🛑 मनात घुसलेला हत्ती
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे कणकवलीकरांचं नाटकघर म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सुप्रसिद्ध आहे असे म्हटले तर वावगं ठरू नये. मी या प्रतिष्ठानची अनेक नाटकं , एकांकिका बघितल्या आहेत. त्यांनी केलेली नाटकं किंवा एकांकिका मनात घर करतात. त्यातील संदेश मनाच्या आतल्या कोपऱ्यात पोहोचतो.
' हत्ती घूस रेडा गेंडा ' हे सुद्धा एक असं आगळं वेगळं नाटक नुकतंच पाहण्याची सुवर्णसंधी लाभली. असं विचार करायला लावणारं दोन अंकी नाटक करण्याचं धाडस जेव्हा वसंतराव प्रतिष्ठान करतं, तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होत जातो. नाटकाला झालेली गर्दी म्हणजे एखाद्या व्यावसायिक नाटकाला लाजवेल अशीच. खूप कमी प्रवेशमुल्यात असं बोधप्रद नाटक सर्व जिल्हावासियांना पाहायला मिळालं. खूप लांबून लांबून नाट्यरसिक आले होते. देवगड, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण मधील माझे काही शिक्षक मित्र, नाटक मित्र आलेले पाहून मला माझ्या कणकवलीचा अभिमान वाटला.
अर्थात गेले कित्येक वर्षं प्रतिष्ठानची ही नाट्यचळवळ सुरु असलेली मी प्रत्यक्ष पाहतो आहे. माझं बालपण कणकवलीत झाल्यामुळे प्रतिष्ठानचे अनेक कलाकार माझ्या ओळखीचे आहेत. शरद सावंत यांचा अभिनय वाखाणण्यासारखा. सुदिन तांबे यांना परीक्षक म्हणून पाहिलं होतं. त्यांचा अभिनय अफलातून. पुरळकर यांना यु ट्यूबवर पाहिले, त्या दिवशी त्यांचा अभिनय जवळून पाहिला. विकास कदम यांचं ढोल वाजवताना बोलण्याचं टायमिंग लाजबाब. माझे मित्र काणेकरांचे राकेश आणि खटावकरांचे सिद्धेश यांच्या अभिनयाला सलाम करावासा वाटतो. युवा अभिनेत्री व गायिका प्रतिक्षा कोयंडे हिचा आवाज ऐकतच राहावा असाच. अगदी सर्वांच्याच अभिनयाची दाद द्यायला हवी. विंगेतून टिपऱ्या वाजवून संगीत देणारी युवती ( सोनाली कोरगावकर ) पाहिली. अगदी समरसून ती संगीत देण्यात मग्न होती. दिग्दर्शक केतन जाधव यांनी अप्रतिम कलाकृती बसवली आहे याचा प्रत्यय आला. नाटकाची संकल्पना मनात येणं सोपं असतं, ते प्रत्यक्षात राबवताना त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पनाच केलेली बरी.
माझ्या दोन मुली नाटकाला जायचंच असा हट्ट धरुन बसल्या होत्या. तसंही मी त्यांना नेहमीच नाटकांना नेत असतो. पण या नाटकाची जाहिरात पाहिल्यापासूनच ती माझ्यामागे लागली होती. तनिष्का ( 9 वी ) आणि स्वानंदी ( 3 री ) दोन्हीही मुलींनी नाटकाचा शेवटपर्यंत आस्वाद घेतला. त्यांनी सर्वांच्या अभिनयाचे माझ्याकडे कौतुक केले. पुढच्या पिढीकडून कौतुक होणं हे आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोठी पावती आहे. आजच्या आभासी दुनियेत ' नाटक ' तिकीट काढून पाहणं लोकं टाळू लागले आहेत. कोरोना काळात तर या नाट्यअभिनेत्यांची खूपच आर्थिक गोची झाली असेल. पुन्हा एकदा नव्या दमाने आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असे कलाकार वेगळं समाजमनावर राज्य करु पाहणारं दाखवणार असतील तर ' नाटकांचा उदय ' पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.
छोट्या स्वानंदीला अगदी जवळून ' हत्ती, घूस, रेडा, गेंडा ' हे सर्व प्राणी पाहायचे होते. आमची तिकीट एक्सच्या म्हणजे शेवटच्या रांगेत होती. तिथून तिला काहीही दिसत नव्हते. ती कुठे अचानक गायब झाली होती. मी शेजारीच बसलेल्या माझ्या शिक्षक मैत्रिणीला ' कल्पना मलये ' हिला विचारलं. मला वाटलं तिच्याकडे बसली असेल. ती तिथेही नव्हती. ती थेट सी रांगेत जाऊन एका रिकाम्या सीटवर बसून अगदी जवळून नाटक बघण्यात दंग होऊन गेली होती. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या समाप्तीनंतर दहा मिनिटांच्या रिसेसमध्ये मी तिला शोधून काढण्यात यशस्वी ठरलो.
नाटकाला माझ्या मुलींच्या वयाची मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सर्वांचे माझ्यासारखेच अनुभव असू शकतील असे नाही. मुलांना नाटकं दाखवली पाहिजेत या मताचा मी आहे. हल्ली मुले मोबाईलवर गेम खेळतात. त्यांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी ' नाटक ' हे एक उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. सर्व पालकांनी आपल्या मुलांना आपल्यासह असंच ' वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली ' यांच्या विविध उपक्रमांना सातत्याने भेट देत राहावी आणि जे कमी वेळेत जास्त प्रबोधन करणारं असं काहीतरी शिकून शहाणं होऊन जावं.
प्रतिष्ठान पुढील काळात अनेक उत्तम प्रयोग घेऊन आपल्यासाठी येत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी कायमच ' रंगवाचा ' हे त्यांचे उत्तम त्रैमासिक वाचत असतो. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सर्व कलाकारांना, सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १
( 9881471684 )

No comments:
Post a Comment