के फोर हंड्रेड
प्रत्येकाच्या आयुष्यात जशी माणसं येतात, तशा गाड्यासुद्धा. माणसांशी नाती घट्ट होतात, तशीच गाड्यांशीही. फक्त माणसं सजीव असतात, ती बोलू शकतात. गाड्या निर्जीव असतात, त्या बोलतात यावर कोणाचाही विश्वास कसा बसणार ? आपण सायकलीपासून विमानापर्यंत विविध वाहतुकीची साधने विकत घेतो.
विकत घेतलेले वाहन आपला मित्र बनून जातं. त्या वाहनावर आपला जीवच जडतो. आता तर सगळ्यांकडेच अशी वाहने दिसत आहेत. टू व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर अशा चाकांची वाहने आपण सर्रास वापरतो. टू व्हिलर वाहनांचा तर कचराच झाला आहे. जागोजागी या टू व्हिलर गाड्यांचे ट्राफीक जाम झाल्याचे दिसून येते.
मलाही माझी स्वतःची टू व्हिलर असावी असे वाटत होते. वाटायला काहीच हरकत नव्हते . पण ते सहजच अमलात आणणे सोपी गोष्ट नव्हती. मी नोकरीला लागून ४ वर्षे होऊन गेली होती. मला आता टू व्हिलर गाडीची जास्त गरज भासू लागली होती. कोणीही अशा गाड्या विकत घेताना दिसत होते. मला मात्र एक साधी टू व्हिलर घ्यायला जमत नव्हते. त्यावेळी पगारही कमी होता. पण गाड्यांच्या किमतीसुद्धा कमी असल्या तरी मला त्या नेहमीच जास्त वाटत आलेल्या.
लग्न झाल्यानंतर गाडी घेण्याची इच्छा जास्त प्रबळ झाली. लग्नासाठी खर्चही झाला होता. माझ्या पत्नीने त्यासाठी रोख दहा हजारांची मदत केली. लग्नानंतर दोन महिन्यातच नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरात पहिली टू व्हिलर आली. नुकताच एक नवीन शोरुम उघडला होता. त्या शोरुममध्ये कायनेटीकच्या टू व्हिलर्स होत्या. मी त्यातली ' के फोर हंड्रेड ' ही बाईक निवडली होती. लाल कलरची ही बाईक दिसायला छानच होती. माझ्या ती आवडीची बनली. मी ती फायनान्सने घेतली. गाडी बटनस्टार्ट होती. रत्नागिरीत असतानाच टू व्हिलर शिकल्याचा फायदा झाला होता. लायसेन्स काढले. गाडी चालवू लागलो.
आता माझी स्वतःची गाडी होती. घरात एक नवीन पाहुणी आली होती म्हणून तिचे जंगी स्वागत झाले होते. रोज तिला धुवून पुसून स्वच्छ ठेवत होतो. माझ्यापेक्षा मी माझ्या नव्या गाडीकडे जास्त लक्ष देऊ लागलो होतो. गाडीचे ॲवरेज ताशी नव्वद किलोमीटर मिळत होते. माझी गाडी दररोज ९० किलोमीटर पळत होती. कणकवली ते गढिताम्हाणे दादरावाडी शाळा ४५ किलोमीटर होती. यायला जायला नव्वद किलोमीटरचा प्रवास होई. रोज घरी यायला मिळत होते. शनिवार रविवार बायकोला फिरवायला नेताना गाडीचा चांगला उपयोग होत होता. सोमवारी पत्नीला बसपर्यंत सोडण्यासाठी गाडी उपयोगी पडे. पुन्हा आठवडाभर पत्नी नोकरीच्या ठिकाणी दाणोली येथे असे.
मला पत्नीची तीव्र आठवण आली कि माझी गाडी मला दाणोलीपर्यंत घेऊन जाई. पत्नी जवळ नसताना गाडीच माझी पत्नी झाल्याप्रमाणे साथ देत असे. त्यावेळी पेट्रोल २७ रुपये लीटर होते. दररोज ३० रुपयांचा पेट्रोलखर्च होई. पण बजेटमध्ये बसे. पत्नीची बदली झाल्यानंतर आम्ही पाटगांव येथे राहू लागलो. आता गाडीने आमचे जगणे सुसह्य बनवले. खेड्यात स्वतःची गाडी असणे हे अजूनही प्रतिष्ठेचे मानले जाते.
आमच्यासाठी गाडीचे असणे प्रतिष्ठेपेक्षा गरजेचे जास्त होते. गाडीने भरपूर प्रवास केला होता. पहिल्या वर्षाला ती वीस हजारपेक्षा जास्त किलोमीटर धावली असेल. पुढील सहा वर्षात ती लाखाच्या पुढेच गेली. माझ्यासाठी माझी गाडी परमप्रिय अशीच होती. ती वाटेत कधीच बंद पडली नाही. जवळ गॅरेज बघून ती बंद पडलेली मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे.
मी तिच्यावरुन पडलो तरी मला काहीच लागले नाही. गाडी बाजूला टाकून मी उभा राहत असे. गाडीलाही काही जास्त दुखापत होत नसे. माझी गाडी ' माझी लक्ष्मीच' होती जणू. तिच्यासोबतचे माझे ते अविस्मरणीय क्षण आठवले कि आजही अंगावर काटा येतो. त्यानंतर मी चार पाच गाड्या घेतल्या असतील , पण त्या पहिल्या ' के फोर हंड्रेड ' ची सर कोणालाच आलेली नाही. माझ्या जीवनाला गतीमान करण्यात त्या निर्जीव गाडीने दिलेली साथ म्हणून मला मोलाची वाटते.
ती गाडी फक्त मीच वापरली नाही तर माझ्या भावानेही वापरली. त्याच्यासाठी ती गाडी पहिली मैत्रीणच ठरली होती. त्यानंतर ती गाडी माझ्या मेहुण्याने वापरली. ती गाडी त्याची बहिणच झाली. त्याची सख्खी बहिण काळाने हिरावून नेली होती, पण ज्या गाडीवर त्याच्या स्वतःच्या बहिणीने सात वर्षे प्रवास केला होता ती गाडीच त्याची बहिण झाली होती. अशी ही माझी गाडी माझ्या आयुष्यातील एक सहचारिणीच होती असे म्हटले तरी चुकीचे ठरु नये.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
.jpeg)
No comments:
Post a Comment