Tuesday, September 27, 2022

🛑 नृत्यानंदी : स्वानंदी

🛑 नृत्यानंदी : स्वानंदी

          गेले दोन दिवस वेशभूषेची तयारी सुरु होती. कणकवली शिवसेना नवरात्रोत्सव जिल्हास्तरीय रेकॉर्डडान्स स्पर्धेत छोट्या उर्मीने सहभाग घेतला होता. 

          आज तो दिवस उजाडला होता. संध्याकाळी कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचलो होतो. नृत्याची आवड असणारी मंडळी आमच्या आधीच येऊन विराजमान झाली होती. संगीत मैफिलीचे शौकिन वेगळे असतात , तसे नृत्याची आवड असणारे शौकिन आगळेवेगळे असतात. येथे आलेले प्रेक्षक संमिश्र होते. आपल्या पाल्यांना घेऊन आलेले पालक यांत जास्त होते. आमच्याच घरातून आम्ही सहाजण गेलो होतो. गर्दी बघून कार्यक्रमाची लवकर सुरुवात करण्यात आली. 

          माझी छोटी मुलगी स्वानंदी उर्फ उर्मीने देवीला मनोभावे नमस्कार केला होता. देवीची हसतमुख मूर्ती बघून ती भारावून गेलेली दिसली होती. ती आपलं देहभान विसरुन गेली होती. सूत्रसंचालकांचा आवाज कानात घुमू लागला होता. डिजेच्या एको साऊंडमुळे मी थोडा लांब बसण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी मध्यवर्ती ठिकाणी बसलो. कार्यक्रम सुरु झाला होता. 

          ' आई तुझं देऊल ' या नृत्याने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली होती. लोक टाळ्यांचा गजर करत होतेच. एक एक कार्यक्रम पुढे सरकत होता. उर्मी कधी आईकडे तर कधी माझ्याकडे येऊन बसत होती. तिचं सादरीकरण व्हायला अर्ध्या पाऊण तासांचा अवकाश होता. ती दोन दोन मिनिटांनी " पप्पा , माझा डान्स कधी आहे ? " असे विचारत होती. मी तिला " आता येईल हं तुझा नंबर " असं सांगत होतो. 

          समोरचे देधडक परफॉर्मन्स पाहून आम्हांला धडकी भरत होती. धडकी अशासाठी की ' माझी मुलगी डान्स करेल ना नीट ' ही भिती उफाळून येत होती. उर्मी मात्र अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. स्टेजवर जाणं तिच्यासाठी तसं नवीन नव्हतं. भाग न घेताही तिने यापूर्वी ' ऑन द स्पॉट '  परफॉर्मन्स दिले होते.  डान्स तिच्या अंगाअंगात भिनला आहे. यु ट्युब वर बघेल तसं ती स्वतः नाचण्याचा प्रयत्न करते. तिला कोरिओग्राफर लागत नाही , ती स्वतःच स्वतःची कोरिओग्राफर आहे. तिच्या परफॉर्मन्स पूर्वी ' चंद्रमुखी ' चित्रपटातील ' चंद्रा ' या गाण्यावर तीन ते चार परफॉर्मन्स तिला पाहायला मिळाले होते. तिचं निरीक्षण जबरदस्त आहे. तिने आजही बारकाईने निरीक्षण केले होते. 

          तिचं नाव पुकारलं गेलं होतं. ती धावतच स्टेजवर गेली होती. दर्शकांकडे पाठ करुन उभी असलेली पाच सहा वर्षांची चिमुरडी पाहून सर्वच स्तब्ध झाले होते. ही चिमुरडी काय करणार परफॉर्मन्स ? किंवा बघुया तरी या चिमुरडीचा परफॉर्मन्स ? असे प्रत्येकाला वाटत असावे. 

          आणि ढोलकीचा आवाज स्पिकर मधून येऊ लागला होता. उर्मीचे पाय तालात थिरकायला सुरुवात झाली होती. तिने अजून आपला चेहरा दाखवला नव्हता. तिने तोंडावर पदर धरला होता. ती कधी एकदा पदर दूर करते असे प्रत्येक दर्शकाला झाले असेल. अखेर तिने पदर दूर केला आणि दर्शकांनी अधिक शांत होत जणू तिचे स्वागतच केले होते. कारण ते टाळ्या वाजवायला विसरले होते. 

          उर्मी स्वानंदात नाचत होती. सुरुवातीलाच तिचा केसांचा भला मोठा अंबाडा सुटून पडला होता. तरीही नाचताना तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रॅक्टिस करताना ज्या स्टेप्स तिने केल्या नव्हत्या , त्या स्टेप्स तिने आकस्मिकपणे केल्या होत्या. लावणी नृत्याला साजेसा अभिनय तिने साकार केला होता.

          गाणे संपेपर्यंत तिचा अप्रतिम परफॉर्मन्स लोक डोळे भरुन पाहात होते. ती खुशीतच स्टेजवरुन खाली उतरत होती. उतरल्यावर ती मला भेटण्यासाठी धावतच येत होती आणि अरेरे ... ती पडली होती. न रडता तशीच ती आपलं बक्षीस घ्यायला पुन्हा धावली होती. आयोजकांनी सर्वांनाच मानधन दिले होते ही विशेष बाब होती. 

          परिक्षकांच्या टेबलापासून जवळच आम्ही बसलो होतो. एका परीक्षकांनी कौतुकाने तिला बोलावून घेतले होते. तिचे वैयक्तिक कौतुक केलेले तिलाही विशेष आवडले होते. लहान गटात खुप चांगले परफॉर्मन्स झाले होते. सगळे परफॉर्मन्स आम्ही बघायला थांबलो नाही. उर्मीला अनेकांनी वैयक्तिक बक्षिसे दिली होती. 

          मी तिला घरी घेऊन येत होतो. तिला आईस्क्रीम खूप आवडतं. तिने आपल्या आवडीचं मँगो डॉली खाल्लं. तिला मिळालेलं ते खरंखुरं बक्षीस असावं. आईस्क्रीमवाले नारायण अंधारी काका तिला ' सैतान ' म्हणतात. अर्थात ते गमतीने म्हणतात. त्यांनी तिचा डान्सचा व्हिडीओ पूर्ण पाहिला होता. त्यांनाही कमाल वाटली. त्यांना वाटले तिला हा डान्स कोणीतरी शिकवलेला असेल. पण कोणतीही विशेष मेहनत न घेता तिने केलेला तो नृत्याभिनय लक्षात राहण्यासारखा होता. 

          तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचे आताच समजले आणि तिच्या अंगीभूत गुणांचा मला सार्थ अभिमान वाटला. अभिनंदन उमा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Saturday, September 24, 2022

🛑 सुहास्य वदनी साहेब

🛑 सुहास्य वदनी साहेब

          सरकारी नोकरीत असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क येत असतो. अधिकारी हे अधिकार गाजवण्यासाठी नसतात. ते आपल्या हाताखालील माणसांकडून काम काढून घेण्यासाठी असतात. सगळेच कर्मचारी काम करत असतात. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगवेगळी असते. त्यात अधिक गती देण्याचे काम अधिकारी करत असतात. म्हणून त्यांना अधिकारी म्हणत असावेत. 

          गेल्या पंचवीस वर्षात अनेक अधिकाऱ्यांचा सहवास लाभला आहे. त्यांच्या भेटीने नवीन शिकायला मिळाले आहे. प्रत्येक भेटीत भीतीची जाणीव झाली आहे. भीती म्हणजे आदरयुक्त भीती !! अधिकाऱ्यांची अनामिक भीती वाटलीच पाहिजे असा सर्वसाधारण समज असतो. तो सर्वत्रच असतो असे माझे ठाम मत आहे. याबाबत मतभिन्नता नाकारता येणार नाही. 

