Wednesday, December 30, 2020

हादरा देणारी दादरा शाळा

हादरा देणारी दादरा शाळा

        आपली जन्मभूमी ही आपली कर्मभूमी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. मला अगदी तसेच वाटत होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक भरती होती. मी अर्ज केला. परीक्षा दिली.पास झालो. मुलाखतीत सोपे प्रश्न विचारले होते. पण मुलाखतीची मला नेहमीच भिती वाटत आलेली. शेवटी सिलेक्शन यादी प्रसिद्ध झाली. आदेश घरपोच मिळाल्यावर माझे बाबा स्वतः खेडला घेऊन आले. थेट शाळेतच आले. त्यावेळी संपर्क करण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागे. पत्राने कळवले तर उशिर होणार होता. म्हणून स्वतः येऊन बाबांनी मला कमालीचे थक्क करुन सोडले. 

मला माझ्या जिल्ह्यात नोकरी करण्याची अनमोल संधी मिळाली होती. माझी बोलतीच बंद झाली होती. इतका आनंद झाला होता कि तो व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नव्हते. आपल्याला आता ही नोकरी सोडावी लागणार म्हणून रात्रभर झोपू शकलो नाही. जामगे सीमावाडीतील ग्रामस्थांना माझ्या नवीन नोकरीविषयी न सांगता मला निघायचे होते. नोकरीचा राजीनामा द्यायचा म्हणजे काही रितसर बाबी पूर्ण करायच्या होत्या. त्यावेळी १२०० रु. बेसिक पगार होता. खेड पंचायत समितीत १२०० रु.भरुन पावती घेतली. लेखी राजीनामा देऊन त्यावर पोच घेतली.

 कर्मभूमी सोडून जन्मभूमीची कर्मभूमी करायला निघालो तरीही हातपाय थरथरत होते. मी माझ्या पायावर धोंडा मारुन घेतोय असेही वाटून सर्वांगाला घाम फुटत होता. पण मनोमन निश्चय ठाम होत होता.माझ्यासारखे अनेकजण नोकऱ्या सोडून जाताना बघून धीर एकवटण्याचा प्रयत्न करत होतो. चेहऱ्यावर ' कभी खुशी , कभी गम ' च्या भावना दिसत होत्या. दोन- तीन गाड्या बदलत बदलत कणकवली मुक्काम गाठला. आई आणि भावंडे वाटच पाहत होती. आल्या आल्या पहिल्यांदा आईच्या कुशीत घुसलो. 

आई म्हणाली , " झिला, बरा झाला इलस तो, तू नाय तर आमका घर कसा खावंक येता. आता हयच नोकरी कर." मी सगळ्या भावंडांची विचारपूस केली. माझ्या मोठ्या दोन बहिणींची लग्ने झाली होती. आता लहान दोन भावंडे म्हणजे न्हानू आणि पपी यांचे शिक्षण सुरू होते. मला देवगड तालुका मिळाला होता. शाळा समजली नव्हती. दुसऱ्या दिवशी पंचायत समिती देवगड येथे लवकरच हजर झालो. पुढे सेवाज्येष्ठता मिळेल हा हेतू होता. 

त्यावेळी गढिताम्हाणे गावात ५ शाळा होत्या. त्यातील चार शाळा द्विशिक्षकी होत्या. आम्ही सुरुवातीला गेलेले चारजण गढिताम्हाण्यात नेमले गेलो. देविदास प्रभुगांवकर, वल्लभानंद प्रभु, सदानंद गांवकर आणि मी. जणू आम्हा चारजणांची गढिताम्हाणे गाव वाटच बघत होतं. मला गढि. दादरा शाळा मिळाली होती. दादरा नाव वाचून मला त्याचवेळी हादरा बसला होता. नंतर समजले कि ती धनगरवाडीची शाळा होती. ऐन पावसाचे दिवस होते. नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. आम्हाला शाळेकडे जाण्याचे दोन मार्ग सांगण्यात आले. तळेरेमार्गे आणि तळेबाजारमार्गे असे ते दोन मार्ग होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्याचदिवशी न जाता दुसऱ्या दिवशी शाळेकडे जायचे ठरवले. सकाळी सहाची कणकवली रत्नागिरी गाडी पकडली. तळेरे स्थानकात उतरलो. 

