Friday, January 22, 2021

नकय नकय जावया

नकय नकय जावया


          आपण आपल्या इच्छा प्रत्येकवेळी सांगत बसत नाही. मनात ठेवून राहतो. पोटातली इच्छा ओठात येत नाही. तुमच्या ओठातून बाहेर आल्याशिवाय ती दुसऱ्यांना समजणार तरी कशी ? लहानपणापासून असेच होत राहते. इच्छा आकांक्षांची मोठीच्या मोठी लांबलचक यादी आपण आपल्यालाही कळू देत नाही एवढी लपवून ठेवतो. 

          मनात आलेली गोष्ट बोलण्याचा संकोच करत राहतो. यांना काय वाटेल ? त्यांना काय वाटेल ? असे विचार मनातल्या मनात करत राहतो आणि कधीकधी विसरुनही जातो कि आपण कोणत्या इच्छा मनात आणल्या होत्या ते !!!! काहीजण तर आपल्या इच्छा सतत मारण्याचं काम करत असतात. इच्छा असायलाच पाहिजेत. त्या चांगल्या असल्या पाहिजेत. त्या वाईटही असू शकतात. 

          वाईट इच्छा मात्र नक्कीच मारुन टाकाव्यात. त्यांना जवळ फिरकू देऊ नये. पण ज्यांना सोडायचं असतं त्याच आपण होऊन वेगाने मागे लागत असतात. त्यामुळे त्यांना सोडणंही शक्य नसतं. चांगल्या इच्छांचं सतत संवर्धन करत राहायला हवं. त्यांचं प्रबळ महत्त्वाकांक्षेत रुपांतर करायला हवं. त्या पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन तर बघा. त्या लवकरच पूर्ण होऊ लागतील. 

          अर्थात त्यासाठी आपल्याकडे कमालीचा संयम हवाच. ' इच्छा तिथे मार्ग ' असं सुवचनच आहे. इच्छाशक्ती असली तर सगळी योजलेली कार्ये हवी तशी घडू लागतात. सगळीच नाही साध्य होत , पण आपण प्रयत्न करण्यात कमी पडलो असं होऊ नये. आपण त्यांचा आपल्या गतीने पाठलाग करत राहायला हवं. कधीतरी सापडणार नक्की. आपला वेग त्या इच्छेला गाठणारा हवा. 

          नुसती इच्छा बाळगली आणि बसून वाट बघत राहिलो तर काहीच घडणार नाही. ' असेल माझा हरी , तर देईल खाटल्यावरी ' असं म्हणणारे सतत मागे राहीलेले मी पाहिले आहेत. ते सगळ्याला मुहुर्त बघत बसतात. आज शनिवार आहे म्हणून नाही करायचे अशी इच्छा बाळगतात. सगळे शनिवार फुकट घालवतात. ' न कर्त्याचा वार शनिवार ' ही म्हण त्यांना खरी करुन दाखवायची असते जणू. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच अंमलात आणा. 

          वार आणि मुहुर्त बघत बसू नका. तुम्ही जन्माला येताना मुहुर्त बघून जन्माला आलात का ? नाही ना ? मग झालं तर .... तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला सुरुवात कराल तो चांगला मुहुर्त आणि चांगला दिवस. सुरुवात करुन बघा , नको नको म्हणत वेळ दवडू नका. 

          एकदा एक जावई सासरवाडीला आले होते. त्यांच्यासाठी छान बेत केला होता. सासुबाईंनी व्हायनात ( मालवणी शब्द ) तीळ कुटून मस्त तिळकूट बनवलं होतं. जावयांच्या नाकात तो खमंग वास भरला होता. जेवायला वाढण्यात आले. जावई भरपूर जेवले. आग्रह करण्यात आला. संकोचून जावयांनी तिळकुट थोडेच खाल्ले. पण तिळकुटाची चव काही त्यांच्या चवदार जीभेवरुन जाता जाईना. सगळे झोपले. 

          जावई मात्र झोपेत जागे होते. डोळे मिटून सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहत झोपलेले. सगळे गाढ झोपलेले लक्षात येताच जावई मांजराच्या पावलांनी व्हायनसळापर्यंत वास काढत पोहोचले. जाता जाता सासुबाईंना त्यांचा पाय लागला होता. जावयांच्या ते लक्षात आले नाही. ते आपले आपल्याच तंद्रीत. व्हायन सापडले. जावयांनी योगा करायला सुरुवात केली. पोटावर झोपून ते मकरासन करु लागले. 

          सासुने हळूच उठून कानोसा घेतला. बघते तर काय ? जावई अंथरुणात नाहीत. अरे बापरे !!! आमचे जावई अंधारात चालतात कि काय असे तिला वाटले. ती त्यांच्या मागून गेली. अंधुक दिव्याच्या उजेडात स्पष्ट दिसत नव्हते. पण हालचाली जाणवत होत्या. आपले जावई रात्री योगाभ्यास करत असावेत असे तिला वाटले. तीने आणखी पुढे जाऊन बघितले. तिला मांजरासारखा चाटण्याचा आवाज आला. तिने खाली वाकून पाहिले तर तिचे जावई जमिनीला चिकटलेल्या व्हायनातील उरले सुरले तीळ चाटत होते. तिळकुटाचा आस्वाद घेत होते. सासू गालातल्या गालात हसली व परत जाऊन झोपली. 

          सकाळी सगळेजण उठले. जावईसुद्धा उठले. त्यांच्या जीभेवर अजूनही तिळकूटाची चव रेंगाळत असावी. सासूने जावयांना गमतीने म्हटले , " नकय नकय जावया , व्हायन चाटून खावया " हे ऐकताच जावयाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जावयाची पुरती फजिती झाली होती. 

          अशा अनेक घटना आपल्या जवळपास घडत असतीलही. पण इच्छा असताना नको नको म्हणणे बरे नाही. नाहीतर इच्छा उफाळून येते आणि अशी फजितीही होऊ शकते. ही एक गंमतगोष्ट आहे. घडलेली असेल किंवा नसेलही. पण कित्येक माणसं या जावयांप्रमाणे असू शकतात. त्यांनी  " कशाला , कशाला " म्हणत लाजत राहू नये. हवी असलेली वस्तू विनंती करुन थेट मागावी. कधीकधी  जेवणाच्या पंगतीमध्ये असाही आग्रह केला जातो, " लाजू नका, मागू नका , पोटभर जेवा. " आता काय जेवणार कप्पाळ !!!! जेवढ्या इच्छा दाबून ठेवाल , त्या कधीतरी उचंबळून वर येतील. आपण त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...