          एखाद्या अधिकाऱ्याबद्दल आत्यंतिक प्रेम , आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होण्यासाठी ते अधिकारी स्वतःच जबाबदार असतात. त्यांच्या कार्यप्रेरणेने सर्वसामान्य कर्मचारी अधिक कार्यप्रवण होत असतात. त्यांनी दिलेले प्रोत्साहन महत्त्वाची भूमिका बजावत असते. 

          2019 साली मी कणकवली तालुक्यातील तळेरे प्रभागातील शिडवणे नं.१ शाळेत दाखल झालो. आम्हाला सुहास पाताडेसाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी असल्याचे मला समजले. त्यांना मी वैभववाडी तालुक्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून पाहिले होते. त्यावेळी मला त्यांची खूपच भीती वाटली होती. त्यांच्या परीक्षण अधिकारी पदामुळे ती भीती असू शकेल.

          आता मात्र ती भीती अजिबात राहिलेली नाही. त्यांची भेट सतत होत राहायला पाहिजे असे वाटत राहते. त्यांच्या भेटीमुळे आपला दिवस अधिक चांगला जातो. प्रोत्साहनाचे बळ मिळते. चुका लक्षात आणून दिल्या जातात. त्यावर अचूक मार्गदर्शन केले जाते. तुम्ही अजिबात नाउमेद होत नाही.

          तालुक्यातील शाळांच्या गडकिल्ले स्पर्धा होत्या. आम्ही भाग घेण्याची चिन्हे ठळक दिसत नव्हती. पाताडेसाहेबांचा फोन आला. त्यांनी विचारले , " किल्ला बांधून झाला का ? " आमची पूर्वतयारीही झाली नव्हती. आम्ही काय उत्तर देणार ? तयारी सुरु आहे असे मोघम उत्तर दिलं. साहेब त्यावेळी रागाने की प्रेमाने बोलले होते , " मी कासार्ड्यातून किल्ला बनवण्यासाठी मुले घेऊन येऊ का ? " साहेब असे म्हणाले आणि आमची बोलतीच बंद करुन टाकली. त्या क्षणापासून आमची युद्धपातळीवर तयारी सुरु झाली होती. माझ्यासमोरच प्रांगणात रस्त्याच्या खडीचा भला मोठा डेपो दिसत होता. त्याचा उपयोग करुन आम्ही उंचावर किल्ल्याची प्रतिकृती साकार केली. साहेबांनी असं करायला भाग पाडलं होतं. न होऊ शकणारा किल्ला दोन तीन तासांत उभारला गेला होता. हे झाले ते साहेबांमुळे. 

          कागदपत्रे देण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी भेट होई. त्यावेळी ते माझ्या सारख्या उपशिक्षकांचं आदरातिथ्य करायला नेहमीच पुढे सरसावले आहेत. एकदा त्यांच्या घरी धोंडास नावाचा गोड पदार्थ खायला मिळाला. त्यावेळी मला माझी आई त्यात दिसली होती. साहेब आमची आईसुद्धा झाले आहेत. ते खरंच महान आहेत. असे अधिकारी लाभणे हे आमचे परमभाग्यच म्हणायला हवे. 

          एकदा मी त्यांना आमच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरुन दिलं होतं. तेव्हा माझी मुलगी त्यांच्याशी बोलली होती. त्यामुळे माझ्या मुलीलाही त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती. यावरुन त्यांचं मुलांवरील निर्व्याज प्रेम दिसून येतं. त्यांच्याशी बोलताना अनेकदा भावनाविवश व्हायला झाले आहे. त्यांच्या डोळ्यांतील प्रेमाश्रु दिसले आहेत. कोण कोणासाठी असे अश्रू ढाळेल ? पाताडेसाहेब त्याला अपवाद असतील. ते सर्वांमध्ये मिसळतात. अशा सर्वांत मिसळून जाणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हां शिक्षकांना खरी गरज आहे. नवीन अधिकारी झालेल्यांना त्यांच्यासारखं आचरण करता आलं तर ते आमच्याकडून अपेक्षित काम नक्कीच काढून घेऊ शकतील. 

          असे अधिकारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला झालेली गर्दीच त्यांच्यावरील निस्सीम प्रेम व्यक्त करीत असते. त्यांच्यासाठी कितीही लिहिले , बोलले तरी ते कमीच असेल. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी खूप सुधारलो आहे. 

          साहेब माझं लेखन वाचत असतात. एकदा मी ' कळीचे निर्माल्य ' हा लेख लिहिला होता. तो वाचताना त्यांना त्यांची मुलगी ' स्नेहल ' आठवली होती. स्नेहलवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. आपल्या वेलीवरील निरागस फुल उन्मळून पडल्यानंतर पाताडेसाहेब स्वतः किती हतबल झाले असतील याची मी कल्पना करु शकतो. माझा अनुभव वाचल्यानंतर त्यांनी आपला हृदयद्रावक अनुभव मला शेअर करताना त्यांच्या डोळ्यांतील वाहणाऱ्या गंगा यमुना मी माझ्या घरातून अनुभवत होतो. 

          ते सर्वांशी असेच घरगुती संबंध जोडतात आणि आपलेसे होऊन जातात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशी अनेक संकटे पाहिली आहेत , त्यांना निकराने लढा दिला आहे. यापुढेही त्यांनी आपलं आयुष्य ' सुखी माणसासारखं ' जगावं आणि आम्हाला आजन्म प्रेरणा देत राहावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

          देऊ कसा निरोप

          तुटतात आत धागे

          हा देह दूर जाता 

          मन राहणार मागे

          दाटून कंठ येतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, September 19, 2022

🛑 करु देवाशी भांडण

🛑 करु देवाशी भांडण 

          कैलासवासी चुलत्यांचे वर्षश्राद्ध होते. आदल्या दिवसापासून आमच्या सर्व बहिणी , नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. मोठा गोतावळा असल्यामुळे माणसांची गर्दी नेहमीसारखीच होती. हे सर्वांचे आमच्यावरचे प्रेमच आहे असे मी मानतो. 

          भटजीकाका सांगितलेल्या वेळेवर आले होते. सर्व धार्मिक विधी वेळेवर पूर्ण होत होते. अशा वेळी एक वेगळे भावपूर्ण वातावरण तयार झालेले असते. येणारे नातेवाईक , पाहुणेरावळे अनेक दिवसांच्या अंतराने एकत्र आलेले असतात. त्यांच्या अश्रूपूर्ण गाठीभेटी जिव्हाळ्याचे प्रतिक असतात. ज्ञातीबांधव एकत्र येतात. समाजातील वाडीतील गावकरी येतात. 

          हे सगळं आज घडत होतं. दुपार होत चालली होती. येणारी मंडळी पिंडाला नमस्कार करत होती.  मनोभावे नमस्कार करुन मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत होती. अजून काही माणसं येतच होती. 

          मी पिंडांचे विसर्जन करण्यासाठी नदीकडे निघालो होतो. माझ्यासोबत माझे बालाकाका होते. बालाकाका आमच्या घरातील एक जाणते व्यक्ती आहेत. त्यांच्याशिवाय कुणाचे पान हलत नाही. त्यांना सगळ्या धार्मिक गोष्टी परिपूर्ण माहिती असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडील सर्व कार्यक्रम होत असतात. आमचे सर्व भावोजी आणि बहिणी आम्हाला जे सहकार्य करतात त्याने आम्ही नेहमीच भारावून जातो. ही सर्व माणसे स्वतःच्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांसमोर वाकत असतात. या सर्वांबद्दल कायम मला ऋणात राहावेसे वाटते. येणारी माणसे हसतमुखाने निघून जातात. जाताना त्यांचे पाय आमच्या घरातून निघण्यास तयार नसतात. ते बराच काळ रेंगाळत राहतात. मग जाताना जड पावलाने जायचे म्हणून जातात. 

          वाडीतील सर्व गावकरी मंडळी हिरीरीने सहभाग घेतात. कित्येक कार्यक्रमात मी त्यांना मिळून मिसळून काम करताना बघितले आहे. हा एकोपा बघून खूप समाधान वाटते. मग ही वाडीतील माणसे वाटतच नाहीत , एकाच कुटुंबातील माणसे वाटत राहतात. मला बघताच हात उंचावतात. आपुलकीने चौकशी करतात. आम्हांला खूप सारे प्रेम देतात. आमच्याकडून प्रेम घेतात. आम्ही प्रेम देतो , त्यामुळे आम्हाला जे प्रेम मिळते त्याला तोड नाही. हे प्रेम आजन्म जपून ठेवायची आमची जबाबदारी असते. 

          जी माणसे काही काळ आमच्या सोबत नव्हती , तीही आता आमच्यासोबत येऊ लागली आहेत ही त्या देवाचीच कृपा आहे. त्या माणसांत नेहमीच चांगली भावना भरुन राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

          अशा मोठ्या गजबजाटात काही चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुका घडत असतात , त्या मुद्दाम केल्या जात नसतात. माणसे नुसती येत असतात. सर्वांचा आदर सन्मान करायचे मनात असते. पण गर्दीत कधीतरी काहीतरी राहून जातेच. 

          आलेली सर्व पितरे असतात. ती माणसाच्या रुपाने महालय किंवा श्राद्धाला खूप मोठ्या श्रद्धेने आलेली असतात. त्यांना आदराने जेवायला वाढणे हे यजमानांचे कार्य असते. आज हे कार्य आमच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यात काही चुका झाल्या असतील तर येणाऱ्या अस्मादिकांनी आम्हांला क्षमा करावी अशीही विनंती आम्ही साष्टांग नमस्कार करुन केलेली आहे. 

          आलेली माणसं जायला लागली , तसं घर रिकामं होऊ लागलं. तरीही बहिणी , भावोजी आणि आत्या अशी माणसं मुद्दाम थांबली होती. वर्षश्राद्ध असलं की रात्री नेहमी भजन केलं जातं. त्यावेळी ज्यांचं वर्षश्राद्ध असतं , त्यांचा आत्मा कोणाच्याही अंगात येत असतो. तो कोणाच्या अंगात येतो हे पाहण्याची उत्सुकता असते. 

          आमचा भाई तिच्या मुलीच्या अंगात येतो हे आम्हाला गेल्या वर्षभरात माहीत झालेले आहे. तो येतो , तो मृदुंग वाजवतो , तो बोलतो आणि ते पाहून सगळे भाईची आठवण काढून ओक्साबोक्सी रडू लागतात. 

          आजही अगदी तसेच घडत होते. भजन मधुर सुरात सुरु झाले होते. अभंग आणि गजराचा आळवणीचा आर्त सुर , धुपाचा सुगंध  , मृदुंगाचा नाद ऐकून भाईचा आत्मा आजही अगदी वेळेवर आला होता. त्याची वाट पाहावी लागली नव्हती. भाई आला आणि त्याने मृदुंग वाजवायला सुरुवात केली. त्याच्या आत्म्याचे घुमणे सुरु झाले होते. भाईच्या सगळ्या मुली रडू लागल्या होत्या.  

          सगळे भाईला नमस्कार करत होते. मीही नमस्कार करायला गेलो होतो. मी भाईचा हात हातात घट्ट पकडून त्याला विचारले , " मी कोण आहे ? " भाईने तातडीने उत्तर दिले होते. भाईचा आत्मा बोलला , " बाळू "…  तू माझी आठवण काढ. माझ्या पोरग्यांकडे लक्ष दे. " मी सद्गदित झालो. पुढे भाईने सर्वांची नावे सांगितली. त्यांचे गुण सांगितले. तो चतुर्थीला दोन वेळा आला होता. आज तो पुन्हा आलाच. तो यावा अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. ती पूर्ण झाली. 

          तो असाच येत राहतो , त्यामुळे तो गेला आहे असे आम्हाला वाटत नाही. त्याचा वरदहस्त आमच्यावर असाच राहो अशी त्याच्या चरणी आमची कायमची प्रार्थना असणार आहे. भजनाचा शेवट भैरवीने होत होता. " मिळोनिया संतजन , करु देवाशी भांडण " हे शब्द माझ्या कानात नुसते गुंजत राहिले होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )

Sunday, September 11, 2022

बरं बाबा

 बरं बाबा


         काही माणसं अशी असतात , त्यांना कोणाचेही काहीही देणं घेणं नसतं. आपल्या स्वतःच्या कोशात रमलेली अनेक माणसे या जगात असू शकतात. त्यांना कितीही , काहीही सांगण्याचा प्रयत्न करा , ती काही त्या कोशातून बाहेर येऊ शकत नाहीत. का कोण जाणे ? पण अशीही माणसे जगात आहेत याचे वेगळे आश्चर्य वाटण्याची गरज नाही. 

          प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसे येऊन गेलेली असतील. आली नसतील तर ती पुढील आयुष्यात येऊ शकतील. या माणसांपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नसतो. फक्त त्यांचा तुम्हाला उपयोग किती होईल हेही सांगता येणं कठीण आहे. 

          त्यामुळे अशी माणसं आपल्या नेहमीच लक्षात राहतात. ती निर्विकार असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही आठ्या पडत नाहीत. त्यांनाही तणाव येत असेलच. पण हा तणाव काही केल्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसता दिसत नाही. कधी कधी असं वाटतं , या माणसांसारखं आपणही व्हावं. तसं होण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणे जमत नाही. त्यांना ते कसं जमत असावं त्यांनाच माहित ? 

          एकदा असेच एक गृहस्थ माझ्या आयुष्यात आले. त्यांना सतत ' बरं बाबा ' असं म्हणण्याची सवय होती. कोणाचे काहीही झाले तरी त्यांचं आपलं ठरलेलं वाक्य ' बरं बाबा '. त्यांना दुसऱ्यांबद्दल आपुलकी असेलही , पण एखादा कोण आयुष्यातून कायमचा निघून गेल्याच्या बातमीलाही त्यांचं हेच उत्तर असे , " बरं बाबा ". आपण कसे " अरेरे , वाईट झाले. " असे तरी म्हणतो. त्यांनी असं कधीच म्हटलं नसावं. कारण त्यांच्या या वाक्याचा मला कित्येकदा अनुभव आलाय म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. 

          आपण नेहमी आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असतो. हे डोकावणं कधी कधी झोकून देणं होऊन जातं. झोकून देताना दुसऱ्याला निर्मळ मनाने मदत करण्याची इच्छा आपल्याला तसे करायला प्रवृत्त करत असते. 

          हे ' बरं बाबा ' म्हणणारे आजोबा आता जिवंत नाहीत. ते स्वतः कायमचे निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल ' बरं बाबा ' असं म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणंही जीवावर येतंय. 


@ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

          

Sunday, September 4, 2022

🛑 बायग्या आका

🛑 बायग्या आका

          ऐन तारुण्यात पतीचे सौख्य निघून जावे आणि वैधव्य भोगणे नशिबी यावे यासारखे दुःख नाही. जिच्या पदरी असे भोगणे येईल तिला तिचे ठसठशीत कुंकू लावण्याचे दैनंदिन कार्य प्राक्तनाने कायमचे हिसकावून घेतलेले असेल. पुढील आयुष्य कसं कंठणार ती बिचारी माऊली ?

          तिच्या पदरात एक चिमुरडी देऊन सतत पिऊन जीवनाचा नाश करणाऱ्या या पुरुषांना म्हणावे तरी काय ? त्यात तिचा काय दोष ? 

          माझ्या आत्येच्या मुलीची ही शोककथा आहे. ती जन्माला आल्यानंतर काही काळ आपल्या घरी राहिली असेल. तिचे वडील अकाली गेले आणि माझी आत्या आपल्या मुलीसह आमच्या घरी येऊन राहिली ती कायमचीच. आमच्याच घरात लहानाची मोठी झाली. ती आमची सगळ्यात मोठी आत्येबहिण. जिला आम्ही सगळेच ' बायग्या आक्का ' म्हणतो. आम्ही लहान असल्याने आका म्हणतो , मोठे तिला बायग्या म्हणतात. नेहमी दुसऱ्यांची काळजी घेणारी. सगळ्यांची चौकशी करणारी. चौकशी अर्थात तब्येतीची. सगळे बरे असले की तिला बरे वाटते. तिच्या मनात कोणाबद्दल कधी द्वेष नसतो. प्रेम आणि आपुलकी मात्र कित्येक पटीने असते. 

          तिला सगळेच हवे असतात. भेटण्यासाठी ती आतुर झालेली असते. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी ती अक्षरशः मिठीच मारते. नाहीतर गाल कुस्करते. ती प्रेमाने असे करत असते , पण आम्हाला चारचौघात असे केलेले आवडत नाही. म्हणून तिला तेवढ्यासाठीच राग येतो. ती बरोबर असते , कदाचित आम्हीच चुकीचे असतो. 

          तिने आम्हाला लहानपणी आंघोळ घातली आहे. स्वच्छतेच्या सवयी लावल्या आहेत. कान , नखे यांची स्वच्छता केली आहे. आम्हां पाच भावंडांना वेगवेगळी नावे ठेवली आहेत. चेंब्रिक , शाम्बा , बाळीहुंड्री , अण्णांनू , वासरु अशी आमची पाच भावंडांची अभूतपूर्व नावे तिलाच सुचू शकतात. आम्हाला ती अजूनही याच नावाने हाक मारते.

          तिची शंकरावर अपार भक्ती. तिने सगळी व्रते केली असतील. तिला चांगला वर मिळायला हवा होता. सुरुवातीला चांगला वाटलेला तिचा नवरा अट्टल बेवडा होता. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनाने माझ्या बहिणीचे आयुष्य बरबाद करुन टाकले. तिला एक मुलगी झाली. वाटले होते मुलगी झाल्यानंतर तिचा नवरा सुधारेल. पण तो अधिकच पिऊ लागला. आमच्याकडे आल्यावर तो चांगला असे. त्याचा स्वभाव चांगला होता. पण त्याचे व्यसन काही केल्या सुटता सुटत नव्हते. बहिणीने केलेली सर्व व्रतवैकल्ये व्यर्थ ठरली. अखेर त्याला दारुनेच संपवले. 

          आईसारखे आयुष्य तिच्या पदरी आले. आता एका मुलीला घेऊन त्या मुलीसाठी आयुष्य नव्याचे जगण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. आम्ही तिला भेटायला गेलो. तिला रडताही येत नव्हते. ती खंबीर झाली होती. 

          तिने आपल्या मुलीला स्वतःच्या बळावर मोठे केले. शिक्षण दिले. तिचे लग्न लावून दिले. तिच्या मुलीला चांगला निर्व्यसनी नवरा मिळाला हे तिचे भाग्यच. आता ती आपल्या मुलीकडेच राहते आहे. 

          तिला लग्नात ओव्या म्हणण्याची , बारश्यात पाळणी म्हणण्याची , गणपती सणाला फुगड्या म्हणण्याची आवड आहे. तिला लोक बोलवून नेतात. बोलावले नसले तरी ती स्वतःहून जाते. तिला अहंकार नाही. काहीतरी मिळेल या अपेक्षेने ती गेलेली नसते. तिला माणसात राहायचे असते. तिला ते आवडते. 

          ती सर्वांना फोन करत असते. सर्वांची चौकशी करण्यात ती दिवस घालवते. कधी कधी आमची बोलणी खाते. तरीही ती तिच्यासारखीच वागते. रक्षाबंधन आणि भाऊबीज ती कधीही चुकवित नाही. असेल तिथून ती भावांना भेटायला धावत येते. तिला फक्त आमचे प्रेमच हवे असते. तिला ते मिळाले की ती आल्या पावली निघून जाते. 

          तिचे जीवन असे चालले आहे. तिला आपल्या जीवनाची अजिबात पर्वा नाही. दुसऱ्यांसाठी जगणारी अशी आमची बायग्या आका आहे. 

          लहानपणी तिने आमच्यासाठी एक चारोळी रचली होती. ती म्हणे , " 

दादा नि अण्णा 

काय तुमचा म्हन्ना

कित्याक गो आरडलस

आमका दोन्ना

ही चारोळी आता म्हणताना मला हसू येते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 सत्यनारायण आणि आरती

🛑 सत्यनारायण आणि आरती

          आरती करणे ही आपली सर्वांची आवड असते. गणपतीला आरती खूप आवडते. घरोघरी चतुर्थी सणाला आरत्यांची लगबग दिसून येते. दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला आरती केली जाते. घरची आरती आणि वाडीची आरती होत असते. एखाद्या घरी आरती म्हणणारे कुणी नसतील तर अशा आरत्यांची आवश्यकता भासते. एका घरीच आरती करण्यापेक्षा ती सगळ्या गणपतींकडे करण्याची प्रथा म्हणूनच सुरु झाली असावी. 

          या आरत्यांच्या चाली अफलातून असतात. दशावतारी चाल , साधी सरळ चाल , संथ चाल , उडती चाल , चित्रपटातील गाण्यांवर आधारित चाल अशा एक ना अनेक चाली लावून आरत्यांमधील भक्तिभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु राहतात. आरती पाठ नसणारे पुस्तके हातात घेऊन आरत्या म्हणताना दिसतात. त्यांच्या आरत्या कधीच पाठ होत नाहीत. प्रत्येक कडव्याला त्यांना पुस्तकात पाहावेच लागते. जुन्या जाणत्यांच्या या आरत्या तोंडपाठ असत.त्यांनी पुस्तक हातात धरल्याचे आठवत नाही. 

          मृदुंगाच्या किंवा ढोलकीच्या तालावर आरती म्हणताना तल्लीन व्हायला होते. टाळ , चकी यांची साथ नक्कीच उपयोगी ठरत असते. पेटीचे सुर संगतीला असतील तर आरती सुरुच राहावी असे वाटत राहते. 

          हल्ली आरती संपली की विविध गोडधोड किंवा तिखट , चमचमीत खाद्यपदार्थ वाटले जातात. त्यामुळे त्यांचे वास आधीच नाकात गेले तर आरतीपेक्षा तिकडेच जास्त लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्याकडे काय मिळणार ? यासाठी आरतीला जाणे हे भक्तिमय नक्कीच असणार नाही.

          सत्यनारायण पुजा असली की आरतीला तुडुंब गर्दी असते. सत्यनारायण आरतीची चाल एका वेगळ्या धाटणीची असते. ती तशीच असली तरच बरी वाटते. टाळांचा खणखणाट मग कर्कश वाटत नाही.

          आरतीमधून कलावती आणि अंगध्वजराजा यांची कहाणी ऐकताना सत्यनारायण प्रसादाची महती पटते. त्यामुळे लहानपणापासून सत्यनारायण पुजेचा प्रसाद न घेता पुढे जाण्याचे धैर्य झालेले नाही. 

          चतुर्थी सणामध्ये बऱ्याचदा नवसाच्या सत्यनारायण महापूजा सांगितल्या जातात. त्या केल्यानंतर मनशांती मिळते. मन आणि काया दोन्ही सकारात्मक होतात. मनातील वाईट नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून जातात. 

          हल्लीच मी एका नातेवाईकांकडे सत्यनारायण पुजेसाठी गेलो होतो. एक बाल भटजी कथा वाचन करत होते. त्यांचे सुवाच्य पठण समोर जसेच्या तसे चित्र निर्माण करत होते. वडिलांच्या अकाली निधनामुळे शाळेत शिकता शिकता त्याच्यावर पौरोहित्य करण्याची पाळी आली होती. त्याची आईही प्रसाद बनवण्यासाठी आलेली होती. दोघे मिळून अशा प्रकारे आपला वारसा पुढे चालवत होते. मला त्यांचा अभिमान वाटला. 

          आरतीची वेळ जवळ आली. वाडीचे भजन मंडळ साहित्यासह आले. त्यांनी सत्यनारायण आरती सुरु केली. त्यांनी म्हटलेली आरती कर्णमधुर आणि सुरात होती. मीही त्यात सामील झालो होतो. कित्येक दिवसांनी सुंदर आरतीचा लाभ मिळाला होता. कोणतीही गडबड नव्हती. व्यवस्थित शब्द उच्चार होत होते. कलावतीचा जीवनपट नयनचक्षूंसमोर उभा करण्याची कला त्यांच्या गायनातून दिसून आली. 

          चतुर्थी सणांच्या निमित्ताने अशा आरत्या , पुजा संपन्न होतात. मुले , माणसे , पाहुणेरावळे एकत्र येतात. समाज एकत्र येतो. हेवेदावे विसरले जातात. म्हणूनच की काय या सणांचे उपयोजन केले गेले असावे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, September 3, 2022

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

          बारावी सायन्स नंतर डीएड केलं. कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात पहिल्या वर्षात चाळीस जणांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. दहावी झाल्यानंतर डीएड बंद होऊन ते बारावी नंतर सुरु झाले होते. पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या अनेकांनी बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळवला होता. 

          दहावी डीएड बॅचची मुलेही काही कमी नव्हती. पहिल्या परिपाठात त्यांच्या विद्वत्तेचा अनुभव आला. तीही जबरदस्त टक्क्यांनी गुणवत्ता सिद्ध करुन प्रवेश घेतलेली मुले होती. कदाचित आम्हीच त्यांच्यापुढे कमी पडू की काय असा धसका पहिल्या दिवसापासून आमच्या अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. काहींनी कॉलेज लाईफ अनुभवलेले होते. त्यांना हे कठीण नव्हते. 

          अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मात्र थोडे कठीण जात होते. कारण आता फक्त लिहायचे नव्हते तर बोलायचेही होते. नुसतेच बोलायचे नव्हते तर शिक्षकाला शोभेल असे बोलायचे होते. त्यासाठी दोन वर्षे शिकून शिक्षक होण्यासाठी सगळे तयार झाले होते. 

          चाळीसच्या चाळीस छात्र अध्यापक विशेष तयारीचे होते. एकापेक्षा एक हुशार होते. प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण होता , जो इतरांवर प्रभाव पाडायचा. अर्थात प्रत्येकावर दररोज एकोणचाळीस प्रभाव पडत होते. ते प्रभाव टिपणं सोपं काम नव्हतं. 

          परिपाठात प्रत्येकातील आगळे वेगळेपणा नजरेत भरायचा. आपल्याला असे जमेल का ? असे वाटायचे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय होता. आज हे सगळे शिक्षक कुठे ना कुठे आदर्श शिक्षक म्हणून काम करत असतील तेव्हा मला माझ्या बॅचचा सार्थ अभिमान वाटतो. त्यावेळी जे साधे सरळ वाटत होते , ते आता बोलके आणि उपक्रमशील झाले आहेत. शिक्षकी पेशाचा तो गुण असतो. पाण्यात पडले की जसे पोहायला शिकता येते , तसे शिक्षकी पेशा स्वीकारला की त्यातील सर्वकाही अंगी बाणत जाते. 

          संतोष तुळसकर नावाचा माझा मित्र उत्तम बोलका होता. स्मार्ट होता. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता. मुलीदेखील त्याच्या अशा असण्यावर फिदा असाव्यात. बिचारा खेड येथील क्षमताधिष्ठित प्रशिक्षणाच्या सकाळी नदीवर आंघोळीला गेला तो वर आलाच नाही. तो गेला आणि आम्हां मित्रांमधील संतोषच हरपला. 

          संजय शेट्ये हा माझा बेंचमेट. कुठेही जाताना तो आणि मी सतत बरोबर असू. त्याचे तिरपे तिरपे अक्षर अजूनही आठवते. गोड गोबऱ्या गालांचा , मान तिरपी करुन हसणारा संज्या कुठेतरी हरवला आहे की त्याचे काय झाले आहे समजायला मार्ग नाही. दोन वर्षे एकत्र असणारा मित्र अचानक कुठे निघून जातो आणि सापडता सापडत नाही यासारखे दुःख नाही. तो कुठे असेल तर तो सुखात असावा हीच देवाकडे प्रार्थना आहे. 

          दशरथ सावंत एक सुजाण , संस्कारी मित्र. उंच , बारीक , गोरापान. गाल थोडेसे आत गेलेले. केस नीट विंचरलेले. सगळ्यांचा यथोचित आदर करणारा. काळजीपूर्वक पाठ टाचण काढणारा. पाठात चित्रांचा वापर करणारा. माझ्याही पाठीवर अलगद आश्वासक थाप मारुन प्रोत्साहन देणारा. 

          त्या दिवशी शिक्षक समितीचे धरणे आंदोलन होते. तिथे त्याच्या आत्महत्येची खबर ऐकायला मिळाली. खूप वाईट वाटले. त्याचे डीएडच्या वर्गातील क्रियाकलाप डोळ्यासमोर नाचू लागले. त्याला खेळाची खूप आवड होती. तो दरवर्षी आपले विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत आणायचा. त्यावेळी धावती भेट होई.  पण विद्यार्थ्यांसाठी तो सतत धाव घेणारा आदर्श शिक्षक होता. तो असा अचानक कसा निघून गेला हे आमच्यासमोर असलेले प्रश्नचिन्ह आहे. त्याने आत्महत्या का केली असावी ? कोणते प्रश्न त्याला भेडसावत होते ? सुखी संसाराला सोडून तो का जावा ? दुसऱ्यांना विजयी होण्यासाठी प्रेरणा देणारा एक उपक्रमशील शिक्षक एवढा स्वतःच्या जीवनावर नाराज का व्हावा नकळे !! जीवन सुंदर असताना त्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे असे सांगणारा दशरथ निराशेच्या खाईत कसा जाऊ शकतो ? हे आम्हाला सर्वांना न उलगडणारे कोडे आहे. 

          दशरथासारखे अनेक शिक्षक असतील , ज्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असेल. संकटे तर येतच असतात. कामाचा ताण येऊन तणाव येतच राहणार आहे. त्यावर मात करुन जगणे हेच खरे जगणे आहे. अशा आव्हानात्मक जगण्यात अर्थ आहे. आजच्या शिक्षकांना अनेक तणावांना सामोरे जावे लागत असेल , पण त्यामुळे त्यांनी असा मार्ग कधीही अवलंबू नये. आपल्याला जमेल तसे काम करत राहावे. दशरथा , माझे हे विचार तुझ्यापर्यंत अंतराळातून पोहोचत असतील तर तुझ्यासाठी माझ्याकडून हे लेखाचे दान आहे असे समज. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 जिजी

🛑 जिजी

          नावात काय आहे म्हणा ? पण काही नावं आपलं अस्तित्व मागे ठेवून जातात. भाई , अण्णा , दादा आणि जिजी अशी काही नावं पूर्वीपासून खूप आदराने घेतली जातात. ही नावे समोर आली की एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व असणार याची जाणीव होत राहते. 

          मोठया बंधुला दादा आणि छोट्या बंधुला अण्णा म्हणायचा प्रघात असावा. हे भावांचे प्रमाण वाढले की मग ' भाई ' म्हटले जाते. आता काय सर्वांच्या नावापुढे भाई या शब्दाचा प्रत्यय लावण्यात येतो. राजकारणात या नावांचा सर्रास वापर सुरु झाला आहे. 

          जिजी हे नाव विशेष व्यक्तींसाठी वापरले जात असावे. दाजी या नावाचा सुद्धा अधिक बोलबाला असे. माझ्या आयुष्यात अशी अनेक नावांची माणसे नातेवाईक म्हणून जास्त आली आहेत. 

          आमचे एक मुख्याध्यापक होते. त्यांच्या पहिल्या दोन नावांची आद्याक्षरे घेऊन त्यांना सारेच ' जिजी '  म्हणत असत. त्यांनीही ते नाव स्विकारले होते. ते स्वतःचे मूळ नाव विसरतील इतके ते जिजी म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. 

          माझ्या आत्येचे पती म्हणजे माझे काका ' जिजी ' नावानेच गावात प्रसिद्ध आहेत. आता ते हयात नाहीत. तरीही त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्वभावाने ते कायमच सर्वांच्या लक्षात राहिले आहेत. त्यांच्या स्मृती ताज्या असल्यासारख्या जाणवत राहतात. एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. उंच असले तरी सडपातळ बांधा. गोऱ्या वर्णाचे. त्यांच्या डोक्यावर केस असताना माझा जन्म झाला नव्हता. त्यांना टक्कल असले तरी ते त्यांना शोभून दिसे. त्यांनी शेती करुन कुटुंबाची गुजराण केली. सोबतीला नाभिकाचा व्यवसाय केला. कधी गावात फिरुन तर कधी दुकान मांडून मोठया कुटुंबाचे पालनपोषण केले. स्वतः मितभाषी होते. ते कमी बोलत असले तरी त्यांचे शुद्ध आचरण खूप काही बोलून जाई. आम्हाला त्यांचा आदर वाटे. भीतीही वाटे. ते आमच्यावर कधीही रागावले नाहीत. 

          ते मांत्रिक होते. ते वैद्य होते. त्यांनी मंत्र म्हटला तर सरपटणारी जनावरे जागच्या जागी थांबत. बिळात गेलेली बाहेर पडत. त्यांच्या मंत्रोच्चाराने नाग , सर्प निसर्गाच्या दिशेने आपल्या मार्गाने निघून जात. त्यांनी दिलेल्या तांदळाच्या दाण्यांनी सरपटणाऱ्या जनावरांना घाबरणारी माणसे भयमुक्त होत असत. 

          वैद्य म्हणून त्यांनी कित्येकांना रोगमुक्त केले असेल. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी अनेकांवर मोफत उपचार केले असतील. जंगली औषधी वनस्पतींची नावे त्यांना तोंडपाठ होती. त्यांची प्रथमोपचार पेटी अशा प्रकारच्या मुळ्यांनी भरलेली असे. आम्ही त्या मुळीला ' पाळ ' म्हणत असू. जुने चिवट रोग जिजींच्या या पाळांनी बरे केले आहेत. त्या काळात आमच्या घरातील उपचार त्यांच्या पाळांवरच चाले. 

          माझे लग्न झाल्यानंतर मी पाटगाव येथे राहात होतो. ते माझा संसार बघायला आले होते. ते खूप आनंदी दिसत होते. त्यांना व्यसन नव्हते. अचानक त्यांच्या जिभेला एक जखम झाली. तपासणीअंती ती वाढण्याची शक्यता सांगण्यात आली. ऑपरेशन झाले. तरीही त्या आजाराने त्यांचा बळी घेतला. आमचे सर्वांचे लाडके जिजी गेले आणि सारा गावच हादरला. दुसऱ्यांवर उपचार करणारा वैद्य , स्वतःवर उपचार करु शकला नव्हता.

          त्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे जाणे झाले. त्यांचं जुनं सलून आणि त्यांनी काम केलेली लाकडी फिरकीची खुर्ची बघून ' जिजींची ' आठवण उफाळून येई. संपूर्ण गावात नव्हे पंचक्रोशीत जिजींचे नाव आजही खूप आदराने घेतले जाते. जोपर्यंत त्यांच्या गावात आजार आहेत , तोपर्यंत ' जिजींचे ' नाव विसरले जाऊ शकत नाही. एक वेगळाच ठसा जिजींनी जनमानसात उमटवला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, September 2, 2022

🛑 आवाजाचा राजा

🛑 आवाजाचा राजा

          आवाज ही निसर्गाने आपल्याला बहाल केलेली देणगी आहे. त्यात प्रयत्नाने रियाज करुन आवाजासाठी प्रसिद्ध होताना मी खूप कमी लोकांना पाहिले असेल. 

          हा आवाज ऐकत राहावासा वाटला पाहिजे. आवाज ऐकून कार्यक्रमातून उठून जात असलेले लोक थांबले पाहिजेत. केवळ या माणसांचा आवाज ऐकण्यासाठी काही आवाजप्रेमी लोक कार्यक्रमाच्या शेवटच्या पुष्पापर्यंत थांबलेले असतात. ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असे व्यक्ती करतात , त्यांच्या मुखातून येणारे शब्द टिपून घेण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्ती टपून बसलेल्या असतात. हे आवाजाचे बादशहाच असतात. त्यांना कोणतेही शब्द द्या , त्या शब्दांना उच्चारांचं सामर्थ्य देणारे ते एक आवाजदूत असतात. काहीही म्हणा म्हणूनच मला अशा व्यक्ती देवदूत वाटत राहतात. 

          असे हे आवाजाचे राजा मला भेटले. त्यांचे नाव राजेश कदम. खरंच आवाजाचे बादशाहाच म्हणालात तरी ते वावगे ठरु नये. भेटीतून त्यांच्यातील सुत्रसंचालक पाहून कोणालाही भुरळ पडेल. माझेही तसेच झाले. एक माझ्यासारखा शिक्षक इतकं चांगलं बोलू शकतो याचा मला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो. मी त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले , ऐकले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू प्रत्येक श्रोत्याला भुरळ पाडेल अशीच आहे. 

          त्यांच्या आवाजासमोर पार्श्वसंगीत लाजेल. त्यांची बोलण्याची एक आगळी आणि वेगळी शैली आहे. त्यांनी त्याची निरंतर जोपासना केली आहे. या आवाजाचा त्यांना अभिमान असला तरी गर्व मात्र अजिबात नाही. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळणे हे साहजिकच आहे. कितीही पुरस्कार मिळाले तरी त्यांनी आपले पाय जमिनीवरच ठेवले आहेत. पुढील आयुष्यात त्यांनी अनेक उत्तम पुरस्कार मिळवत राहावेत. त्यांना पुरस्कार मिळाला की तो पुरस्कारच मोठा होतो. 

          राजेश कदमांमध्ये दम आहे , ते कधी दमत नाहीत. त्यांनी आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता वाढवत नेली आहे. सध्या ते डॉक्टरेट मिळवण्यात व्यस्त आहेत. ते एक उत्तम कवी आणि लेखक आहेत. त्यांच्यासारखे लेखक ज्यावेळी माझ्या लेखनाला दाद देतात त्यावेळी आमचा साहित्यिक व्यासंग वाढण्यास प्रेरणा मिळत जाते.

          ते कधीही कुठेही भेटले की जे स्मितहास्य करतात , ते पाहून कोणीही आपले दुःख विसरुन जाईल. त्यांच्याही जीवनात अनेक विघ्ने आली असतील , पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांवर सदैव मात केली आहे. आमच्यावर आपल्या तेजस्वी आवाजाचा ठळक ठसा उमटवणारे आमचे मित्र राजेश आम्हाला कायमच वंदनीय , आदरणीय असणार आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




🛑 भटजी काका

🛑 भटजी काका

          प्रत्येक घरी बाप्पाची पुजा करायला भटजी काका येतात. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. एखाद्या घरी सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली असते. त्यावेळी भटजी काकांची सर्वजण चातकासारखी वाट बघत असतात. हल्ली भटजी काका दुर्मिळ झाले आहेत. एखाद्या गावासाठी एक भटजी काका असतात. मोठा गाव असला तर त्या बिचाऱ्या काकांची त्रेधातिरपीट उडून जाते. शुभकार्य आणि अशुभकार्य अशी दोन्ही कार्ये एकाच भटजी काकांना पार पाडत असताना किती त्रास होत असेल तेच जाणो !! आम्हाला त्याची कल्पना जरी आली तरी पुरे. 

          गणपतीच्या दहा दिवसांत तर या काकांना उसंतच नसते. त्यांचे सर्व दिवस बुकिंग झालेले असतात. त्यात एखादी आकस्मिक पुजा ठरली तर तीही त्यांना पार पाडावीच लागते. मग त्यांना त्यांच्या दैनंदिन कार्याचा वेग वाढवावा लागतो.एका दिवसांत त्यांना नाईलाजाने दोन , तीन , चार किंवा जास्त पुजा कराव्या लागत असतील. दक्षिणा मिळत असली तरी त्याचा त्रास भटजी काकांनाच सहन करावा लागतो. त्यांना तसे करायचे नसते , पण आम्हीच त्यांना तसे करायला भाग पाडत असतो.

          या भटजी काकांचा अभ्यास दांडगा असतो. ते कितीही वयाचे असले तरी त्यांना ' भटजीकाका ' म्हटले जाते. पोरवयाच्या भटजींना ' काका ' च म्हणतात. 

          काही गावांमध्ये ' भटवाडी ' असते. तिथे असलेल्या पौरोहित्य करणाऱ्या काकांना वेगवेगळ्या वाड्या किंवा पंचक्रोशीतील गावे ठरवून दिलेली असतात. ज्या गावांत असे काका नसतात , त्यांना ते आणून ठेवावे लागतात. त्यांना एखादे झोपडीवजा घरही बांधून द्यावे लागत असेल. त्यांची नवी पिढी निर्माण झाली तर पुढच्या पौरोहित्याचा प्रश्न सुटत राहण्याची चिन्हे दिसतात. अर्थात काकांच्या नवीन पिढीने ' भटजीकाका ' व्रत जोपासायला हवे असते. नाहीतर पुन्हा प्रश्नचिन्ह होते तसेच दिसायला लागते. नवीन पिढी जन्माला आलीच नाहीतर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहते. 

          वृद्ध झालेल्या अशा काकांची अवस्था कावरीबावरी होत असेल. जुन्या पद्धतीने मांडणी करुन पूजा व्रत करणारे काका आताच्या नवीन पिढीला सामोरे जाताना घामाघूम होत असावेत. एखादी पोथी वाचत असताना गरिबीमुळे ऑपरेशन न करता आल्याने दिसत नसल्याने पुन्हा पुन्हा चष्मा काढून पुसणारे भटजी काका मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यांनी केलेल्या प्रसादाची चव मात्र अप्रतिम असते. त्यांनी ब्राम्हण भोजनासाठी केलेल्या महाप्रसादातील वरण पातळ असले तरी तशी चव घरच्या वरणाला कधीच कशी येत नाही हे समजायला मार्ग नाही. अर्थात त्यांच्या हाताची चव कुणा दुसऱ्याच्या हाताला येणार नाहीच. 

          गावोगावी पूजा व्रत करण्याचे कार्य करणाऱ्या या भटजी काकांचा सदोदित सन्मान होत राहायला हवा. त्यांना आदर दिलात तर तुम्हाला मिळणारे पुण्य नक्कीच वाढत जाईल. 

          आम्ही आमच्या भटजी काकांचा कमालीचा आदर करतो. त्यांना घेऊन येतो , नेऊन सोडतो. त्यांनी खुश राहावे यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आमचे भटजी काका माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांनी मला त्यांच्या घरी ' गोड शिरा ' खायला येण्यासाठी गोड शब्दांत आमंत्रण दिले आहे. अजून मी त्यांच्या गृही गेलेलो नाही. बघुयात कधी जायला मिळते ते ?

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, September 1, 2022

🛑 भजनांचे दिवस

🛑 भजनांचे दिवस

          माणसाकडे एखादी कला असायलाच हवी. त्या एका कलेचा आधार घेत तो आपलं जीवन सुंदर करु शकतो. ही एखादी कला जर भजनाची आवड असेल तर अधिक उत्तम. कारण ही भजनाची कला कधी छंद बनेल ते समजणारही नाही.

          पारंपारिक आणि वडिलोपार्जित कला पुढे नेत असताना घरातील नवी पिढी एक एक धडा घेत असते. आमच्या घरात आजोबांना भजनाचे भारी वेड होते. ते उत्तम गायक होते. त्यांचा आवाज स्त्रियांसारखा बारीक होता. त्यांनी आपल्या काळात अनेक भजने गाजवल्याचे बाबा सांगतात. स्वतः पेटी वाजवत नसले तरी सुरात गाण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांचे हे वेड पुढच्या पिढीत उतरत गेले आहे. 

          आम्ही लहान असतानाचे भजनांचे दिवस आठवतात. आमच्या एका घरातच आठ नऊ पुरुष असल्यामुळे भजन मंडळ स्थापन झाल्यासारखे झाले होते. काही कारणास्तव आमची आरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे आमचे भजन आपसूकच बंद झाले होते. अर्थात या कारणामुळे आमचे वैयक्तिक भजन सुरु करण्यासाठी चालना मिळाली होती. बुवाकाका पेटीवर , भाईकाका मृदुंगावर , बालाकाका चकीवर आणि आम्ही उर्वरित सगळे कोरस असे आमचे भजन सुरु झाले. बुवाकाका गायला लागले की आम्हाला चेव येत असे. त्यांचे अफलातून गायन पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. आम्ही एका रात्रीत आठ दहा भजने करत असू. प्रत्येकवेळी आधीपेक्षा भजन सरस होई. जणू रंगदेवता माता आमच्यावर प्रसन्न होण्यासाठी नेहमीच आतुर असल्यासारखी. सलग दहा रात्री जागरणे करुनही बाप्पाची सेवा करताना त्रास वाटत नसे. ते भजनांचे दिवस आठवले की आताही खुमखुमी येते. तसे ते बालपण पुन्हा यावे असे वाटत राहते. ती भजनांची मजा आता येत नाही. 

