टुमक्या
लग्नात वाजंत्री मंडळाला त्याकाळी खूप मागणी होती. ' याचं वाजवलं, त्याचं वाजवलं ' अशी आपली प्रसिद्धी प्रत्येक वाजंत्री मंडळ करत असणार. आमचेही वाजंत्री मंडळ त्याला अपवाद नव्हते. आमच्या गावकडच्या वाडीत काही ठराविक हौशी तरुण ढोल, ताशा, ढोलकी इत्यादी आवड म्हणून वाजवत. या आवडीचे रुपांतर हळूहळू व्यवसायात कधी झाले ते त्यांना समजलेही नाही.
लोकं लग्न वाजवायला बोलवत कि हे आनंदाने निघालेच म्हणून समजा. पैसे मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट नव्हते. तर शब्दाला किंमत देऊन त्यांच्या लग्नात जाऊन आपली वादन कला दाखवणे असाही सुप्त उद्देश होता. अर्थार्जनाबरोबर वाडीची आणि वादकांचीही प्रशंशा होत होती. प्रशंशा वाढत चालली.
प्रसिद्धी कणकवलीपर्यंत येऊन पोहोचली. वाजवणारे चार पाच लोक असत. हळूहळू कामधंद्याच्या निमित्तानं त्यातील एखादी व्यक्ती नसली तर तिथे अचानक एखादा नवीन वादक शोधावा लागे. मी आणि माझा भाऊ हे नवीन वादक बनलो होतो. माझा भाऊ न्हानू ढोलकी तालात वाजवायचा.
मी आपला टुमके वाजवणारा. टुमके म्हणजे ' टुम टुम ' असा आवाज करणारे एक छोटेसे वाद्य असे. टुमके या वाद्याला आम्ही मालवणी भाषेत ' टुमक्या ' म्हणत असू. हे वाद्य खूप हलके असते. काठीने फक्त दोन तीन सेकंदांच्या अंतराने बडवत राहायचे असते. इतर वाद्यांची गती वाढली कि आपणही टुमक्याची गती वाढवायची असे करत राहायचे. मोठ्या माणसांना याचा सराव असे. आम्ही शाळेत शिकत असल्याने लग्नातच आमचा सराव आणि रंगीत तालीम दोन्ही लाईव्ह चाले. ठेका चुकला तर आमचे तिन्ही काका मला डोळ्यांनी खुणावत. बरोबर ठेका पडला तर ते माझ्याकडे प्रेमाने बघत , मग तर मी अधिक तालात येई.
आम्हांला खेड्यापाड्यातील लग्नांच्या जास्त आॕर्डरी असत. मला एका लग्नाला टुमके वाजवल्याबद्दल १०० ते १२० रुपये मिळत. मे महिन्यात सलग सात आठ लग्ने वाजवल्यानंतर पैसे मोजताना ते खूप वाटत. भरपूर पैसे मिळाल्याबद्दल बाबांकडून शाबासकी मिळे. मिळालेले पैसे आम्ही बाबांकडेच देत असू. बाबा ते आमच्या शिक्षणासाठी वापरायला देत.
बाबांनी आमच्या कष्टाचे पैसे कधीच स्वतःला घेतले नाहीत. पैसे मिळतात म्हणून आम्ही कधीकधी शाळेला दांडी मारुन लग्न वाजवायला जात असू. आम्ही लग्न समारंभात वाजंत्री मंडळातील आहोत असे समजल्यामुळे वराकडील किंवा वधूकडील मंडळी आम्हाला बाहेर बाजूला जेवायला वाढीत. मग आमच्या ओळखीचे लोक त्यांना ओरडत व आम्हांला सर्वांसोबत पंगतीत जेवण्याचा बहुमान मिळे.
त्यावेळी लहानपणीही वाटायचे , कि आपण सगळीच माणसे सारखीच आहोत, तरी हा वर्णभेद , जातीभेद का ? आपल्याच काही बांधवांना आत आणि काही बांधवांना बाहेर जेवण का देतो ? आपण माणुसकी हा धर्म पाळत नव्हतो हे त्यावेळीही आमच्या बालमनावर तीव्र आघात करणारी गोष्ट होती.
आम्ही नाभिक समाजाचे आहोत, म्हणूनही आम्ही अवमान सहन केलेला आहे. दाढी, केस स्वच्छ करताना आम्ही यांचे संपूर्ण डोकेच हातात घेतो, तरीही आम्ही कमी याची बोच मनात सतत टोचतच राही. टुमक्याच्या प्रत्येक आघाताबरोबर ही बोच वाढत चालली होती. पण मनात पक्के ठरवले होते कि कोणतेही काम प्रामाणिकपणे करायचे.
कणकवलीच्या लग्नाची आॕर्डर होती. वधुपक्षाकडून बोलावणे होते. त्यादिवशी शाळेला सुट्टी नव्हती. टुमक्या वाजवणारा उपलब्ध नव्हता. मला सांगण्यात आले. मी शाळेला दांडी मारुन टुमक्या वाजवण्यासाठी वधुपक्षाच्या घरी दाखल झालो.
वधुकडील मंडळी वाजतगाजत लग्न कार्यालयाकडे चालली. कार्यालय अगदी जवळ आले होते. लग्न कार्यालय म्हणजे आमचे एस्, एम्. हायस्कूल होते. खालच्या प्रार्थनाहाॕलमध्ये साध्या पद्धतीने लग्न समारंभ होता. वरच्या मजल्यांवरील वर्ग सुरु होते. मी ' टुमक्या ' वाजवत वर्गाच्या खालून मान खाली घालून निघालो होतो.
मान खाली घालून अशासाठी कि माझे मित्र मला वरच्या खिडकीतून बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्यामुळे लाज वाटत होती. एक दोनदा त्यामुळे माझा ठेकाही चुकला होता. पण काकांनी माझ्याकडे डोळे वटारुन पाहिले होते. त्यामुळे ठेका चुकवून आणि लाजूनही चालणार नव्हते. शाळेला दांडी मारुन राहिल्याबद्दल वाईट वाटत होते. शिक्षकांनी मला बघितले तर ओरडणार म्हणून भिती वाटत होती.
पण हळूहळू धीर चेपला. गावाकडे ओळखीच्या माणसांची लग्ने वाजवताना लाजलो नाही , तर आता तरी का लाजावे ? मनाशी ठाम निश्चय केला , " वाईट करताना लाजावे, चांगले काम करताना अभिमान बाळगावा." त्यानंतर मी अशी अनेक लग्ने वाजवताना कधी लाजल्याचे आठवत नाही. लोकं हसतात , तेव्हा त्यांचे दात दिसतात , आपण शांत चित्ताने ते दात बघत राहावेत. कारण नंतर ही हसणारी माणसे आपल्यासाठी अभिमानाने टाळ्या वाजवतानाही मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
.jpeg)
.jpeg)
