Wednesday, December 4, 2024

' परखलेले सर्वे '

         परख नावाच्या परखलेल्या म्हणजेच विशेष पारखून अभ्यासलेल्या सर्वेसाठी माझी नुकतीच क्षेत्रीय अन्वेषक म्हणून निवड झाली होती .  त्यानिमित्ताने शासनाच्या एका सर्वेक्षणामध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी लाभली हे माझे भाग्यच. 

        तशीही ही माझी तिसऱ्यांदा निवड झाल्याने मला यापूर्वी सर्वेक्षण केल्याबद्दलचा अनुभव गाठीशी होताच .  पहिल्या वेळी मला ' कासार्डे तांबळवाडी ' या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गाचा सर्वे करता आला. त्या शाळेत तर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावलेले दिसले. तिथे काम करत असलेल्या आणि काम करुन गेलेल्या शिक्षकांनी गावातील , वाडीतील लोकांच्या सहभागातून शाळेचा चेहरा बदलून टाकल्याचं ते चित्र मला मोहित करणारं होतं. त्या शाळेतील केसरकर मॅडम आणि राठोड सर यांनी केलेला उत्तम पाहुणचार अजिबात विसरता येणार नाहीच.  बिचारे राठोड सर आज हयात नाहीत याची खंत वाटते आहे.  त्यांचा चेहरा मला अजूनही जसाच्या तसा दिसतो आहे.  

        विद्यार्थी सुरक्षा संदर्भात परिपत्रक येण्यापूर्वीच यांनी खूप पूर्वी केलेला विचार खरोखरच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासारखाच आहे. असा भविष्यकालीन विचार करुन कार्य करणाऱ्या शिक्षकांना खरंच सलाम केले तरी कमी पडतील .  

        त्यानंतर दुसऱ्यांदा मला तळेरे येथील ' स्वीटलँड इंग्लिश मेडीयम स्कुल ' मिळाली होती .  इयत्ता सहावीच्या मुलांचा NAS सर्वे करतानाही मला खूप छान अनुभव प्राप्त झाला होता. तिथे मिळालेली वागणूक आदरयुक्त होती .  

        यंदा मिळालेली शाळा पुन्हा एकदा इंग्रजी माध्यमाची होती.  मी मराठी किंवा सेमी माध्यमाला शिकवणारा शिक्षक असलो तरी सर्वे करताना भाषेची कोणतीही अडचण मला आलेली नाही हे महत्त्वाचे आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्हां शिक्षकांना मिळालेलं मुद्देसूद प्रशिक्षण हे त्याला कारणीभूत आहे .  कोणतीही शंका न ठेवता सर्वांच्या सर्व प्रकारच्या शंकांना उत्तरे देणारे मार्गदर्शक खरंच मोलाचे ठरतात ते त्यासाठीच .  त्यांच्याकडे कोणत्याही अवघड शंकेचं मुद्देसूद उत्तर असतं. लहान मुलांना सांगावं तसं ते पुन्हा पुन्हा सुद्धा सांगतात तेव्हा त्यांच्या संयमाची दाद द्यावीशी वाटते. म्हणूनच त्यांनी दिलेले प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांपर्यंत पोहोचते .  

        मला यावेळी मिळालेली शाळा माझ्या शाळेपासून जवळ असली तरी मी कधीही त्या शाळेत गेलेलो नव्हतो .  नडगिवे हे गाव शिडवणे पासून जवळ म्हणायला हरकत नाही .  एका खाजगी शाळेच्या आणि तेसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांची सर्वे परीक्षा घेण्यासाठी माझी निवड झाली होती.  असं काही वेगळं करण्यासाठी शिक्षक म्हणून मी नेहमीच उत्साही असतो .  यावेळीही माझा उत्साह नेहमीसारखाच होता .  

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...