🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर
२०१९ पासून मी तळेरे बीटमध्ये आहे. तेव्हापासून माझी आणि त्यांची भेट होत आहे. नावात राम आणि आडनावात विभुती असणारे हे व्यक्तिमत्व.
सध्या तळेरे नं. १ शाळेत कार्यरत असणारे माझे मित्र मा. श्रीराम विभूते यांच्याबद्दल मी बोलतोय हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच.
तळेरे प्रभागातील अनेक उत्तम कार्यक्रम तळेरे नं. १ शाळेत संपन्न होत असताना मी अनेकदा त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थितही होतो. प्रत्येक वेळी श्रीराम विभूते सरांचं ' सूत्रसंचालन ' अनुभवलं आहे. त्यांच्या हातात ' माईक ' गेला कि त्या ' माईकचं ' कर्णमधुर आवाजात रूपांतर होताना मी कित्येकदा ऐकलं आणि पाहिलं आहे. त्यांचा आवाज लांबूनही मी ओळखू शकेन इतका तो माझ्या ओळखीचा झाला आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी विद्येची देवता ऐकत राहावी अशीच. विद्येचं आराध्य दैवत जणू त्यांच्यावर सदानकदा प्रसन्न झालेलं असतं. त्यांनी बोललेली सुभाषिते, शायरी, चारोळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवत जातात तेव्हा तो प्रेक्षकांसाठी अनमोल क्षण असतो. त्यांनी बोलत राहावं आणि रसिकांनी टाळ्या वाजवत नियमित दाद देत राहावी असं त्यांचं सूत्रसंचालन मला नव्हे सर्वांनाच मोहवून टाकणारं असतं.
ते समोर येतात तेव्हा एखाद्या कार्यक्रमाचा सुश्राव्य आरंभ होत असतो. मान्यवरांचे स्वागत करताना त्यांच्याबद्दल ' ऑन द स्पॉट ' स्तुतीसुमने उधळणारे श्रीराम विभूते सर पाहिले कि त्यांच्या अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्वाची छोटीशी झलकच झळकते.
प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या सूत्रसंचालनाला नेहमीच ते असतात. त्यावेळी बक्षीस वितरणाचे त्यांचे सूत्रसंचालन कुतूहल जागृत करणारं असतं. त्यांच्या स्वतःच्या शाळेने अनेकदा तालुकास्तरापर्यंत किंवा जिल्हास्तरापर्यंत बाजी मारलेली असते तेव्हा तर त्यांच्या सूत्रसंचालनाला अधिक बहर आलेला असतो.
NAS सर्वेक्षण होते. माझी नेमणूक कासार्डे तांबळवाडी शाळेत झाली होतो. ते त्या शाळेत काम करुन बदली होऊन तळेरे नं. १ गेले आहेत. तांबळवाडी शाळेत ' CCTV कॅमेरे पाहिले. श्रीराम विभूते सरांनी त्यावेळी तांबळवाडी शाळेला डिजिटल बनविण्यात महत्वाची भूमिका निभावली होती असे ऐकायला मिळाले आणि मला अधिक आनंद झाला.
ते एक उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात तबला वाजवताना मी स्वतः पाहिले आहे. शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे. त्यांच्यात अनेक उत्तम गुण आहेत. मला त्यांच्यातल्या उत्तम गुणांविषयी अतीव आदर आहे. त्यामुळे ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमात उठून दिसतात. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार व सिंधदुर्ग जिल्ह्याचा गुरू गौरव पुरस्कार मिळाला आहे.
त्यांचे स्टेटस भारी असतात. त्यांचे सामान्यज्ञान अफलातून आहे. त्यात नेहमीच वाढ होत असते. १ जानेवारीला त्यांचा वाढदिवस येतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी वाढदिवस असणं ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीराम विभूते सरांनी आपल्या चांगल्या गुणांमध्ये अधिक वृद्धी करावी आणि आपल्या व कुटुंबाच्या आयुष्यात पुढील वाटचालीसाठी समृद्धीचे, सुखाचे, भरभराटीचे दिन सदैव येवोत अशा कोट्यावधी शुभेच्छा.
©️ प्रवीण कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment