Sunday, July 18, 2021

ताई नव्हे मोठा भाऊच

           आमची ताई आमच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी. तिच्याकडे बघूनच आम्ही मोठे होत होतो. सातवीपर्यंत शिकताना आम्हाला आई बाबांकडून मार्गदर्शन मिळत असे. तरीही अभ्यासक्रम सतत बदलत असल्याने ताई आणि दोन नंबर बहीण आक्का या दोघांचे मार्गदर्शन आम्हाला मिळू लागले. 

         आमची ताई अभ्यासात खूप हुशार होती. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही ती गुणवत्ता यादीत आली होती. तिचे वाचन अफाट होते. कोणतेही पुस्तक मिळाले की ते वाचण्यात ती कमालीची दंग होऊन जाई. शाळा , कॉलेजचा अभ्यास करता करता ती आम्हालाही वैयक्तिक मार्गदर्शन करत असे. आमच्या सर्व शंकांची उत्तरे तिच्याकडे असत. तिचे आमच्यावर जिवापाड प्रेम. पण आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल ती आम्हांला चांगलीच खडसावीत असे. कधीकधी तिचा मारही खावा लागे. मार मिळाला तरी आम्हाला तिच्याशिवाय पुढे जाणे शक्यच नसे. तासा अर्ध्या तासात आम्ही आणि तीही सर्व विसरून जात असू. मार्गदर्शनात तिने कधी खंड पडू दिला नाही. 

          सलून दुकान असूनही ती बाबांसोबत रात्री दुकान बंद करेपर्यंत थांबे. सर्व पुरुषासारखी कामे करत असे. सलूनातील सर्व हत्यारे पुसून स्वच्छ करण्याचे काम तीच करी. बाबांनी सांगितलेले कोणतेही काम ती करत असे. बाबांचा तो मोठा मुलगाच होता म्हणा ना !! आम्ही थोडे लहान असल्यामुळे सर्व जबाबदारीची कामे तिलाच दिली जात. सर्व कामे आमची ताई आत्मविश्वासाने करी. बाबांसोबत ती टेलर काम करायलाही शिकली. दुकानात येणारे शिवणकाम आईसोबत माझी ताईच करू लागली. त्यामुळे आईला घराकडील कामे करायला मिळत. घराच्या कामात आईला आक्काने साथ दिली. सर्व प्रकारचे कपडे बाबांनी तिला शिकवले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत माझी ताई बाबांसोबतच असे. कॉलेज करून ती दुकानातील शिवणकाम आणि इतर कामे सांभाळत होती. 

          शिवणकाम नसताना ती दुकानातच शाळेचा अभ्यास वाचत किंवा लिहीत राही. वाचन करताना तिला एक आवाज करण्याची सवय होती. ती एकाग्र झाली की बंद तोंडातून एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढताना आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. तिची त्या कामात तंद्री लागली की ती आपल्या जवळ असणाऱ्या कोणत्याही कापडाला , रुमालाला किंवा तिच्या फ्रॉकला बोटाने ' टक टक ' करत असे. हे तिच्याकडून आपसूकच घडे. ती तिची एक सवय होती. प्रत्येकाची एक विशिष्ट पद्धत असू शकते , तिची ती पद्धत होती. त्या सवयीचा तिला किंवा कोणालाही त्रास झालेला मला माहित नाही. रात्री घरी आल्यानंतर जेवण झाले की ती पुन्हा अभ्यासाला बसे. कधीकधी उशिरापर्यंत अभ्यास करताना ती भिंतीला डोके टेकून तिथेच झोपून जाई. ताई दुकानातून लवकर घरी आली तर आमच्या अभ्यासात आम्हाला खूप मदत होई. तिचे अक्षर अगदी मोत्यासारखे , ते बघून आम्ही तसे अक्षर काढण्यास शिकलो. तिने मला अनेकदा निबंध लिहिण्यास घातला आहे. 15 ते 20 ओळींचा निबंध ती सहज अभ्यास करता करता सांगत असे. तिच्यासारखा चांगला निबंध आम्हाला लिहिता येत नसे. 

          आम्ही एकदा असेच तिच्यासोबत बाजारात गेलो होतो. बाजार आणायचा होता. बाजारात भरपूर खाऊही दिसत होते. ते खाऊ आम्हाला आकर्षित करत होते. आम्ही ते खाऊ ताईला आमच्यासाठी घ्यायला सांगत होतो. त्या खाऊसाठी ताईकडे पैसे कसे असणार ? दिलेले पैसे बाजारासाठीच पुरत नव्हते. तेव्हा ताई आम्हाला म्हणे , " आम्ही एवढे भारीवाले खाऊ कधीच खायचे नसते. त्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यासाठी आपल्याला खूप शिकून मोठे व्हायला लागेल. गरिबांनी हे सगळं बघायचं असतं. ते मिळण्यासाठी कधीच हट्ट करायचा नसतो. " तिचे बोलणे त्यावेळी आम्हाला समजत नव्हते. शिकत गेल्यानंतर थोडी समज आली होती , तरीही श्रीमंत माणसं खातात ते पदार्थ मी कधीतरी नक्की खाणार हे वाक्य माझ्या मनात मी सतत घोळवत ठेवलं होतं . 

          ताईचे लग्न झाल्यानंतर ती सासरी जाताना आम्हाला काही वाटले नाही. पण त्यानंतर आम्हाला तिची फार उणीव भासू लागली. तिचे काम मग आम्ही दोघे भाऊ मिळून करू लागलो. पण ती एकटी जे करू शकत होती , ते आम्ही दोघे करू शकलो नाही हे मी मान्य करतो. ती आमची मोठी ताई नव्हती , तर मोठा भाऊच होता हे अजूनही सांगताना मला अभिमानच वाटतो. ताईचे पती म्हणजे आमचे मोठे भावोजी ताई इतकेच शिकलेले. त्यांचाही आमच्यावर प्रभाव आहे. त्यांचे अक्षर , स्वभाव , व्यक्तिमत्त्व यामुळे आम्ही त्यांच्याकडूनही शिकत गेलो. 

          आज आमची ताई मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे. तिने दिलेले संदेश आमच्यासाठी अमृताचे बोल आहेत. लग्नानंतरही तिने आम्हाला नेहमीच मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे. भावंडे अशी असावीत , जी आपल्या इतर भावंडांसाठी कायमच सोबत असतात. प्रत्येक वेळी पैशाचीच गरज असते असे नसते. नुसता शाब्दिक मानसिक आधार सुद्धा नवीन उमेद आणत असतो. ही उमेद फुलवणारी आमची ताई म्हणूनच आमच्यासाठी सदासर्वदा गुरुस्थानी असणार आहे. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...