गढीताम्हाणे दादरा शाळेत सलग साडे सहा वर्षे काम करताना चांगला अनुभव आला. सर्वात जास्त त्याच शाळेत शिकता आले. मीच मुख्याध्यापक असल्यामुळे प्रशासकीय बाबींची माहिती मिळाली. पण तीच शाळा , तेच ग्रामस्थ , तोच रस्ता , तेच जीवन अनुभवायचे असल्याने कंटाळा येत होता. पण तरीही शैक्षणिक कामांचा कधीही कंटाळा केला नाही. बदलीचे प्रयत्न सुरू होतेच. कधी एकदा बदली होते असे झाले होते. दररोजच्या खराब रस्त्याने तर मानेलाही त्रास जाणवू लागला होता. फणसगावच्या एका डॉक्टरांनी तर मला मानेचा पट्टा लावण्यासाठीही सांगितले होते. मानेचा पट्टा , त्यावर हेल्मेट घालून गाडी चालवताना बाजूला वळणे शक्य नव्हते.
बदलीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते. बदलीची ऑर्डर हातात आली होती. मला मागणीप्रमाणे ' गोवळ गावठण ' शाळा मिळाली होती. बदलीची ऑर्डर मिळाली तेव्हा मी कधी नव्हे इतका आनंदित झालो होतो. कधी एकदा ही शाळा सोडून नवीन शाळेत हजर होतो असे मला झाले होते. पण जोपर्यंत माझ्या शाळेत दुसरे शिक्षक हजर होत नाहीत , तोपर्यंत मला कार्यमुक्त होता येत नव्हते. ऑर्डरमध्ये तसा उल्लेखही केला गेला होता. नवीन शिक्षक लवकरच हजर होतील अशी अपेक्षा होती. नवीन शिक्षकाची ऑर्डरही मिळाली होती. पण त्यात त्या शिक्षकाचा पत्ता होता , फोन नंबर नव्हता. सतीश गुलाब कांबळे असे त्या नवीन शिक्षकाचे नाव होते.
पोस्टाने ऑर्डर्स पाठवल्या असल्याने कधी कधी त्या मिळायला उशीर होऊ शकतो. तसेच झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथे पावसाने पाणी भरले होते. त्यामुळे नवीन शिक्षकांपर्यंत ऑर्डर पोचायला बराच विलंब झाला होता. ऑर्डर मिळून त्यांना शाळेकडे येईपर्यंत तीन महिन्यांइतका कालावधी गेला. मला तोपर्यंत माझी ऑर्डर बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्यावेळी पाटगाव येथे राहत होतो. जाताना गोवळ गावठण शाळा वाटेतच मिळे. गोवळ गावठण शाळेतील मुलांनाही मी त्यांच्या शाळेत येणार याची माहिती मिळाली होती. त्यामुळे येता जाता ती शाळा , ती मुले , ते शिक्षक मला नुसते माझ्या येण्यासाठी आसुसलेले असल्याचे जाणवे. खरंतर मीच या गोष्टीसाठी अतिशय आतुर झालेलो होतो. गोवळ गावठण शाळेकडून जाताना माझ्या गाडीचा वेग आपसूकच कमी होत होता. येतानाही तसेच घडे.
कधी एकदा कार्यमुक्त होऊन नवीन शाळेत हजर होतो असे झाले होते , पण मुहूर्तच सापडत नव्हता. मी कधी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघितलाच नव्हता. पण यावेळी मात्र मला गढी. दादरावाडी शाळेत जायला उत्साह वाटत नव्हता. म्हणून मी मुहूर्ताची वाट बघत होतो. शाळेत गेलो तरी , माझी नजर नुसती रस्त्यावर भिरभिरे. नवीन शिक्षक कधी येणार ? की मी याच शाळेत सडणार ? असे अनेक नकारात्मक प्रश्न मला क्षणाक्षणाला पडू लागले होते. शाळा सुटताना बरे वाटे , पण पुन्हा उद्या याच शाळेत यायचे आहे या कल्पनेनेच पायातील वीज निघून जाई.
