Wednesday, December 30, 2020

माझ्या पहिल्या नेमणुकीची गोष्ट

माझ्या पहिल्या नेमणुकीची गोष्ट 

             १९९६ सालातली गोष्ट. मी नुकताच डी. एड्. झालो होतो. निकालही माझ्या मनासारखा लागलेला. अध्यापक महाविद्यालयात दुसरा आल्याचा आनंदही गगनात मावेनासा झालेला. निकाल दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसता पाहत बसत असे. रात्री मस्त स्वप्नामध्ये रंगून जाई. स्वप्नातच एखाद्या शाळेत शिक्षक बनून गेल्याचा भास होत राही. मी खडबडून जागा होई. उगीचच जाग आली म्हणून पुन्हा झोपून तसंच स्वप्न पडावं याचा विचार करत असताना कधी झोप लागे कळतही नसे. 

नोकरी नसल्यामुळे दुकानात जावे लागायचे. आमचे दोन खुर्च्यांचे सलून होते. त्यात बाबा आणि काका काम करायचे. बाबांनी मला सलूनात काम करायला शिकवले होतेच. आता मला नोकरी मिळेपर्यंत तेच करायचे होते. बारावी सायन्समध्ये ७४ % गुण मिळवलेला मी त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे डी.एडला गेलो होतो. गिऱ्हाईकांची केसदाढी करताना मला सतत नोकरीची चिंता भेडसावत होती. 

मी आतल्या आत धुमसत होतो. बाबांनी सांगितलेली सगळी कामे मनापासून करत असलो तरी मी खुश नव्हतो. त्यावेळी आमच्या दुकानात येणाऱ्या वृत्तपत्रात जाहिराती पाहण्याचा मला छंदच जडला होता. एकदा एक अशीच जाहिरात वाचली.  ' शिक्षक पाहिजे ' या जाहिरातीने मला हायसे वाटले. एक दाढी झाली कि मी पुन्हा तीच जाहिरात वाचताना बाबांनी मला पाहिले. ते म्हणाले , तू आता आधी दुकानात काम कर . जाहिराती वाचून नोकरी मिळत नाही. मला रडूच कोसळले. मी रागाच्या भरात बाबांना उलट काहीतरी बोलून गेलो. भर दुकानात मला रडू आवरेना. मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. रडता रडता बोलत होतो आणि बोलता बोलता रडत होतो. बाबांनी मला तोंड काळं कर असं म्हणून घरी पाठवलं. घरी आलो. आईला घडलेली घटना मोठ्याने हुमसून हुमसून सांगून टाकली. 

आईने मला जवळ घेतले. मला खूप धीर वाटला. आईच्या कुशीत शिरलो. आज माझी आई हयात नाही. पण तिच्या प्रेमाची ऊब मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी असेल. तिने रात्रीच बाबांना सांगून टाकले. " आपला मुलगा आता मोठा झालाय, त्याला पाठवा नोकरीच्या शोधात. " बाबांना मग आईचे ऐकावेच लागले. मी कपडे भरुन तयारच होतो. नोकरीची जाहिरात रत्नागिरी जिल्ह्यातील होती. कणकवलीपासून एस्.टी. ने ४ तास तरी जायला लागतात. २१ वर्षांचा मी रत्नागिरी गाठली. 

माझे छोटे मामा रत्नागिरी येथे रहात असल्याने मला त्यांची मदत घेऊन नोकरी मिळवायची होती. दोघेही नोकरीला असल्याने त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता. पटवर्धन हायस्कूलसारख्या रत्नागिरी शहरातील नावाजलेल्या शाळेत इंटरव्ह्यु द्यायचा म्हणजे सोपी गोष्ट नव्हती हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. हायस्कूलच्या प्राथमिक विद्यामंदिरात एकच शिक्षक हवा होता. पण त्या एका जागेसाठी ४० पेक्षा जास्त उमेदवार आले होते. मी एकटाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतो. सर्वजण रत्नागिरीतील होते. मी अगदी साध्या कपड्यात गेलो होतो. मोठ्या भावोजींनी मला एक पांढरा शर्ट आणि मातकट पँट दिली होती. ती मापाने खूपच मोठी होती. बाबांनी ती माझ्या मापाची करुन दिली होती. तरीही ती मला फिट बसत नव्हती. पट्टा लावला तरी खाली सुटत होती. त्यावेळी मी काटकुळा असल्यामुळे पँटचा नाईलाज होता. 

