🔴 सुट्ट्यांतील पत्त्यांचे रंग
सुट्टी म्हटलं की विविध बैठ्या खेळांची आठवण येते. आमच्याकडे बालपणी सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ आणि पत्ते असे खेळ असत. आजही हे खेळ प्रत्येक घरात असणार आणि त्यात पत्त्यांचा खेळ तर विशेष लोकप्रिय असेल. काही घरात तर रात्र रात्र जागून पत्त्यांचे डाव रंगतात.
मे महिन्यात मुंबईचे 'चाकरमानी' गावी परतताना सोबत पत्ते घेऊन येतात आणि मग संध्याकाळ झाली की रात्री जेवण होईपर्यंत 'पत्त्यांचा खेळ' रंगात येतो. आम्हांला पत्ते खेळायला शिकायला मिळालं ते श्रीधर सावंतांच्या घरी.
गांगोवाडीत आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो, त्या घरातील सर्वजण 'पत्तेप्रेमी' होते. त्यामुळे नकळतच आमचंही पत्त्यांवर प्रेम जडलं. पत्ते खेळतांना त्यांनी आम्हांला काही 'जादू'च्या ट्रिक्ससुद्धा शिकविल्या, ज्या आजही लक्षात आहेत. ती जादू शिकवणारी माणसं तर मनात कायम घर करून राहिली आहेत.
पत्त्यांमधील खेळांचा राजा म्हणजे 'मेंडी कोट'! गंमत म्हणजे मी त्याला पूर्वी 'मेंढी कोट' म्हणायचो. पत्त्यांमध्ये एकही मेंढी किंवा बकरी नसताना त्याला मेंडी कोट का म्हणतात, हे मला अजूनही कोडं आहे. आणि त्यात प्रत्यक्ष कोट नसतानाही आपल्याला 'कोट' लागतो! दहाला 'मेंडी' म्हणतात आणि अशा चार मेंड्या मिळाल्यावर प्रतिस्पर्ध्याला 'मेंडी कोट' बसतो.
आम्ही अनेकदा असे कोट मोठ्या खुशीने स्वीकारले आहेत, पण दुसऱ्यांना कोट चढवण्याइतका शहाणपणा अजूनही आमच्यात आलेला दिसत नाही! त्यावेळी राजा, राणी आणि गुलाम यांचे चित्र असलेले पत्ते डोळ्यासमोर नाचत असतात.
आमचे बाबा शिस्तीच्या बाबतीत खूप कठोर होते. त्यांना स्वतःला पत्त्यांचा खेळ आवडत असला तरी, आम्ही पत्ते खेळून बिघडून जाऊ नये म्हणून ते आम्हांला खेळू देत नसत. पण सुट्ट्या आल्या की त्यांचा नाइलाज होई आणि ते काही काळासाठी त्यांची शिस्त थोडी शिथिल करत.
आम्ही त्यांना पत्त्यांच्या जादू दाखवू लागलो की त्यांनाही त्यात गंमत वाटे. पण ही गंमत फार काळ टिकायची नाही. आम्ही दिवसभर पत्तेच खेळतोय हे कळल्यावर, कधीतरी तेच पत्ते चुलीत जळताना दिसत!
आज आमच्या घरात मी एका बाजूला साऊथ इंडियन चित्रपट बघतोय आणि दुसऱ्या बाजूला मेंडीकोटचा खेळ रंगात आला आहे. मोठ्या मोठ्याने हास्याचे आवाज येत आहेत आणि एकमेकांना कोट चढवण्याची स्पर्धा सुरू आहे. तुमच्याही घरात सध्या असे 'कोट' सुरू आहेत का?
©️ प्रवीण अशितोष कुबल

No comments:
Post a Comment