मयसा
आमचे पाक्षिक सुरु होते. डीएड संपत असताना प्रत्यक्ष १५ दिवस पाठ शिक्षकांनी एखाद्या शाळेत सलग शिकवण्याचे काम करायचे असते. आम्हाला पाक्षिकासाठी माझी सातवीपर्यंत शिकत होतो तीच शाळा मिळाली. भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन मध्ये आमचे पाक्षिक सुरु झाले.
आम्ही ४० छात्रशिक्षक अगदी मनापासून शिकवत होतो. दरदिवशी मुख्याध्यापक बदलत असत. ते सांगतील त्याप्रमाणे आम्हाला वर्ग मिळे. तासिका घेताना खूप मजा येई. सर्व वर्गांवर जायला मिळे. शाळेतील ऑन ड्युटी काम करणाऱ्या शिक्षकांना त्यानिमित्ताने लेखी काम करायला उसंत मिळे. ते आमच्या सोबत सहकार्याने वागत.
आम्ही काही छात्रशिक्षक तिथले जुनेच विद्यार्थी होतो. त्यामुळे ती शाळा आम्ही कधीही गेलो तरी आपलीच वाटते. सांस्कृतिक कार्यक्रम शेवटच्या दिवशी करावे लागत. आम्हीही त्याचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच सुरु केले.
वर्गातील प्रत्येक मुलांच्या क्षमतेनुसार नकला , नृत्ये, नाट्यछटा, विनोदी बातम्या, नाच, रेकॉर्ड डान्स, एकांकिका, नाटुकली इत्यादी विविध प्रकार शिकवणे सुरु झाले. मी नाट्यछटा बसवण्याचे ठरवले. म्हणजे मी एक दोन मुलांना निवडून त्यांना नाट्यछटा देणार होतो. काही मुलांनी स्वतः हात वर केले. सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे म्हणून मी काही सहभागी न होणाऱ्या मुलांकडे लक्ष केंद्रित केले.
माझ्या मित्राचा भाऊ सातवीत शिकत होता. त्याचे नाव महेश होते. त्याच्या घरी माझे येणे जाणे असे. त्यामुळे तो मला व्यक्तिगत ओळखत होता. त्याने घरी सांगून टाकले होते. आम्हाला माझ्या दादाचा मित्र शिकवायला आहे. तो मला शाळेत सर आणि शाळेबाहेर कुबलदादा म्हणत असे. त्याला घरी मयसा म्हणत. मीही त्याला प्रेमाने मयश्या किंवा मयसा म्हणू लागलो. त्यालाही ते आवडे.
त्याने मला सांगितले , “ दादा, मला नाट्यछटा करायची आहे. ” मी त्याला आश्वासन दिले. त्याला स्क्रिप्ट दिली. वाचण्याचा सराव घेतला. त्याचे वाचन चांगले होते. तो भावनाप्रधान होता. पण त्याचे उच्चार स्पष्ट येत नव्हते. मी त्याला अधिक सराव करायला सांगितले. तरीही उपयोग होत नव्हता. त्याचे पाठांतरही झाले होते. तो रोज घरी सराव करत होता. त्याच्या आईलाही त्यामुळे आनंद वाटला होता. बरेच कार्यक्रम बसवले जात होते. ऐनवेळी त्यात बदलही केले जात होते. निवड करताना बसवलेल्या काही कार्यक्रमांनाही नाकारण्यात आले. मला खूप वाईट वाटले.
कारण माझ्या मयश्याचा कार्यक्रम रिजेक्ट केला गेला होता. मी त्याला सांगितले, पण त्याची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. तो रडकुंडीला आला होता. घरी जाऊन त्याने हे आपल्या आईला सांगितले. कार्यक्रम मस्त पार पडले. पाक्षिकही संपले. मी मयश्याचा तो विषय विसरूनही गेलो.
पण नंतर एकदा मला त्याची आई भेटली. ती म्हणाली, “ माझ्या मयशाला नाट्यछटा दिलीस तेव्हा मला किती आनंद झाला होता ? तो रोज मला म्हणून दाखवत होता. पण त्याचे सर्वांसमोर सादरीकरण झाले नाही याबद्दल मला खूप वाईट वाटले. तू त्याला सहभाग दिला नसतास तरी चालले असते , पण त्याचा वाढत असलेला आत्मविश्वास मी कमी होताना पाहिला आहे. खरोखरचा शिक्षक झालास कि असे कधीच करू नकोस. मुले अपेक्षा ठेवून असतात. माझा मयसा असाच अपेक्षा ठेवून होता. त्याचा आणि माझा दोघांचाही तुझ्यामुळे अपेक्षाभंग झाला.”
मी त्या माऊलीचे उदगार ऐकून अक्षरशः निःशब्द झालो. माझ्याकडे उत्तर नव्हते. मी पुरता गांगरून गेलो. माझ्या मित्राच्या भावावर मी अन्याय केल्याचे माझ्या आता लक्षात आले होते. हा मयसा नंतर मला ज्या ज्या वेळी भेटे , त्या त्या वेळी मला त्याच्या आईचे ते मौल्यवान शब्द आठवत. त्याने मोठेपणी मोबाईल दुरुस्ती करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. गोव्याला जाऊन जॉब करत होता. लग्न केले.
एके दिवशी माझ्या कानावर एक वाईट बातमी धडकली. मयश्याने आत्महत्या केली होती. मला खरेच वाटेना. पण बातमी खरीच होती. मी माझ्या मित्राला जाऊन भेटलो. त्याने सांगितले कि तो हल्ली टेन्शनमध्ये होता. मानसिक तणावात येऊन त्याने गळफास लावून घेतला होता. मला त्याच्या आईला भेटण्याची इच्छा असूनही भेटू शकलो नाही. मित्राच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचे सांत्वन केले.
त्याने ‘ बोलावणे आल्याशिवाय नाही ’ ही नाट्यछटा पाठ केल्याचे मला चांगले आठवते. पण बोलावणे आल्याशिवाय त्याने आपल्या मरणाला स्वतः जवळ केले होते. काहीही झाले तरी आपले आयुष्य कधीही महत्त्वाचे असते, ते असे बारीकसारीक गोष्टीसाठी कधीही संपवायचे नसते.
मयश्यासारखी अनेक तणावग्रस्त मुले या जगात असतील त्यांनी आपल्या जीवनाकडे सकारात्मक रितीने बघितले पाहिजे. आत्महत्या हा नकारात्मक दृष्टीकोन मनातून कायमचा हद्दपार करायलाच हवा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment