नागपंचमी आणि उष्टी पाने
आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता नदी कधी आली ते समजले देखील नाही. नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला.
लांबलचक लोखंडी साकव एकदाचे पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला. शेत छान डुलत होतं . आम्हाला जणू बोलावत होतं . आमचं स्वागत करत होतं . बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची त्रेधा होत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नाही.
आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लीलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत. आम्ही नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. कोण आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण आहे.
घरी आलो. मस्त वाफाळलेला चहा घेतला. आमच्या बाबांनी बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी आणला. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होतीच.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.
बाबानी नागोबाचे पूजन सुरु केले. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य, दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता. सुखकर्ता दुःखहर्ता , लवथवती विक्राळा अश्या आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले. नंतर केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी, जिलेबी,पापड, वाटाणे- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र येतोच.
त्यालाही कारण तसेच आहे. बाबांच्या बालपणीची गोष्ट आहे. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे झाली. आता आजी जेवायला बसली. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी चाटू लागली. ते माझ्या बाबांनी पाहिले व आजीवर ओरडले. म्हणाले, आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. सर्व भावंडांनी ते ऐकले व बाबांवरच ओरडायला लागली, ' तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस.' हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले आणि मोठ्याने रडू लागले. आजी म्हणाली , ' अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांनी उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच.
संध्याकाळी नागाचे विसर्जन केले आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. सकाळी दुसऱ्यादिवशी आज पाणी वाढलेच होते. कमी होण्याची शक्यता नव्हतीच. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले आणि जीव भांड्यात पडला. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पाणीमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत होत्या.
© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )
No comments:
Post a Comment