भय इथले संपत नाही
हल्ली मुलींच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न खूपच ऐरणीवर आला आहे.घरातून मुली बाहेर पडल्यानंतर त्या पुन्हा घरी येईपर्यंत त्यांच्या सुरक्षेविषयी अतिशय काळजी वाटू लागली आहे. पेपर उघडला कि एखादी नव्हे तर मुलींवर होणाऱ्या अनेक अत्याचारांच्या बातम्या वाचून प्रत्येकाचे मन भयग्रस्त होऊ लागले आहे.
ज्यांच्या घरात अनेक मुलींचा जन्म झाला असेल , त्यांना तर खूपच काळजी वाटू लागली आहे . घरात एखादी मुलगी असली तरी तिच्या पालकांना धास्ती वाटते. ही धास्ती वाढत गेली कि मग त्याचे तणावात रुपांतर होत जाते. जगात असे अनेक पालक असतील जे मुलींना घराबाहेर एकटीला पाठवताना दहावेळा तरी विचार करत असतील.
प्रसार माध्यमांच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकलेल्या ह्या नवीन पिढीतील युवक युवती ज्यावेळी आपलं सर्व जीवनच सोशल करुन टाकतात , तेव्हा त्यांच्या शोषणाला सुरुवात होण्याची जास्त शक्यता असते . आपलं संपूर्ण जीवन आपण माध्यमांच्या स्वाधीन करुन आपल्या लाईकची वाट पाहत बसतो , तिथेच आपले चुकते. आपणही काहीअंशी समोरच्याला आपल्याशी संवाद साधण्याची संधी देऊन मोकळे होतो. मग संवादांना सुरुवात झाल्यावर मग त्याला एखादा रिप्लाय दिला तरी पुढून लगेचच रिप्लाय वर रिप्लाय येत जातात. या रिप्लायच्या जाळ्यात सापडणाऱ्या मुली त्यांचे भक्ष्य बनण्याची अधिक शक्यता असते. या मिडीयावर आता ओळखीपाळखीशिवायच मैत्री होण्याचे प्रमाण वाढले आहे .
ही मैत्री मग भयानक रुप घेऊन पुढे येते. कुठेतरी एकांतात बोलाविले जाते. मुलगी कोणालाही न सांगता तिकडे जाते. तिच्या आयुष्याची वाट लावायला काही नराधम टपून बसलेले असतात. ती जाते आणि त्यांच्या सापळ्यात सापडते. मग ती पुन्हा मागे येऊच शकत नाही अशीही परिस्थिती निर्माण करण्यात येते. तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं. तिच्याकडून हवी तशी कोणतीही कामे करुन घेण्यात येतात. तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण उडते. तिला यातून मागे यायचे मनात येते , पण आपण पुन्हा समाजात कोणत्या तोंडाने जाणार अशी भीती वाटून ती होणारा अत्याचार सहन करत राहते. ज्यावेळी या सहनशीलतेचा कळस होतो , तेव्हा आपलं आयुष्य संपवण्याशिवाय तिला कोणताही पर्याय ठेवला जात नाही. ती आत्महत्येचा अघोरी मार्ग निवडते. खरंच , हे सारं वाचताना , लिहिताना जर अंगाचा थरकाप उडवणारं असेल , तर ज्यांच्यावर हे प्रसंग प्रत्यक्ष येत असतील त्यांची काय अवस्था होत असेल , याची फक्त कल्पना केली तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते.
ही अशी एखादी घटना आपल्या घरी घडत नाही , तोपर्यंत आपल्याला त्याचे काहीही गांभीर्य वाटत नाही. आपल्या आप्तजनांच्या बाबतीत घडल्यानंतरच आपल्याला त्याची भयानकता समोर येते. आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत म्हणून आपण त्यांना कायमचं घरी डांबून ठेवू शकत नाही ना ?
माझ्या लहानपणी मी एक ' मोहरा ' नावाचा हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यात एका मुलीवर ' पार्टी ' मध्ये अत्याचार करण्यात आलेला होता. तो अत्याचार समजण्याचं माझं त्यावेळी वयही नव्हतं. तरीही मला त्या युवकांचा खूप राग आला होता. माझ्या बहिणीसुद्धा सुरक्षित नाहीत , हे त्यावेळीही माझ्या लक्षात आले होते. मला माझ्या दोन मोठ्या बहिणी व एक लहान बहिण असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्हां भावांवर आहे ही समज मला त्यावेळी अंतर्मनात रुजली होती. त्या जिथे जिथे जात , तिथे तिथे मी स्वतः उपस्थित राहून त्यांच्यावर लक्ष ठेवीत असे. अर्थात त्या काळात मोबाईल , फोन संस्कृती नव्हती. त्यामुळे आज जेवढ्या घटना घडत आहेत , तशा घटना वारंवार घडताना दिसत नव्हत्या.
आजच्या मुली आणि मुलगे , युवक , युवती , लग्न झालेल्या विवाहिता यांच्यावर अन्याय , अत्याचार होताना पाहून मन विषन्न होते. आकाशवाणीवर माझ्या लग्नापूर्वी मी एक नभोनाट्य ऐकले होते. ' वाटेवरती काचा गं ' असं त्या नाट्याचं शीर्षक होतं. मुलींना नेहमीच अशा काचांनी भरलेल्या वाटेने चालत जावं लागत असेल. बिचाऱ्या कित्येक वर्षं हा अन्याय , अत्याचार सहन करत आल्या आहेत. त्यांना होणारे वाईट स्पर्श , त्यांच्याकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा कधी कमी होणार हे आम्हांला अजूनही माहिती नाही. सोशल मीडियाची माहिती नसणाऱ्या किंवा ज्यांना अत्याचार म्हणजे काय असतो हेही माहिती नसणाऱ्या निरागस छोट्या मुलींवर असा अन्याय झाल्याचे ऐकतो , वाचतो तेव्हा तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते.
हल्लीच एका मराठी चॅनलवर एक अशी धीट युवती दाखवण्यात आली आहे कि ती मुलासारखी वागते. तिच्या वडिलांनी तिला लहानपणापासून मुलासारखी वागणूक दिली , त्यामुळे ती ' दुर्गेसारखी ' अन्यायाविरुद्ध तुटून पडते. अन्याय करणे हा गुन्हा आहे , तसंच अन्याय सहन करणे हासुद्धा गुन्हाच आहे. त्यामुळे हल्लीच्या महिला वर्गाने अन्याय सहन करणं सोडून दिलं पाहिजे. अन्यायाचा निकराने प्रतिकार केला पाहिजे. मोबाईलचा वापर करुन पोलिसांना वेळीच कल्पना देऊन कायदेशीर मार्गाने अशा नराधमांना शिक्षा होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. तर आणि तरच इथले भय संपण्याच्या आशेचा किरण दिसेल.
© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं . १
No comments:
Post a Comment