केक ऑफ धीवर
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस मस्त साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असणार. लहान मुलांना तर त्याचं किती अप्रुप !!! त्या दिवसाची तर ती आतुरतेने वाट पाहत असतात. आता तर त्यातून मोठेही सुटलेले नाहीत. अगदी म्हातारे आजोबा देखील या दिवसाची वाट पाहत असावेत.
पहिला वाढदिवस साजरा होत असताना मुलांना तितकेसे कळत नाही. खुप कमी जणांना आपला पहिला वाढदिवस आठवत असेल. एक वर्षाच्या वयात काहीच समज नसते. दुसऱ्या वाढदिवसापर्यंत समज आलेली असते. त्यामुळे दुसरा वाढदिवस मुले लक्षात ठेवतात. मग दरवर्षी वाढदिवस साजरा होत असताना होणारे भव्य सेलिब्रेशन त्यांना आनंदाचा उत्सवच वाटत राहतो.
मला वाटतं हा वाढदिवस मुलांचं एक वर्ष वाढवित असतो तसा एक वर्ष कमीही करत असतो. आपण म्हणूनच की काय तेवढया पेटत्या मेणबत्त्या विझवत जातो. जणू त्या विझत असलेल्या मेणबत्त्या आपल्याला जाणीव करुन देत असतात आपली तितकी वर्षं आयुष्यातील संपली असल्याबद्दल !!! मग कोणीतरी शक्कल लढवतात. मेणबत्त्या विझवायच्या नाहीत पेटवत जायच्या. मेणबत्या विझवल्या काय किंवा पेटवल्या काय , आयुष्य एका वर्षाने कमी झालेलं असतं.
हल्ली असे प्रकट दिन साजरे करण्याचं एक वेडच पसरत चाललं आहे. आमच्या लहानपणी आम्ही आमचा वाढदिवस शाळेत साजरा करत असू. तो कधीकधी वर्गापुरता मर्यादित असे. सगळ्यांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटल्या कि झाला वाढदिवस साजरा. मग सर्व शिक्षकांना पायाला हात लावून नीट वाकून नम्र होऊन नमस्कार केला जात असे. औक्षण वगैरे माहितच नव्हते. शिक्षकांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला कि आपसुक औक्षणच घडे. सर्व मुले पाच मिनिटे गोळ्या आनंदे भरीत होऊन चघळत बसत.
वर्गात भरपूर मुले असली तर कधीकधी दोन तीन मुलांचे एकाच दिवशी वाढदिवस असत. मग सकाळ, दुपार , संध्याकाळ तीनवेळ डॉक्टर देतात तशा गोळ्या खायला मिळत. श्रीमंतांची मुले भारिवाली चाॕकलेट्स देत. आम्हांला कधीच न मिळणारी चाॕकलेट्स त्या दिवशी खाण्याचा योग येई. मी शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरे केलेले बघितले आहेत.
४५० पटसंख्या असलेल्या शाळेत असताना एखाद्या दिवशी सात आठ मुलांचे वाढदिवस असत. एक दिवस आड करुन असे वाढदिवस येत राहत. मुलांचे पालक धनवान असल्यामुळे ते मुलांना चांगल्या वस्तू घेऊन देत. रुमाल, पेन, पेन्सिल, वह्या, गोष्टीचे पुस्तक, पट्टी अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाई. माझे टेबल अशा वस्तूंनी आठवडाभरात भरुन जाई. त्यांनी दिलेल्या खाऊने पोटही भरुन जाई. वाढदिवसानिमित्त शाळेलाही ५०१ रुपये देणगी यथाशक्ति प्रत्येकाकडून मिळे.
आता तर काही देणगीदार आपल्या किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत स्नेहभोजन देतात. मुलांना एक दिवस गोडधोड जेवणाचा आस्वाद घेता येतो ही एक चांगली गोष्ट त्यानिमित्ताने घडून येते. मांगवली नं.१ शाळेत असताना मनिषा राव यांनी राबवलेला उपक्रम मला भावून गेलेला आहे. स्नेहभोजन , भेटवस्तूंचे वितरण, शाळेला शैक्षणिक भेट आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या पहिल्या तीन नंबरात आलेल्यांना आकर्षक बक्षिसे, रोख स्वरुपातील बक्षिसे असा त्यांचा एक दिवसीय उपक्रम दर एकोणतीस सप्टेंबर रोजी नित्य नियमाने राबवण्यात येतो हे विशेष.
अजय रावांचा हा मुलगा विहान ठाण्यातील काँन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतोय. पण त्याचा वाढदिवस गावातील एका शाळेत उत्सवासारखा साजरा केला जातोय हे उल्लेखनीयच आहे. वाढदिवसाला विहान, अजय राव, मनिषा राव नसले तरी विहानच्या आजी आजोबांची उपस्थिती मात्र आवर्जून असतेच असते. विहानला फक्त मुलांनी हाय केलेले व्हिडिओ पाठवले तरी त्यांच्या पालकांना समाधान होत असते. असे सेवाभावी ग्रामस्थ ज्या शाळेला मिळतील तिथल्या मुलांनी त्यांचे सतत आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळे आपल्याला जी शैक्षणिक मदत दरवर्षी मिळते आहे त्याचे मोल पैशात करता येणार नाही असेच आहे.
माझ्या मोठ्या मुलीचा अठरावा वाढदिवस अठरा जानेवारीला साजरा करण्यात आला होता. तो आम्ही नेहमीप्रमाणे साजरा केला. तिला खूप आनंद झाल्याचे तिने बोलूनही दाखवले. पण तिचा तिसरा वाढदिवस असतानाची घटना आहे. पहिला वाढदिवस तिच्या लक्षात नसणारच. पण बालपणातील साजरे केलेले वाढदिवस तिला नीटसे आठवत नाहीत असे तिनेच मला सांगितले.
मी तिला तिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या गमती सांगायला सुरुवात केली. आम्ही दोन्ही उभयता शिक्षक असल्यामुळे शाळेत गेलो होतो. शाळेचा कामाचा दिवस असल्यामुळे मला शहरात जाऊन केक आणायलाही जमले नव्हते. आम्ही पाटगांवसारख्या खेड्यात राहत होतो.
माझे मुख्याध्यापक खटावकरगुरुजी साळिस्त्याला राहात. ते नुकतेच त्यांच्या गावी जत्रेला गेले होते. येताना त्यांनी जत्रेतून आम्हां शिक्षकांसाठी खाऊ आणला होता. खाऊ म्हणजे काहीतरी पिवळ्या रंगाची जाड चकतीसारखी मिठाई होती असे दिसत होते. मी पहिल्यांदा तो पदार्थ पाहात होतो. मी सरांना त्या पदार्थाचे नाव विचारले. त्यांनी त्याचे नांव ' धीवर ' असे सांगितले.
मी धीवर पक्ष्याला नदीत सूर मारुन मासा पकडून उडताना पाहिले होते. आज हा नवीनच धीवर बघत होतो. मी तो धीवर पिशवीत जपून ठेवला घरी नेण्यासाठी. संध्याकाळी शाळा सुटली. साडे पाच वाजले होते. मी तळेरे येथे जाऊन केक आणायचा कंटाळा केला होता.
घरी पाटगांवला आलो. बायकोने केक आणलात काय विचारले. मी केक आणल्याचे खोटेच सांगितले. हळूच पिशवीतून धीवर काढून बायकोला दाखवत म्हणालो, " अगं, आज आपण या धीवरलाच केक बनवायचा !! " तेवढ्यात मुलगी धावतच मला मिठी मारायला आली होती. तिला तिचा वाढदिवस समजला होता. तिनेही केकबद्दल विचारले. मी तिला नंतर दाखवतो असे सांगून वेळ मारुन नेली. रात्री आठ वाजता आम्ही घरातले सगळे एकत्र जमलो. टीपाॕयवर धीवरला ठेवले. मुलीला तो केकच वाटला. तिला तो आगळा वेगळा केक आवडला होता. तिला तो कापायला सांगितला. तिला कापता येईना. म्हणून मी तिचा चिमुकला हात धरुन तो ताठ असलेला ' केक ऑफ धीवर ' जोर लावून कापला. छोटा तुकडा तोंडात भरवून तिला ' हॕप्पी बर्थ डै टू यु ' म्हटले. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता.
त्यानंतर तिचे अनेक वाढदिवस साजरे केले. पण तो छोटेपणातला आनंद आताच्या मोठेपणातील आनंदापेक्षा नक्कीच भाव खाऊन गेल्याचे आजही मला प्रकर्षाने जाणवते. तो क्षण माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आता विरळाच.
©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment