आजोबांचा अडकित्ता
मी तेव्हा खूप लहान होतो. मला आजोबा धूसरसे आजही आठवतात. पण त्यांच्या आठवणी मला सांगताना बाबांनी सांगितलेल्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही भावंडांनी घरातल्या अंथरुणांबरोबर खेळायला सुरुवात केली होती. एक एक गुंडाळलेले अंथरून काढून ते लादीवरून गाडीसारखे ढकलत ढकलत पुढे सरकवत होतो.
तेवढ्यात आजोबा तेथे आले होते आणि आम्हाला रागावले होते. त्यानंतर आम्ही तसला खेळ पुन्हा कधीच खेळलो नसू. मी अगदीच लहान. गोंडस बाळ. आजोबांचा लाडका. घरी असताना मला खेळवायला त्यांना खूप आवडे. आजोबा दिसायला हिरो होते हिरो. ते सगळ्या गोष्टी करण्यात पटाईत होते. त्यांचा आवाज सुरेल होता. ते तमाशात लावण्या नाचत. भजनात बुवागिरी करत.
त्यांच्याकडे नेहमी पानाची चंची असे. चंची म्हणजे पान, सुपारी , तंबाखु , अडकित्ता आणि कात ठेवण्याची छोटी पिशवीच. त्यात तीन चार कप्पे असत. ती गुंडाळून ठेवता येत असे. त्यात आजोबा आपल्या गोळ्या , सुटे पैसे ठेवत असत. मी दोन वर्षाचा असतानाची गोष्ट असेल कदाचित. मी आजोबांच्या चंचीलाच हात घातला. त्यातली एक एक वस्तू मी काढू लागलो. आजोबा माझ्याकडे कौतुकाने बघत होते.
मला काय खेळायचेच होते. माझा खेळ होत होता. ते सुद्धा त्यात लहान होऊन सहभागी झाले होते. बोबड्या बोलामध्ये माझ्याशी बोलत होते. ते नेहमी पंचा किंवा धोतर नेसत. आतासारख्या चड्ड्या घालणं त्यांना मान्य नव्हतं. त्यावर खिसा असलेली मांजरपाटाची बाबांनी शिवलेली बनियन असे. मांजरपाट म्हणजे साधे खळीचे कापड. पण या पेहरावात आमचे आजोबा नटासारखेच भासत. ते स्वतः गाणी रचत. कित्येक गाणी , अभंग, जेवणावळीचे श्लोक त्यांना पाठ होते.
मी आता माझा मोर्चा अडकित्त्याकडे वळवला. मला ते यंत्र खेळणंच वाटलं. मी तो फेकत होतो. दुडूदुडू जाऊन परत आणत होतो. असं माझं खेळणं सुरुच होतं कि अचानक आजोबांनी माझ्याकडे अडकित्ता मागितला. मी माझ्या खेळात रंगून गेलो होतो. मी अडकित्ता द्यायला तयार नव्हतो. त्यांनी माझ्याकडून अडकित्ता काढून घेण्याचा प्रयत्न केला.
मी चिमुकल्या मुठीत घट्ट पकडून धरलेला अडकित्ता सोडतच नव्हतो. ओढून घेण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला त्याची धार लागेल म्हणून ते काळजी घेत होते. माझी पकड आणखी घट्ट होत गेलेली. शेवटी आजोबांनी " नातवा , माका दी आडकती , दी बाबू " अशी विनवणी सुरु केली. मी अडकित्ता त्यांच्या दिशेने फेकला. अडकित्ता माझ्या हातातून सुटला होता. तो परत मागे येणार नव्हता.
तो थेट आजोबांच्या कपाळावरच बसला. नशीब डोळ्यावर बसला नाही. कपाळाला नुसता बसला नाही तर त्याची धार लागून आजोबांच्या कपाळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आजोबांनी कपाळ दाबून धरले. तेवढ्यात तिथे बाबा आले आणि माझा पराक्रम बघितला.
बाबा मला मोठ्या आवाजात ओरडले. मी बाबांच्या आवाजाने घाबरुन रडू लागलो. घरातले सगळे काय झाले म्हणून बघायला आले. आजोबांवर अडकित्ता मारला म्हणून मला कोणीही जवळ घेईनात. मी आणखीनच भोकाड पसरले. माझे प्रेमळ आजोबा मला काहीही बोलले नाहीत कि रागावलेही नाहीत.
उलट त्यांनी मला हलकेच उचलून माझे पटापट पापा घेतले. आता मला माझे आजोबाही नाहीत आणि ते गोड गोड पापा सुद्धा. आता असे निरलस प्रेम मिळणे केवळ दुरापास्त झाले आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment