Saturday, December 21, 2024

जल्लोष बाल खेळाडूंचा

 जल्लोष बाल खेळाडूंचा 


मुलांसाठी खेळ ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. खेळ त्यांच्या जीवनात नियमित आनंद फुलवणारे क्षण निर्माण करत असतो. त्यामुळेच खेळ मुलांसाठी जल्लोष असतो. बालजीवनात चैतन्य आणण्याचे कार्य करणारा हा खेळ सतत येत राहिला तर मुलांचं तन आणि मन दोन्ही तंदुरुस्त होण्यास नक्कीच मदत होईल. 

गेले काही दिवस आम्ही सर्व शिक्षक या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. मुलांसोबत विविध खेळांचा आनंद घेत आहोत. मुलांसाठी आणि मुलांसोबत खेळताना होणारा आनंद काय वर्णावा !! बाल कला , क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव मुलांच्या जीवनात दरवर्षी प्रसन्नतेचं पीक आणणारा काळ असतो. या दुर्मिळ क्षणांची ही मुले अगदी आतुरतेने वाट पाहताना मी स्वतः अनेकदा पाहिली आहेत. मुलांना खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहण्यासारखं सुख नाही. मुलं मस्त खेळत आहेत , मस्ती करत आहेत , भांडत आहेत , स्वतःच भांडणं सोडवत आहेत असं चित्र सगळीकडेच थोड्याफार फरकाने पाहायला मिळतं. शिक्षकांना हे सतत दिसणारं दृश्य आहे. मुलं तक्रारी सांगतात , त्या सोडवतात. भांडण करतात , भांडणं विसरून जातात. हा त्यांच्यातला निरागसपणा आम्हां मोठ्या माणसांना टिपता यायला हवा. 

केंद्राच्या स्पर्धा संपन्न होत असताना मला उपक्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मी मला दिलेली जबाबदारी अधिक उत्तम रीतीने नेहमीच बजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये , आपल्याला त्रास झाला तरी चालेल हे माझं नेहमीच सूत्र असतं. कोणालाही थेट नकार द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे मला जबाबदारी दिली नसली तरी माझीही जबाबदारी आहे असं समजून मी सर्वतोपरी अधिकाधिक प्रयत्न करत राहतो. ती माझी सवयच आहे. त्यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते आणि मग ती पार पडताना माझी दमछाक झाली तरी मी ती निमूटपणे सहन करत राहतो. 

मुलं छान खेळताना बघून केंद्रात यशस्वी होऊन प्रभागात जाताना एका विशिष्ट चाळणी प्रक्रियेतून जात असतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झालेली मुलेच पुढे पुढे खेळू शकतात. स्पर्धेत यशस्वी व्हायचंच असं ठरवून आलेली मुलं अपयशी ठरली कि अक्षरशः रडू लागतात. यावेळी मी हे क्षण पुन्हा अनुभवले. माझ्या शाळेतील मुलांचा केंद्रात ज्ञानी मी होणार मोठ्या गटात निसटता विजय झाला. अर्थात मुलांनी केलेला अभ्यास मुलांना विजेता ठरवून गेला होता. प्रतिस्पर्धी शाळेतील मुलांनीही खूप अभ्यास केला होता. पण उपविजेता ठरुनसुद्धा त्यांना अश्रू आवरले नाहीत. मुलांना खिलाडूवृत्ती माहिती आहे , तरीही डोळ्यातून पाणी येतंच. मुलांची चाचणी आणि चाचपणी होत असताना जणू शिक्षकांचीच चाचणी होत असते. शिक्षक आणि मुले या दोघांनीही केलेल्या परिश्रमांचं ते दुहेरी यश असतं. यात जेव्हा पालकही जबाबदारी घेतात , तेव्हा मुलांच्या उत्तर देण्याचं प्रमाण अजून वाढत जातं. मुलं पटापट उत्तर देऊ लागली कि टाय फेरीची वेळ येते. 

टाय फेरीपर्यंत पोहोचलेली मुले खऱ्या अर्थाने विजेता ठरलेली असतात. फक्त पुढे एक कोणतातरी संघ न्यावा लागतो म्हणून एक संघ बाद ठरविण्याची ही एक निकषरुपी पद्धत आहे. जी मुलं आणि जे शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुढे आलेली असतात , त्यांच्या त्यावेळी डोळ्यांतून पाणी आल्याखेरीज राहत नाही. मुलांच्या ते प्रत्यक्ष येतं , शिक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं तरी ते लपवून ठेवावं लागतं. कारण त्यावेळी मुलांना सांभाळून घेणं अधिक गरजेचं असतं ना !!! 

मुलं आपलं कोणत्याही खेळातलं सादरीकरण बिनधास्त करतात. आमच्या खोखोच्या संघातील काही मुले आम्हांला इतकी छान खेळतील असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिलो होतो. आमचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी येऊन येऊन मुलांना क्रीडांगणावर निपुणतेने खेळण्यासाठी धडे देत होते. या सगळ्या मुलांच्या अंगात खोखो हा खेळ इतका भिनला आहे कि बघताना प्रत्येकात चैतन्य संचारावं. अर्थात मी माझ्या मुलांचा खेळ पाहत होतो. मी स्वतः असा कधीही मैदानावर खोखो खेळ खेळलेलो नाही. कारण आमच्या बालवयात अशा क्रीडा स्पर्धा होत नसत. मी नोकरीला लागल्यापासून या स्पर्धा सुरु झाल्यामुळे आताच्या मुलांना असं खेळण्याची संधी सरकारकडूनच मिळालेली आहे. 