          एकदा बुवाकाका भजनाला आले नव्हते. दोन तीन भजने करायची होती. बुवाच नाही तर भजने कशी करायची हा आमच्यासमोर प्रश्न होता. सगळ्यांनी मला बुवागिरी करण्याचा आग्रह धरला. मी सहजच पेटीवर बसलो. एक दोन सूर दाबून धरले. त्या सुरात लाऊडस्पीकर लावून तीन भजने केली. लोकांना ती आवडलीही. लोकांनी मला सहन केले. त्यांच्या सहनशीलतेची मी खरंच कमाल करतो. बाप्पाने त्यावेळी माझ्याकडून भजनरुपी सेवा करुन घेतली होती. 

          अशी ही माझी गायनाची आणि भजनाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी अनेक भजने प्रत्यक्ष पाहिली आहेत. चंद्रकांत कदम , परशुराम पांचाळ , वामन खोपकर , विलास पाटील यांची भजने प्रत्यक्ष बघितली. त्यांच्या शिष्यांची भजने पाहिली. त्यानंतर कित्येक बुवांची भजने पाहण्याचा योग आला. 

          पूर्वीच्या आणि आताच्या भजनांमध्ये बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या बुवांना सर्वकाही मुखोद्गत असे. त्यांची नोटेशने , तराने ऐकताना देहभान विसरून जायला होई. आता तसे का घडत नाही समजत नाही. 

          आमचे आणि बुवाकाकांचे काहीतरी बिनसले. भजन बंद पडले ते सुरु झालेच नाही. मीही पेटी शिकण्याचा प्रयत्न करता करता आरंभशूर ठरलो. मला ते तडीस नेता आले नाही हा माझा पराजयच आहे. माकडाच्या घरासारखे मी पेटी वाजवायला शिकण्याचा दरवर्षी निश्चय करत गेलो. पण कधीही सफल प्रयत्न करुच शकलो नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकत गेलो आणि त्या संसारालाच भजन म्हणू लागलो. आता हे माझे स्वप्न पूर्ण होईल याची मलाही खात्री नाही. 

          आता दरवर्षी आम्ही आमच्या गणपतीकडे छान भजन करतो. सगळी घरातली मंडळी ' भजन मंडळी ' म्हणून बसलेली असतात. दरवर्षी तेच अभंग , तेच गजर , त्याच गवळणी असल्या तरी आमच्या भजनाची गोडी आम्हांला नेहमीच नित्य नूतन टवटवीत वाटते हेही तितकेच खरे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

          दरवर्षी बाप्पा घरी येतात. ते पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यांचं येणं किती आनंददायी असतं ! त्यांचं पुन्हा येणं असलं तरी त्यांचं जाणं हुरहुर लावणारं असतं. 

          लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच बाप्पाचं असणं स्वर्गीय सुखासारखं असतं.  वर्षातले हे गणपतीचे दिवस प्रत्येकाला हवेहवेसे वाटत राहतात. त्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आलेले असते. हेवेदावे विसरुन एकत्र आल्यामुळे गणपतीचे दिवस स्नेहपूर्ण वाटतात. मनाने एकत्र येण्यासाठी गणपतीचा सण नेहमीच लाभदायक ठरत आला आहे. 

          आमचे मोठे कुटुंब. बाबा , तीन काका , त्यांची कुटुंबे , आम्ही दोन भाऊ आणि आमची कुटुंबे मिळून सतरा अठरा मुले माणसे एकत्र येतो , तेव्हा खरी चतुर्थी साजरी होत असते. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी येतात. त्यांचं हे येणं चतुर्थीमुळेच शक्य होते. आपला हा बाप्पा असा सर्वांना एकत्र आणतो म्हणून हा सण खऱ्या अर्थाने साजरा होतो. 

          गणपती आमच्याच शाळेतला. त्यामुळे तो आणायला जावे लागत नाही. उलट इतर कुटुंबे आमच्याकडून गणपती घेऊन जाताना आमच्या कुटुंबाची लगबग सुरु असते. गणपती सुखरुप आसनावर पोहोचेपर्यंत जीवात जीव नसतो. एकदा बाप्पा सुखरुप घरोघर पोहोचले की जीव भांड्यात पडतो. 

          आम्ही आमचा गणपती घरात आणला. बाबांनी प्रथम पूजा केली. प्रथम पूजा म्हणजे सुरुवातीची पूजा. ही पूजा नेहमी बाबांकडूनच होत असते. यंदा भाईकाका नव्हते , गेल्या वर्षी ते दीर्घ आजारामुळे गणपतीच्या दिवसांत देवाघरी गेले होते. त्यांचा फक्त देह दिसत नव्हता. मात्र त्यांचा आत्मा जिथे तिथे वावरताना जाणवतो आहे. 

          आमच्या भाईकाकांचे सजावट , स्पिकर आणि लायटिंगवर भारी प्रेम होते. ते नाहीत तर त्यांच्या या सगळ्या वस्तू पारख्या झाल्या आहेत. त्यांच्या परमप्रिय वस्तूंना कोणीही वाली राहिलेला नाही. त्यांचा आत्मा त्या सर्व वस्तूंमध्ये वास करत असेल. त्यांची ती मालमत्ता जपून ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या सजावटीच्या वस्तू लावताना प्रत्येकक्षणी त्यांची आठवण दाटून येते आहे. त्यांनी जिवापाड प्रेम केलेली तोरणे लुकलुकताना दिसत आहेत. स्पिकरमधले अजित कडकडे  अभंग गात आहेत. त्यांच्या संग्रहातील हजारो गाण्यांच्या सिड्या त्यांच्याशिवाय अधुऱ्या आहेत. 

          पहिले पूजन संपन्न झाले. पहिली आरती सुरु झाली. घालीन लोटांगणचा टिपेचा सुर भाईकाकांच्या कानी पोचला असेल. त्यांच्या मुलीच्या अंगात भाईकाका संचारले. आमची आरती संपण्याऐवजी वाढत चालली होती. गणेशभक्तीचे सूर ' भाईकाकांना ' परत आणण्यात यशस्वी ठरले होते. बहिणीच्या अंगातील भाईकाका आपली नेहमीची वज्रमांडी घालून आले होते. त्यांनी मृदुंगाचा ताबा घेतला. एक वर्षानंतर वाजवायला मिळाल्यामुळे त्यांनी मनसोक्त वाजवायला सुरुवात केली होती. वाजवून झाल्यानंतर त्यांनी गणपती पूजनाची इच्छा व्यक्त केली. डोळे बंद असूनही त्यांना अक्षता , गंध आणि फुले दिसत होती. त्यांनी पूजन केले. हे सगळे आम्ही साक्षात पाहात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांत भाईकाकांसाठी गंगा यमुना दाटून आल्या होत्या. दरवर्षी गणपती येणारच होता , तसे आमचे भाईकाकाही पुन्हा पुन्हा येणार म्हणून आम्हा सगळ्यांनाच झालेला आनंद लपवता येत नव्हता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...