Sunday, June 12, 2022

🛑 रस्त्यातले देव

🛑 रस्त्यातले देव

          हल्ली देवांची संख्या बरीच वाढली आहे. कारण माणसांची संख्या वाढली आहे. एवढ्या सगळ्या माणसांना देव पुरायला हवेत म्हणून की काय देवांची संख्या माणसांनी वाढवली असावी. 

          संत गाडगेबाबा म्हणतात , " माणसांत देव पाहा. " आपण जर माणसा माणसात देव शोधत राहिलो तर देवांची संख्या दर चार सेकंदाला वाढत जाईल. 

          आपण जेव्हा प्रवासाला निघतो , तेव्हा रस्त्यावर पाच पाच मिनिटांच्या अंतरावर देव सापडतात. आपण त्यांना गाडीतूनच नमस्कार करतो. हे देव म्हणजे जणू गतिरोधक आहेत. कारण त्यामुळे आपण आपल्या गाडीचा वेग कमी करतो. थोडा वेळ थांबून नमस्कार करतो. देवाशी एकाग्र होतो. पुन्हा निघतो. काही वेळानंतर आपण जातोय त्याच रस्त्यात एखादा मोठा अपघात झाल्याचे पाहायला मिळते. आपण त्यात सापडणार असतो , पण रस्त्यातील देवाला नमस्कार करण्यासाठी थांबल्यामुळे आपण अपघातात सापडलो नाही याबद्दल देवाचे आभार मानत राहतो. काळ आलेला असतो , पण वेळ आलेली नसते. 

          रस्त्यातले देव म्हणूनच आवश्यक वाटतात. मी काही क्षणांसाठी थांबतो आणि नमस्कार करुनच पुढे निघतो. 

          शाळेत जाताना मला असे अनेक देव सतत भेटले आहेत. ते मला भेटले. मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी मनोमन संवाद साधून पुढे निघणे एवढेच मला जमले. तिथल्या कुणीतरी दिलेला खोबऱ्याचा प्रसाद चावत पुढे निघेपर्यंत पुढचा देव भेटतोच. धडधाकट असलेले दोन हात फक्त जोडायचे असतात. बाकी काहीच करायचे नसते. हे देव आपल्या पाठीशी आहेत एवढी भावनाच तुम्हाला सुखरुप ठेवत असते. माझा तसा अनुभव आहे. 

          फोंडा रस्त्याला ' पाचोबा ' देव भेटतो. मग माझा जप सुरु होतो. " पाचोबा , पाचोबा , पाचोबा , माझा देव आहे पाचोबा " हाच जप मनापासून करत पुढचा प्रवास सुखरुप करत आलो आहे. तळेरे रस्त्याला ' कोळंबा ' देव भेटतो. त्याचाही जप असाच करत पुढे पुढे जायचे असते. वाटेत मंदिरे उभी असतात. गाडी सुरु असतानाच आपला एक हात मुजऱ्यासारखा नतमस्तक होतो. ती एक सवयच जडली आहे. 

          शाळेत चालत जायचो तेव्हा वाटेत गढिताम्हाण्याचा गणेश वड भेटत असे. " गणेश स्तोत्र ' म्हणत वंदन करुनच पुढे पाय वळत असत.  पायातल्या वहाणा आपोआप पायातून निघतात. नमस्कार केलाच जातो. 

          आमच्या गावी जाताना वाटेत परदेशी गांगो , एडदोबा , पावणादेवी , टोकयोदेव , कोसंबी महापुरुष यांचे दर्शन घडते.  निसर्गातील प्रत्येक ठिकाणी असे माणसाने बसवलेले देव , देवी थांबवतात. त्यामुळे आपल्या जीवनातील काही क्षण भक्तिमय बनतात. त्यामुळे मानसिक दृष्टीने आपण शक्तिमान बनत राहतो. 

          आपला एखादा अपघात घडतो. तेव्हा काही माणसे आपणांस मदत करायला धावून येतात. हे सुद्धा रस्त्यातले देवच आहेत. मी अनेकदा गाडीवरुन पडलो असेन. प्रत्येकवेळी माणसाचे रुप घेऊन हे रस्त्यातले देव मला मदत करायला , उचलायला धावून आलेले आहेत. 

          माझ्या गाडीचा वेग जास्त असतो असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. हे सगळेजण मला ' गाडी सावकाश चालवा ' असे सांगत असतात. मी काळजीपूर्वक गाडी चालवत असतो. समोरचा नीट आला नाही तर मला त्यांच्याकडेही लक्ष द्यायचे असते. सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. आता तर मला जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. पण माझे हे ' रस्त्यातले देव '  आहेत म्हणून मी निर्धास्त आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 11, 2022

🛑 ताटारो

🛑 ताटारो

          माणसं जशी माणसांवर प्रेम करतात , तशी वस्तूंवर प्रेम करतात. सतत वापरावयाच्या वस्तू आपल्या प्रिय होऊन जातात. त्यावर आपला जणू जीवच जडत असावा. ती वस्तू दिसली नाही तर त्यांच्या जीवाचा आटापिटा होईल. एवढे प्रेम कुठून येते ? निर्जीव वस्तूत जीव अडकवून आपण आपलं समाधान करुन घेत असतो का ? 

          गृहिणीचा जीव स्वयंपाकघरात असलेल्या भांड्यांवर असतो. कारभाऱ्याचा जीव घरातल्या इतर निर्जीव वस्तूंवर असतो. मग हळूहळू त्यांचा जीव जमिनीवर , घरावर आणि घरातल्या डेडस्टॉकवर कधी जडू लागतो ते त्यांनाच कळत नाही. 

          आमच्या लहानपणी शाळेत जाणारी आम्ही पाचजणं होतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला छत्री हवी असे. पावसाळा आला की छत्री किंवा रेनकोटसाठी आमच्या मागण्या वाढत असत. एका छत्रीत दोन दोन भावंडे शाळेत जाताना मजा येई. दोघांच्याही एक एक बाह्या भिजून जात. शाळेपासून जवळ खोली असली तर एवढा त्रास होत नसे. त्यावेळी आम्हांला तो त्रासच वाटत नसे. आता बारीकसारीक गोष्टीत त्रास का जाणवतो हा सुद्धा सतत भेडसावणारा प्रश्नच आहे. त्यावेळीच्या त्रासाचा बाऊ होत नसे. आता मात्र जरा त्रास झाला की आकांडतांडव होऊ लागते. 

          छत्र्यांवर नावे लिहिण्याचे काम मी करायचो. शाळेतून आलो की कोणाच्या छत्र्या आल्यात का बघायचो. त्यावेळी छत्रीवर नाव लिहून दिले की एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त पाच रुपये मिळत. हे पैसे आम्हाला वह्या घेण्यासाठी उपयोगी पडत. आमच्या सलूनमध्ये येणारी आमची गिऱ्हाईके चांगली होती. मला पैसे मिळावेत म्हणून ती आपल्या जुन्या छत्र्यांवरदेखील नावे लिहून घेत. मला दिवसाला शाळा करुन चौदा पंधरा रुपये मिळत. 

          माझे अक्षर पाहून लोक मला शाबासकी देत. त्यांचा प्रेमाचा दृष्टीक्षेप आम्हाला प्रेरणा देत राही. आम्ही त्यांच्यामुळे घडलो हे सांगताना मला आणखीच अभिमान वाटत आहे.

          दरवर्षी आम्हांला नव्या छत्र्या मिळण्याची शक्यता असे. एखादी चांगली छत्री दोन वर्षे वापरुनही बाद होत नसे. कदाचित त्यावेळच्या छत्र्या मजबूत असाव्यात. मला रंगीबेरंगी छत्री आवडे. पण ती लेडीजने वापरायची असते असे सांगण्यात येई. त्यामुळे आमची छत्री नेहमी काळी आणि काळीच असे. 

          पूर्वी इंग्रजी जे आकाराच्या दांड्याच्या छत्र्या टिकाऊ असत. त्या सुद्धा आम्ही वापरत असू. एकावेळी तीन व्यक्तीसुद्धा त्यात सहज मावत. धोतरवाल्या आजोबांच्या हातात ही छत्री कायमची असे. अजूनही बाजारात अशा छत्र्या मिळतात. सध्या अशा छत्र्या वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. 

          आमच्या घरात त्यावेळी अशा दोन छत्र्या होत्या. एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. आईची छत्री जास्त वापरली जात नसे. त्यामुळे तिचे आयुष्य वाढत राही. पाच पेक्षा जास्त वर्षे एकच एक छत्री आईने वापरली असेल. 

          बाबांना त्यांची छत्री परमप्रिय होती. ते ती कोणालाही देत नसत. त्या छत्रीचा खूपच वापर होत असे. त्यामुळे ती वापरुन वापरुन जीर्ण झाली होती. डॉक्टर उपचार करुन किंवा प्रथमोपचार करुन बाबा ती नेहमी ठिकठाक करुन वापरत असत. कितीही काहीही केले तरी ती जुनी ती जुनीच असे. तिच्यावर बाबांचे निरतिशय प्रेम होते. तिला त्यांनी एक नाव ठेवले होते. त्या छत्रीला ते ' ताटारो ' असे म्हणत. या ताटाऱ्याने बाबांना नेहमी इमानेइतबारे सुके ठेवले. आता बाबांकडे बटन असलेली छत्री आहे. पण त्यांचे त्या ताटाऱ्यावरील प्रेम काही अजूनही कमी झालेले नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



🛑 ती बोलते

🛑 ती बोलते

          माणसं कसली कसली व्यसनं करतात याची मोठी यादी होऊ शकते. चांगल्या गोष्टींची व्यसनं असणं नक्कीच चांगलं. सतत एखादी गोष्ट करण्याची आवड सवयीत बदलून जाते. काही माणसं ह्या सवयी मुद्दाम लावून घेतात. चांगल्या सवयी लागणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचं संस्कारात रुपांतर होत असतं. ह्या सवयी सतत कराव्याशा वाटत राहतात. 

          आधी सवय आकर्षित करते. ती सवय होऊ लागते. मग आपण त्या सवयीचे गुलाम होत जातो. सवय लागणं ही दैनंदिन गोष्ट आहे , पण त्या सवयीचा गुलाम होणं ही हानिकारक गोष्ट आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्याचे परिणाम भोगावेच लागतात. 

          त्या दिवशी मी रत्नागिरीला जाण्यासाठी निघालो होतो. सकाळी लवकरची बस होती. मी अर्धा तास आधीच स्थानकात पोहोचलो. स्थानकात पंचवीस तीसपेक्षा जास्त प्रवासी गाडीची वाट पाहत असावेत. मीही त्या प्रतिक्षेत सामील झालो. मी बाकड्यावर बसलो. मागून मोबाईलवर बोलल्यासारखा आवाज आला. मी हळूच मागे वळून पाहिले. एक माणूस बोलत होता. मी त्याला अधिक निरखून पाहिले. तो मोबाईलवर बोलत नव्हता. तो एकटाच बोलत होता. माझे त्याच्या बोलण्याकडे जास्तच लक्ष जाऊ लागले. त्याने थोडी घेतली असावी असा मला संशय आला. तो सलग बोलत होता. तो बोलता बोलता सतत जागा बदलत होता. त्याचे कुणाशीतरी भांडण चालू होते. तो समोर नसलेल्या माणसावर चरफडत होता. तो बरळत होता. त्याच्या मनाचा ताबा सुटला असावा. शेजारी इतकी माणसं असताना त्याचे त्याला अजिबात भान नव्हते. त्याने जे पेय घेतले होते , त्याचा तीव्र असर त्याच्यावर झालेला कोणाच्याही लक्षात आला असता. मला त्याची कीव येत होती. तो एक चांगला माणूस दिसत होता. पण त्याला लागलेले व्यसन वाईट होते. त्या व्यसनाचा तो गुलाम झाला होता. त्या एकच प्याल्याने त्यालाच पुरते पिऊन टाकले होते. त्याचे बरळणे अजिबात थांबता थांबत नव्हते. 

          तो दोन तीन माणसांची नावे सतत घेत होता. ती माणसे त्याला त्रास देणारी असावीत. तो आता मानसिक झाला होता. त्याला जे बोलायचे होते , ते तो ओकल्यासारखा बोलतच होता. त्यामुळे त्याला शांत वाटत होते का ? मला समजत नव्हते. मला वाटतं तो बोलतच नव्हता , त्याने घेतलेली ' ती ' मदिरा बोलत होती. त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं दिसत होतं. त्या मदिरेने त्याच्या जीवनाचे तीन तेरा वाजवले होते. 

          तेवढ्यात रत्नागिरी गाडी लागली होती. मी गाडीत जाऊन बसलो होतो आणि विचार करत राहिलो होतो. अधूनमधून मोबाईलची नोटिफिकेशन्स माझ्या विचारांची शृंखला तोडू पाहात होती. अनेक विचार एकमेकांत मिसळून जात होते. 

          पुढे मी प्रवासात रमून गेलो होतो. फोन येत होते , मेसेज सुरु होते. त्या ' मदिराप्रेमी ' ला कधीच विसरुन गेलो होतो. 

          अचानक एक फोन आला. त्यावर एक लहान मुलगी बोलत होती. तिने आपले नाव परी सांगितले. मी ऐकतच राहिलो. ती बोलत होती , " मामा , मी परी बोलतेय , माझे पप्पा माझ्या मम्मीकडे पिण्यासाठी पैसे मागताहेत.  " मी उडालोच. मी तिला सांगितले , " बाळा , तुझ्या पप्पांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , पण मी काहीही करु शकत नाही याचे मला वाईट वाटते. " 

          एका छोट्या मुलीने आपल्या वडिलांच्या व्यसनाबद्दल मामाला फोन करावा आणि मामाला काहीही करता येऊ नये याचे दुःख मला सतत राहणार होते. मी फोन ठेवला आणि तिच्या पप्पांशी बोललेला संवाद आठवण्याचा प्रयत्न केला. हा माणूस " मला एकदा संधी द्या , माझी चूक झाली , मी आता नक्की सुधारणार " असं बोलून गेला होता. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नव्हते. 

          अशा पिणाऱ्या माणसांच्या घरात मुले कशी जगत असतील ? वडिलांचे असले अवतार बघून त्यांच्या बालमनावर किती दुष्परिणाम होत असतील याची कल्पनाच मला सहन होत नव्हती. यांच्या बायकांवर होत असलेले अन्याय त्या कशा सहन करत असतील ? हे बळ त्यांच्याकडे कुठून येते ? प्यायलेली उतरली की या माणसांना पश्चात्ताप होतो. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी असाच अनुभव भोगावा लागतो. 

          घर हे मंदिर असते. पण या मदिरेने घरमंदिराला उद्ध्वस्त केलेले असते. अशी कित्येक घरे या मदिरेपायी दररोज यमयातना सोसत जगत असतील देव जाणे. 

          मी परत यायला निघालो होतो. विचारांचं काहूर सुरुच होतं. या माणसाचं काय करावं याचाही विचार येतच होता. तेवढ्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. पावसाच्या पाण्याचे तुषार मस्त वाटत होते. मी खुश झालो होतो. आता मस्त प्रवास होणार असे वाटत होते. 

          खूप मोठा पाऊस मला भिजवू पाहत होता. सर्वांनी खिडक्या बंद करुन घेतल्या होत्या. आता आतले कोंदटलेले वास यायला लागले होते. माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी ' मदिराधीन ' बसला होता. त्याने आपले पिण्याचे काम सुरु केले होते. माझ्या नाकात तो दर्प जात होता. मला आता ओकारी येईल असे वाटत होते. अधूनमधून खिडकी उघडून मी तो घाणेरडा वास बाहेर घालवण्याचा प्रयत्न सुरु केला होता. बाहेरचा वारा आला की मला हायसे वाटत होते. पण बाहेरच्या पावसाने उधाण मांडले होते. तो मला जास्त भिजवू लागला होता. मला आता या प्रवासाचा वैताग आला होता. माझ्या सोबत इतरांना याचा त्रास होतच असेल ना ? पण  कोणीही काहीही करु शकत नव्हते , अगदी मी सुद्धा. तो माणूस अगदी सकाळी भेटलेल्या माणसासारखा बोलत होता. तो फोनवरच बोलत होता. तो प्यायला असला तरी शुद्धीत  असल्याप्रमाणे बोलत होता. मी प्यायलो नसलो तरी लवकरच बेशुद्ध पडेन अशी शक्यता दिसत होती. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Wednesday, June 8, 2022

🛑 अभिनंदन बारावी !!!!

🛑 अभिनंदन बारावी !!!!


          ४ थी पासून १२ वी पर्यंत अनेकविध स्पर्धा , शिष्यवृत्ती परीक्षा आणि बोर्डाच्या दोन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना पार करावयाची उंच उंच शिखरेच आहेत. ही चढताना त्रास होतो. दमायला , थकायला होते. 

          गेल्या दोन वर्षात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन परीक्षांची नव्याने ओळख झाली. मार्कांची टक्केवारी सतत वाढत जाणारी पाहायला मिळाली. काहींना शंभर टक्केच्या वर गुण मिळाले. एवढे गुण आम्ही आमच्या काळात बघितले नव्हते आणि मिळवलेही नव्हते. तेव्हाचा अभ्यासक्रम अवघड होता. काठिण्यपातळी उच्चस्तरीय होती. आता अभ्यासक्रम बराच सोपा असावा. एवढे टक्के गुण मिळतात म्हणून असे वाटून जाते. नाहीतर आजची मुले खूपच हुशार झालेली असावीत. एक काहीतरी नक्कीच असेल. विचार करुन बघा. 

          मराठीत आम्हाला कधीच पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. बारावीत असताना माझे सगळे विषय इंग्रजीतून होते. मराठी आणि जीवशास्त्र या दोन विषयांबद्दल मी इलेक्ट्रॉनिक्स हा दोनशे गुणांचा विषय घेतला होता. तरीही मी बरेचदा जी.ए.सावंत सरांच्या मराठीच्या लेक्चरला थांबत असे. धडससरांच्या बायोलॉजीच्या लेक्चरला थांबण्याचे मी कधीही धाडस केले नाही. हत्तीसर , पारकरसर , नलावडेसर , प्रभुसर यांनी इलेक्ट्रॉनिक्स समजेल असे शिकवले. घोकंपट्टी करत गुण मिळवले. आता मला त्यातले काहीही आठवत नाही. 

          Maths हा माझा सगळ्यात आवडता विषय.महाजन सरांमुळे भरपूर सराव केला. डेरिव्हेटिव्हज , इंटिग्रेशन आणि इलिप्स , हायपरबोला , पॅराबोला यांचे अक्षरशः पीठ पाडले. आता त्यांचा मला काहीच उपयोग होत नाही. साध्या गणिताने माझ्या जीवनाचे गणित पक्के होत गेले.

          इंग्रजीच्या शिंदेसरांनी शेक्सपिअरच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्याही विसरलो आहे. 

          फिजिक्सची खूपच आबाळ झाली. येणारे नवे शिक्षक आम्हांला पाहून घाबरुन निघून गेलेले असत. त्या विषयाचा धसका घेतल्यामुळे त्याचाच अभ्यास जास्त झाला. हे शास्त्र बरेचसे लक्षात राहिले आहे. 

          केमिस्ट्रीचे बाक्रेसर म्हणजे अतिशय कडक. प्रॅक्टिकल व्यवस्थित केले नाही तर पायावर काठी बसलीच म्हणून समजा. अतिशय प्रेमाने समजावून सांगणारे सर. त्यामुळे आमची जीवनाची केमिस्ट्री स्ट्राँग झाली. 

          अजिबात क्लास न करता सतत एका ठिकाणी घरात बसून जो अभ्यास केला तसा पुढे कधी केला असेल असे वाटत नाही. त्यामुळे बारावीत चांगले यश मिळाले. त्यावेळी सायन्समध्ये एकूण 74 टक्के गुण मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. आय आय टी चे स्वप्न बघितले. आय आय टी करता आले नाही. डीएड केले. बीए केले. एम.ए. केले. बीएड केले. प्राथमिक शिक्षक झालो. आता मुलांच्यात माझे स्वप्न पेरण्याचा प्रयत्न करत आहे. कोण कोठे जाईल हे आताच्या गुणांवर अजिबात सांगता येणार नाही. 10 वीत बोर्डात उच्च गुण मिळवणारा झोपडपट्टीत राहणारा मंगेश म्हसकर नावाचा विद्यार्थी आता कुठे असेल माहीत नाही. 

          सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयश आले तरी खचून जाऊ नका. बारावीत भरपूर गुण मिळवलात त्याबद्दल अभिनंदन तुमचं. पण आता तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. चिकाटी सोडू नका. नोकरी मिळेल हा अट्टाहास सोडा , स्वतःच नोकरी देणारं एखादं व्यक्तिमत्त्व बना. शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



🛑 शाळेचा पहिला दिवस

🛑 शाळेचा पहिला दिवस 


          शाळा सर्वांचीच आवडती असावी बहुतेक. कारण सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पहिल्यांदा शाळेची पायरी चढतो. शाळा कधी एकदा सुरु होतेय याची आम्ही अजूनही चातकासारखी वाट पाहतो. चातक पक्षी पहिल्या पावसाचे पाणी प्यायला आतुर झालेला असतो. आम्हीही तसेच शाळेतील ज्ञान प्यायला आतुरच झालेले असतो.

          शाळा सुरु होण्यापूर्वी पंधरा दिवस शाळेत जाण्याच्या तयारीची लगबग सुरु होते. हे प्रत्येकाच्या घरी घडत असेल. आम्ही लहान असताना यापेक्षा मजा यायची. शिक्षक झाल्यामुळे ती मजा तशीच सतत घेता येते आहे याचा आनंद होतो. ही मजा इतरांना अनुभवता येणे शक्य असेल असे मला वाटत नाही. 

          दरवर्षी नवा वर्ग , नवीन इयत्ता , नवी मुले , नवे शिक्षक , नवी पुस्तके , नव्या वह्या , नवी छत्री , नवा रेनकोट , नवी कंपासपेटी , नवे मित्र , नवी पट्टी आणि बरेच नवनवे अनुभवण्याचे क्षण येतच राहतात. त्यांच्याकडे दरवर्षी नवा दृष्टिकोन ठेवून पाहिल्याने नव्या शैक्षणिक वर्षाची लज्जत अधिकाधिक वाढतच राहते. 

          आज जगन भेटेल. मगन भेटेल. नवे अनुभव घेत यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी प्रेरणा मिळत जाईल. हे सगळे घरी सुदधा मिळेल , पण त्यात मजा ती कसली ?  वर्गातील प्रत्यक्ष अनुभवांची चवच न्यारी असते. ती कधीच कुठे येऊ शकणार नाही. 

          काही मुले पहिल्या दिवशी शाळेत जात नसतील , तर ती एका मोठ्या आनंदाला मुकत असतील. सफाई करावी लागेल या भीतीने काही पालक आपल्या मुलांना घरी ठेवतील तर मुलांना पहिला दिवसच अनुभवता येणार नाही. त्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्यक्ष तनाने आणि मनाने उपस्थित राहायलाच हवे.

          मुले मैदान साफ करतात. वर्ग झाडू मारुन लख्ख करतात. घरात कधी एखाद्याने झाडू घेतली नसेल , पण शाळेत मुले एकोप्याने सगळी कामे करतात. येथे समानतेचे धडे मिळतात. घरी नेहमी भरवून घेऊन जेवणारी मुले शाळेत मात्र स्वतःच्या हाताने जेवतात. जे पानात वाढले असेल ते चवीने खातात. त्यांना भूक लागते. हे सर्व शाळेत घडते. 

          स्वच्छतागृहे साफ करणारी मुले पाहिली की त्यांच्या अंगी येत असलेली श्रमप्रतिष्ठा पाहून थक्क व्हायला होते. हे सगळे शिक्षणच आहे. हे करत असताना त्यांना एकात्मतेची जाणीव होत असते.

          पुस्तकात नाक घालून त्याचा वास घेत राहणे , पानफुटीची पाने ठेवणे , जुन्या वह्यांपासून नव्या वह्या बनवणे यांतही अनोखा आनंद असतो. आता तसे होताना दिसत नाही. पूर्वी नवी पुस्तके मिळत नसत आता मिळतात तशी. जुनी पुस्तके वापरत वापरत आम्ही पुढच्या वर्गात गेलो आहोत. ताई आणि आका यांची पुस्तके आम्हांला मिळत. त्यांना वर्तमानपत्रांची कव्हरे घालून आम्ही त्यांना नवी करुन टाकत असू. त्या जुन्या पुस्तकांवर आम्ही नव्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असू. शेजारपाजारी राहणाऱ्या काकांच्या मुलांची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन आम्ही चांगले शिक्षण घेतले आहे. तीच पुस्तके आम्ही चार ते पाच वर्षे हस्तांतरित करत वापरत असू. आताच्या मुलांची सोयच सोय आहे. 

          दरवर्षी नवीन पुस्तकांचा संच मुलांना मिळतो. मोफत गणवेश मिळतात. शालेय पोषण आहार मिळतो. एवढं सगळं मिळतं , तरी शिक्षण घेताना आजच्या मुलांना जड का जातं देव जाणे ? सगळं आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत राहिलेली नाही की काय ? 

          पालक स्वतः कमी शिकलेले असले तरी ते आपल्या मुलांना सगळ्या सोयी देऊ करतात. फक्त मुलांना अभ्यासच करायचा असतो. तोही करताना पालक मदत करतात. क्लास लावतात. आम्हांला कुठे पालकांची अभ्यासात मदत होती ? क्लास तर माहितच नव्हता. तरीही आम्ही अभ्यास केलाच ना ? आजच्या मुलांमध्ये चिकाटी दिसत नाही. ती चंचल होत चालली आहेत. त्यांचे लक्ष विचलित होत राहिल्याने अभ्यासात एकाग्रता दिसत नाही. पाढे पाठ नसतात. कविता पाठ नसतात. त्यापेक्षा त्यांना whats app , यु ट्यूब , स्टेटस , इंस्टाग्राम , फेसबुक हे सगळे माहिती असते. प्रत्येक गोष्टीचे फोटोसेशन करणे त्यांना आवडते. 

          त्यावेळी एका वर्गात तीस चाळीस मुले असत , आता ती एका शाळेत असतात. ग्रामीण भागात उच्चशिक्षित शिक्षकवर्ग आहे. तरीही ग्रामीण भागातील मुले जवळपासच्या शहरी भागातील शाळेत शिकायला जातात. त्यामुळे पटसंख्या रोडावत चालली आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी बघायला मिळते. ही तुडुंब गर्दी ज्यावेळी ग्रामीण भागात बघायला मिळेल तेव्हाच शाळेचा पहिला दिवस अधिक उत्साहवर्धक असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 4, 2022

🛑 उर्मीची ' चंद्रा '

 🛑 उर्मीची ' चंद्रा '

          काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एखादया ठिकाणी जातो. जाताना कुटुंबातील व्यक्ती सोबत असतात. ते एखादे ठिकाण माहेर असले तर बायकोला जो आनंद होतो तो शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. त्या दिवसांत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. त्यांना एखादी रात्र राहायला मिळाले तरी चालते. पण मुक्काम हवाच असतो. बाहेर पडताना नवऱ्यावरचे त्यांचे प्रेम उतू जाते हे मी अनुभवलेले आहे म्हणून सांगू शकतो. इतरांचा अनुभव असाच असेल याची मी खात्री कशी देऊ ? प्रत्येकाचा अनुभव जर असाच असेल तर मात्र ते माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील. 

          माझ्या सासरी पडळी राधानगरीला कालिकादेवीचे एक सुंदर मंदिर बांधले आहे. आम्ही गेलो कि तिचे दर्शन घेतो. यावर्षी कालिका मंदिरात वर्धापन दिन महोत्सव संपन्न होणार होता. हिला तिकडे जायचे मनात होते. हिला म्हणजे बायकोला. तिने माझ्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली होती. मी अवाक झालो होतो. आज काहीतरी मागणी असावी असा मला प्रश्न पडला होता. ती म्हणाली , " कारभारी , रागावणार नसाल तर सांगते , एक सांगू काय ? " मी म्हटले , " एक सांग , दोन सांग , काय ते सांग , आता सांगणारच आहेस तर मला ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. " ती पुढे म्हणालीच , " अहो , मी काय म्हणते , आमच्या तिकडे मंदिरात उत्सव साजरा होणार आहे , आपण जाऊया ना !!! " ती एवढी काकुळतीला आली होती की मला होकार द्यावाच लागला. तिकडे जाईपर्यंत तिचे अपार प्रेम वाढत चाललेले दिसत होते. मी मनातल्या मनात हसत होतो. तिला माझे हसणे समजत असले तरी तिने तिकडे दुर्लक्ष केले होते. ती खूप खुश होती. ती दररोज अशीच खुशीत राहावी असे मला वाटत होते. पण ही खुशी फार काळ टिकली नाही तर त्रास होतो. 

          नुकताच आम्ही कुटुंबासह ' चंद्रमुखी ' हा मराठी चित्रपट पाहिला होता. त्यातील लावणी नृत्ये माझ्या लहानग्या ' उर्मी ' ला अतिशय आवडली होती. घरी येऊन तिने तसेच नृत्य करण्याचा स्वतःहून सराव करत राहिली होती. पाच सहा वर्षांची मुलगी नाचून काय नाचणार असे कोणालाही वाटू शकते. पण उर्मी याला अपवाद होती. तिने दोनच दिवसांत ते गाणे नाचून , गाऊन पाठ करुन टाकले. तिला नाचाची आवड असल्यामुळे आम्ही तिची ही उर्मी थांबवू शकणार नव्हतो. नृत्य दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाशिवाय तिने नृत्यात केलेली प्रगती उल्लेखनीय अशीच होती.

          बायकोने बॅगा भरल्या. आम्ही राधानगरीला निघालो. सोबत मेहुणा आणि त्याची पत्नी होती. प्रवास सुखाचा झाला. सासू सासऱ्यांनी जावयांचे स्वागत केले. बायको खुश होती. तिला खूपच बरे वाटत होते. एवढा प्रवास करुनही ती दमली नव्हती. तिथे गेल्यानंतर तिने भराभर जेवणाची तयारी केली. जेवल्यानंतर कालिकादेवीच्या मंदिरात कार्यक्रम बघायला जायचे होते. 

          कार्यक्रमांना सुरुवात झाली. वाडीतील सर्व कलाकारांनी आधीच आपली सादरीकरणे आयोजकांकडे दिली होती. स्टेजवरील कार्यक्रम पाहून छोट्या ' उर्मी ' ला नाचावेसे वाटले नसेल तरच नवल !! तिने आपल्या मामाला सांगून आपला डान्स सांगितला. रात्रीचे साडे बारा होत आले होते. उर्मीला झोप अनावर झाली होती. आता ती झोपणार म्हणून माझ्या बायकोनेच तिच्या ओळखीने उर्मीचा लवकर नंबर लावला होता. ' स्वानंदी प्रवीण कुबल ' असे नाव मोठ्यांदा पुकारले गेले. उर्मीची आता झोप उडून गेली होती. तिच्या अंगात ' चंद्रा ' संचारली होती. ती धावतच स्टेजवर गेली होती. गाणे सुरु झाले होते. वाद्याच्या तालावर पदविन्यास दाखवत तिने नाचायला सुरुवात केली आणि सर्वांचे डोळे तिच्यावर खिळले होते. ओठांचा अभिनय जसाच्या तसा करत असल्यामुळे जणू तीच गाणं म्हणून नाचत आहे असा भास होत होता. तिने फ्रॉक घातला होता. पदर म्हणून ओढणी घेतली होती. साडी परिधान केली नसली तरी डोक्यावरच्या ओढणीने पदराचे काम केले होते. ओढणीला तिने असे काही बाजूला करत जी अदाकारी दाखवली होती , तिला टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट झाला होता. 

          कार्यक्रम झाल्यानंतर कित्येकांनी दुसऱ्या दिवसापर्यंत तिचे अभिनंदन करणे सुरुच ठेवले होते. कोणीतरी तिला सांगितले की तुझा नंबर आला आहे , तुला ट्रॉफी मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ट्रॉफी मिळणार या एकाच आशेने ती रात्रीच्या सन्मान सोहळ्याला गेली होती. सगळ्यांचे सन्मान झाले होते. आपले नाव आता येईल , मग येईल असे म्हणत असताना ती माझ्या मांडीवर गाढ झोपेच्या अधीन झाली होती. तिला खूप उशिरा जाग आली होती. तिने झोपेतच मला विचारले होते , " पप्पा , माझी ट्रॉफी मिळाली काय ? " मी तिला एवढेच बोललो , " तुझी ट्रॉफी त्यांच्याकडून हरवली आहे , ती सापडली की नक्की मिळेल. " उर्मी तरीही खुश झाली. ती मला म्हणाली , " पप्पा , माझीच ट्रॉफी यांनी हरवली कशी ? " मी आपला मनातल्या मनात हसत तिला थोपटवत गाढ झोपवलं. मी आपला तिच्या मम्मीच्या आणि माझ्या मुलींच्या चेहऱ्यावर असा स्वानंद सतत येत राहावा हे माझे जागेपणीच स्वप्न शांतपणे बघत राहिलो होतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव

🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव


          हल्ली ' मॉर्निंग वॉक ' ला जाण्याचे प्रमाण पुन्हा सुरु झाले आहे. ती एक काळाची गरज आहे. चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम प्रकार आहे. चालल्यामुळे तुमचे अनेक ताणतणाव कमी होऊ शकतात. 

          अनेकजण कित्येक वर्षे ' पहाट चालणं '  करण्यासाठी बाहेर पडलेली मी प्रत्यक्ष बघितली आहेत. पूर्वी सकाळी शाळा असे , त्यावेळी आपोआप सकाळचे चालणे होऊन जाई. आता काही शाळांच्या वेळा बदलल्या आहेत , त्यामुळे ' प्रातःकालची चाल ' बंद पडली आहे. लोकांनी उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयी बदलायला हव्यात. तर सकाळी चालायला जाण्यासाठी लवकर जाग येईल. रात्री उशिरापर्यंत हॉरर सिरीयल बघत बसतात. त्याचा प्रभाव झोपेतही राहतो. झोप झाल्यासारखे वाटत नाही. मग सकाळी उशिराच गाढ झोप लागते. अर्थात आज नको उठुया , उद्या उठून ' प्रातःकाल चाल ' सुरु करण्याचा संकल्प करत राहतील आणि तो पूर्णही होणार नाही कधीच.

