Wednesday, December 30, 2020

आता कसे मस्त दिसताय

 आता कसे मस्त दिसताय        

        मी कधीही स्वतःकडे तितकेसे लक्ष दिले नाही. प्रसंगानुरुप जसे लक्ष द्यायला पाहिजे तेवढेच लक्ष माझे माझ्याकडे असे. पण आपण मनाने चांगले असलो तर तनाने सुद्धा चांगलेच असतो. मी नेहमीच मनाने सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माझ्या शरीराकडे जाणीवपूर्वक लक्ष देता आले नाही. दुसऱ्यांना सुख देण्यात व्यस्त असताना स्वतःकडे लक्ष द्यायचे राहूनच गेले. 

          आठ दिवस पत्नी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना तर मला माझ्याकडे लक्ष देणे अजिबात शक्यच नव्हते. मी तिची काळजी घेत होतो. ती बेडवर होती. पण मला मानसिक आधार देत होती. अर्थात ती स्वतः मनातून हादरुन गेलेली होती हे मला समजत होते. पण मी काहीच करु शकत नव्हतो. 

          मी तिच्याजवळ बसून बोलत राही. जीवनात आनंद आहे हे सांगत राही. जीवन एक उत्सव आहे , तो साजरा करायला हवा असा पोकळ दिलासा देत राही. ती सुद्धा माझे बोलणे हताशपणे ऐकत असे. स्वतः आनंदाने हसते आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राही. मी तिच्या गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या केसात बोटे घालून तिला येत असलेली डोक्यातील खाज कमी करत होतो. नीट आंघोळही होत नव्हती. केस धुणे होतच नव्हते. केसात उवांनी थैमान घातले होते. मी आय सी यु मध्ये तिच्या उवा काढताना ती म्हणाली होती , " किती करता हो तुम्ही माझ्यासाठी ? मला लवकर घरी जायचे आहे. मला कंटाळा आलाय. कधी मी यातून मोकळी होणार देव जाणे ?  " शिवलिलामृत , मारुती स्तोत्र , गणपती स्तोत्र, महालक्ष्मी मंत्र, गायत्री मंत्र सगळंच तिच्या मुखोद्गत होतं. ती म्हणत असे आणि मी ऐकत असे. कधीतरी ती मला म्हणायला लावी. मग मी ही नाईलाजास्तव म्हणत असे. ती मनापासून म्हणायची. पण मला देवाचाच राग आला होता. त्यामुळे माझ्याकडून मनापासून म्हटले जात नव्हते. फक्त ओठ म्हणत होते , पोटातून भक्ती येत नव्हती. 

          आपला मुलगा पोटातच गेला हे समजल्यानंतरसुद्धा ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. तिच्याकडे बघून माझे काळीज तुटत होते. माझी दाढी वाढली होती. कसातरीच दिसत होतो. ५ मे ला शाळेचा शेवटचा दिवस होता. मी ४ मे पर्यंत रजा घेतली होती. ५ मे ला हजर होणार होतो. ६ मे पासून उन्हाळी सुट्टी पडणार होती. हॉस्पिटलमध्येच वस्तरा घेऊन स्वतःची दाढी केली अगदी आरश्याशिवाय. तिच्यासमोर गेलो तर ती त्यावेळी म्हणाली होती , " आता कसे मस्त दिसताय." तिने मला मस्त म्हणावे ही इच्छा मी कधीच ठेवली नव्हती. 

          त्याच रात्री तिने हॉस्पिटलच्या बेडवरच शेवटचा श्वास घेतला. मी पुरता कोलमडून गेलो. पुन्हा कधी आरश्यात बघताना मला तिचे हे वाक्य कायमच घुमत राहते - " आता कसे मस्त दिसताय." 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


1 comment:

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...