कोडी सोडवणे हा आमचा लहानपणीचा आवडता छंद होता. अर्थात मोठेपणी सुद्धा हा आमचा छंद आहेच. पण तेव्हा सर्व भावंडे मिळून विचार करून कोडी किंवा उखाणी सोडवण्यातली मज्जा काही औरच होती. आम्ही पुढारी किंवा लोकसत्ता पेपर घेत असू. त्यात दरदिवशी कोडी येत असत. आम्हाला शब्दकोडी सोडवण्याचा छंद म्हणण्यापेक्षा नादच लागला म्हणा ना !! शब्दकोडी सोडवून आमच्या शब्दसंपत्तीत भर पडत होती.
आमच्या सलूनात येणारे कस्टमर त्यातील शब्दकोडी अर्धवट सोडवून ठेवीत. ती नंतर सोडवून पूर्ण करणे अवघड होत असे. कारण त्यांना न येणारे शब्द शोधून काढावे लागत. माझे बाबा , माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी शब्दकोडी सोडवण्यात पटाईत होती. त्यांच्यामुळेच मलाही ती चांगली सवय लागली. आमच्यात त्यामुळे चढाओढ लागे. ज्यांना लवकरात लवकर शब्द आठवे त्यांना त्याचे श्रेय मिळे. मी ते श्रेय मिळण्यासाठी खूप प्रयत्न करीत असे. संपूर्ण कोडे परिपूर्ण सोडवणे काही सोपे काम नसते. त्यात ते जम्बो कोडे असले तर खूपच वेळ लागे. काही शब्दकोड्यांमध्ये पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द येत त्यामुळेही नवनवीन शब्दांची भर आमच्या ज्ञानात पडत राहिली. दुसऱ्या दिवशी शब्दकोड्याचे उत्तर आले की ते पडताळून पाहण्याचे कामही आनंद देऊन जाई. पूर्ण बरोबर शब्दकोड्यासाठी आपणच आपल्याला पाठीवर शाबासकी देत असू. आपण आपली स्वयंमूल्यमापन चाचणी घेत होतो हे त्यावेळी आम्हाला समजलेही नव्हते.
एकदा अशीच शब्दकोडी सोडवत बसलो होतो. सुट्टी असल्यामुळे घरात होतो. सगळी भावंडे त्यात आपला सहभाग दर्शवित होती. मी लिहीत होतो. मी लिहीत असलो तरी मोठ्याने वाचून सर्वांना विचारून फक्त लिहिण्याचे काम करत होतो. मी माझ्या मनाने कमीच शब्द लिहिले होते. शब्दसमूह मोठ्याने वाचण्याचे माझे काम सुरू होते. वाचल्यानंतर माझी मोठी ताईच पटकन उत्तर देत होती. माझी आईसुद्धा अधूनमधून त्यात भाग घेण्याचा प्रयत्न करत होती. ती घरात काम करता करता जेवढे ऐकत होती , त्यांची उत्तरे आपल्या परीने मनात ठरवत होती. आम्ही तिला त्यात सहभागी करून घेत होतो याचा तिला आनंदच होता. ती फक्त सातवी शिकलेली होती. आम्ही तिच्यापेक्षा जास्त शिकत होतो , म्हणून आमचा सर्वांचा तिला अभिमानच वाटत होता. ती आम्हाला तिच्यापेक्षा हुशार समजत असे. तिला मोठ्या टाईपच्या अक्षरांची गोष्टीची पुस्तके वाचनाचा छंद होता. पूर्वी कडधान्य कागदात बांधून मिळत असे. किराणा सामान आणल्यानंतर ज्या कागदातून सामान बांधून आणलेले असे , ते सर्व कागद ती वाचून काढीत असे. कधीचे जुने कागद किंवा रद्दी असे ती , पण ती वाचून तिला खूप समाधान मिळे.
चार अक्षरी एक शब्द सापडत नव्हता. एका जंगली झुडूप असलेल्या फळाचे नाव होते. ते आठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. आमचा हा शोध आईपर्यंतही पोचला होता. आईने तिथूनच मोठ्याने उत्तर दिले होते. ती म्हणाली , " भ्या-ड-सा " . तिने हे फळ मालवणी बोलीमध्ये सांगितले होते. भेडसा नावाचे एक करवंदासारखे दिसणारे फळ आहे. तिने आम्हाला त्या फळाविषयी अचूक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चार अक्षरी शब्द सापडला होता , " क र वं द " असे त्याचे खरे आणि बरोबर उत्तर होते. पण आईने भ्याडसा हे नवीन फळाचे नाव उच्चारताना एक वेगळ्याच प्रकारचा उच्चार केला होता. त्यानंतर पुन्हा कधीही शब्दकोडी सोडवताना आम्ही तिला ' भ्याडसा ' असे म्हणून आठवण करून देत असू. ती सुद्धा हा शब्द ऐकून जी हसे ते हसणे निखळ होते. अशाच प्रकारच्या अनेक गमतीजमती आम्ही सगळे एकत्र जेवताना होत असत.
कोणत्याही शब्दकोड्यात ' भ्याडसा ' हा शब्द कधी आला असेल किंवा येईल याबद्दल मला माहीत नाही , पण आम्हा सर्व भावंडांच्या आयुष्याचे शब्दकोडे या शब्दाने सुरू होते हे तितकेच खरे आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment