Saturday, May 10, 2025

🔴 विहानच्या उज्ज्वल भविष्याची एक झलक

🔴 विहानच्या उज्ज्वल भविष्याची एक झलक

         आज माझ्या मनात आनंदाची एक अनोखी लहर दाटून आली आहे. विहान मनीषा अजय राव याने ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत तब्बल 96% गुण मिळवले हे वाचून मन अभिमानाने भरून आले. हा विहान... तोच ना, ज्याच्या बालपणीच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत!

          2012 साली जेव्हा मी मांगवली नं. 1 शाळेत एक नवखा शिक्षक म्हणून रुजू झालो, तेव्हा माझ्यासमोर राहण्याचा प्रश्न उभा होता. त्यावेळी विहानचे आजोबा, आदरणीय चंद्रकांत राणे यांच्या घरात मला आसरा मिळाला. याचमुळे विहानच्या कुटुंबातील सदस्यांशी माझा स्नेहबंध जुळला. त्यांचे मोठे बंधू, श्रीधर राणे यांनी मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली आणि मांगवली माझं दुसरं 'घर' झालं. 

         माझ्या आठवणींच्या पानांवर विहानच्या आजोबा-आजींच्या भेटी आजही सोनेरी अक्षरात कोरल्या आहेत. दरवर्षी, ते दोघेही न चुकता विहानच्या वाढदिवसानिमित्त खास ठाण्याहून शाळेत येत. त्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून मन भरून येई. शाळेतील मुले जेव्हा विहानला 'Hi' करत, तेव्हा त्याचे व्हिडिओ आम्ही त्यांना पाठवत असू आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असे.

         विहानचा वाढदिवस म्हणजे शाळेसाठी एक आनंदसोहळाच असे! त्या दिवशी शाळेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या तब्बल 21 विद्यार्थ्यांना सुंदर शैक्षणिक भेटवस्तू मिळत, तर कधी रोख स्वरूपात बक्षीसही असे. इतर मुलांनाही आकर्षक भेटवस्तू मिळत आणि दुपारच्या जेवणात सर्वांसाठी रुचकर, गोड बासुंदीचा बेत असे.

          या सगळ्या गोष्टींपूर्वी मला आठवते, आदरणीय मनीषा राव मॅडम यांचा फोन यायचा. त्या अत्यंत आदरपूर्वक चौकशी करायच्या आणि शाळेतील पटसंख्येनुसार भेटवस्तू पाठवून देत, कधी कधी तर पैसेही पाठवत. त्यांच्या सांगण्यानुसार त्या भेटवस्तू विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी माझी असे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, ज्याबद्दल मी त्यांचा आजही आभारी आहे.

         मांगवली शाळेत मी सात वर्षे सेवा केली आणि या काळात राव कुटुंबीयांशी माझा नियमित संपर्क होता. नवीन शाळेत आल्यावर संपर्क थोडा कमी झाला, तरीही विहानचे आजोबा आजही मला फोन करून आठवण काढतात. एकदा तर ते आणि आजी दोघेही कणकवलीत आमच्या घरी जेवायला आले होते, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.

विहान लहानपणापासूनच एक अत्यंत हुशार मुलगा आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याला उत्तम संस्कार दिले आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्याला सतत प्रेरणा दिली. त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत आहेत.

         आज विहानने दहावीच्या आंतरराष्ट्रीय बोर्डात जे अभूतपूर्व यश मिळवले आहे, ते केवळ त्याचेच नव्हे, तर त्याच्या सुजाण पालकांच्याही परिश्रमाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. हे यश त्यांच्या यशोशिखरावरचा मानाचा तुरा आहे, असे म्हणणे नक्कीच योग्य ठरेल.        

          विहान, तुझ्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! तू निश्चितच उज्ज्वल भविष्य गाठशील यात मला तिळमात्र शंका नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...