Thursday, June 30, 2022

🛑 दोन तपांची धाव

🛑 दोन तपांची धाव

          नोकरी मिळवणं म्हणजे एक अवघड गोष्ट असते. ती मिळाली कि ती टिकवणं हे आपलं कौशल्य असतं. आता नोकरी मिळवणं खूपच अवघड बनत चाललेली बाब आहे हे कुणीही सांगेल. सव्वीस वर्षांपूर्वी मलाही नोकरी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले होते. प्रत्येकवेळी यशस्वी होत गेलो होतो. कारण नोकरी मिळवणारच असा ध्यासच घेतला होता. ध्यास हाच श्वास बनला होता. प्रत्येकाचं असंच घडत असावं. 

          डिग्री हातात आली रे आली कि घरातल्यांना लगेच त्याची उपयोगिता हवी असते. मला योगायोगाने नोकरी मिळाली होती. हा योग कसा आला हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं असतं. योगा शिकल्यामुळे माझ्या नोकरीचा योग जुळून आला होता. 

          इतर महत्त्वाच्या प्रमाणपत्रांना योगप्रवेश परीक्षा प्रमाणपत्राने प्रभावित केले होते. माझे पारडे जड झाले होते. कुणाचीही ओळख नसताना व एकही रुपया खर्च न करता मला मिळालेली नोकरी म्हणूनच बहुमोलाची होती. ती सोडताना मीच माझ्या पायावर भला मोठा दगड मारुन घेत होतो. डोक्यातही विचारांचे हातोडे बसत होते. रत्नागिरीतील खाजगी नोकरी सोडून जिल्हा परिषदेत रुजू झालो होतो. तिथेही चांगलाच जम बसत असताना पुन्हा सिंधुदुर्गात येण्याची ओढ लागली होती. आपल्या जिल्ह्यात नोकरी करण्याची कल्पना मनात जोर धरत होती. आई , बाबा , भावंडे सतत जवळ असावीशी वाटत होती. या सर्वांच्या मनासारखे झाले होते. पुन्हा एकदा कोकण निवड मंडळाच्या परीक्षेत पास झालो होतो. 

          मुलाखत झाल्यानंतर यादीत नाव आल्याचे पाहून जिंकल्याचे समाधान वाटले होते. शेवटी रत्नागिरी जिल्हा परिषदेला रितसर राम राम ठोकला होता. इकडे यावेसे वाटत होतेच. पण तिथूनही निघावेसे वाटत नव्हते. 

          प्रत्येक ठिकाणी आपण आपले अस्तित्व निर्माण करीत असतो. आता मला पुन्हा ते निर्माण करायचे होते. २९ जून १९९८ या दिवशी मी खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका विकासगटात हजर झालो. शाळेत दुसऱ्या दिवशी हजर झाल्यामुळे ३० जून हिच तारीख माझी अखंड नोकरीची सुरुवातीची तारीख ( अनोसुता ) ठरली होती. आज या दिवसाला चोवीस वर्षांचा प्रदिर्घ कालावधी उलटून गेला आहे. 

          आज मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. बदलीसंदर्भात माहिती भरत होतो. ती भरताना माझ्या लक्षात आले होते कि आज मला चोवीस वर्षे झाली होती. माझी मलाच कमाल वाटली होती. दोन तपे कधीच कापरासारखी उडून गेल्यासारखी वाटली होती. 

          मला मिळालेली दुर्गम भागातील पहिली शाळा आता सुगम क्षेत्रात आली होती. पती पत्नी मिळून एकत्र राहता यावे म्हणून दुसरी शाळा बदलीसाठी मागितली होती. तिथे असताना पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे तिसरी शाळा जवळची म्हणून हजर झालो होतो. या शाळेत जाण्यासाठी मळ्यातून उंचसखल वाटा तुडवित जावे लागत होते. पावसात चिखलमय वाटेतून जाताना गुडघ्यापर्यंत पाय चिखलातून वर काढावे लागत होते. तिथूनही बदलीने निघालो होतो तो थेट साठ किलोमीटर अंतरावरच्या शाळेत. पदवीधर शिक्षक प्रमोशन स्विकारले होते ना ? वरच्या वर्गांना शिकवण्याची भारी हौस होती !!! सात वर्षे तीही हौस पूर्ण करुन घेतली होती. पटसंख्या कमी झाल्यामुळे एक चांगली शाळा सोडताना जीव रडवेला झाला होता. 

          आज आता सध्याच्या शाळेत काम करत असताना खूप उत्साहाने काम करण्याचा आनंद घेतो आहे. चोवीस वर्षांत कित्येक शिक्षक भेटले , कित्येक पालक भेटले , कित्येक विद्यार्थी भेटले , या सर्वांच्या आठवणी कधीतरी नक्कीच येतात तेव्हा खूप बरे वाटते. 

          सर्वच ठिकाणी मला जिवापाड प्रेम करणारी माणसे भेटली आहेत. पुढेही अशीच चांगली माणसं भेटत राहतील. पुढच्या शाळेत जातो तशा मागच्या शाळेच्या आठवणी थोड्याशा पुसट होत गेल्या असतीलही. तरीही मी काहीतरी निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे हा भावच मला पुढेही निरंतर कार्य करण्याची प्रेरणा देत राहतो आहे याचा आनंद बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसासारखा कोसळतो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली.



Wednesday, June 29, 2022

🛑 दातृत्व माऊलीचे

 🛑 दातृत्व माऊलीचे

          देणे हा देवाचा गुण आहे असे म्हटले जाते. राखून ठेवतो तो राक्षस. लहानपणी पुस्तकात एक धडा होता. देतो तो देव. आपल्याकडे जे चांगलं आहे ते देत राहता आलं पाहिजे. ज्ञानसुद्धा दिल्यानेच वाढत राहते. ते दिल्यामुळे अजिबात कमी होत नाही. 

          इतर गोष्टींना सुद्धा हा नियम लागू पडतो. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात , " देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे , घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे " याचा अन्वयार्थ आपण समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाने कायम देत राहण्यासाठी तत्पर असायला हवे. 

          आपण जे देत असतो तेच आपल्याला बुमरँग होऊन परत मिळत असते. म्हणून कायम चांगले देण्याचा प्रयत्न असावा. त्यात स्वार्थाची भावना असू नये. मला यातून काहीतरी मिळणार आहे असा स्वार्थ बाळगणे चुकीचे आहे. समाधानाचा निर्मळ स्वार्थ जरुर असावा. देताना घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर येणारे कृतज्ञतेचे भावच आपल्याला परमसुख मिळवून देतात. 

          दानत असली पाहिजे. दातृत्वातून सेवाभाव फुलत जातो. गरजूंना दान करण्याची इच्छा निर्माण झाली की आपल्या हाताने दान करत राहावे. काही लोक असंही दान करतात की त्यांचं दान या हाताचं त्या हाताला समजत नाही. 

          गाडगेबाबांना स्वच्छतेची आवड होती. त्यांना लोक भेटवस्तू आणून देत. या भेटवस्तू गरजूंना देऊन ते आपल्या घराची स्वच्छता करत. आपले घर स्वच्छ झाल्यानंतर ते म्हणत , " आता कसे मस्त स्वच्छ झाले घर !! " सध्या आपण आपल्या घरात अनेक वस्तू भरभरून आणून ठेवतो आणि जणू त्याचे प्रदर्शनच घडवत असतो. खरंच या एवढया महागड्या वस्तूंची गरज असते का ? आता घराला पुन्हा एकदा जुना टच देण्याची गरज निर्माण होऊ पाहते आहे. कारण जुने ते सोने होते. जुने तेच आरोग्यदायक होते. चुलीवरच्या जेवणाची चव फाईव्ह स्टारला येत नाही हेच खरे.

          शिडवणे माऊली वारकरी संप्रदाय मंडळाने वंचित राहिलेल्या प्राथमिक शाळेतील मुलांना मोफत गणवेशांचे वाटप केले याचे म्हणूनच कौतुक करावेसे वाटते. मंडळाने या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये ' विठू माऊली ' पाहिली असावी. माऊलीच्या तीन अक्षरांची फोड केली तर तीन शब्द बनतात. माता , उमाळा आणि लीनता. या तिन्ही गुणांना आपलेसे करत मंडळानं आपलं सेवाव्रत पुढे अव्याहत सुरु ठेवावे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला शिकवणारी संस्कृती जोपासताना त्यांनी आमच्या बालचमुला दिलेली ही भेट उबदार शालीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हा गणवेश घालून रुबाबात आपल्या शाळेची वाट चालताना मुलांनीही माऊलीचा सतत आदर करत राहायला हवा. देण्याचे व्रत स्वीकारायला हवे. आज आपल्याला मिळाले आहे , उद्या आपण मोठे झाल्यावर अशीच दानशूरता दाखवणार आहोत. तळागाळातील गरजू आणि होतकरुंना ऐन गरज असताना दिलेली अशी वस्तूरुप भेट म्हणूनच नक्कीच अविस्मरणीय ठरेल यात अजिबात शंका वाटण्याचे कारण नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली






Tuesday, June 28, 2022

🛑 भेटला विठ्ठल माझा

 🛑 भेटला विठ्ठल माझा

          हल्लीच एक चित्रपट बघितला होता. त्यातलं एक गाणं माझ्या ओठी आलं होतं. एखादा चित्रपट बघितल्यानंतर माझं असंच होतं.त्यातलं एखादं भावलेलं आणि आवडलेलं गाणं आपसूक माझ्या मुखातून बाहेर पडायला लागतं. गाणं म्हणणं आणि ऐकणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचा सगळा ताण कुठल्या कुठे विसरुन जाता. 

          मी अर्जित रजेवर होतो. मला थोडे बरे वाटत नव्हते. प्रत्येकाला काहीतरी हायदुख पायदुख असतेच. शाळा सुरु झाली होती.मला नाईलाजाने रजा घ्यावी लागली होती. मला बरे नाही म्हणून मी माझ्यावरच चिडत होतो. अर्थात असं स्वतःवर चिडणं ही चांगली गोष्ट नव्हतीच. गाण्यामुळे या चिडण्याची तीव्रता थोडी कमी झाली होती. 

          माझे बरे नाही असे समजल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून , फोन करुन तब्येतीची चौकशी केली होती. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगून मीही कंटाळलो होतो. व्हाट्सएपच्या भरलेल्या संदेशांना बघून त्यांना रिप्लाय द्यायचाही वैतागच वाटत होता. बिचाऱ्या आपल्या माणसांनी आपली चौकशी केली ही माझ्यासाठी नवी गोष्ट नव्हती. ही सगळी माणसे मला सतत फोन करुन , प्रत्यक्ष भेटून दिलासा देतात त्यामुळेही मी लवकर बरा होण्याची जास्त शक्यता असते. सर्वांचे आशिर्वाद पाठीशी असले की देवच पाठीशी असल्यासारखे असते. 

          माझे विद्यार्थी माझी वाट बघत असतील ही कल्पनाच मला जास्त त्रास देत होती. नुकतीच शाळा सुरु झाली आहे आणि मी रजेवर आहे ही मला न पटणारी गोष्ट होती. त्यात शिक्षणाचा सेतू बांधायचे काम सुरु होते. माझा सेतू माझ्या शिक्षक बांधवांना बांधावा लागत होता. कधी एकदा मी बरा होतो आणि शाळेत जातो असे मला झाले होते. बाबा , पत्नी आणि भावाचं कुटुंब माझी अतिशय काळजी घेताना दिसत होतं. त्यांच्या या प्रेमामुळे मीही अधिक भावनाशील बनत चाललो होतो. पण काही केल्या शाळा काही डोळ्यासमोरुन हटत नव्हती. एवढी मी शाळेची आणि माझ्या विद्यार्थ्यांची का काळजी करतोय तेच मला समजत नव्हते. त्यामुळे माझा बीपी थोडा इकडे तिकडे होत होता. 

          डॉक्टर उपचार करत असताना त्या भल्यामोठ्या गोळ्या घशाखाली उतरताना दिसत नव्हत्या. ते पथ्याचं खाणं मला चिडवून दाखवताना दिसत होतं. मी बरा होण्यासाठी आटापिटा करत होतो. थोडा फरक पडला तेव्हा कुठे मी मोकळा श्वास घेतला होता. 

          न राहवून शेवटी रजा पूर्ण न भोगताच शाळेत जायला निघालो होतो. आज मला जो आनंद होत होता , त्याचं वर्णन करायला माझ्याकडे खरंच शब्द सापडत नव्हते. वारकरी जसा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जायला निघतो , तसाच काहीसा मी निघालो होतो. 

          गेल्या काही वर्षांपूर्वी शिक्षणाच्या वारीत सहभागी होण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्याच्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होत होता.  

          माझे अनेक विठ्ठल शाळेत माझी वाट बघत असतील या कल्पनेने मी भारावून गेलो होतो. मी माझं दुखणं खुपणं पार विसरुन जात चाललो होतो. त्यात पुन्हा एक गाणं मुखातून बाहेर पडत होतं. " कुणी पाहिला , पाहिला , पाहिला हो , माझा देव कुणी पाहिला ? " गाणं म्हणताना निसर्गात मला सगळीकडेच देवांचा सूक्ष्म भास होऊ लागला होता. माझा मोबाईल खणखणला होता , त्याकडेही मी मुद्दाम दुर्लक्ष करत रस्ता कापत निघालो होतो. शाळेच्या कक्षेत आलो होतो.

          मुले वाट बघतच होती. चार पाच मुले धावतच गाडीकडे आली होती. त्यांनी शाळेची चावी माझ्याकडून घेतली होती. मी त्यांचा चार्ज घेण्याऐवजी त्यांनीच माझा चार्ज घेतला होता. त्यांना बघून माझेही चार्जिंग झाले होते. माझे विठ्ठल मला साक्षात पाहायला मिळाले होते. काही क्षणातच मी आजारी होतो हे पूर्णपणे विसरुन गेलो होतो आणि शिक्षणाच्या वारीत विद्यार्थीरुपी विठ्ठलासंगे हरवून गेलो होतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 18, 2022

🛑 कबचे शंकर : यादवसर

🛑 कबचे शंकर : यादवसर

          काही माणसं एखाद्या क्षेत्रात जातात , तेव्हा त्या क्षेत्राचे सोने करतात. किंबहुना ते क्षेत्रच त्यांची वाट पाहत असावं. ते समोर आले की चैतन्याचा झरा वाहू लागतो. नाराजांवर राज करण्याचं सामर्थ्य अशा थोड्याच निवडक माणसांमध्ये असतं. त्या निवडक माणसांची याद आल्याशिवाय राहत नाही. हे शैक्षणिक दव सतत ओलं ठेवण्याचं महत्कार्य करणारे म्हणूनच दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यांनी समोर यावं आणि तरतरी पेरावी असंच त्यांचं दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणूनच हवंहवंसं वाटत राहतं. 

          हिमालयाच्या निर्जन ठिकाणी  असे शंकर नेहमीच साधना करुन येतात आणि त्यांच्या जटेतून अव्याहत शैक्षणिक गंगा वाहती ठेवतात. म्हणून ते नुसते शंकर नसतात तर ते सर्वांचे शंकरराव असतात. 

          आम्हाला सलग सात दिवस अहोरात्र ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या शंकरराव यादव सरांविषयी मला रास्त अभिमान वाटतो. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या सात दिवसांचं प्रशिक्षण अफलातून केलं होतं. 

          माझी आतापर्यंत अनेक प्रशिक्षणे झाली आहेत. प्रशिक्षणे घ्यायची असतात. ती कोणी देत नसतात. तुम्ही त्यात हिरिरीने भाग घेतलात तरच त्या प्रशिक्षणाचा तुम्ही एक भागच होऊन जाता. सात दिवस यादवसरांनी आम्हांला आमच्या घराचा विसर पडेल अशी वागणूक दिली. सर्व क्षण सुवर्णक्षण बनवले. त्यांच्या सानिध्यात राहताना भीतीही वाटली , पण त्यांच्याबद्दलचा आदर दिवसागणिक अधिकाधिक वाढत जाताना दिसला. ते म्हणजे एक चालतं बोलतं स्काऊटिंग आहेत. 

          यादवसर नेहमीच हसतमुख दिसत होते. नेहमी ' तैयार ' दिसत होते. त्यांनी आपल्या गुणांचा परिचय आपल्या आचरणातून आम्हाला दिला. त्यांनी आमच्यात दुसऱ्यांच्यात स्फूर्ती कशी पेरावी ते शिकवलं. त्यांची बॉडी लँग्वेज भारीच. यादव सरांसारखं एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं हे आमचंच भाग्य म्हणायला हवं. एवढया कमी दिवसांत त्यांनी भरपूर शिकवलं. एकही गोष्ट रिपीट केली नाही. जुन्या गोष्टी नवीन करुन सांगितल्या. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आम्हांला भारावून टाकत असे. त्यांनी बोलायला सुरुवात करावी आणि आम्ही फक्त आ वासून ऐकत राहावं असंच नेहमी घडे. 

          अनेक प्रशिक्षणांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असला तरी प्रत्येक प्रशिक्षण ते नवीन उर्मीने घेतात हे कमाल करण्यासारखं आहे. त्यांना कधी कंटाळा आल्याचे दिसले नाही. त्यांनी नाचून गायलेली आणि आमच्याकडून करुन घेतलेली कृतीगीते कायमच लक्षात राहतील. रंकाळा तलावावर बाहेरील निसर्गात गाणी नाचताना त्यांना त्यांच्या वयाचा विसर पडलेला पाहून आम्हालाही लाजायला व्हायचं. त्यांचं हसणं , लटक्या रागानं बघणं जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे. त्यांच्या हाताखाली कित्येक कबमास्टर शिक्षक घडले आहेत. त्यांच्या हाताखाली शिकणं ही माझ्यासारख्या शिक्षकासाठी पर्वणीच असते. 

          मी शेवटच्या निरोप समारंभात बोलत होतो. मला यादव सरांची भीती वाटत होती. तरीही त्यांच्याकडे बघून उलट माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यांचा तो चेहरा आताही मला दिसतोय. त्यांच्या आयुष्यात कोरोना काळात अत्यंत वाईट घटना घडली होती याचा त्यांनी शेवटपर्यंत उच्चारही केला नव्हता. त्यांच्या परमपत्नीचे कोरोना काळात स्वर्गवासी झाल्याचे ऐकले तेव्हा तर आम्हाला सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला होता. स्वतः दुःखात असणारा हा माणूस दुसऱ्यांना हसवत होता. जीवनात अशी कर्तव्यदक्ष माणसं आहेत म्हणून हे जग उभं आहे. त्यांनी यापुढेही आमच्यासारख्या काहीतरी करु पाहणाऱ्या शिक्षकांना सदैव ज्ञानाचा हा अखंड झरा अव्याहत ठेवावा. त्यांच्या अफाट व्यक्तित्वापुढे माझी ही लेखरुपी गुरुदक्षिणा सागरातील छोट्या थेंबासारखी आहे याची मला जाणीव आहे. तरीही या छोट्या थेंबाने माझ्या आयुष्यात मोठ्या सागराएवढी साहित्यसंपदा निर्माण करु दिली हेही नसे थोडके.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली





Friday, June 17, 2022

🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

 🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

          निकालाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवसाची प्रतिक्षा संपून गेलेली असते. हा निकाल धक्कादायक असू शकतो. तो आपलं जीवन कायमचं बदलवून टाकणाराही असू शकतो. अपेक्षित निकाल लागला नाही तर काहीही विचित्र घटना घडवणारी मुले पाहिली की सुन्न व्हायला होते. 

          निकाल ही फक्त टक्केवारी असते. कमी टक्के गुण मिळवणारे नाराज होण्याची शक्यता असते. त्यांना अपयश मिळाले आहे असे वाटत राहते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून जायचे नसते , उलट अधिक जोमाने प्रयत्नाला लागायचे असते. दहावीच्या पुढे अजून बऱ्याच परीक्षा बाकी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे स्पर्धात्मक युग असले तरी आपण दुसऱ्याशी तुलना करण्याचं सोडून द्या. तुमच्या स्वतःच्या पूर्वीच्या गुणांपेक्षा तुम्ही वरचढ ठरत आहात ना ? मग आणखी काय हवे ? सगळी मुलं ही वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांना सर्वांना एकाच तराजूत तोलणं कितपत शहाणपणाचं आहे ? ह्या तुलनेमुळेच मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होत चाललेला आहे. 

          आपल्या मुलांना अजून खूप जग बघायचे आहे. त्याला ज्याची आवड आहे , तेच त्याला करु द्या. त्याला ज्या ज्ञानाची भूक आहे , ते त्याला खाऊ घाला. तो नक्की पोटभर जेवेल. अर्थात करियर करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींची माहिती करुन देणं हीसुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण कमी पडणार नाही हेही पाहिले पाहिजे. 

          आम्हीही दहावी शिकलो. भरपूर अभ्यास केला. खूप लेखन केले. पाठांतर केले. उपक्रमात भाग घेतला. नेहमी पुढे पुढे राहण्यासाठी कंबर कसून करत राहिलो. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. हुशार मुलांकडे बघत बघत त्यांचे चांगले गुण आत्मसात केले. त्यांच्यातल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या रॅगिंगला बळी पडलो नाही. आम्ही यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला होता. 

          अत्युच्च शिखराचे ध्येय सतत खुणावत होते. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जागेपणीही स्वप्न पाहात होतो. झोपेत तर स्वप्नांची शृंखलाच असे. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला लागत असू.

          रात्री उशिरापर्यंत झोप आली तरी अभ्यास केला होता. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हते. गुगल सर्च नव्हते. पुस्तके वाचूनच उत्तरे शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. क्लास लावले नव्हते. गाईड्स नव्हती. तरीही चांगले गुण प्राप्त करुन पहिल्या तीन नंबरात येण्याचा प्रयत्न असे. केलेले प्रयत्न बऱ्याचदा सफल होत गेले होते. त्यामुळे प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही. 

          दहावीचे आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात हुशार मुले होती. माझ्या वर्गात मी ' वासरात लंगडी गाय ' होतो. माझा अभ्यास बघून माझ्या वर्गाने अभ्यास करायला सुरुवात केली होती. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा अभिमान आहे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी मला केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यांनी मला अभ्यास करायला दिला होता. नंबर आला की त्यांनी माझे पुढे येऊन अभिनंदन केले होते. त्यामुळे माझी जबाबदारी ते अधिकाधिक वाढवत नेत होते. त्यांना एखादे उदाहरण पुन्हा समजावून सांगताना माझे ते अधिक लक्षात राहत होते. त्यांनी मला दिलेला आदर मी कायमच लक्षात ठेवला आहे. 

          कधीतरी ते जुने वर्गमित्र भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. आता त्यांना ओळखणे शक्य नसते. प्रत्येकाची शरीराची ठेवण पुरती बदललेली दिसते आणि खुदकन हसूच येते. मी शिक्षक झालो आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना पाहतो तेव्हा मलाही अत्यानंद होतो. 

          दहावीत भरपूर गुण मिळालेले असतात. तेवढे गुण बारावीत मिळवणे कठीण जाते. पुढे पुढे शिकत जावे तशी गुणांची टक्केवारी खालावत जाते. अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली असते. ती पेलताना ताकद पणाला लावावी लागते. 

          वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. वय निघून गेले की तेही तसेच जाते. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण मग उशीर झालेला असतो. त्यामुळे वाईट विचार मनात डोकावू लागतात. 

          आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवायला हवे. ते सांगेल तसे करु नये. आपण सांगू तसे मनाने आणि देहाने करावे. हे घडेल तेव्हा आपले उत्तीर्ण झालेले आणि अत्युत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल. सर्वांना त्यांच्या पुढील दैदिप्यमान यशासाठी अनंत उदंड शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Tuesday, June 14, 2022

🛑 लेडी कंडक्टर

🛑 लेडी कंडक्टर

          माणसाने कोणता व्यवसाय करावा हे कधी कधी ठरवूनही होत नाही. अपवादात्मक ते बरोबर येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली असली तर हे घडण्याची शक्यता अधिक असते. 

          हल्ली मुली सर्वात पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने काम करता करता त्या कधी पुरुषांच्या पुढे निघून गेल्या हे पुरुषांना समजलेही नसेल. त्यावेळी महिलांची पोलीस भरती सुरु झाली होती. फौजदार बाईसाहेब येणार याचे आम्हालाही आश्चर्य वाटत होते.

          आम्ही डीएडला असताना एका समुहनृत्य स्पर्धेत " आल्या फौजदार बाईसाहेब आल्या " हा पोवाडा नाचून सादर केला होता. त्यात फौजदार बाईसाहेबांची भूमिका गणेश राणे याने केली होती. तो एक जातिवंत कलाकार होता. तो बोलायला उभा राहिला कि त्याचे सर्व अंग बोलते आहे असे वाटे. तो दिसायला सुंदर होता. त्याने मिशी काढली होती. मेकअप केला होता. तो फौजदार बाईंसारखा हुबेहूब दिसू लागला होता. 

          त्यात शाहिराची भूमिका मी केली होती. माझा आवाज बरा लागला होता. आमचा नंबर येईल असे वाटले नव्हते. गाणे आणि नृत्य दोन्ही बाजू चांगल्या झाल्या होत्या. समूहातील सर्वांनी उत्तम सादरीकरण केले होते. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीणच.

          त्या फौजदार बाईंनी केलेला अभिनय अफलातून झाला होता. गणेश खुश झाला होता. कारण तो रंगमंचावर आल्यापासून चैतन्यच घेऊन आला होता. आमच्या गाण्याने आणि नृत्याने अधिक रंगत चढली होती. तो मिशीतल्या मिशीत हसण्यासाठी त्याची मिशीच नव्हती. त्याची परमप्रिय मिशी त्याने त्या सादरीकरणासाठी काढून टाकली होती म्हणजे बघा. त्याला सगळे ' गण्या ' म्हणत. त्याच्या तोंडी ' झामू ' हे नाव सतत येई. त्यामुळे नंतर नंतर त्यालाच सगळे ' झामू ' म्हणू लागले. तो ज्वाली होता. तो अभ्यासात हुशार होता. एकपाठी होता. एकदा ऐकले , वाचले की ते त्याच्या डोक्यात कायमचे राहत असे. त्याचे बोलणे मुलांनाच नव्हे तर मुलींनाही आकर्षित करत असे. तो त्यांच्या नातेवाईकांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. तो आता मुंबईतील एका मोठया शाळेत शिक्षक आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. समुहनृत्य स्पर्धेत आमचा प्रथम क्रमांक आला होता , तेव्हा तो पडद्यामागे जबरदस्त नाचला होता. 

          तेव्हापासून आमचा महिला अधिकारी , कर्मचारी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत गेला. महिला वर्ग आपली जबाबदारी पार पाडताना त्यांची किती गडबड होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. कारण घरी गेल्यानंतर त्यांना परत गृहिणी ही भूमिका पार पाडायची असते. 

          रेड बसने प्रवास करत होतो. रेड बस म्हणजे आपली लालपरी. लालपरी म्हणजे आपली एसटी हो. त्यात दोन लेडी कंडक्टर बसल्या होत्या. त्यांचा काम करण्याचा उत्साह पुरुषांना लाजवणारा होता. प्रत्येक नवीन पॅसेंजरच्या जवळ जाऊन तिकीट काढताना , त्यांना उरलेले पैसे परत देताना त्यांचे वागणे बोलणे कोणालाही आवडेल असेच होते. 

          महिलांनी या क्षेत्रात ठेवलेले हे पाऊल थक्क करणारे आहे. त्या लेडी कंडक्टर आहेत म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीत कमतरता दाखवलेली नव्हती. माझ्या कणकवली ते रत्नागिरीपर्यंतच्या तीन तासांच्या प्रवासात त्या कोणावरही चिडलेल्या दिसल्या नाहीत कि नाराज दिसल्या नाहीत. त्यांनी हसतमुखाने केलेले काम रेड बसला प्रफुल्लित करुन टाकीत होते.

          त्यांनी ' लेडी कंडक्टर ' चा व्यवसाय स्वीकारला आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या या महिला सावित्रीचा आणि सावित्रीबाईंचा हा वसा असाच पुढे चालू ठेवतील यांत अजिबात शंका वाटत नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Monday, June 13, 2022

🛑 तेरा जून मेरा

🛑 तेरा जून मेरा

          तारखा खूप महत्त्वाच्या असतात. त्या लक्षात राहतात. आपल्या आयुष्यात काही तारखांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या काही केल्या विसरता येत नाहीत. कधी ते दिन होऊन येतात , कधी दीन ? कधी सुखमय आठवणींचा पुष्पगुच्छ घेऊन येतात , कधी दुःखमय काटेरी निवडुंग. या तारखा दररोज नवीन होऊन येत राहतात , त्या आपली पाठ सोडत नाहीत. 

          तेरा जून दोन हजार. माझ्या लग्नाची तारीख मी विसरणे कठीण आहे. माझ्या आनंदाचा बहरलेला गुलमोहर म्हणजे ही तारीख. आज माझ्या आयुष्यात मला एक मैत्रिण मिळाली होती. आयुष्यभरासाठी साथ देणारी. 

          लग्नाचा दिवस उजाडला होता. माझी आणि तिची ओळख नव्हतीच. जुन्या पद्धतीने पसंतीने लग्न ठरवले होते. लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत एकदाही संवाद झाला नव्हता. त्यावेळी साधे फोन होते. माझ्या आणि तिच्या घरी फोन नावाचं यंत्र नव्हतं. शेजाऱ्यांकडे फोन करावा लागे. 

          एकदा मी तिथे फोन केला होता. तिकडून फोनवर ती आली. मला काय बोलायचे ते सुचेना. मी आणि तीही तशीच. शेवटी नंतर फोन करतो असे म्हणून मीच फोन ठेवला. पुन्हा एकदा असाच फोन केला तेव्हाही तसेच काहीसे झाले होते. मग तीच म्हणाली होती , " तुम्हाला काय बोलायचे असेल ते लग्नानंतरच बोला. आता फोन ठेवा. " असे म्हणत ती अशी खळखळून हसली होती कि तो आवाज माझ्या कानात अजूनही घुमतो आहे. 

          मी काळा आणि ती गोरी गोरी पान होती. त्यामुळे अनेकांना आमचे जोडे विजोड वाटल्यास तो त्यांचा दोष नव्हताच मुळी. माझे अनेक मित्र लग्नाला आले होते. ते अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्याचे कारण समजत नव्हते. मी आपला घामाघूम झालो होतो. ती माझ्या अगदी जवळ बसली होती. मला तशी सवय नव्हती. मी पुरता गांगरून गेलो होतो. आताच्या नवऱ्यामुलांकडे पाहतो , त्यावेळी मला माझेच हसू येते. आताचे वर वधू खूप सराईत झाले आहेत. त्यांच्या व्हाट्सअँपच्या मैत्रीचे रूपांतर कधीही लग्नात होऊ शकेल याची गॅरंटी देता येते. पण त्यांचे हे आकर्षण लवकरच संपून त्यांचे ब्रेकअप किंवा डिव्होर्स होताना पाहून या तकलादू प्रेमाविषयी राग करावासा वाटतो. प्रेम म्हणजे एक पवित्र गोष्ट आहे. प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नसते , ते आयुष्यभराची साथ असते. 

          माझ्या डोक्यावर तेव्हा थोडेसे केस होते. आता ते शोधावे लागतात. माझ्या अशा डोक्यावर फेटा टोपी घातली होती. ती थोडी सैल बसत होती. त्या टोपीमुळे माझा एक कान दुमडला गेला होता. त्यामुळे मी विचित्र दिसत होतो. माझे मित्र का हसत होते ते मला माझे फोटो बघितल्यावर कळले. पण आता नाईलाज होता. मी फोटो इडिट करु शकत नव्हतो. बायकोचे सगळे फोटो मस्तच आले होते. 

          आज मी ते फोटो पाहतो तेव्हा माझे मलाच हसू येते. माझ्या अनेक मित्रांचे , नातेवाईकांचे फोटो मी जपून ठेवले आहेत. त्यातली अनेक माणसे आता हयात नाहीत. माझे सासरे गेले , आई गेली , आजी गेली , आत्ये गेली , काका गेले आणि माझी बायकोही गेली. त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या प्रतिमा आठवणी कधीतरी बघून डोळ्यांत पाणी येईपर्यंत पाहत राहण्याची माझी सवय काहीकेल्या जात नाही त्याला मी तरी काय करणार ? 

          कोणतीही माणसं आपल्याला जन्माला पुरत नाहीत , त्या पुरवाव्या लागण्यासाठी अशा सवयी लावून घ्याव्या लागतात. माझ्यावर झालेले संस्कार मला तसं करायला भाग पाडतात. मी तसाच आहे , जसा असायला हवा. 

          आज मी ऐश्वर्या गेली असे मानत नाही , ती ईश्वरीच्या नव्या रुपाने माझ्या जीवनात पुन्हा आली आहे असे मानतो. आज मी तिला गजरा आणून दिला आठवणीने. तिला तो तिच्याइतकाच खूप आवडला. 

          बायकांना बाकी काही नको असते. त्यांना आपल्या नवऱ्याचे निर्मळ प्रेम हवे असते. त्यात कुणीही भागीदार असल्याचे त्यांना अजिबात आवडत नाही. आपला नवरा ही आपलीच सुंदर भेट आहे अशी त्यांची भावना असते आणि ती असायलाच हवी. असे निरागस प्रेम करणाऱ्या पत्नी मग सावित्री ठरतात. आपल्या सत्यवानाचे गेलेले प्राण आणणाऱ्या सावित्रीला म्हणूनच श्रेष्ठ मानले जाते. माझ्यासाठी ऐश्वर्या आणि ईश्वरी दोन्ही सावित्रीच आहेत.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...