🔴 लेट्स लर्न इंग्लिश
इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा आहे. ती जगाची भाषा आहे. ती वाघिणीचे दूध आहे असेही म्हटले जाते. इंग्रजी बोलणे , वाचणे व आकलन होणे ही काळाची गरज आहे. सध्या जिल्हा परिषदच्या काही शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यम आहे. पहिलीपासून इंग्रजी विषय आहे. तसेच शासकीय टॅग मिटिंगच्या माध्यमातून शिक्षकांचे इंग्रजी संभाषण विषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाही फायदा शिक्षकांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे.
आम्ही लहान असताना आम्हाला पाचवीपासून इंग्रजी विषय अभ्यासक्रमामध्ये आला. त्यावेळी पाचवी म्हणजे आमची इंग्रजीची पहिली इयत्ता होती. तरीही आम्ही बारावीमध्ये सर्व विषय इंग्रजीमध्ये असूनही ते लिलया पेलले. चांगली टक्केवारी मिळवली. इंग्रजी प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत व्यवस्थित लिहिली.
फक्त ऐकणे , वाचणे , लिहिणे या क्षमतांमध्ये बाजी मारली. पण इंग्रजी भाषण , संभाषण यात तितकी बाजी मारता आली नाही. इंग्रजी ऐकलेले समजत होते , पण बोलण्याची वेळ आली कि भीती समोर येत राहिली. पोटात मोठा गोळा येत गेला.
इंग्रजीत बोलायचे तर मराठी सारखे जलद गतीने जमेनासे झाले. घरी मालवणीत बोलत होतो. मराठीही शुद्ध बोलताना अडखळायला होई. मग इंग्रजी बोलणे तर त्याही पुढची गोष्ट होती. माझी मोठी बहिण कणकवली कॉलेजमध्ये जात होती. तिचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. तिच्यासोबत बोलायला गेलो तरीही भीतीच वाटे. आमच्या सलूनात येणारी बरीचशी गिऱ्हाईके उच्चशिक्षित असत. ती आम्हांला इंग्रजी बोलण्याचा आग्रह धरत. तरीही आमच्यात आत्मविश्वास वाढला नाही. व्याकरण चुकेल अशी भीती नेहमीच वाटत आली आहे. चुकून मराठी शब्द येईल आणि हसे होईल ही भीतीसुद्धा दडलेली होतीच. इंग्रजीत बोलायचे तर मराठीत विचार करावा लागे. त्या मराठीतील विचारांचे इंग्रजीत भाषांतर करुन बोलल्यामुळे चुका जास्त होत. जेवढ्या चुका होत , तेवढा आत्मविश्वास कमी होत जाई.
आता आत्मविश्वास वाढला आहे. कारण आता आपल्याला इंग्रजीचे अनेक शब्द सतत समोर येत आहेत. विविध प्रसार माध्यमे , पुस्तके , यु ट्युब याद्वारे आपल्याला ऐकण्याची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. फक्त आपल्याला त्यांचा समर्पक उपयोग करता यायला हवा. अनेक इंग्लिश स्पिकिंग कोर्स ऑनलाईन स्वरुपात मिळू शकतात , त्यांनीही आपली इंग्रजी बोलण्याची क्षमता अधिक विकसित होऊ शकते. इंग्रजी बोलण्यासाठी आपला सराव कमी पडतो , म्हणूनच आपण संभाषणात कमी पडतो. त्यात रस घेतला तर ते संभाषण सोपे होऊन जाईल आणि तो आपल्या सवयीचा भाग होऊन जाईल. जे आपण सतत करतो , ते आपल्या अंगवळणी पडते. इंग्रजी सतत ऐकायला हवे , वाचायला हवे , मोठयाने बोलायला हवे आणि दुसऱ्यांना प्रत्यक्ष प्रतिसाद द्यायला हवा. हे सतत घडेल तेव्हाच तुमची भीती आपसूकच कमी कमी होत जाईल. इंग्रजी शब्दांची संपत्ती वाढवायला हवी. त्यासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तके वाचायला हवी. बालभारतीच्या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती पुस्तके डाऊनलोड करुन वाचल्यास खूपच चांगले. आपल्याला आपल्या मनात इंग्रजीत थॉट आला पाहिजे. तो विचार म्हणजेच थॉट इंग्रजीत येऊ लागला कि तुमचे इंग्रजी बोलणे आलेच म्हणून समजा.
आता जाल तिथे तुमचे इंग्रजीमुळे अडत असेल तर तुम्हाला इंग्रजी भाषेत पारंगत झालेच पाहिजे. काही शिक्षक वर्गात शिकवताना संपूर्णपणे इंग्रजीत शिकवतात , त्यांनी सांगितलेला सर्वच आशय मुलांना समजतही नसेल , पण त्यांचा इंग्रजी ऐकण्याचा कान तयार होत आहे ही चांगली गोष्ट आहे.
आपली मातृभाषा मराठी आहे. ती बोलतानाही आपले कधीकधी बारा वाजतात. म्हणजे बोलताना जो शब्द आठवायला पाहिजे तो ऐनवेळी आठवत नाही. अर्थात मराठीची जर अशी अवस्था असेल तर इंग्रजीला थोडा वेळ लागणार. किंवा थोडा अधिक जाणीवपूर्वक वेळ द्यावाच लागणार. नवीन वर्षात हा संकल्प सर्वांनी नक्कीच करायला हरकत नाही. दररोज पंधरा मिनिटे इंग्रजी बातम्या ऐका , पाहा. मित्रांसोबत सोपी इंग्रजी बोला. मराठी लिहिता तसे इंग्रजीही लिहिण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांबरोबर , विद्यार्थ्यांबरोबर साधी इंग्रजी बोलत राहा. जमेल , पळेल, धावेल तुमची इंग्रजी तुमच्या मुखातून. लेट्स लर्न इंग्लिश.हॅपी न्यू इयर टू थावजंड ट्वेन्टी टू.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )