मे महिना... म्हणजे जणूकाही आनंदाची आणि उत्साहाची बरसात! उष्णतेची लाट असली तरी, याच महिन्यात लग्नाची धामधूम अधिक असते. शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या आणि गावाला आलेले चाकरमानी यामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण पसरलेले असते. एकाच मुहूर्तावर अनेक ठिकाणी लगीनघाई पाहायला मिळते.
'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील 'या गो दांड्यावरना बोलते, नवरा कुणाचा येतो' हे गाणं ऐकताना आजही मन भूतकाळात रमून जातं. डीजेच्या आधुनिक जमान्यातही या गाण्याची मोहिनी कमी झालेली नाही. आजही अनेक लग्नसमारंभात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासारखा असतो. खरं तर, ही गाणी वाजल्याशिवाय लग्न पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही!
आमच्या घरात तर या मे महिन्यात दोन-दोन मंगलकार्ये झाली. दोन बहिणी आणि एका आठवड्याच्या अंतराने ठरलेले विवाहसोहळे ! दोन्ही लग्नं अगदी थाटामाटात आणि आनंदात पार पडली. दोन्ही बहिणींनाही त्यांच्या स्वप्नातले राजकुमार मिळाले. एका बहिणीचं लग्न वराच्या गावी, अगदी घरच्यांसारख्या वातावरणात झालं, तर दुसरीचं एका सुंदर हॉलमध्ये. दोन्ही सोहळ्यांना नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी भरभरून हजेरी लावली. घर बघण्याचा, साखरपुड्याचा, ओटी भरण्याचा, पुण्यवचनाचा, विवाह आणि त्यानंतरच्या पाच परतावणीपर्यंतचे सगळे विधी उत्साहात आणि हास्याच्या कल्लोळात पार पडले.
गावाकडच्या लग्नातील मंगलाष्टकांचा अनुभव तर काही औरच असतो! एकाच वेळी दोन-तीन गायक वेगवेगळ्या सुरात आणि लयीत मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात, ती एक अद्भुत जुगलबंदी असते. माईक नसतानाही त्यांचा आवाज दूरवर ऐकू जातो. दुसऱ्या लग्नात तर कहरच झाला होता! वधू आणि वर पक्षाकडील गायकांनी अक्षरशः चढाओढ लावली होती. प्रत्येकाला आपली मंगलाष्टकं अधिक सुंदर आणि प्रभावी वाटायला हवी होती. आणि खरं सांगायचं तर, सगळ्यांचीच प्रस्तुती खूप छान झाली.
नवरा उंच असल्यामुळे त्याला सगळे स्पष्ट दिसत होते, तर नवरी लाजऱ्या डोळ्यांनी खाली पाहत होती. आणि अशातच कुणीतरी 'आली लग्न घटी समीप नवरा' ही सर्वांना परिचित असलेली मंगलाष्टका सुरू केली. मग काय विचारता! सगळ्यांनी मिळून एका सुरात ती म्हटली आणि तो क्षण अक्षरशः अविस्मरणीय बनला.
'कुर्यात सदा मंगलम' म्हणत जेव्हा सर्वांनी नववधू आणि नवरदेवाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या, तेव्हा वाजंत्र्यांनी एक वेगळाच जल्लोष निर्माण केला आणि दोन अनोळखी जीवांची रेशीमगाठ बांधली गेली.
पूर्वी, जिथे नवरा-नवरी एकमेकांना लग्नानंतरच भेटायचे, ते चित्र आता क्वचितच दिसते. आता तर विवाहपूर्व फोटोशूट आणि वेगवेगळ्या पार्ट्यांची क्रेझ आहे. पण वरातीत डीजे वाजायला लागल्यावर सगळ्यांच्याच पायांना एक वेगळीच ताल मिळतो. लहान-मोठी माणसं, स्त्री-पुरुष सगळेच देहभान विसरून नाचताना दिसतात आणि ज्याला नाचता येत नाही, त्यालाही त्या आनंदात सामील व्हावंसं वाटतं.
अशा प्रकारे, सगळ्यांच्या साक्षीने झालेल्या या विवाहबंधनानंतर, या जोडप्यांवर आयुष्यभर सुखाने संसार करण्याची एक मोठी जबाबदारी येते आणि म्हणूनच अशा पारंपरिक पद्धतीने झालेली लग्नं अधिक काळ टिकतात, यात काही शंका नाही.
©️ लेखक : प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. 1

No comments:
Post a Comment