Sunday, July 18, 2021

मी उंदीर झालो

           पाचवीत असतानाची गोष्ट असेल. भालचंद्र महाराज विद्यालय शाळेत त्यावेळी पालवगुरुजी होते. ते वरच्या वर्गांना शिकवत. कधीतरी आमच्या वर्गात येत असत. त्यांची चित्रकला आम्हाला आवडायची. फळ्यावर चित्र काढताना चित्र पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नसत. अक्षरही वळणदार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे. इंग्रजी रनिंग लिपी देखील काढत. फक्त त्यावेळी ती आम्हाला समजत नसे. त्यांचा गणपतीच्या मूर्तीचा कारखाना होता. शाळा सुटल्यानंतर आम्ही तिथे बघायला जात असू. आमचे पालवगुरुजी चित्रकार आहेत , मूर्तिकार आहेत याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ते स्काऊट मास्टर देखील होते. अनेक प्रशिक्षणे पूर्ण करून त्यांनी कार्यशाळा घेतल्या होत्या. 

          दिल्लीचे सी. सी. आर. टी. चे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी त्याची अंमलबजावणी शाळेत सुरू केली. कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग केले. आम्हाला त्यांचे प्रयोग बघायला खूप आवडत. त्यांचा वाचिक अभिनय चांगला होता. विविध प्रकारचे आवाज काढण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखेच होते. एकच माणूस दोन ते तीन आवाज काढत सोबत बाहुल्या नाचवण्याचे काम पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन जाऊ. त्या निर्जीव बाहुल्यांना काही मिनिटांसाठी सजीव करण्याचे कौशल्य पालवगुरुजींमध्ये होते. त्यांचा भटजी मला खूप आवडे. तो बोलायला लागला की त्याचा जबडा वर खाली होई. आरती म्हणताना तो नाचतही असे. पालवगुरुजींची सर्वच पात्रे विनोदी असत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना गंमत वाटे. मोठी माणसे त्यातून बोध घेतील असाही संदेश शेवटी दिला जात असे हे विशेष होते. या संपूर्ण कार्यक्रमात पालवगुरुजी दिसत नसत. त्यांचा फक्त आवाज ऐकू येई. नंतर पालवगुरुजींनी मुलांची मदत घ्यायला सुरुवात केली. त्यांना एक रेकॉर्डिंग करायचे होते. त्यांनी आमच्या शाळेतील दोन मुले आणि तालुका स्कुलमधील दोन मुले निवडली होती. त्या मुलांमध्ये मी होतो.

          गोष्टीचे नाव होते ' बुड बुड घागरी '. त्यात उंदीर , मांजर , माकड आणि निवेदक अशा चार जणांचे आवाज रेकॉर्ड करायचे होते. मला उंदराची भूमिका मिळाली होती. फक्त संवाद म्हणायचे नव्हते तर संवादासोबत पार्श्वसंगीतही द्यायचे होते. पालवगुरुजी यांनी सर्व वस्तू जवळ ठेवल्या होत्या. चार ते पाच वेळा सराव घेऊन मगच अंतिम रेकॉर्डिंग करण्यात आले. सर्व संवाद पालवगुरुजींनी आम्हाला एका कागदावर लिहून दिलेले होते. त्यांचे बघून वाचन करायचे होते. माझ्याबरोबर आमच्या शाळेतील प्रणाम कामत हा मुलगा होता. त्याचा अभिनय अफलातून होता. त्याचं जगणंच ते होतं. पण तो खोडकर मुलगा होता. त्याचे वडील नसल्यामुळे त्यांच्या काकांकडे तो राहत असे. आज तो एक प्रसिद्ध व्यापारी आहे. त्याने कोणती भूमिका केली होती ते मला आता नक्की सांगता येत नाही. मला वाटतं तो माकड झाला असावा. 

          इतर दोन मुले आमच्यासाठी अनोळखी होती. आम्ही त्यांना विचारले , " तुम्ही कुठले ? " त्यांनी उत्तर दिले , " आशिया " . आम्ही दोघेही हसलो. कारण आम्हाला त्यावेळी आशिया खंड माहीत होते. मी सहज विचारले , " तुम्ही इतक्या लांबून कसे आलात ? " ते म्हणाले , " पायाने " . आम्ही चकित झालो. इतक्या लांबून पायाने आल्याबद्दल आम्हाला त्यांचे आश्चर्य वाटले. नंतर समजले की ती मुले आशिये या शेजारच्या गावातून आले होते. ते ' आशिया ' बोलल्यामुळे आमचा घोळ झाला असावा. 

          माझ्याकडे सोपी वाक्ये दिलेली होती. त्यापैकी एक वाक्य असे होते  , " ची ची करी , वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी " मी चांगला वाचिक अभिनय केला होता. गुरुजींनी आमची सगळ्यांची पाठ थोपटली होती. ते रेकॉर्डिंग त्यांनी पुढे अनेक कळसूत्री कार्यक्रमांमध्ये वापरले असेल. माझ्या मुली लहान असताना त्यांना बऱ्याचदा ही ' बुड बुड घागरी ' ही गोष्ट सांगावी लागली आहे. मला वाटतं सर्वच आई वडिलांनी आपल्या पाल्यांना ती ऐकवली असेल.

          गोष्टीचा सराव केल्यामुळे माझ्या अंतर्मनात तीच गोष्ट रात्रीपर्यंत राहिली होती. सकाळी उठताना मला आईने हलवून उठवले तर मी अजून उंदीरच असल्याप्रमाणे बडबडत उठलो , " ची ची करी , वरचे डोंगरी , मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी . " 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...