Saturday, January 2, 2021

मी रंगवतोय

 मी रंगवतोय 

   

माझ्या भावाचा कलाशिक्षकाचा कोर्स नुकताच पूर्ण झाला होता. त्याने ए. टी. डी. केल्यानंतर पुढे जी. डी. आर्ट करण्याचे मनोमन ठरवले होते. मग काय ? त्याने ठरवले आणि आम्हीही त्याला परवानगी दिली. खर्चाची आम्हाला कल्पना नव्हती. पण त्याला कधी कधी आठवड्यालाच  २ - ३ हजाराचे रंग, ब्रश, कॅनव्हास अशा महागड्या वस्तू लागत. तो लगेचच मागत नसे. कारण त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. आपले अगदीच अडते आहे असे वाटले तरच तो मागणी करी. त्याने मागणी केल्यानंतर त्याला आठवड्याने वस्तू मिळत. 

गरिबांनी महागडे शिक्षण घेणे, ते व्यवस्थित पूर्ण करण्याला चिकाटी लागते. माझ्या भावाकडे चिकाटी होती. परिश्रम करण्याची क्षमता होती. पण तो बाबांना घाबरत असे. लहानपणी अनेक उचापती केल्यामुळे त्याला खोडकर म्हटले जाई. तो आईला सांगी. आईकडून बाबांकडे ते रात्री पोहोचे. मग बाबा म्हणत , “ उद्या बघू.” त्यांनी कधी नाही म्हटले नाही. ते तरी लवकर कसे देऊ शकणार होते ? आम्हाला त्यांचा संघर्ष दिसत होता. 

मग माझ्या भावानेच ठरवले. आपण काहीतरी काम करून पैसे मिळवायचे. एवढी डिग्री मिळवायची आहे तर रात्रंदिवस काम करून पैसे मिळवीन असे त्याने ठरवूनच टाकले. प्रत्येकवेळी बाबांकडे पैसे मागणेही त्याला अजिबात आवडत नव्हते. 

घरांना रंग काढून देणारे अनेकजण आमच्या दुकानात दाढी, केस करायला येत असत. त्यांच्यापैकी दोघांनी त्याला कामावर यायला सांगितले. घरांना रंग द्यायचे काम होते. काम असेल तसा हा जात असे. चार चार दिवस बाहेर राहून त्यांच्यासोबत भिंतींना रंग काढण्याचे काम करून येतील ते पैसे बाबांकडे आणून देण्याचे त्याने आता सुरु केले होते. बाबांनाही बरे वाटले. पण मला आवडले नव्हते. 

माझा कलाकार भाऊ भिंती रंगवतोय हे मला बघवत नव्हते. भिंतींवर जशीच्या तशी चित्रे काढणारा तो रंगाऱ्यांबरोबर भिंती रंगवून दिवसाची मजुरी आणून देत होता. त्याला आनंद वाटत असल्यामुळे मीही काही बोललो नाही. पण त्याला उन्हातान्हात कामे करताना भरपूर त्रास होत होता. त्याला होत असलेला त्रास मला जाणवे. 

त्यादिवशी तो असाच चार पाच दिवसानंतर कामावरून आला होता. मस्त हसत होता. कामाचे आलेले पैसे बाबांच्या हातात देऊन मनसोक्त जेवला. तो आज खूप दमलेला दिसला. त्याने लगेच अंथरून घातले आणि झोपी गेला.

रात्री चार वाजता मला जाग आली. कसला तरी आवाज आला होता. बघतो तर काय ? भाऊ उठला होता. मला वाटले पाणी प्यायला उठला असेल. तो भिंतीवर उजव्या हाताने काहीतरी वरखाली करत होता. त्याचे डोळे बंद होते. म्हणजे तो झोपेत होता. मी त्याला सहजच विचारले , “ काय रे न्हानू, काय करतोयस ? ” त्यावेळी तो डोळे बंद असतानाच म्हणाला होता , “ मी रंगवतोय.” मला हसू आले आणि वाईटही वाटले. मी त्याला हलकेच चिमटा काढून झोपेतून जागे केले. तेव्हा त्याचे लाल झालेले डोळे चोळत तो जागा झाला. त्याला आपण झोपेत असताना ब्रश घेऊन रंगवतोय हे लक्षात आले असावे. तोही गालातल्या गालात हसला आणि पुन्हा गाढ झोपी गेला. 

त्याला लहान असताना झोपेत चालण्याची सवय होती. पण मोठा झाल्यानंतरही तो त्याचं जागेपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेतील स्वप्नातही आपल्या भविष्यातील आयुष्याला रंग देत होता असे मला वाटत होते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असला तरी तो याबाबतीत माझ्यापेक्षाही नेहमीच मोठा असणार आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...