एखादी गोष्ट करायची आहे आणि ती कशामुळे तरी होत नसेल तर माणसाला किती त्रास होतो हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. माझ्या मुलीचा एक वर्षांपूर्वी जन्म झाला होता. तिला घरी जाऊन भेटण्यासाठी आतुर असलेला मी , या बदली होऊनही जाता येत नाही म्हणून पुरता व्याकुळ झालो होतो. कधी नव्हे ती सहा वर्षांनंतर बदली झाली होती आणि मी अजूनही कार्यमुक्त होण्यासाठी नशीबाशी झगडत होतो. आपण कितीही प्रयत्न केला , तरीही जी गोष्ट ज्यावेळी व्हायची असते , ती त्यावेळीच होत असल्याबद्दल मला चांगलाच अनुभव येत होता. मी खूपच कासावीस झालो होतो. माझे बदली झालेले अनेक मित्र नवीन शाळेत हजर होऊन जुनेही झाले होते. मी आपला माझ्या शाळेत हजर होणाऱ्या नवीन शिक्षकाची चातकासारखी वाट पाहून थकून गेलो होतो. प्रतिक्षा करण्याची सवय मला माझ्या आयुष्यात अनेकदा माझ्यावरील परिस्थितीनेच लावली होती. एकटाच रडत कुढत , डोळ्यातले अश्रू कोणालाही न दाखवत मी आनंदात आहे असे सर्वांनाच भासवत होतो. बऱ्याचदा आपल्याला आपला खरा चेहरा दाखवता येत नाही हेच खरे. सुखाचा किंवा आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर लावून जीवन जगणे कधीकधी क्रमप्राप्त होऊन जाते. माझ्याबाबतीत तसेच घडत होते.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे शाळेत आलो होतो. खूप पाऊस पडत होता. मी शाळेच्या व्हरांड्यातील पाणी झाडूने स्वच्छ केले होते. धनगर सड्यावर शाळा असल्यामुळे पावसाचा मारा जबरदस्त होत असे. मजबूत चिऱ्यांमुळे शाळा जमिनीत घट्ट रुतून बसली होती. कितीही पड , मला काहीही होणार नाही असे ती पावसाला बजावत असावी. सतत पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे व्हरांडा थोडा बुळबुळीत झाला होता. त्यावरून मला आणि मुलांना चालण्याची सवय झाली होती. अलगद पाय ठेवून चालावे लागे. मीच एक दोनदा घसरलो होतो. मुलांना सवय होती. कातळावरून चालून चालून त्यांना बुळबुळीत पृष्ठभागावरून चालण्याचे नैसर्गिक प्रशिक्षणच जणू मिळाले होते.
अचानक शाळेच्या समोर एक रिक्षा थांबली. मला वाटले कोणीतरी आले असतील. मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण एक विद्यार्थीच म्हणाला , " सर , रिक्षातून उतरणारे कोणीतरी आपल्या शाळेकडेच येत आहेत." मी अजूनही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करत राहिलो होतो. पण सहज बाहेर बघितले तर खरेच ते आपल्या शाळेकडेच येत होते. माझ्या डोक्यात आता कुठे प्रकाश पडला होता. शाळेत हजर होण्यासाठी नवीन सर रिक्षामधून उतरत असावेत. मी तसाच धावत रिक्षेच्या दिशेने गेलो. पाऊस रिमझिम पडत होता. सरांकडे दोन बॅगा होत्या. त्या घेऊन ते बिचारे शाळेकडे येत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे वडीलही आले होते. एखादी बॅग घेण्याचा मी प्रयत्न केला. पण सरांनी माझ्याकडे बॅग दिली नाही. ते म्हणाले , " असू दे सर , घेतो मी ". असे म्हणत त्यांनी शाळेच्या व्हरांड्यात पाय ठेवला. नवीन शाळेतील आणि नोकरीच्या पहिल्या शाळेची पहिली पायरी ते चढत होते.
नवीन शाळेत प्रवेश करताना मी नेहमी त्या नवीन वास्तूला जमिनीला हात लावून नमस्कार करूनच शाळेत प्रवेश करतो. त्यांच्या दोन्ही हातात बॅगा असल्यामुळे त्यांना नमस्कार करण्यास एकही हात शिल्लक नव्हता. पण त्या शाळेनेच स्वतःला त्यांच्याकडून साष्टांग नमस्कार करवून घेतला. त्यांनी व्हरांड्यात ठेवलेला पाय घसरला आणि त्यांनी सपशेल साष्टांग नमस्कारच घातला होता. मला हसू आले तरी मी ते आतल्या आत दाबले. वर्गात त्यांचे स्वागत केले. त्यांची विचारपूस केली. त्यांना शाळेचा चार्ज देऊन मी कार्यमुक्त झालो आणि निघालो. मुले माझ्याकडे बघून कावरीबावरी झाली. कुबलसर आता पुन्हा आपल्या शाळेत असणार नाहीत हे त्यांना माहीत झाले होते , त्यांचाही चेहरा रडवेला झाला होता. सलग एका शाळेत काम केल्यानंतर तेथून निघताना मलाही कसेसेच झाले. पण प्रतिक्षा संपली म्हणून ' आसू आणि हसू ' दोन्ही भावना एकाचवेळी उचंबळून आल्या होत्या.
नवीन शाळेत गोवळ गावठण येथे हजर झालो. माझा नवीन शैक्षणिक कार्याचा प्रवास सुरु झाला होता. नवीन मुले , नवीन शिक्षक , नवीन ग्रामस्थ , नवीन पालक , नवीन वर्ग , नवीन उपक्रम सर्व नवीन असल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा वर्गात जाऊन शिकवतो असे झाले होते. लवकरच मी तिथेही जुना होऊन गेलो होतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )