माझी मम्मी आणि भाऊ कुठंय ?
आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन अनेक वर्षांचा लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १३ वीत शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.
तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली होती ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात तर मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं झालं ? ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं सांगायचं ? ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलीसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगतोय. दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात काहूर आणून जातात.
© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )
No comments:
Post a Comment