Saturday, June 28, 2025

🔴 कणकवलीच्या शैक्षणिक वाटचालीतील 'खळाळता झरा' – सचिन तांबे सर!

🔴 कणकवलीच्या शैक्षणिक वाटचालीतील 'खळाळता झरा' – सचिन तांबे सर!

         कणकवली बीआरसीमध्ये गेली अनेक वर्षे आपल्या उत्साह आणि प्रामाणिकपणाने एक वेगळीच ओळख निर्माण केलेले सचिन तांबे सर हे खरंच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य आणि त्यांची व्यक्ती म्हणून असलेली उंची यामुळे ते मला नेहमीच भावतात. कणकवली तालुक्यात विविध प्रशिक्षणांच्या निमित्ताने त्यांची भेट होते, आणि जेव्हा त्यांच्या हाती सूत्रसंचालनाची धुरा असते, तेव्हा ते त्या क्षणाचे अक्षरशः सोनं करतात.

          त्यांच्या ओठातून निघणारे शब्द कधी हास्याची उधळण करतात, तर कधी संवेदनशील मनाला अंतर्मुख करतात. त्यांचे बोलणे वरवरचे नसते; ते नेहमीच पोटतिडकीने बोलतात, त्यांच्यातील अतरंगी शिक्षक सतत जागा असतो. माणूस म्हणूनही ते खूप मोठे आहेत; त्यांना ओळखण्यासाठी वेळ लागतो, सहवास लागतो. अन्यथा त्यांच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यताच अधिक.

          सचिन सर शिस्तबद्ध आहेत, सर्वांचा आदर करतात आणि नेहमी टापटीप राहतात. त्यांचे 'मेकअप किट' त्यांच्यासोबत असते आणि ते कधीही अव्यवस्थित दिसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावे यासाठी ते खूप प्रयत्न करतात, कारण मनातील दुःख लपवून 'मी सुखी आहे' हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो. अर्थात, खऱ्या मित्रांसोबत ते कधीतरी मनातील गुपितं उघड करतात आणि मोकळे होतात.

          त्यांना वर्तमानपत्रे वाचण्याचा नुसता नाद नाही, तर ती त्यांची आवडच आहे. अनेक वर्तमानपत्रे वाचून त्यातील महत्त्वाच्या बातम्या हायलाइट करणे, त्यांची कात्रणे गोळा करून चिकटवणे हा त्यांचा अनोखा छंद आहे. पण ते इथेच थांबत नाहीत, तर त्या कात्रणांचे फोटो काढून आपल्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट ग्रुपद्वारे सर्वांना पाठवतात. मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा उदात्त हेतू असतो.

          एखाद्या शाळेत गेल्यावर तेथील संपूर्ण वेळेचा ते मुलांसाठी सदुपयोग करतात, पूर्ण वेळ मुलांना देतात. त्यांच्यातील आदर्श शिक्षक त्यांनी कायम जागृत ठेवला आहे. आमच्या शेजारी, अगदी जवळच्या खोलीत ते राहायला असल्यापासून मी त्यांना ओळखतो. 'आपलं घर, आपण आणि आपली मुलं' यापलीकडे ते कधी गेले नाहीत, पण नोकरीच्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून वागणं त्यांना उत्तम जमतं, म्हणूनच ते अधिक लोकप्रिय आहेत.

          सर्व शिक्षकांना माहीत आहे की, सचिन तांबे म्हणजे खळाळता झरा आणि चैतन्याचा पूर! त्यांच्या येण्याने प्रशिक्षणात अक्षरशः जान येते. गंभीर प्रशिक्षणही कसं खेळकर करावं, हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. प्रशिक्षण म्हटलं की कपाळाला आठ्या घालून आलेल्या शिक्षकांना मी त्यांच्या नुसत्या प्रवेशानेच हसतमुख होताना पाहिलं आहे. त्यांचं वक्तृत्व आणि सूत्रसंचालन खरंच वाखाणण्यासारखं आहे. त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत आणि अनेक अधिकारी त्यांचा आदर करतात.

          अशा या सचिन तांबेंनी नुकतंच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण केले आहे. ते जर पूर्णवेळ शिक्षक असते, तर त्यांना नक्कीच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले असते. आजच्या नवनियुक्त शिक्षकांनी सचिन सरांच्या नित्याच्या अध्यापनातून खूप काही शिकले पाहिजे, कारण एखादा नवोपक्रमशील शिक्षक जे करू शकतो, त्याहीपेक्षा जास्त सचिन तांबे सर एखाद्या शाळेमध्ये गेल्यानंतर करत असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याला माझा सल्यूट!

©️लेखक: प्रवीण अशितोष कुबल सर

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...