किलवर तिरी
कित्येकांच्या घराचा पत्ता नसतो पण त्यांच्या घरी पत्त्यांचा पत्ता असतो. पत्ते म्हणजे खेळातले पत्ते. टेबलाचे एखादे ड्रॉवर उघडावे तर पत्ते सापडतील ते पत्ते. या पत्त्यांना आता प्लेईंग कार्डस म्हणतात. हे नाव बाकी लगेच समजते. पूर्वी या पत्त्यांना कॅट म्हटले जाई.
कॅट म्हणजे मांजर. मांजर जसे प्रत्येक घरी पाळले जाई तसेच हे कॅट सुद्धा पाळले जाई म्हणून की काय त्यालाही कॅट म्हणत असावेत कदाचित. मांजराची जशी म्याँव चालते तशीच या कॅटची पिशी चाले. या पिशीने माणसे वेडीपिशी होताना मी बघितली आहेत.
आम्ही तेव्हा सावंतांच्या चाळीत भाड्याने राहायचो. मालक आणि सगळे शेजारी गुण्यागोविंदाने राहात. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत. एका घरात कायम पत्त्यांचा खेळ चाले. मोठी माणसे केवळ एक टाईमपास म्हणून पत्ते खेळत. टेपरेकॉर्डर चालू असे. त्यावर जुने ' आवारा हू ' हे गाणे लावलेले असे. कधीकधी ' सावज माझं गवसलं ' असे मराठी गाणे वाजत असे. गाणी थांबली कि आम्ही समजू कि पत्त्यांचा डाव संपलेला आहे. असे एकावेळी दोन मनोरंजनाचे खेळ सुरु असत.
आम्ही लहान होतो. आम्हाला पत्तेही कळत नसत आणि गाण्यांचा अर्थही. हळूच त्यांच्या घरी जाऊन एक फेरी मारुन येत असू. त्यांचे पत्ते पिसण्याचे कौशल्य बघत असू. पिसतानाचा टाळीसारखा येणारा आवाज आम्हाला आवडे. नवनवीन पत्ते आणि त्यावरील नवनवीन चित्रे बघताना मजा येई. निम्मे निम्मे पत्ते दोन हातात घेऊन फर्र असा आवाज करत पिसण्याची पद्धत आम्हाला तिथेच शिकायला मिळाली.
गाढवपिशी, पाच तीन दोन , मेंडीकोट आणि पत्त्यांच्या विविध गमतीदार जादू बघत बघत शिकत गेलो. समोरच्याला कोट देता देता किती कोट सेकंद वाया घालवले असतील नकळे. पण त्यातही मौज येत होती. जादू दाखवून समोरच्याला उल्लू बनवून निघून जाताना मोठेच ज्ञान घेतल्यासारखे वाटे. बघता बघता जसे पत्ते बदलत गेले, गाणीही बदलत गेली. ' सून सायबा सून , प्यार की धून , हो sss मैंने तुझे चुन लिया ' असे तोंडाने म्हणत पत्त्यांची पानेही चुन चुन चुनली जात होती.
बाबा घरी आले कि आमचे हे खेळ आपोआप थंड होत. एकदा तर बाबांनी आमचं पत्त्यांचं हे वाढतं वेड पाहून पत्त्यांना पेटत्या चुलीत घालून आम्हाला थंड करुन टाकलं होतं. परीक्षा जवळ आल्या कि आम्हाला अभ्यासाशिवाय काहीच करण्यास मज्जाव असे. गाणी ऐकू येत तेव्हा अभ्यास करताना समोर पत्ते नाचू लागत. आईने आमच्या घराचा दरवाजा बंद केलेला असे. मोठ्या ताईचाही डोळ्यांचा धाक असे. पण सुट्टीत पुन्हा पत्तेबाजार भरे.
शेजारचे राणेकाका एस.टीत कंडक्टर होते. ते ड्युटीवरुन आले कि पत्त्यांच्या पिसण्याचा आवाज येई. ते मेंडीकोट खेळण्यात पटाईत होते. समोरच्याला कोट घालून आपण उघडेबंब खेळत राहात. कोट घालून म्हणजे खेळात ते दुसऱ्यांना कोट चढवत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. खेळ एकदा रंगात आला कि ते आपल्या वयाचेही भान विसरुन जात. काकीने जेवायला बोलावले तरी त्यांना जेवायला जायला वेळच होई. अर्ध्या पाऊण तासांनंतर गेले तर गेले. नाहीतर स्वतः काकीच त्यांना हाताला धरुन घेऊन जाई. तरीही ते सुरु असलेला डाव संपवूनच उठत.
एकदा त्यांचा पत्त्यांचा खेळ रंगात आला होता. त्यांच्याकडे असलेले पत्ते तितकेसे स्ट्रॉन्ग नसावेत बहुदा. ते मोठ्याने ओरडत खेळत होते. त्यांनी ' किलवर तिरी ' हातात घेतली होती. ते टाकणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले कि आपल्यावर कोट बसणार. ते सावध झाले. त्यांनी आपल्या पायाखाली दडवलेला तुरुपाचा पत्ता बाहेर काढला आणि ते कोटापासून वाचले.
दुसऱ्यांना कोट लावणारे स्वतः कोट लावून कसे घेणार ? अक्कलहुशारीने आणि शिताफीने त्यांनी स्वतःला मोठ्या संकटातून वाचल्याचा उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. त्यावेळी ते म्हणालेही होते , " किलवर तिरी टाकली असती तर काय झाले असते ? " मोठे संकट आले असते अशा आविर्भावात ते बोलताना पाहून मी ही ' फार मोठ्या संकटातून काका वाचले ' असा अभिनय करुन त्यावेळीही खळखळून हसलो होतो. घरी गेल्यावर आईबाबांना आणि भावंडांना सांगितल्यानंतर तर आम्ही सगळे इतके हसलो होतो कि राणेकाकी आम्हाला विचारायला आली होती. तिला सांगितले तर तिही मनसोक्त हसली.
जीवनात अशी ' किलवर तिरी ' सारखी नको असलेली माणसे येतात तसे हवे हवेसे वाटणारे तुरूपही येतात. असे तुरुप आले कि मनाला हुरुप येतो. माणसांचा हा तुरुप सतत रुपे बदलत राहतो. जीवनरुपी पत्त्यांचा खेळ हा असाच सुरु राहणार त्याला कधीच अंत नाही. आता ते राणेकाकाही नाहीत , पण त्यांची ही आठवण तुरुपासारखी काढून मी माझ्या जीवनाला नवीन रुप देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment