आंब्यार जाम
मिठबांवच्या निवासी शिक्षक प्रशिक्षणात रात्री सांस्कृतिक कार्यक्रम करावे लागत. दररात्री वेगवेगळ्या गटाकडे कार्यक्रम करण्याचे नियोजित असे. आमच्या गटाची पाळी आली होती. मला काहीतरी सादर करावेसे वाटू लागले. माझा मित्र सदानंद गांवकर हजरजबाबी आणि वक्ताही चांगला. त्याच्याशी बोललो. तो लगेच तयार झाला.
दोघांनी संवाद समजून घेतले. मी त्याला एकदाच समजावून सांगितले होते. पण त्याने तर बाजीच मारली. त्यात अधिक रंगत आणून त्याने केलेली मालवणी बतावणी अधिकच लक्षणीय ठरली होती. दशावतारी नाटकाच्या अगोदर लोकमनोरंजन करण्यासाठी ' शंकासूर ' येतो आणि लोकांना हसवतो. त्याच्या विनोदी बोलण्याने लोकांची हसून हसून मुरकुंडी वळते.
अर्थात शंकासूराचे काम करणारा तसा मिश्किल असावा लागतो. तो कोण आहे हे लोकांना समजत नाही. कारण त्याने बुरखा पांघरलेला असतो. त्याच्या आवाजाने ओळखणंसुद्धा कठीणच असतं. कारण शंकासूर आवाज बदलून कोणत्याही भाषेत बोलतो आणि मनाला येईल तसे बोलत जातो.
स्टेज डेरिंग येण्यासाठी नवीन आलेल्या कलाकाराला नाटकवाले ही भूमिका देऊन बोलकं करण्याचा प्रयत्न करतात. त्यात नाईकांची भूमिका बतावणीची असते. ते त्याला नीट समजावत समजावत मूळ मुद्द्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम करतात. सदाने ही भूमिका अगदी पट्टीच्या नाईकाप्रमाणेच पार पाडली होती.
मी शंकासूर बनून आलो. मला बुरखा मिळाला नव्हताच. मी माझ्या लुंगीचा वापर केला. माझे तोंड दिसू नये, ते लपून राहावे असे झाकून घेतले. विचित्र हालचाली करत मी रंगमंचावर अवतीर्ण झालो. माझा अवतार बघूनच प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी लुंगीच्या आत खुश झालो. मी माझ्या संवादाला सुरुवात केली.
नायकांनो, ' तुमका सांगतंय, आंब्यार जाम , माडार गाय आनि समुद्रात वनवो दिसलो. ' या तिन्ही गोष्टी मी नाईकांना नीट समजावून सांगताना लोकं पोट धरुन हसताना पाहून मला आणखी चेव येत होता. आंब्यावर मला जाम दिसले. सगळीकडे जामच जाम होते. नंतर पुढे गेल्यावर मला माडावर गाय चरताना दिसली. पुढे समुद्रात वणवा पेटलेला दिसला. अशा असंबद्ध गोष्टी मी सांगत चाललो होतो. हालचालींनी प्रत्येक मुद्द्याला अधिक टाळ्या घेत होतो.
काही लोकांना हा संकासूर नवाच होता. त्यांनी कदाचित पहिल्यांदाच तो बघितला असावा. मी सुद्धा तो पहिल्यांदाच करत होतो. विद्यार्थीदशेत असताना अनेकविध भूमिका केल्या होत्या. नाईकांच्या सोज्ज्वळ भुमिकेत काम करणारा माझा मित्र सदानंद गांवकर अतिशय हुशारीने माझे म्हणणे खोडून काढत होता. मी सगळ्यांना ' पकवतोय ' या शब्दाने तर त्यानेच अनेकदा टाळ्या मिळवल्या होत्या. त्याने सर्वांना प्रत्येक गोष्ट समजेल अशी उलगडून दाखवली होती.
मी आपला त्याच्या प्रत्येक उत्तराला ' असा काय , माका वाटला तसा ' असं म्हणून हसणं उकळत होतो. सदाने नीट स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता , " संकासुरा, अरे बाबा , तसा नायहा ... आंब्यार जाम म्हंजे एक माणूस जेवल्यावर आंब्यार चडलो, तेका जांभये येवंक लागले , म्हणून आंब्यार जाम , माडार गाय म्हंजे एक मानूस माडाच्या झाडावर माडी काडूक चडलो , तेना थोडी माडी पिल्यान , तो थयसर गावंक लागलो , म्हणून माडार गाय..... आणि शेवटचा समुद्रात वनवो म्हंजे आगीचो वनवो न्हय, समुद्रात जावंन पकडलले मासे वनवो रवान टोपलेत टाकूक लागलो, म्हणून समुद्रात वनवो , मेल्या तो वनवो न्हय. " असं करत करत त्याने माझी संकासूराची अक्षरशः दांडीच उडवली होती.
आमचा तो कार्यक्रम ७-८ मिनिटांचा होता, पण संपल्यानंतर सर्व मित्रांनी ' भारीच रे प्रवीण ' असा लगेचच प्रतिसाद दिला होता. मला मस्त वाटत होते. लोकांना हसवताना खूप मजा येते. लोक तसे लगेच हसत नाहीत. त्यांना हसवावे लागते. पण माझे मित्र खळखळून हसताना पाहून मला ' संकासूर ' वटवता आल्याचे समाधान वाटले. आयुष्यात असे अनेक संकासूर येतात, पकवतात. आपण नाईकांसारखे सावध राहिले पाहिजे. मी फक्त एक पात्र म्हणून ' संकासूर ' केला. बाकी मी काही खराखुरा संकासूर नाही.
© प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
.jpeg)







