🔴 निरु आत्ये
बिडवाडीच्या मगरवाडीत माझी आत्ये राहायची. माझ्या वडिलांनी तिला प्रेमाने 'गुलाबायो' म्हणायचे. तिचे पती, म्हणजेच आमचे जीजी, एक प्रसिद्ध वैद्य होते. जीजींना रामचंद्र नावाचे एक भाऊ होते, आणि त्यांच्या पत्नीचे नाव सीताबाई. रामचंद्रकाकांना सगळे 'नाना' म्हणत, तर सीताबाई आमच्यासाठी 'निरु आत्ये' होत्या.
निरु आत्ये... किती प्रेमळ आणि चांगली आत्ये होती ती! तिने आम्हांला खूप माया लावली. ती बिडवाडीत राहत होती आणि तिचे पती, नाना, मुंबईच्या पोस्ट खात्यात नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचे निम्मे आयुष्य मुंबईतच गेले. नोकरीमुळे ते क्वचितच, म्हणजे मे महिन्यात किंवा सण-समारंभाला गावी येत. त्यामुळे त्यांची आणि आमची फारशी जवळीक झाली नव्हती, पण आमच्या निरु आत्येने आम्हांवर निस्सीम प्रेम केले.
आम्ही जेव्हा बिडवाडीला जायचो, तेव्हा आमची गुलाआत्ये आणि निरु आत्ये एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसायच्या आणि आम्ही त्यांच्यात सामील होऊन जायचो. त्यांची मुले – बबन, बायग्या, रमो, राजू, जगी आणि पपी – यांच्यासोबत आम्ही कितीतरी खेळलो होतो. आता ही सर्व मंडळी विवाहित आहेत आणि त्यांना मुलेबाळेही झाली आहेत.
काळानुसार त्यांचे एकत्र कुटुंब विभक्त झाले असले, तरी त्यांची मने आजही जुळलेली आहेत. प्रत्येक कुटुंबात काही ना काही घडतच असते, पण आमच्या जीजीकाकांनी आणि नानांनी आम्हांला चांगली शिकवण दिली. गुलाआत्येने आणि निरु आत्येने तर आम्हांला आईसारखे प्रेम दिले. जवळ घेऊन मायेची ऊब दिली आणि प्रेमाने नाना प्रकारचे पदार्थ करून खाऊ घातले. गावी गेल्यावर त्यांच्या मिठीत एक वेगळाच आधार मिळायचा. गुलाआत्ये आणि निरु आत्ये या दोघींनीही आम्हांवरच्या प्रेमात कधीच भेदभाव केला नाही. आमचे चुकले तर कान पकडायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
आमच्या आयुष्यातील यशात या बिडवाडीच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे आणि हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
काही दिवसांपूर्वी, आमच्या लाडक्या 'निरु आत्ये'चे देहावसान झाल्याची दुःखद बातमी कानावर आली. एक प्रेमळ आणि चांगली आत्ये आम्हांला कायमची सोडून गेली, याचे खूप वाईट वाटले. चांगली माणसे जेव्हा आपल्यातून जातात, तेव्हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा सल्लागार हरवल्याची भावना मनात घर करून जाते. राजू, जगी आणि पपी यांना होणारे दुःख मी समजू शकतो. आई-वडील कोणालाच शेवटपर्यंत पुरत नाहीत, पण त्यांच्या आठवणींच्या साथीनेच पुढील जीवन जगायचे असते. येत्या १८ मे २०२५ रोजी निरु आत्येचे धार्मिक कार्य आहे. आपल्यावर मोठे संकट आले की आपण आई किंवा बाबांच्या कुशीत जाऊन रडतो, पण आता निरु आत्येची ती प्रेमळ कुशी तिच्या मुलांसाठी कायमची पारखी झाली आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबल

No comments:
Post a Comment