इतकी कल्पना नव्हती
काही व्यक्तींमध्ये अचानक बदल घडतात. काही बदल वयानुसार घडतात. प्रसंग आल्यानंतर जाणीवपूर्वक बदल घडवावे लागतात. या सर्व गोष्टींची कल्पना यायला वेळ लागतो. काही काळ थांबून , वाट बघून घडलेले बदल स्वीकारावे लागतात. कामातील बदल म्हणजे आपण विश्रांती म्हणतो. हे बदल व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. आमूलाग्र बदल घडण्यासाठी तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. परिश्रम कमी असताना मोठ्या बदलाची अपेक्षा करणे चुकीचे असते. पण बदल हा जीवन जगण्यासाठी एक आवश्यक गोष्ट असे म्हणायला हरकत नाही.
आमच्या डीएडच्या वर्गात एकूण तीन कल्पना असतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती. समजले तेव्हा कल्पना आली. या तीन कल्पना म्हणजे कल्पना मलये, कल्पना धुत्रे आणि कल्पना मुसळे. तिन्ही कल्पनांचे स्वभाव आगळे आणि वेगळेच होते. एक कल्पना थोडी भित्री होती. दोन कल्पना धीट होत्या. तिन्ही एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. एकाच माध्यमिक शाळेत एकत्र शिकलेल्या आणि हुशार होत्या. पुन्हा एकदा दोन वर्षासाठी एकत्र आल्यानंतर त्या तिघींनाही जो आनंद झाला असेल त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तिन्ही तुफान बोलक्या. एकीचे बोलणं पूर्ण व्हायच्या आत दुसरी बोलत असे , तिसरी दोघांचेही बोलणं खोडून काढण्यात पटाईत. दोन वर्षे एकत्र शिकताना त्यांच्याकडूनही आम्हाला बरेच शिकता आले. तिन्ही कल्पना आज उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका आहेत.
अध्यापक महाविद्यालयातील ती दोन वर्षे या तिन्ही कल्पनांनी चांगल्या प्रकारे गाजवली. कार्यानुभव , संगीत , नृत्य , शिवणकाम हे त्यांचे आवडते विषय. आम्हाला कोणतीही मदत लागली तर या त्रयींची मदत मिळणार हे नक्की ठरलेलं असे. भरतकाम , विणकाम यांनीच आम्हाला शिकवले. कधी कधी तयार करूनच दिले. पाठाच्या सादरीकरणात शैक्षणिक साहित्य देण्यात त्यांनी कधीही नकार दिला नाही. अगदी बहिणींप्रमाणे साथ दिली. या कल्पनांनी जशी साथ दिली तशी इतर मैत्रिणींनीही दिली.
आज कल्पना मलये एक उत्तम साहित्यिक झाली आहे. ती एक लेखिका आणि कवयित्रीही आहे. तिच्यातले हे गुण आम्ही बघितले नव्हते. ती एक उत्तम वक्ता सुद्धा आहे. या साहित्यिक कल्पनेची आम्हाला कल्पना नव्हती. ती आज आपले मत परखडपणे मांडताना दिसते. पूर्वी पाठ घेताना ती घाबरताना आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. आज तिच्या बोलण्याने समोरचाच घाबरून जाऊ शकतो इतका आत्मविश्वास तिच्यात आला आहे हे विशेष सांगावेसे वाटते. तिला दिलेल्या कोणत्याही विषयावर ती मुद्देसूद लिहू शकते. तिच्या जीवनात आलेल्या संकटांशी तिने हसत हसत सामना केला आहे.
दुसरी कल्पना म्हणजे कल्पना धुत्रे. हिचा स्वभाव पहिल्यापासूनच प्रेमळ. ती आता आमच्या किर्लोस आंबवणे शाळेत शिक्षिका आहे. पालकांना आपलेसे करण्याची तिची भाषाशैली घेण्यासारखी आहे. पूर्वी ती एवढी मनुष्यवेल्हाळ नव्हती. वाटेने जाता जाता शेतकरी ग्रामस्थांबरोबर संवाद करत जाणारी वेगळी कल्पना आम्ही पूर्वी पाहिली नव्हती.
तिसरी कल्पना म्हणजे कल्पना मुसळे. 1 ली ते 7 वी पर्यंत माझ्याच वर्गात असलेली कल्पना , शिक्षिका होईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. एकदम साधी, सरळ, नाकासमोर चालणारी मुलगी. आमच्या दुकानापासून तिचे घर अगदीच जवळ. तिचे बाबा , आई , भाऊ यांच्यासोबत आमचे संबंध चांगले होते. आज ही कल्पना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना जी तल्लीन होऊन शिकवते , ती घाबरट कल्पना आज धीट झालेली आम्हाला पहावयास मिळते आहे.
अशा या तिन्ही कल्पना इतक्या प्रभावी होतील अशी कल्पना त्या तिन्ही कल्पनांनीही केली नसेल कदाचित. पण आज तिन्ही कल्पना शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावून आहेत , आपल्या परीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडवित आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याला सर्वांचेच सलाम असायला हवेत. ' दिव्यत्वाची जेथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती '.
No comments:
Post a Comment