🔴 मुंबई आणि 'तुंबई' - एक न संपणारा संघर्ष
पावसाळा सुरू झाला की, मुंबईकरांच्या मनात धस्स होतं. कारण या दिवसांत मुंबईची 'तुंबई' व्हायला वेळ लागत नाही. गुडघाभर पाण्यातून वाट काढत, रेल्वेच्या रखडलेल्या प्रवासाला सामोरं जात मुंबईकर आपल्या कामावर जातात. या संघर्षाची कल्पना करणंही कठीण आहे. अनेक चाकरमानी आता मुंबईला परतले आहेत, त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे पुन्हा एकदा कर्मभूमीतील आव्हानांना सामोरं जाण्यासारखं आहे.
मुंबईकरांना खरंच मानायला हवं. रोजच्या जीवघेण्या प्रवासातून ते मार्ग काढतात. नोकरीचा ताण कमी की काय, पण प्रवासाचा त्रास त्याहून अधिक असतो. आम्ही वर्षा-दोन वर्षांनी मुंबईला जातो, तेव्हा तिचा बदललेला चेहरा पाहून थक्क होतो. गगनचुंबी इमारती पाहून भीती वाटते. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहूनही त्रास होतो, मग तिसाव्या मजल्यावर राहणारे मुंबईकर कसे राहत असतील, हे देवच जाणे!
सकाळी घर सोडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल की नाही, याची खात्री नसते.
'आता थांबायचं नाय' या चित्रपटात मुंबईची गटारं साफ करण्याची पद्धत पाहिली आणि सफाई कर्मचाऱ्यांना सलाम करावासा वाटला. हे कर्मचारी आहेत म्हणूनच मुंबई काही अंशी स्वच्छ आहे, यात शंका नाही. तरीही, मुंबई तुंबतेच. गटारांमध्ये काहीही वाहत असताना पाहिलं की, ते कोणताही कचरा टाकणाऱ्या आपल्याच बांधवांची कीव येते.
मुसळधार पाऊस असला तरी नोकरीसाठी धावपळ करणाऱ्या मुंबईकरांची कमालच आहे. जीव मुठीत घेऊन दररोज कर्तव्य बजावणारे हे चाकरमानी दरवर्षी गावाकडे येऊन आनंदात का राहतात, याचं कोडं मला आज उलगडलं. एकदा गावी आले की, त्यांना मुंबईला जायचं नावही काढवत नाही, कारण 'आमचो गावच लय भारी' हे त्यांना पटलेलं आहे.
गावी आल्यावर, "साला मुंबयवरना आलो, पन मुलांना खायलाच विसरलो" असं म्हणणारे चाकरमानी भेटले की हसू आवरत नाही. येताना मिठाई आणण्याची त्यांची पद्धत अजूनही गेलेली नाही. मिठाई म्हणजे 'म्हैसूरचे पिवळे चिरेच'. साखरेची कापा, म्हातारीचे केस – हा मुंबईचा सुकामेवा लहानपणी मिळाला की आम्ही त्यावर तुटून पडत असू.
मुंबईच्या आमच्या मुंबईकर मंडळींना देव सुखी ठेवो. त्यांच्या संघर्षाला कोकणी माणसाचा सलाम!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. 1

No comments:
Post a Comment