🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा .......
एखाद्या खऱ्याखुऱ्या बेटावर जाण्याची वेळ अजूनतरी माझ्यावर आलेली नाही. कदाचित तसा योग पुढे कधी येईल असेही वाटत नाही. तरीही काल एका अंधाराच्या बेटावर जाण्याची संधी ‘ ध्यास परफॉर्मिंग आर्टस् , पुणे ’ यांच्या दोन अंकी नाटकानं दिली. वामन पंडितांच्या Whats App मेसेजमुळेही संधी मिळत असली तरी ‘ निलायम ’ या त्यांच्या वैयक्तिक थिएटर मुळे माझ्यासारख्या नाटकाची आवड असणाऱ्या माणसांना चांगलं बघण्याची सुवर्णसंधी मात्र प्राप्त झाली आहे असे मी म्हटले तरी तेही ‘ सोळा आणे ’ सच आहे.
नाटकाचे अप्रूप मला लहानपणापासूनच आहे. ते आजही तसेच आहे. नाटक घरात प्रवेश करताना आज मला एका बेटावर जायला मिळणार ही उत्सुकता होतीच. नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदरच मी ‘ निलायम ‘ मध्ये पोहोचलो. काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच नाट्यवेडी माणसं तिथे माझ्याआधीच येऊन बसलेली दिसली. त्यात माझ्याहीपेक्षा वयाने मोठी असलेली माणसंच अधिक प्रमाणात होती. नंतर हळूहळू माणसांची संख्या वाढत गेली. तिकीट काढलं आणि तिकीट काढणाऱ्या काकांशी बोलत बसलो. नाटक घरात लवकर प्रवेश करता यावा ही अधीरता होतीच. सात वाजता नाटकाची वेळ होती. बरोबर सात वाजता नाटकघराचं दार उघडलं. मी एक नंबरवालं तिकीट काढणारा होतो याचा मला आनंद वाटत होता. माझ्यासारखे नाटक बघायला आतुर झालेले नाट्यवेडे दरवाजाकडे गर्दी करु लागले. मीही त्यात मिसळून गेलो. प्रवेश करताना स्वतः कलाकारांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी आमच्या हाताला ‘ नाटकाचं अत्तर ’ लावलं. हातात एक ‘ हिरवं पान ’ दिलं. ते पान आणि तो अत्तराचा वास घेत मी माझ्या आसनावर जाऊन बसलो. नाटकातील काही कलाकार रंगमंचावर आधीच उपस्थित होते. हसतमुखाने स्वागत करताना स्वतः एक वाद्य वाजवत एक वेगळालं गाणं म्हणत होते. तो रिदम आपलासा वाटत होता. प्रेक्षक बसेपर्यंत कलाकारांचं हे वादन जणू आपल्याला वंदन करत आहे असा भास होत होता. नाटकाचं हे एक भन्नाट नैसर्गिक संगीत रसिकांच्या मनात पुढील नाटक बघण्याचं कुतूहल वाढवणारं होतं.
मी माझ्या हाताचा वास घेत असताना मिळालेल्या पानाकडे बघत राहिलो होतो. ते पान म्हणजे रंगमंचावर केलेल्या बेटाच्या नेपथ्याचा एक भाग होतं. बेटावरील अनेक वेलींच्या कुंजातील पाने प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या हातात एकेक दिसत होती. आपणही या बेटावर गेल्याची ही नाटकाची खरी सुरुवात होती.
नाटक बरोबर सव्वा सात वाजता सुरु झालं. नाटकातील सर्व कलाकार अप्रतिम अभिनय करत होते. प्रत्येक कलाकार आपला अभिनय नैसर्गिक करत आहेत असं वाटत होतं. उगीच आपले शब्द फेकत राहावेत असं काही घडत नव्हतं. त्यामुळे ते नाटक लवकरच आपलंसं झालं होतं. ज्या लेखकाने नाटक लिहिलं त्यानेच ते परफॉर्म करावं ही नेहमीच अधिक चांगली गोष्ट असते. कारण एक तर ते नाटक म्हणजे त्याचंच अपत्य असतं. त्या अपत्याशी कसं वागावं हे त्याच्याशिवाय अधिक चांगलं कुणालाच कळू शकत नाही. नाटकाचे लेखक , दिग्दर्शक , मुख्य अभिनेते नाटकवेडे ‘ श्रीकांत भिडे ’ यांनी लिहिलेले नाटक अफलातून आहे. एकांकिकेचं एका दिर्घांकात रुपांतर झाल्यानंतर देखील नाटकाला बघताना शेवटपर्यंत कंटाळा येत नाही हे विशेष आहे. कुडाळचे श्रीकांत भिडे खरंच माझ्या मनात भिडले.