          ' लवकर निजे , लवकर उठे

    ' तया आरोग्य , संपत्ती , ज्ञान भेटे '

हे सुवचन म्हणूनच अगदी योग्य आहे. लवकर उठावे , मस्त प्रफुल्लोत्तेजन करावे. ताण कुठल्या कुठे निघून जाईल पहा. आज , उद्या , परवा करण्याच्या भानगडीत पडू नका. आज आता ताबडतोब सुरुवात करणं कधीही उत्तमच. मीही या सुट्टीत अनेकदा मॉर्निंग वॉकचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव खरंच घेतल्याशिवाय समजणार नाही. त्यासाठी दररोज थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडाच. 

          दिवसाची चांगली सुरुवात अशी करुन पहा. कित्ती मस्त वाटेल तुम्हाला. दिवस आनंदात जाईल. शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित होऊन जातील. तुम्ही कायम तंदुरुस्त राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 

          त्यासाठी कोणत्याही मोठया पूर्वतयारीची अजिबात गरज नाही. साधे सैल कपडे घालून निघा. हलके शूज असले तर आणखी उत्तम. चालताना तुम्हाला अवघड वाटता कामा नये. बाजाराला जाताना तुमच्या हातात एखादी पिशवी असते , इथे ती नसते. मोबाईल नसला तर तुमचे चालण्याकडे अधिक लक्ष राहू शकेल. नाहीतर प्रत्येक नोटिफिकेशन तुमची चाल मंदावत राहील. याला काय अर्थ आहे ? तुम्ही चालायला गेलात ना ? मग तेवढीच गोष्ट मनापासून करा. काही लोक कानात इअरफोन घालून एका हातात मोबाईल घेऊन चालताना मी बघितले आहेत. त्यामुळे त्यांचे चालणे हा एक उपचार ठरतो. त्याचे हवे तसे फिलिंग येत नाही. काही लोक बोलत बोलत चालत असतात. त्यांचे चालणे थांबेल , पण बोलणे थांबत नाही. काही लोक एखादा व्हिडीओ पाहत पाहत चालत असतात. भीती वाटते अश्यांची. चुकून खड्ड्यात पडले तर ? पडताना अशी माणसे आधी आपला मोबाईल वाचवतील , मग स्वतःला. 

          मॉर्निंग वॉकसाठी कमी वाहतुकीचा रस्ता निवडावा. असा रस्ता आता दुर्मिळ झाला आहे. दोन्ही बाजूंना झाडे असल्यास चालताना मजा येते. जाताना खूप काही पाहायला आणि ऐकायला मिळते. पक्ष्यांचे आवाज ऐकत जावे. निसर्गाच्या सहवास घेत घेत पुढे पुढे चालत राहावे. थोडे ट्रेकिंग करावे. घामाघूम होऊन जावे. घाम हलकेच पुसून टाकावा. एखाद्या शांत ठिकाणी शांत बसून निसर्गातील विविध आवाज ऐकावेत. डोळे बंद करुन जगापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करावा. 

          वाटेतील झाडांशी ओळख करावी. त्यांच्याकडे प्रेमाने पाहावे. दुसऱ्या दिवशी ती तुमची वाट पाहताना दिसतील. तुम्ही जवळ जाताच तुमच्यासाठी ती डोलताना दिसतील. ती झाडे सजीव आहेत , ती तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतात. फक्त ते निरीक्षण करता आले पाहिजे. 

          रानकोंबडी अगदी तुमच्या जवळून जातील. पळसाची फुले , प्राजक्ताची फुले थेट तुमच्या पायावर पडतील. निसर्ग तुमचे स्वागत करायला सुरुवात करेल. कुठूनतरी एखादी कोकिळा तुमच्यासाठी गाणे गात असेल. गोठ्यातील गाई , गुरे हंबरत असतात. दूध काढताना चरवीचा येणारा आवाज , शेणामुताचा आरोग्यदायक वास , पिकलेल्या आंब्यांचा सडा हे सगळं एका मॉर्निंग वॉक मध्ये अनुभवायला मिळतं. वाटेत मित्र भेटतात. ते गुड मॉर्निंग करतात. मोकळी स्वच्छ जागा दिसली की तिथेच बसून राहावेसे वाटते. आपण मध्येच आणि आपल्या चारी बाजूंना निसर्ग. किती मस्त वाटतं !! मग तिथे बसून थोडी योगासने करावीत. शरीराबरोबर मनाचाही भार हलका करावा. शरीरातील दुखणाऱ्या इंद्रियांकडे पहावे. त्यांच्यावर आलेला ताण शिथिल करावा. 

          हे करुन आल्यावर मस्त थंड पाण्याची आंघोळ करावी. मंत्र म्हणत देवाला  नमस्कार करावा. हे सगळे दररोज करता आले तर छानच.  नाहीतर एकदिवसाआड जमते काय बघा. मलाही हे नित्य करता येते का बघतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...