सीमा नसलेली शाळा
कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात नोकरी करत असताना कोकण निवड मंडळ रत्नागिरीची परीक्षा दिली होती. परीक्षा शिर्के हायस्कूलमध्ये होती. मी रत्नागिरीतच असल्यामुळे परीक्षासुद्धा सहजच दिली. पण सहा महिन्यातच नोकरीचा कॉल आला. मला खेड तालुक्यातील जामगे गावातील सीमावाडी शाळा मिळाली. मला अतिशय आनंद झाला होता. कारण मला जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली होती. पण दुःखही झाले. कृ. चिं. आगाशे शाळा सोडणे माझ्या जीवावरच आले होते. पण पगार आणि पेन्शन या दोन शब्दांमध्ये मी अडकलो.
जिल्हा परिषदला नोकरी केली तर मला सुरुवातीपासूनच पूर्ण पगार मिळणार होता आणि निवृत्तीनंतरचे फायदे मिळणार होते. मी माझ्या प्राथमिक शाळेतील नारकरगुरुजींना भेटायला गेलो. त्यांनी सांगितले , " तुला जर शिक्षिका पत्नी हवी असेल तर जिल्हा परिषदेची नोकरी कर. म्हणजे तुम्ही कधीतरी पती पत्नी एकत्र येऊ शकाल. तुला आर्थिक मदत करणारी सहचारिणी मिळेल. म्हणजे तुझा तिहेरी फायदा होईल. " मी त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानला. चाळणी परीक्षा देऊन मिळवलेल्या कृ. चिं. शाळेचा मी राजीनामा दिला. राजीनामा देताना मला तेव्हा अवघड वाटलेच पण अजूनही पश्चात्ताप होतो आहे. मी केले ते बरोबर केले का ? या प्रश्नाचे मला उत्तर देता येत नाही. शेवटी माझ्या बाबांना आणि शिक्षक असलेल्या भाईमामांना घेऊन मी खेड गाठले.
माझ्याबरोबर माझे बरेच मित्र आणि मैत्रिणी नोकरीवर हजर व्हायला निघालेल्या होत्या. मला त्यांची सोबत होतीच. पण तरीही बाबा आणि मामा कुतुहल म्हणून बरोबर आले होते. शाळेचे गाव खेडपासून १२ किलोमीटर अंतरावर होते. रामदासभाई कदमांच्या गावात जायला मिळाले म्हणून विशेष आनंद होता. सीमावाडी शाळा दोन वाड्यांच्या मध्यभागी होती.
द्विशिक्षकी शाळा. आठ मुले आणि मुख्याध्यापिका बाचीमबाई. मला बघून त्यांना कोण आनंद झाला. मी बाईंना नमस्कार केला. त्यांनी मला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणेच समजले होते. मला शाळेतच आईसारख्या बाई मिळाल्याचे समाधान होते. दोन वर्गखोल्यांची शाळा. ३ री आणि ४ थी चे वरचे वर्ग मला बाईंनी शिकवायला दिले. माझ्या दोन्ही वर्गातील ८ -९ विद्यार्थी माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहात होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर खाली मान घालून लाजताना दिसत होते.
कुणबी समाजवस्ती असली तरी शिक्षकांबद्दल अपार आदर होता. तिकडे गुरुजींना ' गुर्जी ' म्हटले जाई. मीही लवकरच ' कुबलगुर्जी ' झालो. मागील शाळेतील एका वर्गात ६० मुले सांभाळली होती. आता शाळेतील एकूण १७ मुलांना सांभाळणे मला अगदीच सोपे जात होते. पूर्वीच्या शिक्षकांनी पालकसंपर्क ठेवला होता. शिंदेगुर्जी उपक्रमशील शिक्षक होते असे ऐकायला मिळू लागले. मला मुलांच्या शिक्षणात जास्त रुची होती. हळूहळू २-३ महिन्यांमध्ये मी त्या शाळेशी एकरुप होऊन गेलो. पण तिकडचे जेवण मला जेवायला जमत नव्हते. कसेतरी जेवलो तरी ते माझ्या पोटात टिकत नव्हते.
शेवटी माझ्या विधवा आत्येला मी तिकडे जेवण बनवण्यासाठी घेऊन गेलो. तिला आम्ही सगळे ' दांडगेआये ' म्हणतो. दांडगेआयेने माझी खूप काळजी घेतली. सकाळी पिठले भाकरी, दुपारी गरमागरम जेवण आणि रात्री पूर्ण जेवण जेवल्यामुळे मी आता तब्येतीने सुधारु लागलो. दांडगेआयेला सगळे मावशी म्हणू लागले. ती होतीच तशी प्रेमळ. तिला एक मुलगी झाल्यानंतर तिचा नवरा एका दुर्धर आजाराने गेला. ती त्या अर्भकाला घेऊन आमच्या घरी आली ती गेलीच नाही. ती आता आठवणींच्या रुपाने आमच्या सोबत आहे. माझी दांडगेआये मालवणी बोलायची. मी मराठीत बोलायचो. लोकांना ती तिच्या भाषेसह आवडू लागली. ' गुर्जींची आत्या ' म्हणून ती दोन्ही वाड्यांत प्रसिध्द झाली. पण तिचे ते भावनाविवश होऊन रडणे आणि गावरान भाषेत बोलणे मला चारचौघात लाजवू लागले. शेवटी मला एक चांगली खोली आणि खानावळ मिळाली.मी दांडगेआयेला घरी सोडून आलो. मोरेंचे घर रिकामे होते. त्यांनी विनाभाडे मला राहायला दिले. लाईटबिल दिले तरी ते घेत नसत इतक्या मोठ्या मनाची माणसे घरमालक लाभली होती. कालेकरांनी घरपोच जेवणाची सोय केली.
माझा विद्यार्थी निलेश कालेकर तिन्ही वेळेला माझा डबा आणून देई. संध्याकाळी जवळचे ७-८ विद्यार्थी अभ्यासाला येऊ लागले. १० वी पर्यंतच्या मुलामुलींना मी शिकवू लागलो. मला माझ्या घरच्यांची आठवण काढायला वेळच नव्हता. दोन तीन महिन्यांनी एकदा घरी जायला मिळे. कालेकरांकडील जेवणाने मी चांगलाच सुधारलो. रविवारी खेडला जाऊन दर आठवड्याला नवीन पिक्चर बघण्याव्यतिरिक्त कोणताच विरंगुळा नव्हता. नरवणकरांच्या खानावळीतील चिकन जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आंबये पाटील केंद्रामधील म्हादलेकर केंद्रप्रमुखांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. लवेल केंद्रप्रमुख अनंत शिंदेसर यांनी दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये माझ्यावर खूपच जीव लावला. माझ्या लग्नाला ते मुद्दाम कणकवलीला आले होते. केंद्रातील सगळ्या शिक्षकांकडून विविध नवोपक्रम शिकायला मिळाले.
अजय सावंत, आनंद सावंत , रामचंद्र कुबल यांनी सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. सीमावाडी शाळेत २६ जानेवारीला मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले. सर्व पालक , म्हातारी माणसे घरी येऊन २२ वर्षाच्या मला पायाला हात लावून पाया पडू लागली. त्यांच्या मळणीला जेवायला बोलवू लागली. सामाजिक कामात मोठा मान देऊ लागली. या त्यांच्या सन्मानपूर्वक वागण्याने माझ्यातला अहंभाव कधीच निघून गेला. त्या शाळेत मी फक्त १९ महिनेच काम केले. आता या गोष्टीला २० -२२ वर्षे होऊन गेली तरी शेजारच्या १०१ वर्षाच्या घागआजीने मला घातलेला साष्टांग नमस्कार आठवून आताही गहिवरुन जायला होते.

No comments:
Post a Comment