सुरुवातीपासूनच हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. कलाकारांनी स्वतः ते नाटक जगले आहेत. सर्व कलाकारांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. जी भूमिका मिळाली , त्या भूमिकेचं प्रत्येकानं ‘ सोन्याचं हिरवं पान ’ केलेले होतं , जे आम्ही आमच्या हातात अत्तराच्या वासासहित घरापर्यंत घेऊन आलो होतो. माझ्या घरातल्या सदस्यांनाही मी या नाटकाचं वेगळेपण सांगितल्यावर त्यांनाही आपण नाटकाला न गेल्याचं शल्य जाणवावं इतकं नाटक मनात रुजलं होतं.
अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नाटकाबद्दल माहिती असणारे आणि नाटकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अतिशय आवडावं असंच हे नाटक आहे. मी या नाटकाबद्दल सकाळी लवकर उठून लिहितो आहे , असं मला का वाटलं ? यातच त्याचं खरं उत्तर दडलेलं आहे. हा लेख लिहिताना माझ्या हाताला लावलेल्या अत्तराचा मी वास घेतो आहे , तो अजूनही तसाच आहे. दिलेले ते हिरवं पान माझ्यासमोर आहे आणि हसत हसत ते माझ्याकडे बघतं आहे.
एका अंधाराच्या बेटात गेलेल्या ‘ राख्या ’ नावाच्या कलाकाराची ही कथा आहे. नाटक तसं म्हटलं तर पैसे देणारं , नाहीतर असलेले पैसे घालवणारं असतं . एखादं नाटक प्रेक्षकांच्या मनात रुजायला वेळ लागतो. हे नाटक नाटकवाल्यांची ‘ व्यथा ’ सांगणारं नाटक आहे. बेटावरील बोचरी थंडी लागते म्हणून केलेली शेकोटी प्रत्येक रसिक प्रेक्षकालाही ऊब देणारी ठरली. शेकोटीत तयार झालेली राख तोंडाला फासून ‘ आपल्या नाटकाच्या आयुष्याचं नाटक ’ दाखवताना श्रीकांत भिडे यांनी केलेला अभिनय टाळ्या द्यायलाही विसरायला लावतो. इथे विनोद नाहीत , पण आपण स्वतः मनातल्या मनात आपल्यावर हसण्यासारखं खूप काही आहे. नाटकाचा शेवट झाला तरी प्रेक्षक टाळ्या द्यायला विसरतात , कारण त्यांना हे नाटक संपूच नये असं वाटत राहतं म्हणून.
नाटकाचा सूत्रधार म्हणून डॉक्टरांची भूमिका केलेल्या कलाकाराने केलेला अभिनय , आवाजाची शब्दफेक थेट मेंदूत जाते. राख्याच्या मित्रांनी , मैत्रिणींनी राख्यावर केलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणून गेलं तेव्हा त्या कलाकारांचा त्या नाटकाचा अभ्यास किती सखोल असेल याची कल्पना येते. नाटकाच्या संहितेबद्दल परिपूर्ण लिहिणं चुकीचं आहे , कारण रसिक प्रेक्षकांनी तिकीट काढून हे असलं नाटक थिएटर मध्ये जाऊन बघतानाचा आस्वाद घ्यायला हवा. नेपथ्य , प्रकाश योजना , ध्वनी योजना खरंच भडकावू नाहीत.
नाटकात एक दोन प्रणय प्रसंग आहेत. तेही अश्लिल नाहीत , ते श्रुंगारपूर्ण आहेत. नेपथ्याचा केलेला काळजीपूर्वक वापर , ती वस्तू तिथेच चांगली आहे असं वाटावं. राजाच्या मुलीने केलेली वेशभूषा आणि अभिनय अप्रतिम. रात्रीच्या अंधारात कंदिलाचा केलेला वापर ‘ अंधाराचं बेट ’ प्रत्यक्ष समोर ठाकल्यासारखा. या नाटकाविषयी बरंच काही लिहिल्यानंतरही आठवत राहावं असं बरंच काही अजूनही मनात रेंगाळतं आहे. पण नाटक करणाऱ्यानं कधी थांबायचं , हे जसं त्याला कळलं पाहिजे , अगदी तसंच लिहिणाऱ्यानेही कधी थांबावं हे त्याला कळलं पाहिजे. नाटकाबद्दल काहीतरी रिव्ह्यू द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच नसून , तो लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून लिहून मी स्वतः समाधानाने मोकळा झालो आहे.
© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( मोबाईल : 9881471684 )