Monday, January 18, 2021

मी दारु पितो

मी दारु पितो


          मी वयाच्या १४ वर्षापासून आमच्या सलूनमध्ये काम करायला लागलो होतो. एकाच दुकानात दोन व्यवसाय सुरु होते. सलून आणि शिवणकाम. बाबा उत्तम टेलरकाम शिकले होते. सलूनकाम नसताना बाबांचे टेलरिंग सुरु असे. सर्व प्रकारचे कपडे स्वतः कापून ते शिवण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केले होते. आई शिवणकाम करायची. खूप काम असताना घरातले काम संपवून ती दुकानात येऊन शिवणकाम करत बसे. मी पोटात असताना सुद्धा तिने बाळंत होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत काम केल्याचे बाबा सांगतात. 

          आता गरोदरपणात सलग नऊ महिने बेडरेस्ट करण्याची प्रथा सुरु झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे सिझर होण्याचे प्रमाण वाढले असावे. पुढे कधीतरी नॉर्मल बाळंतपण हा दुर्मिळ योग समजला जाऊ शकेल. 

          दुकानात गिऱ्हाईक आले कि त्यांच्या दाढीला गरगरीत साबण लावण्याचे काम माझे असे. उंची नाही पुरली तरी शरीराचा पूर्ण झोका देऊन मी साबण लावण्याचे काम उत्साहाने करी. कधीकधी साबण गिऱ्हाईकांच्या तोंडात जाई. पण बिचारी गिऱ्हाईके सहनशील होती. ती म्हणत, " कर काय ते ?  पण शिक. " त्या गिऱ्हाईकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी शिकत गेलो. काही वयस्कर गिऱ्हाईकांचे चेहरे गाल आत गेलेले, हाडे बाहेर आलेले असत. त्यांची दाढी करणे अवघडच काम. 

          लोकांच्या तोंडाला नेहमी हे वाक्य मी ऐकलेले आहे , " काय करत होतास हजामती ? " " हजामत करायची नाहीय. " " हजाम आहेस काय ? " बोलणारे सहज बोलून जातात पण तो धंदा करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींना नक्कीच आश्चर्य वाटते. कारण हजामत करणे एवढी सोपी गोष्ट आहे काय ? मला अवघड वाटलेली गोष्ट लोकांना सोपी कशी वाटते कोण जाणे ? पण कोणालाही जातीवरुन बोलणे बरोबर नाही हे मला लहानापासूनच कळले. आपल्या मनाला लागते तर ते दुसऱ्यांच्या मनालाही लागणारच ना !!! कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचाही विचार करायला हवा. 

          त्या दिवशी दाढी करायला म्हाडेश्वर आले होते. त्यांची दाढी वस्तरा पाजळून करावी लागे. वस्तरा पाजळणे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या दगडावर धार काढून मग तो चामड्याच्या पट्ट्यावर ' खणखणे ' पर्यंत घासणे. त्यात पाच मिनिटे जात. मला बाबांनी वस्तरा पाजळायला दिला. मी मस्तपैकी पाजळला. तो लखलखेपर्यंत. दाढीला गरगरीत साबण लावून दाढी करायला सुरवात केली. दाढीचे केस तुटता तुटत नव्हते. मला घाम आला. 

          बाबा मशिनवरुन उठले आणि त्यांनी दाढी पूर्ण केली. नंतर बरेचदा मी त्यांची दाढी घोटूनघोटून केल्याचे मला अजूनही चांगलेच आठवतेय. ते निघून गेले आणि त्यांच्यामागून आलेले गिऱ्हाईक म्हाडेश्वरांबद्दल बोलू लागले. ते म्हणाले , " हे म्हाडेश्वर रोज दारु पितात, मला माहित आहे." बाबांना हे खरे वाटेना. कारण बाबा त्यांना बरीच वर्षे ओळखत होते. त्यांना त्यांच्याबद्दल यत्किंचितही शंका आली नव्हती. 

          याच म्हाडेश्वरांच्या मुलाने काही कारणास्तव राॕकेल अंगावर ओतून पेटवून स्वतः आत्महत्या केली होती. त्यानंतर ते पुरते कोलमडून गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे भारीवाले सगळे कपडे आमच्या बाबांना आणून दिले होते. बाबांनी मग ते काही आपल्या भावांना तर काही गरजू व्यक्तींना वाटलेही होते. एखाद्या मुलाने वडिल असताना आत्महत्या केली असेल तर ते वडिल एवढे हतबल होतात कि ते रोजच मरणाची वाट पाहत मरत असतात. ते मरणच जगत होते. 

          चार पाच दिवसांनंतर पुन्हा ते आले. दाढी करता करता बाबांनीच विषय काढला. बाबा म्हणाले , " अहो म्हाडेश्वर , एका माणसाबद्दल मला एवढा विश्वास आहे कि तो माणूस कधीच दारु पित नाही असे मला वाटते , मला त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याने दारु पितात असे सांगितले तर मी विश्वास कसा ठेवायचा ? मला पडलेले हे कोडे आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा." म्हाडेश्वर खूप हुशार होते. ते काहीही उत्तर न देता निघून गेले होते. दोन तीन दिवसांनंतर दाढी करायला आले. दाढी करुन झाली. त्यांनी आपले तोंड उघडून बाबांच्या नाकाकडे नेले व दीर्घ श्वास सोडून म्हणाले , " मी दारु पितो." बाबांनी दारुचा वास ओळखला आणि त्यांना म्हाडेश्वरांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले होते. 

          असे हे म्हाडेश्वर आता या जगात हयात नसले तरीही म्हाडेश्वरांसारखी अशी कितीतरी माणसे आढळतील, जी आपली दुःखे विसरण्यासाठी असा मार्ग अवलंबतात. त्याने दुःख कमी होते कि नाही समजायला मार्ग नाही. काहीही झाले तरी दारु हा काही दुःख विसरण्याचा सर्वोत्तम मार्ग नाहीच नाही, मग तो इतरांनी तरी का अवलंबायचा ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...