त्यावेळी आमचे सलून ढालकाठी येथील सावळाराम वाळके यांच्या जागेत होते. त्यांच्या नारळाच्या दुकानाच्या मागे रिकामी जागा होती. त्यामध्ये त्यांचे गोडाऊन होते. त्यापैकी एक जागा त्यांनी आम्हाला भाडेतत्त्वावर दिली होती. त्यांनी उद्या जायला सांगितले तरी आम्हाला जायला लागले असते अशा बोलीवरच त्यांनी आम्हाला ती जागा दिली होती. आम्हाला गरज होती, त्यामुळे त्यांचे सर्व नियम आम्ही म्हणजे बाबांनी मान्य केले होते.
दुकान उंचावर होते. त्यामुळे चार पाच पायऱ्या चढून दुकानात प्रवेश करावा लागे. बाबांनी त्या दुकानाचे दोन भाग केले होते. त्यातला आतील भाग शिलाई मशीन ठेवण्यासाठी वापरला होता. त्यावर आमची आई , ताई किंवा स्वतः बाबा गिऱ्हाइकांचे कपडे शिवत असत. दुकानात दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यावर माझे बाबा आणि माझे एखादे काका काम करत. काका गावावरून दररोज येत. कधीतरी संध्याकाळी उशीर झाला तर काका कणकवलीत आमच्या खोलीवर थांबत.
शिलाईमशीननेही आम्हाला जगवले. दुकानात काम नसताना तिच्यावर केलेल्या शिवणकामावर आमचा चरितार्थ चाले. मी त्यावेळी लहान होतो , त्यामुळे मशीनवर बसून शिवणे मला जमत नव्हते. फक्त पायडळ मारणे जमत होते. खाली पायडळ मारल्यावर वरचे चाक गरागरा फिरते म्हणून मला गंमत वाटे. त्यामुळे टाईमपास म्हणून मी सहजच पायडल मारत बसे. बाबा ओरडेपर्यंत मी हे काम करत राही. बाबा ओरडले की माझे चाक फिरवणे मी थांबवी. बाबांचा मार मला चांगलाच माहीत होता.
त्यादिवशी मी शाळेतून दुकानात आलो. बाबा कोणते तरी गिऱ्हाईक करत होते. मी माझा टाईमपास सुरू केला होता. शिलाई मशिनचे पायडल मारत राहिलो होतो. बाबांना त्याचा आवाज येत होता. पण बाबा मला काही बोलले नाहीत. त्यामुळे मला बाबांची परवानगीच मिळाली आहे अशा थाटात मी माझे पायडल चालवण्याचे स्पीड वाढवले. त्यामुळे मोठा आवाज येऊ लागला होता. एकदा बाबा मला ओरडलेही असतील कदाचित , पण मी माझ्या नादात ते ऐकायला विसरलो होतो. माझी गाडी धूम सुसाट पळत होती. मशीनचा खडखडाट सुरूच होता. अचानक खडखडाट थांबला होता. ' कर कच कट ' असा आवाज येऊन मशिनची सुई माझ्या हाताच्या बोटातून आरपार गेली होती. सुई बोटात गेल्याबरोबर मशिनचे चाक फिरायचे थांबले . सुई बोटात गेल्यामुळे मीही थांबलो.
अचानक मशीन ' कर कच कट ' असा आवाज करत थांबली कशी ? असा विचार करून बाबा पार्टिशनच्या पलीकडे माझ्याकडे आले. मी आपला गप्प. सुई बोटात गेली तरी तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. बाबांनी ओळखले होते. ते माझ्या जवळ आले. त्यांनी माझ्या बोटात गेलेली सुई काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माझा हात आपल्या हातात घेतला. बोटातून रक्त वाहू लागलं होतं. तरीही मी गप्पच. जर मी रडायला सुरुवात केली असती तर मला अजून मार मिळाला असता या भीतीनेच मला रडायला येत नव्हते. बाबांनी माझा हात आपल्या तोंडाकडे नेला. मला काहीच समजत नव्हते. त्यांनी आपल्या दातांनी माझ्या बोटातील सुई ओढून काढली. सुई काढल्यानंतर रक्त जास्त वाहू लागले होते. बाबांनी शिवणकाम करताना उरलेल्या कापडाची मला पट्टी बांधली. त्यापूर्वी दुकानातील डेटॉलने जखम स्वच्छ धुऊन घेतली होती.
त्यानंतर मला स्वतःला शिवायला येईपर्यंत मी मशीनला हात लावला नसेन. दररोज खोबरेल तेल आणि पांढरी अँटिबायोटिक पावडर लावून लवकरच माझे दुखरे बोट बरे झाले होते. त्यामुळे मला एक कायमचा धडा मिळाला होता कि आपल्याला माहीत नसताना कोणत्याही यंत्राच्या भानगडीत पडू नये हेच खरे. नाहीतर असे घडते , " कर कच कट ".
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
No comments:
Post a Comment