पसंत आहे मुलगी
मी वयात आलो आणि बाबांनी माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. वयात आलो म्हणजे २५ वर्षांचा होतो. दोन नोकऱ्या सोडून तिसरी धरली होती. नोकरीनंतर छोकरी असं बाबांचं आणि घरच्यांचं साधं सोपं समीकरण बरोबरही असेल. पण छोकरी नोकरीवाली हवी असंही सर्वांच्या मनात होतं.
माझ्या मनात अजून छोकरीचा उगमच झाला नव्हता. मला लग्न करण्यासाठी अवकाश हवा होता. तो अवकाश मी घेत होतो. बाबांनी स्थळे बघायला सुरुवात केली होती. रत्नागिरीतील संगमेश्वरपासून देवगडातील शिरगांवपर्यंतची स्थळे बाबा बघूनही आले. मला माहितही नव्हते. बाबांची सूनपरीक्षा सुरु असताना आमच्या दुकानात माझ्या लग्नाविषयीची चर्चा पाटकरगुरुजींनी ऐकली.
पाटकरगुरुजी आमचे तीन नंबर शाळेतील वर्गशिक्षक. सातवीत ते आम्हाला गणित विषय अगदी तन्मयतेने शिकवित. त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल होते. ते काॕमन पुलचे शिक्षण विस्तार अधिकारी झाले होते. त्यांना जिल्ह्यात कोणत्याही शाळेत जाण्याची मुभा होती.
एकदा ते सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावठण या शाळेत भेटीसाठी गेले होते. तेथील शिक्षक तक्ता त्यांनी बघितला होता. त्यात ' ललिता तुकाराम चव्हाण ' या नाभिक समाजातील शिक्षिका होत्या. पाटकरगुरुजी आमचे कस्टमर. बाबा त्यांचे केस कापत असताना माझ्या लग्नाच्या चर्चेत त्यांनीही भाग घेतला. मग काय ? बाबा त्यांच्या मागेच लागले. त्यांनी त्या मुलीबद्दल माहिती आणून दिली. गाव समजले.
आता बाबा माझ्या मागे लागले. मी तयार नव्हतोच. मी एकदा बाबांना रागाने म्हणालो होतो, " बाबा, लग्न मला करायचेय कि तुम्हाला ? मला काही घाई नाही. मला एवढ्यात लग्न करावयाचे नाही. मी एकटा आहे तो बरा आहे. " पण बाबांची चर्चा सुरु होती ती होतीच. त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती, खंड अजिबात नव्हता.
मग एके दिवशी ' फर्नांडिस ' गुरुजी दुकानात आले. ते त्यावेळी शिरवल नं.१ शाळेचे मुख्याध्यापक असावेत. त्यांच्या गजाली ऐकत राहण्यासारख्या असत. विनोदी शैलीतील त्यांचे बोलणे सर्वांनाच आवडे. पण ते परखड आणि खरे होते. त्यांनी मला समजावले. मी लग्नाला तयार होण्यासाठी बाबांना फर्नांडिसगुरुजींची मदत उपयोगी पडली. अखेर मी लग्नाला होकार दिला.
आता बाबांना मैदान मोकळे झाले होते. ' माझो झिल लग्नाक तयार झालो ' च्या घोषणा त्यांनी सुरुच केल्या. होळीचे दिवस होते. दोन तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या. बाबांनी मुलीचा पत्ता शोधून काढला होता. मुलीच्या घरी कल्पना न देता आम्ही निघालो.
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गाव कुडाळ पासून फक्त दहा किलोमीटरवर आहे. पोहोचलो एकदाचे. त्यांच्या घरी जाण्यासाठी ' सातेरी मंदिर ' स्टाॕपवर उतरुन चालत निघालो. वाटेत बाबांचे पूर्वीचे मित्र भेटले. ते नाभिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी कुठे जाता असे विचारले. बाबांनी संपूर्ण कथाच सांगितली. ते त्यांना अजूनही चांगलेच जमते. ज्या मुलीला आम्ही बघायला जात होतो ती त्यांची पुतणी होती. त्यांनी मुलीबद्दल प्रश्नच नाही, तुमच्या मुलाला तिने फक्त पसंत करायला हवे. बाकी सर्व माझ्याकडे लागले.
बाबा त्यांना भाई म्हणत. आम्ही पुढे त्यांना भाईअण्णा म्हणू लागलो. भाईअण्णा शिस्तप्रिय होते. मुद्देसुद बोलत. ते आम्हाला मुलीच्या घरी घेऊन गेले. ललिता आज घरीच होती. मी साध्या नेहमीच्या वेशात गेलो होतो. तिचे वडील तिठ्यावरील सलूनात काम करीत. साधे सरळ गृहस्थ. त्यांनी आपली मुलगी दाखवायला आढेवेढे घेतले नाहीत.
सहसा कोणताही बाप आपल्या मुलीला पहिल्या भेटीत मुलाला दाखवायला तयार होत नाही. पण मी शिक्षक आहे असे समजल्यावर ते खुश झाले. घरातील सर्वजण अतिशय कुतुहलाने बाहेर हळूच येऊन मला बघून जात होते. थोड्यावेळाने बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मी आता घाबरलो होतो.
माझी पहिलीच वेळ होती. तिची पहिलीच वेळ नव्हती. तिला यापूर्वी काही स्थळे येऊन गेली होती. पण तिनेच ती नाकारली होती. तिला शिक्षकच हवा होता. मी शिक्षक होतो पण दिसायला काहीच आकर्षक नव्हतो. तिने चहा आणून दिला. मी हळूच मान वर करुन घाबरत घाबरतच तिच्याकडे बघितले. एक साधी सरळ पिवळसर साडी नेसलेली तोंडावर हात घेऊन खुदकन हसणारी मुलगी माझ्यासमोर उभी होती. माझी नजर तिच्या पावलांकडे गेली. ती सावधानस्थितीत उभी होती. तिला नाव विचारले गेले. मीही सांगितले.
मी शिक्षक आहे या एकाच गोष्टीवर ती खुश झाली होती. तिला पाहायला आलेला मी पहिला शिक्षक होतो. मी सायन्सचा विद्यार्थी होतो. ती दहावीमध्ये वेतोरे हायस्कूलमध्ये प्रथम आली होती. बारावी सायन्सला ६८ % म्हणजे अतिशय चांगले गुण होते. मी माझा बायोडेटा लिहून दिला. तिनेही सुंदर रेखीव हस्ताक्षरात आपला बायोडेटा मला दिला. मी तिला तिथेच मनापासून पसंत केले होते. मी तिला विचारले , " मी तुम्हाला पसंत आहे का ? " तिने मलाच उलट प्रतिप्रश्न केला , " तुम्हाला मी पसंत आहे का ? " मी तिला विचारले , " माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. " ती म्हणाली, " आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. "
मी सरळ सांगून टाकले, " पसंत आहे मुलगी. " ती मला गोड हसत म्हणाली, " मलाही तुम्ही पसंत आहात. " त्यावेळी तिच्या त्या होकारासह एक अनामिक सुगंध मला आला होता. ललिता एक उत्तम शिक्षिका होती. माझ्या डोक्यावर कमी झालेले केस तिला खटकले होते, पण ती आपल्या होकाराशी ठाम होती. घरातील सर्वांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले तरी तिचा निर्धार कायम होता.
मे मध्ये आमचे प्रशिक्षण होते. १३ जून २००० रोजी आमचे लग्न झाले. तिच्या आणि माझ्या वयात एक ते दिड वर्षाचे अंतर होते. ती मनाने निर्मळ होती. मितभाषी होती. माझे मानसिक प्रेम सुरु झाले होते.
नुकताच ' हम दिल दे चुके सनम ' हा ऐश्वर्याचा सिनेमा मी पाहिला होता. त्यातील " झोका हवा आज भी , जुल्फे उडाता होगा ना, तेरा दुपट्टा आज भी मेरे सर से सरकता होगा ना ! ! ! ! " या गाण्याची तर मी पारायणे केली. ललितामध्ये मी ऐश्वर्याच बघत होतो. तिचे नाव मी तिला विचारुन ऐश्वर्या ठेवले. तिलाही ते खूप आवडले. मी तिला ऐशू म्हणत असे. चुकून एखाद्या वेळी ऐश्वर्या म्हटले तर ती मला म्हणे, " अहो, रागावलात का माझ्यावर ? मला ऐशूच म्हणा , ऐश्वर्या नको. "
ऐशू ही हाक तिला अतिशय आवडे. आता ही हाक माझ्यासाठी दुर्मिळ झाली आहे. तिच्या फोटोसमोर जाऊन मी तिला नमस्कार करताना ' ऐशू ' असे म्हणूनच दिवसाची सुरुवात करतो. प्रेम हे मनावर करावं, शरीरावर नव्हे. आम्ही उभयतांनी एकमेकांच्या मनावर प्रेम केलं. ते अजूनही निरंतर तस्संच राहणार आहे कायमचं.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment