🛑 पियाबिना बसिया बाजेना
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. ती असते म्हणून तो यशस्वी होत असतो. तिने त्याच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. आपला कारभारी नेहमीच यशस्वी होत राहावा असे तिला मनस्वी वाटत असते. पतीच्या यशाची बीजं पत्नीच्या कार्यात असतात. ती त्या पतीसाठी जीवाचं रान करायला सक्षम असते. ती अबला असली तरी पतीसाठी सबला होते. त्याच्यासाठी ती जगाचा विरोध अंगावर ओढून घेऊ शकते. पतीसाठी ती कोणाचीही पर्वा करणार नाही. एकनिष्ठ पती पत्नी असतील त्यांना हे लागू पडते.
अचानक संकटे येतात. त्यावर मात करताना पत्नी पुढाकार घेते. ती मिळवती नसली तरी ' झाशीची राणी ' बनते. पतीचा आत्मविश्वास वाढवणारी तीच असते. ती असते म्हणून संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकला जात असतो. ती नसली तर सारेच शून्य. हे एकच शून्य नसेल ती असंख्य शून्ये असतील. पती आणि पत्नी ही एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. रथ कधी एका चाकाने चालणारही नसतो. त्यासाठी दोन्ही चाकांचं एकसारखं फिरणं गरजेचं असतं.
पत्नीच्या चाकाला चाक लागते. तिचं चाक निखळतं. एक आणि एकच चाक शिल्लक राहतं. ते पतीचं चाक असतं. रथासाठी दुसऱ्या चाकाची व्यवस्था केली जाते. दुसरं चाक येऊन बसतं. ते पत्नीचं चाक नव्याने सुरु झालेलं असतं. ही दोन्ही चाकं पुन्हा नेटानं फिरु लागतात. रथ पुन्हा होता तसा दिसायला लागतो. चाकं मॅच व्हायला थोडा वेळ लागतो. अखेर चाकं पूर्वीसारखी मॅच होतात.
हे नवीन चाक नव्या उमेदीनं पहिल्या चाकाला सांभाळून घेत असतं. तसं ते खूपच अवघड असतं. रथ धावताना थोडा आवाज जरुर येत असतो. याचा अर्थ प्रत्येक पतीला आणि पत्नीला एकमेकांची किती आवश्यकता आहे हे मला इथे मुद्दाम नमूद करायचे आहे.
हे उलटं झालं असतं तर ? म्हणजे नवऱ्याचं चाक आधी निखळलं तर ? तर पत्नीसाठी दुसरं चाक शोधावं लागेल ना ? पती नावाचं. तिला किती गरज असते पतीची याचा कधी विचार केला आहे का ? तो फक्त तिनेच करायचा ? आणि समजा तिने केला तर तिला काय म्हणायचे ?
आता विविध मालिकांमधून असे प्रकार दाखवले जातात. काही ठिकाणी असे घडतही असेल. पुरुषाने केले तर बोलले जात नाही. बाईने केले की तिला नकोसे करुन सोडणारी अनेक तोंडे असतात. पुरुषाला जशी गरज असते , तशी तिलाही गरज असते. तिने कशाला आजन्म विधवा होऊन राहायचं ? तिने कोणता गुन्हा केलाय ?
माझी पत्नी गेली. त्यानंतर मलाही माझ्यासाठी आणि मुलीसाठी दुसऱ्या लग्नासाठी कित्येकांनी आग्रह धरला. मी मनापासून तयार नव्हतोच. त्यावेळी मी माझ्या घरच्यांना हा प्रश्न विचारला होता , " माझे काही बरेवाईट झाले असते तर माझ्या पत्नीचे तुम्ही दुसरे लग्न लावून दिले असते का ? " या प्रश्नावर सगळेच गंभीर झालेले दिसले होते. कारण या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नव्हते. त्यांनी जसा माझा विचार केला तसा तिचा केला असता का ? मी त्यांचा मुलगा होतो म्हणून असा सकारात्मक विचार !!! ती त्यांची सून होती म्हणून ते तिचाही तसाच विचार करायला हवे होते ना ?
माझे कुटुंब जर याचे उत्तर देऊ शकत नाही तर दुसऱ्या घरांमधूनही मला याचे समर्पक उत्तर मिळेल असे वाटत नाही. तिने बिचारीने आपले विधवेचे जीवन जगत राहावे एवढेच तिच्या नशिबात लिहिले असेल का ?
जगात अशा अनेक ' ती ' असतील. ती तिचे पुढील आयुष्य जगताना आपल्या पतीचं स्मरण करत दररोज मरण भोगीत राहील. तिने आता स्वतः आपल्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. तिच्या नातेवाईकांनी तिच्या लग्नाचा विचार केल्यास तिचे जीवन ती पूर्ववत जगू शकते. ती तिचे पूर्वीचे क्षण आठवेलही. ते आठवून नवीन संसार थाटताना तिला त्याच्यात पूर्वीचा नवरा बघणं अपेक्षित आहे. एकूणच काय दोन्ही चाके महत्त्वाचीच आहेत. रथ सुरु राहिला की दोन्ही चाकांना गती येते. शेवटी तो आयुष्याचा रथ आहे ना ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )









.jpeg)


.jpeg)