Sunday, July 18, 2021

बदली कि बदला

           माझ्या पत्नीचे निधन झाले होते. तेव्हा मी गोवळ गावठण या शाळेत होतो. ती पाटगाव शाळेत होती. आम्ही पाटगाव येथे राहात होतो. आता 4 वर्षाच्या छोट्या मुलीला घेऊन राहणे मला जमणारे नव्हते. अर्थात बदली करणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी बदलीसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत. मला तेही शक्य वाटत नव्हते. पण बदली आवश्यकच होती. 

          बदलीसाठी अर्ज केला. त्याच्या अनेक प्रती काढल्या. माहितीसाठी पदाधिकारी व अधिकारी सगळ्यांना दिल्या. किर्लोस गावातील एक समाजसेवक गोपीनाथ लाड यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी अनेकदा सिंधुदुर्गनगरीचा प्रवास केला. त्यांच्यासोबत मीही दोन ते तीन वेळा गेलो असेन. बदलीची ऑर्डर आली. माझी बदली शिडवणे नं. 1 शाळेत झाली होती. माझी पूर्वीची शाळा त्याच बाजूला असल्याने मला ही शाळा लांब वाटू लागली. शाळा बदलून घेण्यासाठी पुन्हा एकदा ओरोस वारी केली. जाताना मला कसाल हायस्कुलच्या प्रवेशद्वारावर शिक्षक प्रशिक्षणासंदर्भात संघटनात्मक आंदोलन सुरू असताना दिसले. तेथे मला भाई चव्हाण, सुनिल चव्हाण असे संघटनेचे नेते भेटले. त्यावेळी सुनिल चव्हाण म्हणाले होते , " सर , खूप वाईट घटना घडली आहे , आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, आम्ही तुम्हाला तसे पत्र देतो. " भाई चव्हाण यांनाही बदली संदर्भात बोललो. तेही म्हणाले , " मी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहे . तेव्हा मी तुमचा विषय घेतो. तुमची बदली नक्की होईल काळजी करू नका. " बदली त्यांच्या प्रयत्नामुळे झाली असेल किंवा गोपीनाथ लाड यांच्यामुळे ते मला नक्की माहिती नाही. पण त्यांनी नक्की प्रयत्न केले असतील याबद्दल खात्री आहे. सुनिल चव्हाणसर यांनी सांगितल्याप्रमाणे पत्रही पाठवले. संघटनेने मला त्यावेळी दिलेल्या आधाराबद्दल मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो.

          बदली अर्जामध्ये फोंडा गांगोवाडी , फोंडा माळ अशा शाळांची मी मागणी केली होती. त्यानुसार मला पुन्हा बदली ऑर्डर बदलून मिळाली होती. त्यानुसार मला ' फोंडा गांगोवाडी ' शाळा मिळाली होती. मला खूप बरे वाटले. मोठी शाळा मिळाली याचाही आनंद झाला. मी त्यावेळच्या गटशिक्षणाधिकारी यांना फोन करून माझ्या ऑर्डर बाबत सांगितले. त्यांनी मला सांगितले कि तालुकास्तरावरून ' फोंडा गांगोवाडी शाळा दुसऱ्या कोणालातरी दिली आहे , त्यामुळे तुम्ही तिथे अतिरिक्त होणार आहात , तुम्ही ऑर्डर असली तरी हजर होऊ शकत नाही म्हणूनही सांगितले. मला पुन्हा एकदा भर पावसातही घाम फुटला होता.

          साहेबांनी मला ऑफिसला यायला सांगितले. मला उर्वरित शाळांची यादी दाखवली. मी यादीमधली एक शाळा निवडली. पण साहेब म्हणाले की मी तुम्हाला पत्र देतो ते शिक्षणाधिकारी साहेबांकडे घेऊन जा. ते तुम्हाला ऑर्डर बदलून देतील. मला त्या मुसळधार पावसातून ओरोस गाठावे लागले . त्यावेळी असणाऱ्या शिक्षणाधिकारी साहेबांनी मात्र लगेच ऑर्डरवर बदल करून संक्षिप्त सही करून मला ऑर्डर परत दिली. मला आता थोडे बरे वाटले. मी आणि माझे बाबा शाळा बघून आलो. शाळेत चार ते पाचच मुले असल्याबाबत समजले. शाळा कणकवलीपासून 8 किलोमीटरवर होती. 

          शाळा सुरू कधी होते असे मला झाले होते. जुन्या शाळेत हजर होऊन कार्यमुक्त व्हायचे होते. गोवळ गावठण शाळेतून कार्यमुक्त होतानाचा दिवस अजूनही चांगलाच आठवतो आहे. सर्व मुलांनी आणि शिक्षकांनी माझ्यासाठी 15 मिनिटांचा आकस्मिक निरोप समारंभ ठेवला होता. मी रडत रडतच मुलांशी बोललो होतो. मला ती शाळा सोडताना अनेक वेदना होत होत्या. शिक्षकांनीही माझे सांत्वन केले. पत्नी गेल्यानंतर मी पहिल्यांदा शाळेत गेलो होतो. काही पालकही भेटायला बघत होते. पण त्यांना मला भेटायचा धीर झाला नाही. इतकी वर्षे झाली तरी अजूनही मी त्यांना भेटायला गेलो नाही. पाटगावला हल्लीच गेलो होतो , पण गोवळला थांबायचे मनात असूनही थांबलो नाही. 

          आता मला माझ्या नवीन शाळेत हजर होण्यासाठी बाहेर पडायचे होते. माझी CD Dawn गाडी होती. येत असताना मनात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. माझं ड्राईव्हिंगकडे लक्ष नव्हतं असं नाही. पण नांदगाव तिठ्यावर गाडीसमोर एका पाड्याने ( बैलाने ) मला गांगरवले. तो अचानक माझ्या गाडीसमोर आला. त्याला ठोकणार म्हणून माझी गाडी थोडी वळवली, तर तो पुन्हा तिकडेच वळला. त्याला गाडीचा स्पर्श झाला , तो नीट सुटला पण माझी गाडी घसरली. मी रस्त्यावर सपशेल आडवा झालो. समोरून किंवा मागून गाड्या येत नव्हत्या म्हणून बरे झाले. नाहीतर हे लिहिण्यासाठी मी असलो नसतो. माझी पँट फाटली , शर्ट फाटले , थोडेसे खरचटले , बाकी काहीच झाले नाही. मी तसाच उठलो आणि पुन्हा किक मारून नवीन शाळेत हजर होण्यास निघालो. 

          मी शिरवल गावचा रस्ता धरला. शिरवल रतांबेवाडी शाळा मला मिळाली होती. शाळेत जायचा रस्ता मळ्यातून जाणारा होता. रस्त्यावर गाडी ठेवून 10 मिनिटे चालून शाळेकडे गेलो. शाळा उघडी होती. शाळेतील शिक्षक माझ्या ओळखीचे नव्हते. मी आत प्रवेश केला आणि माझी ऑर्डर त्यांना दाखवली. शिवराम सुतारगुरुजी माझ्यासाठी नवीन होते. मुले माझ्याकडे आशेने बघत होती. सरांकडे माझी ऑर्डर नव्हती. त्यांच्याकडे मडवबाईंची ऑर्डर होती. त्या हजर झाल्या नव्हत्या. त्यांनी मला हजर करून घेण्यास खूपच उशीर लावला. ते म्हणाले , " मला माझ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल , त्यांनी सांगितले की मी तुम्हाला हजर करून घेऊ शकतो. " अर्थात शिक्षणाधिकारी यांच्या सहीची ऑर्डर असूनही ते मला हजर करून घ्यायला विलंब लावत होते. माझी कथा सविस्तर सांगितल्यानंतर त्यांना माझी दया आली आणि मला त्यांनी हजर करून घेऊया असे म्हटले. तरीही मस्टरवर सही करेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. दुपारपर्यंत केंद्रप्रमुख आले . त्यांनी सुतारगुरुजींना सूचना देताच त्यांनी मला तात्काळ हजर करून घेतले. 

          यात कोणाची चूक असेल तर मला अजिबात सांगता येत नाही. कदाचित कुणाची चूक नसेलही. प्रत्येकजण बरोबर वागत असावा. माझाच पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. पण नियतीने माझी बदली केली होती की नियती माझा असा बदला घेत होती हे मीही नीट सांगू शकत नाही. माझ्यावर त्यावेळी जशी वेळ आली होती तशी माझ्या शत्रूवरही येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...