सगळ्या उमेदवारांकडे मी पाहून घेतले. भितीने पोटातला गोळा मोठा होत होता. मामा मला सोडून कामावर कधीच निघून गेले होते. आईबाबांची आठवण आली. संकटसमयी मला नेहमीच आईची आठवण अजूनही येते आणि जीव कासावीस होतो. धीर एकवटून सभागृहातील बेंचवर खिळून बसलो. प्रशासनाधिकारी आले. त्यांनी काय परीक्षा घेणार ते धीरगंभीर आवाजात समजावून सांगितले. ' आदर्श शिक्षकाची माझ्या मनातील कल्पना ' असा निबंध लिहिण्यास सांगण्यात आला. मी माझी शब्दशक्ती वापरुन निबंध लिहिला. त्यानंतर प्रत्येकाचे नाव पुकारुन बोलावले गेले. माझे सगळे कागदपत्र म्हणजे मी होतो. सगळे टापटिप , मी मात्र मलाच गबाळा वाटू लागलो. इतरांच्या कपड्यांना पाहून मला माझीच लाज वाटू लागली. 

बारावीचे मार्कलिस्ट बघून समोरचे परिक्षक खुश झालेले दिसले. योगप्रवेश परीक्षा पास झालेले सर्टिफिकेट पाहून ते अधिक चमकलेले दिसले. मला १२०० रु. इतका मासिक पगार सांगण्यात आला. तुम्हाला आम्ही पत्राने कळवू हे त्यांचे शेवटचे वाक्य मला दिलासा देणारे असले तरी एवढ्या भारी लोकांमधून माझी निवड होणार नाही याचीही खात्री झालेली. दोन चार दिवस थांबून परत कणकवलीला आलो. 

पुन्हा सलून एके सलून सुरू झाले. आणि पोस्टमनने पांढऱ्या लखोट्यातले माझ्या नावचे पत्र आणून दिले. मी ते वाचले. त्यात त्यांनी मराठीचा पाठ घ्यायला बोलावले आहे असा उल्लेख केला होता. मी आनंदाने उडीच मारली. बाबांनाही माझा अभिमान वाटला. त्यांनी मला जायला परवानगी दिली. जवळ घेऊन गोंजारले. मला ज्या प्रेमाची गरज होती ते मिळाल्याने मी त्यांना अधिकच बिलगलो. त्यांनी आम्हा भावंडांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व गोष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. 

रत्नागिरीला पोहोचलो. गाण्याची आवड असल्यामुळे शिकवण्यासाठी कविता निवडली. ३ रीच्या वर्गात ६० मुले दंगा करत होती. मी सुरेल आवाजात कविता गायला सुरूवात केली. मुले चिडिचूप गप्प झाली. मुलांशी गप्पा मारत, संवाद साधत ३० मिनिटे कधी संपली मला आणि मुलांनाही समजले नाही. माझ्यासारख्या आणखी १२ जणांना त्यांनी पाठ घ्यायला बोलावले होते.

२ दिवसांत कळवतो म्हणाले. मी रत्नागिरीतच थांबलो. त्यावेळी फोनची सुविधा माझ्या मामांकडेही नव्हती. मी दुपारी जेवून झोपलो होतो. पत्र्याच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावले. मी जागा झालो. दरवाजात हायस्कुलचा शिपाईमामा दुसरे पत्र घेऊन उभा. मी पत्र वाचले. त्यात उद्या गणितचा पाठ घ्यायला या असे लिहिले होते. मी तयारीला लागलो. ४ थी अपूर्णांक घटक घेण्याचे ठरवले. कागदाच्या चपात्या बनवून पाठ घ्यायला गेलो. वर्गातील मुले अवखळ दिसली. त्यांच्या वयाचा होऊन त्यांना कागदाच्या चपात्या खायला देत खेळातून पाव, अर्धा, पाऊण , पूर्ण या संकल्पना समजेपर्यंत शिकवल्या. मुलांनी कृतीयुक्त सहभाग घेतल्यामुळे माझा हा पाठसुद्धा चांगला झाल्याचे दिसत होते. पण मनात धाकधूक होतीच, कारण यावेळी माझ्यासारखे अजून ५ जण पाठ घ्यायला आले होते. प्रशासनाधिकारी जोगसर आले आणि माझ्या गळ्यात हात घातला. ते म्हणाले ,  " तुला घरी कोणत्या नावाने हाक मारतात रे ? " ते मला माझे आजोबाच वाटले. मला नातवाला ते विचारत होते असं वाटून मीही सांगून टाकले ' बाळू ' . ते अतिशय प्रेमाने अधिक जवळ येऊन मला म्हणाले , " बाळू , तू उद्या येऊन तुझी ऑर्डर घेऊन जा." आता मात्र मला ते स्वप्नच वाटलं. पण त्यावेळी मी खरंच मला करकचून चिमटा काढून बघितला. माझी नेमणूक झाली हे माझं जागेपणीचं स्वप्नंच होतं माझ्यासाठी कायमचं.


@ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली





No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...