तिथून गढिताम्हाणे गाडीत बसून गढिताम्हाणे नं.१ शाळेकडील आमराईस्टाॕपवर उतरुन मुख्याध्यापकांच्या खोलीवर गेलो. गोसावीगुरुजी जेवण बनवत होते.  त्यांना आम्ही काल तालुक्याला हजर झाल्याचे सांगितले. पण त्यांनी मला आदल्या दिवशीच्या तारखेला हजर करुन घेण्यास नकार दर्शविला. मग काय आलो तो दिवस अखंड नोकरीची सुरुवातीची तारिख ठरली. माझी शाळा एकशिक्षकी होती. 

लक्ष्मण चौधरीगुरुजी तिथे एक नंबर शाळेतून कामगिरी करत होते. त्यांच्याबरोबर चालत चालत मी आणि बाबा मजल दरमजल करीत दादरा धनगरवाडी गाठली. तीन चार चढावाच्या घाट्या चालताना माझा आणि बाबांचा जीव चांगलाच वर आला. सलग चार किलोमीटर चालून पाय दुखून आले होते. धनगरांच्या शेळ्यांशिवाय वाटेत कुणीही दिसले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींना  चौधरीसर हात वर करुन दाखवताना दिसत होते. कुठे घेऊन चाललात सर ? कधी येणार शाळा ? असे प्रश्न मी विचारत होतो. ही काय आली, आता थोडेच चालायचे आहे असे म्हणत पाऊण तास चालतच होतो. 

अखेर शाळा लांबवर दिसू लागली. आता मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला होता. शाळा एका वर्गखोलीची होती. तीन चार मुलं व्हरांड्यात बसून सरांची वाट बघत बसली होती. बाकीची मुलं सरांनी हाक मारुन बोलावून आणली होती. ८- ९ मुले ' के रं , के रं ' करत काहीतरी कुजबुजताना दिसली. मला त्यांची भाषा समजेना. सरांनी मला सांगितले कि ' के म्हणजे काय चे लघुरुप आहे ' मी निःशब्द झालो. पुढे साडेसहा वर्षे मला त्या शाळेत एकट्याने काम करायचे होते हे मला माहितही नव्हते. त्या शाळेत असताना मी तावून सुलाखून निघालो. 

केंद्रप्रमुख शिरवडकरसर यांनी दरभेटीच्या वेळी बारिकसारीक गोष्टींचा शेरेबुकात उल्लेख केल्याने खूप शिकता आले. घडीचित्रे व शब्दकार्डे हा नवोपक्रम राबवला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात पहिला क्रमांक आला. मला वाटले मी आता खूप काही प्राप्त केले आहे. माझी ४ थीतील सर्व मुले संपूर्ण इंग्रजी पुस्तकाचे वाचन करु लागली होती. गढिताम्हाणे आमराईवाडीत यादवगुरुजींच्या घरी राहत होतो. रोज ८ किलोमीटर चालत तरी होतो नाहीतर सकाळी ९ वाजता गाडीने शाळेत येत होतो. गाडी पकडायची तर जेवण लवकर करुन डबा घेऊन गाडीसाठी पळत बाहेर पडावे लागे. एवढे करुनही उशिर झाला आणि गाडी चुकली तर ४ किलोमीटर चालण्याशिवाय पर्याय नसे. 

शेवटी काही महिने शाळेतच राहिलो. शाळेत लाईट नव्हती. रात्रीच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कसेतरी पिठीभात बनवून रात्रा संपण्याची वाट पाहिली. शाळा वस्तीच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती. शाळेच्या बाजूला हापूस आंब्याच्या बागाच बागा होत्या. त्यात रानटी डुकरांचे वास्तव्य असल्याने शिकारी लोक दिवसा दिसत. एकदा तर बंदुकीच्या आवाजाने तीन चार रानडुकरे शाळेच्या दिशेने सैरावैरा धावत आलेली. मी धसका घेतला. मग धनगरवस्तीत राहायचे ठरवले. त्यांचा मांगर राहण्यास मिळाला. मुले रात्री अभ्यासाला येत. त्यांची सोबत होत होती. माणसे आदराने दूध , दही देत होती. शनिवारी घरी येताना ताज्या भाज्या देत होती. हापूस आंबे देत होती. मुलांचा मला लळा लागला. पालकांचा माझ्या कामावर विश्वास बसला. त्या शाळेने मला खूप शिकवले. त्या अशिक्षित ग्रामस्थांचे निष्पाप प्रेम बघत होतो. असं दुर्मिळ प्रेम मिळण्याचे भाग्य मला लाभले. आता ती शाळा बंद झाली असली तरी माझ्या मनात ती अजूनही तशीच सुरु आहे.



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...