गेली अठ्ठावीस वर्षे मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मुलांच्या अभ्यासाबरोबर खेळसुद्धा घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. छोट्या आणि एकशिक्षकी शाळेत काम करताना मुले छोटी असल्याने मुलांना खेळात सहभागी करूनसुद्धा मुलं खेळात कमी पडताना दिसत होती.त्यामुळे भाग घेऊनसुद्धा कधी जल्लोष वगैरे करता आला नाही. आपले विद्यार्थी खेळात नैपुण्य दाखवतात तेव्हाच मनापासून जल्लोष करता येतो. गोवळ गावठण शाळेत असताना मुले कबड्डी छान खेळत. अनेकदा मुलांनी आणि मुलींनी शाळा समूह योजनेतही ट्रॉफ्या मिळविल्या. तेव्हापासून मुलांमधील खेळातील आवड माझीही आवड बनायला लागली. लोकांनी , पालकांनी यशस्वी झालेल्या मुलांचे ढोल वाजवून केलेले स्वागत मी अजूनही विसरलेलो नाही. खेळात पुढे जाणारी मुले जेव्हा त्या वर्षी ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. 

पुन्हा जेव्हा वैभववाडीत ‘ मांगवली नं. १  ’ शाळेत सात वर्षे असताना नेहमीच खोखो संघाचे नेतृत्व करता आले. आमची मुले स्प्रिंगसारखी खेळताना आमच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा होई. मुलांना दुखले खुपले तरी त्यांना काही वाटत नसे. खेळावर असलेलं त्यांचं प्रेम अंतर्मनात पूर्ण रुजलेले होते. अभ्यासातही चमक दाखवणारी मुले खेळातही अप्रतिम कौशल्ये दाखवताना आम्ही कमालीचे भारावून जात होती. 

आता तर मी ज्या शाळेत आहे , ती शिडवणे नं. १ शाळा तर खोखोसाठी प्रसिद्ध असलेली शाळा आहे. त्यामुळे आमचे अनेक माजी विद्यार्थी खोखो खेळताना पाहिले कि आमचे आजी विद्यार्थीसुद्धा भारावून जाऊन खेळतात. छोटी छोटी मुले खोखो खेळातील हे कौशल्य दाखवताना दिसतात , तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो कि ही मुले हे कधी शिकली ? मुले बघून बघून आणि आपल्या भावंडांकडूनही परंपरेने खूप काही शिकत असतात. शिक्षकांपेक्षाही आपल्या मोठ्या भावंडांकडून शिकताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. 

यंदा मला प्रभागाचा क्रीडाप्रमुख म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले. त्यामुळे मला कामाचा बराच लोड आला. एकतर माझ्या शाळेमध्ये एक शिक्षिका सहा महिन्यांच्या रजेवर गेल्यामुळे दोन वर्ग सांभाळून मुख्याध्यापक काम करताना होणारी धावपळ , माझा अचानक वाढलेला बीपी , घरातील येणाऱ्या आकस्मिक अडचणी या सर्वांवर मात करताना खूप त्रास होत असला तरी तो त्रास दुसऱ्यांना न दाखवता हसतमुखाने काम करत राहणे एवढेच मला माहिती आहे. क्रीडाप्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळतानाही गरम इस्त्री डोक्यावर घेतल्याचा भास होत होता. माझ्या शाळेत कमी शिक्षक असल्याने माझ्या शाळेतील माझ्या वर्गातील मुलांसाठी मला द्यायला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही याची खंत सतावते आहे. 

मुलांचा जल्लोष दिसतो आहे. माझी खंत मनात सलते आहे. क्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत असताना माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी किती खरा उतरलो ते मला माहिती नाही. पण मी मात्र मला जमले तितके प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपसमोर बसून काम करताना मी अजिबात थकत नव्हतो. कारण मला दिलेले कार्य मला निर्विघ्नपणे पार पडायचे होते. 

शिक्षक मला आदर देत होते. विद्यार्थी हसतमुखाने सामोरे जात होते. पंचांना दिलेले काम वेळीच पूर्ण होताना दिसत होते. सर्वांना घेऊन काम करताना मला माझ्या शाळेत संयोजक म्हणून काम केल्याचा अनुभव कामी आला. सर्व विजेते ट्रॉफी घेत होते , तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत चालला होता. मला क्रीडाप्रमुख बनवलं तेव्हा मला वाटलं होतं कि मला बनवलं तर नाही ना ? पण माझी तब्येत बरी नसतानाही मी क्रीडाप्रमुख म्हणून मला दिलेली जबाबदारी पार पडू शकलो याचा माझ्या बाबांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आज ते जिवंत असते तर त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या हसऱ्या सुरकुत्या पाहून मी नक्कीच सुखावलो असतो. मला सहकार्य करणाऱ्या माझ्या प्रभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व शिक्षक , पंच , परीक्षक , पदाधिकारी , पालक , ग्रामस्थ आणि देणगीदार  यांचे ऋण कसे फेडू ? 


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...