डीएडला असताना मी दुकानात जायचे काही सोडले नव्हते. माझ्या अनेक मित्रांनी ते पाहिलेही असेल. तीन नंबर शाळेतील पंधरा दिवसांचे पाक्षिक सुरू असताना काही नवीन विद्यार्थी ओळखीचे झाले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मी सलूनात केसही कापतो ते बघितलेले होते. त्यातील काही विद्याथी माझ्याकडून आग्रहपूर्वक केस कापूनही गेल्याचे चांगलेच आठवतंय. त्यावेळी मला थोडे अवघडायला होई. पण काही क्षणानंतर भानावर येऊन पुन्हा मी माझ्या कर्तव्यावर ठाम राही.
एकदा विद्यामंदिर कणकवलीचे राऊळसर आमच्या दुकानात केस कापण्यासाठी आले होते. मी दुकानात काम नसताना अभ्यास करीत असे. मी एस. एम. हायस्कुल कणकवली येथे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा आणि माझा शिक्षक - विद्यार्थी असा संबंध आला नव्हता. ते आमचे कस्टमर आहेत आणि भूगोल छान शिकवतात एवढेच मला त्यांच्याबद्दल समजले होते. त्यांनी माझ्या वह्या , पुस्तके घेतल्या आणि अक्षर बघितले. त्यांनी माझ्या पाठीवर प्रेमळ आश्वासक हात ठेवला , मला तो स्पर्श उबदार वाटला. ते त्या स्पर्शातून माझे जणू कौतुकच करत होते हे मला मुकपणेच समजत होते. मस्त पांढरे शुभ्र केस असलेले राऊळसर जणू चांदीचे व्यापारीच होते. पांढरे केस असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना ही उपमा दिली होती असे मला माझ्या मोठ्या बहिणींकडून समजले.
राऊळसरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. ते म्हणाले , " अरे प्रवीण , माझ्या भाचीचे दोन मुलगे आहेत. त्यांना घरी जाऊन शिकवशील का ? तुला दरमहा मानधन दिले जाईल. " मी तयार झालो. संध्याकाळी दुकानातूनच मला त्यांना शिकवायला जायचे होते. पहिल्या दिवशी स्वतः राऊळसर मला त्या दोन्ही मुलांना भेटायला घेऊन गेले. एका मोठ्या घरात त्यांनी मला नेले होते. दोन्ही विद्यार्थी माझी वाटच पहात होते. हॉलमध्ये टेबलभोवती चार खुर्च्या लावलेल्या होत्या. बहुतेक ते डायनिंग टेबल असावे. दोन्ही मुले आपल्या इयत्तांची पुस्तके घेऊन आले. राऊळ सरांनी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले , " मुलांनो , हे तुमचे नवीन सर आहेत. ते दररोज संध्याकाळी एक तास तुम्हाला शिकवायला येतील. ते स्वतः शिक्षक होण्यासाठी शिकत आहेत हे लक्षात ठेवा. " मुलांनी ते ऐकले व मानेनेच होकार दिला. पण माझ्याकडून शिकण्यासाठी ते आतुर झालेले दिसले. मी कधी एकदा त्यांच्याशी बोलतो असे त्यांना झाले होते. मुलांच्या आईने मला मस्त गरमागरम चहा आणून दिला. ती माऊली माझ्याशी गोड हसली आणि आत गेली. राऊळ सर देखील निघून गेले. माझा तास सुरू झाला. एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला तरी मला आणि मुलांनाही समजले नाही. शेवटी त्या मुलांच्या आईनेच मला " सर , तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल तर गेलात तरी चालेल असे सांगितले. " तेव्हा मी भानावर आलो. मी मुलांचे वाचन घेत होतो. त्यांची तयारी बघत होतो. मुलांशी अभ्यासविषयक गप्पा मारत होतो. त्यांना शाबासकी देत होतो. त्यांना प्रेमळ शब्दांनी अधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत होतो. दोन्ही मुलगे होते. त्यांच्यामध्ये चार वर्षांचा फरक असावा. मी घरी निघण्यासाठी बाहेर पडलो होतो , छोटा शंकू धावतच माझ्या शर्टाला धरायला आला. म्हणाला , " सर , आज खूप मज्जा आली सर .... आम्हाला अभ्यास करतो आहोत असे वाटलेच नाही. उद्यापासून दररोज या सर. आम्हाला तुमच्याकडून शिकताना खूप आनंद झाला सर. " त्या छोट्या मुलाचे बोलणे मला भावले होते. मोठ्या मुलानेही छान स्मितहास्य केले आणि माझ्याबद्दल आदर दर्शविला. तो थोडा मोठा असल्यामुळे त्याने अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नसावी.
शिक्षक होण्यासाठीचे शिक्षण घेत असतानाच मला या दोन मुलांना सर्वात आधी शिकवण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हे दोन्ही मुलगे आज अत्युच्च शिक्षण घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. दोघेही सिव्हिल इंजिनियर होऊन एम. बी. ए. झाले आहेत. यातील मोठा मुलगा आज कणकवली नगर पंचायतीचे नगरसेवक आणि मोठे बिल्डर आहेत त्यांचे नाव सुशांत नाईक आणि छोटा मुलगा संकेत नाईक जो आता बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मी त्यांना दोन वर्षेच शिकवले. त्यानंतर नोकरी मिळाल्याने मला त्यांच्याकडे जाणे जमले नाही. त्यांची आता भेट झाली तरी मला त्यांच्यासोबतचा पहिला दिवस आठवतो आणि छोट्या शंकूने म्हटलेलं ते वाक्य आठवते , " खूप मज्जा आली सर " . आज शिकवल्यानंतर " खूप मज्जा आली सर " असे म्हणणारे विद्यार्थी भेटले तर तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment