Wednesday, December 30, 2020

संगीतवही कुठे आहे ?

 संगीतवही कुठे आहे ?

        मला त्यावेळीपासूनच संगीत विषयाची खूप आवड होती. आवड होती म्हणून सवडही मिळायची. कणकवली डी.एड्. कॉलेजला असताना घडलेली घटना माझी फजिती करणारी जास्त आहे. परिपाठात प्रार्थना , समुहगीते आणि संस्कारगीते सादर करावी लागत. मला परिपाठ आवडे तो यामुळेच. 

          पण कथाकथन , वक्तृत्व आणि निवेदन यात मी भाग घेत नसे. मला प्रतिज्ञा म्हणतानाही थरथरायला होत असल्याचे जाणवे. एक हात करुन पुढे प्रतिज्ञा म्हणताना माझा हात थरथरताना मी कित्येकदा प्रत्यक्ष पाहिलाय. पण गाणं म्हणताना कसातरी आत्मविश्वास आणून गायन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. मी जरा लयीत आणि सुरात होतो कदाचित. पण तालाचा अद्याप पत्ता नव्हता. बोंडाळे मॅडम संगीत छान शिकवत. त्यांच्या आवाजाने भारावून जायला होई. 

          पेटी वाजवताना मॅडम तल्लीन होऊन गाऊ लागल्या कि मला आपणही गायला पाहिजे असे वाटत राही. त्यामुळे सहाजिकच मी त्यांनी शिकवलेली गाणी घरी येऊन म्हणू लागलो. सेकंड इयरच्या मुलांमधील सर्वच उपक्रमांमधील क्रियाशीलता बघून आम्ही सगळेचजण भारावून गेलो होतो. भावी आदर्श शिक्षक घडण्याची सुरुवात साक्षात पाहात होतो. मलाही त्यांच्यासारखे करायचे आहे ही ऊर्मी माझ्यात डोकावत होती. मी त्या ऊर्मीला वाट देत गेलो. आमचा पूर्ण वर्गच विविध व्यक्तिमत्वांनी संपन्नच होता. प्रत्येकजण एकमेवाद्वितीयच होता. मीच लाजराबुजरा होतो. हेसुद्धा माझे आगळेवेगळेपण असेलही. 

          मला संगीत विषयाची सर्व वही लिहून काढायची होती. मी ती जीवापाड जपत असे. त्यामुळे माझ्या संगीत वहीवर सर्वांचा डोळा होता कि काय नक्की सांगता येणार नाही. पण सगळेच माझी वही घेऊन आपला गाण्यांचा संग्रह वाढवत चाललेले मला आवडतही होते. एकदा असाच वर्गात असताना संगीतच्या तासिकेला माझी वही मला सापडेना. मी सगळीकडे शोधली. पण व्यर्थ !  काहीच उपयोग झाला नाही. सगळ्यांना विचारले. सगळ्यांची बाके तपासली. संगीत वही सापडली नाहीच. 

          मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. मी रडायचा फक्त बाकी होतो. सगळेजण माझा चेहरा बघून ओळखून गेले होते. माझी फजिती करण्यासाठी कुणीतरी माझी संगीतवही मुद्दाम लपवून ठेवली होती. पण मी त्यांची ती गंमत समजू शकलो नाही. शेवटी अश्रू अनावर झाले. मी स्फुंदु लागलो आणि चरफडू लागलो. सर्वजण ' काय झाले रे प्रवीण  ? , आता बरा होतास ? या सोज्वळ आविर्भावात. मी त्यामुळे आणखी डिवचला जाई. शेवटी ज्याने वही लपवून ठेवली होती, त्याला माझा अधिक अंत पाहवेना. दोन दिवस मी वहीच्या शोधात होतो. घरी शोधली. दुकानात शोधली. घरचे सगळेजण मलाच दोष देत होते.

          माझा बेंचमेट संजय शेटे सुद्धा त्यांच्यात सामिल होता. दुसऱ्या दिवशी ' संतोष मधुकर तुळसकर ' ने माझी वही आणून दिली. आदल्या दिवशी त्याने वहीला वाळवी लागल्याचे खोटेच सांगितले होते. माझी संगीत वही मिळाली म्हणून माझा चेहरा खुलला. त्या वहीसाठी मी माझ्या भावासारख्या मित्रांबद्दल राग राग केला. ते माझे सर्व मित्र (  मैत्रिणी ) आता विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. फक्त ज्याने माझी वही लपवून ठेवली तो संतोष आज हयात नाही याचे वाईट वाटते. 

          खेडला क्षमताधिष्ठित प्रशिक्षण असताना पहाटे नदीत आंघोळीला गेलेला आमचा संतोष गेला तो परत आलाच नाही. संगीतवही कायमची हरवली असती तरी चालले असते , पण आमचा सर्वांना आनंद देणारा संतोष हवा होता. संतोषच्या परिवाराच्या आयुष्यातील संगीत कायमचे बेसूर झाले.


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...