Friday, January 15, 2021

मी अजून जिवंत आहे

 मी अजून जिवंत आहे


        वडीलधारी माणसे आपल्यापेक्षा अधिक पावसाळे बघितलेली असतात. त्यांना सर्व काही समजत असते. त्यांनी अनुभव घेत असताना त्यांना अनेकदा ठेच लागलेली असते. पुढच्यांना ठेच लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे मोठी माणसे सतत लहानांना सल्ला द्यायची एकही संधी सोडत नाहीत. 

          ह्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा कनिष्ठांवर विश्वास कमीत कमी दिसून येतो. कनिष्ठ कायमच कनिष्ठच राहतात. किंवा त्यांच्यावर कुणीही श्रेष्ठ नसले तर तेही श्रेष्ठ होऊन जातात. आपल्यापेक्षा लहानांना सगळ्या गोष्टींबद्दल बारीकसारीक सांगत राहून नकोसे करुन सोडतात. 

          मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही कि सगळ्याच गोष्टी मोठ्यांना विचारुनच कराव्यात. आपण आपल्या मनाने कधी घेणार निर्णय ?  मोठे म्हणतात , "  हे करु नको, ते करु नको." न विचारता केले तर म्हणतील, " आमचं ऐकत नाही ना ?  म्हणून असं होतं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. "  

          चुकल्यानंतर कधीच समजून घेणार नाहीत. आपले निर्णय कसे बरोबर असतात तेच सतत सिद्ध करत बसतील. एखादी गोष्ट त्यांना न सांगता केली आणि आपल्याला यश मिळालेच तर त्याचे श्रेय आपणच घेतील. ठिक आहे, घेऊ देत श्रेय. पण यश मिळाल्यानंतरही त्यात इतकेही यश मिळाले नाही असेही सांगतील. पुन्हा हे ही सांगतील कि आम्ही शुन्यातून पृथ्वी निर्माण केली. असू दे. आपलेच आहेत, ऐकून घ्यायलाच पाहिजे. 

          काहीही करायचे असेल तर यांची परवानगी घ्यायला लागते. नाहीतर म्हणतील , " मी अजून जिवंत आहे ना ? अजून मेलेला नाही. " असेही म्हणतील , " माझे म्हणणे पूर्वी सर्वजण ऐकत असत , म्हणून सगळे कसे व्यवस्थित चालले होते. आता तुमच्या राज्यात कोण कोणाला विचारत नाही. म्हणतात ना .... वाघ पडला झाळी आणि वानर दाखवतो नाळी ....तशी तुमची खबर आहे."  ही वाक्ये मोठ्यांची ठरलेली वाक्ये आहेत. ते आपल्या काळजीपोटी हे सर्व करत असतात हे बरोबर आहे. पण पुढे जाणाऱ्याला मागे ओढणे म्हणजे अतिकाळजी झाली. 

          मग आम्ही छोटे पुढे कसे जाणार ? लहान मुलाला जोपर्यंत स्वतः कंदिलाला हात लावल्याशिवाय काच गरम असल्याचा चटका बसत नाही तोपर्यंत तो हात लावतच राहणार. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव एकदा तरी घ्यायला द्यावा. अर्थात इथे चांगल्या गोष्टींचा अनुभव असा अर्थ अभिप्रेत आहे. नाहीतर ही मोठी माणसे त्यातही कूस काढतील. 

          दाखवताना ते प्रथम दोषच दाखवतात, चांगल्या बाबी बघण्याचे विसरुनच जातात. मग जनरेशन गॕपची ओरड मारतात. आमच्यावेळी असे नव्हते बाबा ! !  तुमच्या काळातील ही पिढी पुढे काय दिवे लावणार तो परमेश्वरच जाणे ?  

          त्यांनासुद्धा आपल्या आजी आजोबांनी अगदी असेच म्हटलेले असणार. पुढे आपण मात्र पुढच्या पिढीला असे म्हणू नका म्हणजे मिळवली. चुका सर्वांकडूनच होतात, चुकत चुकत शिकणं खरंच चांगलं असतं. पण सतत सल्ले देऊन आपल्याच माणसांना परावलंबी बनवणं कितपत योग्य आहे ? 

          लहानांना स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी बिनधास्त करायला दिल्या पाहिजेत. पहिल्यांदा चुकतीलही. पण हळूहळू चुकांचे प्रमाण कमी होत जाऊन कौशल्य प्राप्त होईल. केलेली चूक पुन्हा होणार नाही. 

          आईबाबा मुलांना सांगतात , "तुला हे जमणार नाही, ते जमणार नाही." स्वतः अपयशी ठरलेले पालक मुलांनाही अपयशीच होण्याचा मार्ग दाखवत राहात असतात हे त्यांना सांगणार कोण ? मोठ्ठे असतात ना ते ? त्यांचे कसे चुकेल , चुकले तर ते आमचेच. आमच्याच कपाळावर कायम चुकण्याचा शिक्का. 

          कित्येक हुशार आईवडिलांची मुले या अतिसल्ल्यांमुळे परावलंबी जीवन जगताना मी स्वतः पाहिली. अतिशिस्तीमुळे बिघडली गेलेली मुले आता अक्षरशः पालकांनाच नको झाल्याचीही उदाहरणे आहेत. व्यसनी झाली आहेत. पालकांशी शत्रुप्रमाणे वागत आहेत. 

          आपल्या पाल्यांशी पालकांनी मित्रत्वाचे नाते जोडायला हवे. आपलं मूल काय करतंय याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण उलट तपासणी नको. मधल्या पिढीतल्या मध्यम मोठ्यांची मोठीच अडचण होऊन बसते. केस पिकले, वय झालं, टक्कल पडलं तरी त्यांच्या वरच्या मोठ्यांचं त्यांना ऐकून निर्णय घेण्याची कसरत करावी लागते. लहानांनी संयम ठेवला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच मोठी माणसे बाळगत असतात, तसाच संयम बोलताना जर मोठ्यांनी ठेवला तर छोटे मोठे वादविवाद होणारही नाहीत. आता हे वाचल्यानंतरही हे चुकीचे कसे आहे यावरही ते नक्की वाद घालतील यातही मला अजिबात शंका वाटत नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...