असा तरी कित्या
त्यावेळी शालेय पोषण आहाराचे वाटप वस्तुरुपात करण्यात येई. फक्त तांदळाचे वाटप होई. दर महिन्याला एका मुलाला तीन किलो तांदुळ मिळत. पहिली ते चौथी पर्यंत शाळा असल्याने प्रत्येक मुलाला दर दिवसाला शंभर ग्रॕमप्रमाणे पोषण आहार म्हणजेसुद्धा सरकारने तळागाळातील गरीब मुलांसाठी केलेली दैनंदिन मदतच होती.
आमच्या लहानपणी असे काही मिळत नसे, शिक्षण मात्र रोजच्या रोज पोट भरुन मिळे. त्या शिक्षणावरच आमचे बालपण संस्कारीत होत गेले. नंतर सुगंधी दुध मिळू लागले. ते ही मुले आवडीने पित असत. त्याची चव वेगळीच असे. मग कधी कधी सुकडी मिळे. तिचे लाडू करुनही दिले जात. आता सगळ्या मुलांची मज्जा आहे. दुपारी माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गरमागरम तयार भोजन दिले जाते. शाळेत डबा नेण्याचीही गरज नाही.
सध्या शाळा सुरु नाही म्हणून सर्व मुलांना पालकांमार्फत तांदुळ, तुरडाळ, मटकी, मुग, चवळी दरमहा दिली जाते हेही शासनाचे उपकारच आहेत. मोफत पुस्तके दरवर्षी मिळतात. तयार गणवेश मिळतात. पूर्वी एवढं काही मिळत नसे. उलट त्यावेळी आम्हाला त्याची खरी गरज होती. आता सर्व काही मोफत मिळते म्हणून त्या गोष्टींची किंमत कमी झाली आहे असे वाटत राहते.
पूर्वी आम्ही एक पुस्तक संच मोठ्या भावंडांपासून छोट्या भावंडांपर्यंत वापरत असू. आता सहा महिन्यातच नवीन पुस्तकसंच फाटलेला दिसून येतो. फुकट मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते हेच खरं !! माझी शाळा एकशिक्षकी होती. शिपायापासून सर्व कामे मलाच करावी लागत.
सर्व मराठी शाळेतील आजचे शिक्षक हे काम करत आहेत. मुलांचे हित लक्षात घेऊन सगळी कामे करत आहेत. ही कामे करता करता त्यातून वेळ मिळाला तर शिकवण्याचेही काम करत आहेत. रात्र थोडी नि सोंगे फार , अशी गत झाली तरी बिचारा शिक्षक प्रामाणिकपणे शिक्षणाची गाडी जोमाने हाकताना दिसत आहे. नवनवीन तंत्रज्ञान , ऑनलाईन कामे करुन अध्यापनाची विविध तंत्रे शिकत सतत अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करत आहे. यातील प्रत्येकाचा वेग कमी जास्त असू शकतो. पण प्रत्येकाला मर्यादा असतात, तशाच त्या शिक्षकालाही आहेत. सर्वजण सेम टू सेम काम करुन दाखवू शकत नाहीत. पण सर्वजण आपली पूर्ण कार्यक्षमता आपापल्या परीने वापरत आहेत हे नक्की.
माझ्या शाळेत त्यावेळी चार वर्गात एकूण सतरा विद्यार्थी होते. मी एकटाच सर्व वर्ग शिकवत होतो. संध्याकाळपर्यंत शिकवून संपत नव्हते. दररोज १४ ते १५ विषय हाताळण्याची कधी कधी कसरत करावी लागत होती. एकशिक्षकी शाळेत शिकवणारे सर्वच शिक्षक असं करत असताना मी बघितले आहे. सातवीपर्यंत दोन शिक्षकी असणाऱ्या शाळांमध्ये सेम कसरत करावी लागते. कामगिरी शिक्षक आलेच तर त्यांना दोन्ही ठिकाणची जबाबदारी पार पाडतानाही पाहिले आहे.
एकूण काय तर मुले कमी असली तरी कसरती तितक्याच. लोकांना मात्र पगाराचे आकडे दिसतात. त्यांना कामाचे स्वरुप दिसत नाही. बोलण्यासाठी मुद्दे भरपूर सापडतात. असो. काहीही झाले तरी हा संघर्ष सुरुच राहणार असे दिसते आहे.
तांदळाच्या पिशव्या नुकत्याच प्राप्त झाल्या होत्या. मी मुलांच्या हजेरीनुसार मागणी केली होती. त्यातील दोन मुले दोन महिने मुंबईला गेली होती. त्यांची रितसर गैरहजेरी लावली होती. दिपक आणि संदीप या दोन मुलांना तांदळाच्या पिशव्या दिल्या गेल्या नाहीत. ती मुले माझ्याकडे तांदुळ मागू लागली. मी त्यांना त्यांच्या गैरहजेरीचे कारण सांगितले. त्यांना ते समजले. पण सर्व मुलांना तांदळाच्या पिशव्या मिळाल्या , आम्हाला आमच्या गैरहजेरीमुळे मिळाल्या नाहीत याचे त्यांना वाईट वाटलेले दिसत होते.
सर्व मुलांनी तांदळाच्या पिशव्या दप्तरात भरल्या होत्या. काहींनी दप्तराजवळ ठेवल्या होत्या. या दोघांची नजर फिरुन फिरुन त्या तांदळांवरुन जाताना दिसत होती. शाळा सुटली.मुले घरी गेली.शेजारच्या मुलांनी आपले दप्तर भरभरुन आणल्याचे त्या दोन मुलांच्या माऊलीने पाहिले. सगळ्यांना तांदुळ मिळाले आणि माझ्या मुलांना अजिबात नाही म्हणून तिला मुलांचा राग आला. तिने मुलांना मार मार मारले.
दुसऱ्या दिवशी तिने त्या मुलांमार्फत मला चिठ्ठी पाठवून दिली. मी चकितच झालो. चिठ्ठी उघडून वाचू लागलो. चिठ्ठीत मालवणी भाषेत लिहिले होते , " सगल्या पोरांना तांदूल घावले , माज्या लेकांका नाय घावले , असा तरी कित्या ??? " मला चिठ्ठी वाचून खूप हसायला आले. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगितले तेव्हा तिला पटले. ती म्हणाली, " गुर्जी, सांगलास ता बरा झाला, आता मी माज्या दोनक लेकांका घराकडे ठेवचंय नाय , रोज शालेत पाठवतलंय , बघतंय मी तुमी तांदूल कसे देयत नाय ते "
मी घरी आलो आणि ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर तेही मला खोखो हसत म्हणायला लागले , " असा तरी कित्या ? "
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment