Sunday, July 18, 2021

बालामामा : माय आयडियल ब्रँड

           आमचे बाला मामा रत्नागिरीत राहतात. मी त्यांच्याकडे नोकरीनिमित्ताने 6 ते 7 महिने राहिलो असेन. त्यापूर्वीही मी अनेकदा त्यांच्याकडे सुट्टीमध्ये गेलो आहे. मामा , मामी , बबलू , गुड्डी आणि आजी या सर्वांकडून मला जे प्रेम मिळाले ते एका लेखातून व्यक्त होणे शक्य नाही. आमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये नोकरीला असलेले जवळचे नातेवाईक म्हणजे आमचे मामा आणि मामी दोनच होते. कणकवलीचे त्यांचे मोठे भाऊ भाईमामा हेही माझे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी मी नंतर स्वतंत्र लेखात अधिक सांगेनच. 

          बालामामांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असे आहे. त्यांना राग कधी आलेला नाही. ते नेहमी संयमाने बोलतात. नोकरी आणि घर यात गल्लत करत नाहीत. नोकरी करताना नोकरीच करावी. घरी असताना नोकरीचा विचार न करता घराकडे लक्ष द्यावे. मामांचे ऑफिस घराच्या जवळच होते. मामी भूमी अभिलेख कार्यालयात क्लार्क होती. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची. घरात देवपूजा झाली की सर्वांना विभूती लावताना ती मलाही आठवणीने विभूती लावत असे. जेवणात तिचा हात धरणारे कुणीही नसेल इतका फक्कड स्वयंपाक करत असे. तिने केलेली माशांची कढी अजूनही आठवते. जेवताना आम्ही सगळे एकत्र जेवत असू. आपल्याला हवे तितके आपण स्वतः वाढून घ्यायचे असे. मी न लाजता मला हवे तितके जेवण घेत असे. मी कमी घेईन म्हणून मला माझी मामी आठवणीने चौकशी करून आग्रहपूर्वक जेवू घाले. पण मीच संकोच करत असे. 

          मामांचे माझ्याकडे विशेष लक्ष असे. आपल्या बहिणीचा मुलगा पुढे जावा अशी त्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे. त्यांना न समजलेली गोष्ट ते मलाही विचारत असत. मी त्यांचा भाचा असूनही मी शिक्षक आहे याचा त्यांना कायमच आदर वाटत आलेला आहे. ते माझ्याबद्दल अभिमानाने बोलताना मी ऐकलेले आहे. रत्नागिरीसारख्या शहरात नोकरी करून एक चांगले ' चव्हाणभाऊ ' म्हणून त्यांनी सन्मान मिळवलेला मी प्रत्यक्ष पाहिलाय. म्हाडा वसाहतीमध्ये राहताना त्यांना अनेकदा संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. पण शांत डोक्याने त्यांनी त्याचा प्रतिकारही केला आहे. त्यांची कामाची पद्धत मला खूप काही शिकवून गेली आहे. घरातील कोणतेही काम करताना त्यांनी कंटाळा केला नाही. त्यांच्याकडे बघून मलाही त्यांच्यासारखे व्हावे असा दृष्टिकोन तेव्हापासूनच माझ्या मनात येत राही. मी त्यांच्यासारखा होऊ शकलो नसेन. पण आज मी जो आहे त्यात मामा आणि मामी या दोघांचाही तितकाच वाटा आहे. 

          एकदा मला रत्नागिरीवरून घरी यायचे होते. मी मला घरी येताना घ्यावयाच्या वस्तू एका पॅडवरील पांढऱ्याशुभ्र कागदावर लिहून ठेवल्या होत्या. मामांनी त्या बघितल्या. त्यावर छत्री वगैरे असे काहीबाही लिहिले होते. तो कागद उलटून बघितल्यानंतर समजले कि तो साधा कागद नव्हता तर तो एक त्यांच्या कस्टमरने दिलेला बॉंड पेपर होता. माझ्या त्या लिहिण्यामुळे तो खराब झाला होता. तरीही मामा मला काहीही बोलले नाहीत. माझ्याकडून तर चूक झालीच होती. मला त्यावेळी त्यांच्याकडे क्षमाही मागता आलेली नाही. त्यांनी मला कधीच क्षमा करून टाकली होती. आपल्या भाच्याला वाईट वाटेल असे ते कधीच वागले नाहीत. कदाचित माझ्याकडूनच अनेक चुका झाल्या असतील. मामा आणि मामी यांनी त्यावेळी मला दिलेला आधार माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या इमारतीचा मुख्य पिलर असावा असे मला वाटते. 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

कर कच कट

           त्यावेळी आमचे सलून ढालकाठी येथील सावळाराम वाळके यांच्या जागेत होते. त्यांच्या नारळाच्या दुकानाच्या मागे रिकामी जागा होती. त्यामध्ये त्यांचे गोडाऊन होते. त्यापैकी एक जागा त्यांनी आम्हाला भाडेतत्त्वावर दिली होती. त्यांनी उद्या जायला सांगितले तरी आम्हाला जायला लागले असते अशा बोलीवरच त्यांनी आम्हाला ती जागा दिली होती. आम्हाला गरज होती, त्यामुळे त्यांचे सर्व नियम आम्ही म्हणजे बाबांनी मान्य केले होते. 

          दुकान उंचावर होते. त्यामुळे चार पाच पायऱ्या चढून दुकानात प्रवेश करावा लागे. बाबांनी त्या दुकानाचे दोन भाग केले होते. त्यातला आतील भाग शिलाई मशीन ठेवण्यासाठी वापरला होता. त्यावर आमची आई  , ताई किंवा स्वतः बाबा गिऱ्हाइकांचे कपडे शिवत असत. दुकानात दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यावर माझे बाबा आणि माझे एखादे काका काम करत. काका गावावरून दररोज येत. कधीतरी संध्याकाळी उशीर झाला तर काका कणकवलीत आमच्या खोलीवर थांबत.

         शिलाईमशीननेही आम्हाला जगवले. दुकानात काम नसताना तिच्यावर केलेल्या शिवणकामावर आमचा चरितार्थ चाले. मी त्यावेळी लहान होतो , त्यामुळे मशीनवर बसून शिवणे मला जमत नव्हते. फक्त पायडळ मारणे जमत होते. खाली पायडळ मारल्यावर वरचे चाक गरागरा फिरते म्हणून मला गंमत वाटे. त्यामुळे टाईमपास म्हणून मी सहजच पायडल मारत बसे. बाबा ओरडेपर्यंत मी हे काम करत राही. बाबा ओरडले की माझे चाक फिरवणे मी थांबवी. बाबांचा मार मला चांगलाच माहीत होता. 

          त्यादिवशी मी शाळेतून दुकानात आलो. बाबा कोणते तरी गिऱ्हाईक करत होते. मी माझा टाईमपास सुरू केला होता. शिलाई मशिनचे पायडल मारत राहिलो होतो. बाबांना त्याचा आवाज येत होता. पण बाबा मला काही बोलले नाहीत. त्यामुळे मला बाबांची परवानगीच मिळाली आहे अशा थाटात मी माझे पायडल चालवण्याचे स्पीड वाढवले. त्यामुळे मोठा आवाज येऊ लागला होता. एकदा बाबा मला ओरडलेही असतील कदाचित , पण मी माझ्या नादात ते ऐकायला विसरलो होतो. माझी गाडी धूम सुसाट पळत होती. मशीनचा खडखडाट सुरूच होता. अचानक खडखडाट थांबला होता. ' कर कच कट ' असा आवाज येऊन मशिनची सुई माझ्या हाताच्या बोटातून आरपार गेली होती. सुई बोटात गेल्याबरोबर मशिनचे चाक फिरायचे थांबले . सुई बोटात गेल्यामुळे मीही थांबलो. 

          अचानक मशीन ' कर कच कट ' असा आवाज करत थांबली कशी ? असा विचार करून बाबा पार्टिशनच्या पलीकडे माझ्याकडे आले. मी आपला गप्प. सुई बोटात गेली तरी तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. बाबांनी ओळखले होते. ते माझ्या जवळ आले. त्यांनी माझ्या बोटात गेलेली सुई काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माझा हात आपल्या हातात घेतला. बोटातून रक्त वाहू लागलं होतं. तरीही मी गप्पच. जर मी रडायला सुरुवात केली असती तर मला अजून मार मिळाला असता या भीतीनेच मला रडायला येत नव्हते. बाबांनी माझा हात आपल्या तोंडाकडे नेला. मला काहीच समजत नव्हते. त्यांनी आपल्या दातांनी माझ्या बोटातील सुई ओढून काढली. सुई काढल्यानंतर रक्त जास्त वाहू लागले होते. बाबांनी शिवणकाम करताना उरलेल्या कापडाची मला पट्टी बांधली. त्यापूर्वी दुकानातील डेटॉलने जखम स्वच्छ धुऊन घेतली होती. 

          त्यानंतर मला स्वतःला शिवायला येईपर्यंत मी मशीनला हात लावला नसेन. दररोज खोबरेल तेल आणि पांढरी अँटिबायोटिक पावडर लावून लवकरच माझे दुखरे बोट बरे झाले होते. त्यामुळे मला एक कायमचा धडा मिळाला होता कि आपल्याला माहीत नसताना कोणत्याही यंत्राच्या भानगडीत पडू नये हेच खरे. नाहीतर असे घडते , " कर कच कट ". 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



मी उंदीर झालो

           पाचवीत असतानाची गोष्ट असेल. भालचंद्र महाराज विद्यालय शाळेत त्यावेळी पालवगुरुजी होते. ते वरच्या वर्गांना शिकवत. कधीतरी आमच्या वर्गात येत असत. त्यांची चित्रकला आम्हाला आवडायची. फळ्यावर चित्र काढताना चित्र पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नसत. अक्षरही वळणदार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे. इंग्रजी रनिंग लिपी देखील काढत. फक्त त्यावेळी ती आम्हाला समजत नसे. त्यांचा गणपतीच्या मूर्तीचा कारखाना होता. शाळा सुटल्यानंतर आम्ही तिथे बघायला जात असू. आमचे पालवगुरुजी चित्रकार आहेत , मूर्तिकार आहेत याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ते स्काऊट मास्टर देखील होते. अनेक प्रशिक्षणे पूर्ण करून त्यांनी कार्यशाळा घेतल्या होत्या. 

          दिल्लीचे सी. सी. आर. टी. चे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी त्याची अंमलबजावणी शाळेत सुरू केली. कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग केले. आम्हाला त्यांचे प्रयोग बघायला खूप आवडत. त्यांचा वाचिक अभिनय चांगला होता. विविध प्रकारचे आवाज काढण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखेच होते. एकच माणूस दोन ते तीन आवाज काढत सोबत बाहुल्या नाचवण्याचे काम पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन जाऊ. त्या निर्जीव बाहुल्यांना काही मिनिटांसाठी सजीव करण्याचे कौशल्य पालवगुरुजींमध्ये होते. त्यांचा भटजी मला खूप आवडे. तो बोलायला लागला की त्याचा जबडा वर खाली होई. आरती म्हणताना तो नाचतही असे. पालवगुरुजींची सर्वच पात्रे विनोदी असत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना गंमत वाटे. मोठी माणसे त्यातून बोध घेतील असाही संदेश शेवटी दिला जात असे हे विशेष होते. या संपूर्ण कार्यक्रमात पालवगुरुजी दिसत नसत. त्यांचा फक्त आवाज ऐकू येई. नंतर पालवगुरुजींनी मुलांची मदत घ्यायला सुरुवात केली. त्यांना एक रेकॉर्डिंग करायचे होते. त्यांनी आमच्या शाळेतील दोन मुले आणि तालुका स्कुलमधील दोन मुले निवडली होती. त्या मुलांमध्ये मी होतो.

          गोष्टीचे नाव होते ' बुड बुड घागरी '. त्यात उंदीर , मांजर , माकड आणि निवेदक अशा चार जणांचे आवाज रेकॉर्ड करायचे होते. मला उंदराची भूमिका मिळाली होती. फक्त संवाद म्हणायचे नव्हते तर संवादासोबत पार्श्वसंगीतही द्यायचे होते. पालवगुरुजी यांनी सर्व वस्तू जवळ ठेवल्या होत्या. चार ते पाच वेळा सराव घेऊन मगच अंतिम रेकॉर्डिंग करण्यात आले. सर्व संवाद पालवगुरुजींनी आम्हाला एका कागदावर लिहून दिलेले होते. त्यांचे बघून वाचन करायचे होते. माझ्याबरोबर आमच्या शाळेतील प्रणाम कामत हा मुलगा होता. त्याचा अभिनय अफलातून होता. त्याचं जगणंच ते होतं. पण तो खोडकर मुलगा होता. त्याचे वडील नसल्यामुळे त्यांच्या काकांकडे तो राहत असे. आज तो एक प्रसिद्ध व्यापारी आहे. त्याने कोणती भूमिका केली होती ते मला आता नक्की सांगता येत नाही. मला वाटतं तो माकड झाला असावा. 

          इतर दोन मुले आमच्यासाठी अनोळखी होती. आम्ही त्यांना विचारले , " तुम्ही कुठले ? " त्यांनी उत्तर दिले , " आशिया " . आम्ही दोघेही हसलो. कारण आम्हाला त्यावेळी आशिया खंड माहीत होते. मी सहज विचारले , " तुम्ही इतक्या लांबून कसे आलात ? " ते म्हणाले , " पायाने " . आम्ही चकित झालो. इतक्या लांबून पायाने आल्याबद्दल आम्हाला त्यांचे आश्चर्य वाटले. नंतर समजले की ती मुले आशिये या शेजारच्या गावातून आले होते. ते ' आशिया ' बोलल्यामुळे आमचा घोळ झाला असावा. 

          माझ्याकडे सोपी वाक्ये दिलेली होती. त्यापैकी एक वाक्य असे होते  , " ची ची करी , वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी " मी चांगला वाचिक अभिनय केला होता. गुरुजींनी आमची सगळ्यांची पाठ थोपटली होती. ते रेकॉर्डिंग त्यांनी पुढे अनेक कळसूत्री कार्यक्रमांमध्ये वापरले असेल. माझ्या मुली लहान असताना त्यांना बऱ्याचदा ही ' बुड बुड घागरी ' ही गोष्ट सांगावी लागली आहे. मला वाटतं सर्वच आई वडिलांनी आपल्या पाल्यांना ती ऐकवली असेल.

          गोष्टीचा सराव केल्यामुळे माझ्या अंतर्मनात तीच गोष्ट रात्रीपर्यंत राहिली होती. सकाळी उठताना मला आईने हलवून उठवले तर मी अजून उंदीरच असल्याप्रमाणे बडबडत उठलो , " ची ची करी , वरचे डोंगरी , मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी . " 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



खूप मज्जा आली सर

           डीएडला असताना मी दुकानात जायचे काही सोडले नव्हते. माझ्या अनेक मित्रांनी ते पाहिलेही असेल. तीन नंबर शाळेतील पंधरा दिवसांचे पाक्षिक सुरू असताना काही नवीन विद्यार्थी ओळखीचे झाले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मी सलूनात केसही कापतो ते बघितलेले होते. त्यातील काही विद्याथी माझ्याकडून आग्रहपूर्वक केस कापूनही गेल्याचे चांगलेच आठवतंय. त्यावेळी मला थोडे अवघडायला होई. पण काही क्षणानंतर भानावर येऊन पुन्हा मी माझ्या कर्तव्यावर ठाम राही.

          एकदा विद्यामंदिर कणकवलीचे राऊळसर आमच्या दुकानात केस कापण्यासाठी आले होते. मी दुकानात काम नसताना अभ्यास करीत असे. मी एस. एम. हायस्कुल कणकवली येथे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा आणि माझा शिक्षक - विद्यार्थी असा संबंध आला नव्हता. ते आमचे कस्टमर आहेत आणि भूगोल छान शिकवतात एवढेच मला त्यांच्याबद्दल समजले होते. त्यांनी माझ्या वह्या , पुस्तके घेतल्या आणि अक्षर बघितले. त्यांनी माझ्या पाठीवर प्रेमळ आश्वासक हात ठेवला , मला तो स्पर्श उबदार वाटला. ते त्या स्पर्शातून माझे जणू कौतुकच करत होते हे मला मुकपणेच समजत होते. मस्त पांढरे शुभ्र केस असलेले राऊळसर जणू चांदीचे व्यापारीच होते. पांढरे केस असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना ही उपमा दिली होती असे मला माझ्या मोठ्या बहिणींकडून समजले. 

          राऊळसरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. ते म्हणाले , " अरे प्रवीण , माझ्या भाचीचे दोन मुलगे आहेत. त्यांना घरी जाऊन शिकवशील का ?  तुला दरमहा मानधन दिले जाईल. " मी तयार झालो. संध्याकाळी दुकानातूनच मला त्यांना शिकवायला जायचे होते. पहिल्या दिवशी स्वतः राऊळसर मला त्या दोन्ही मुलांना भेटायला घेऊन गेले. एका मोठ्या घरात त्यांनी मला नेले होते. दोन्ही विद्यार्थी माझी वाटच पहात होते. हॉलमध्ये टेबलभोवती चार खुर्च्या लावलेल्या होत्या. बहुतेक ते डायनिंग टेबल असावे. दोन्ही मुले आपल्या इयत्तांची पुस्तके घेऊन आले. राऊळ सरांनी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले , " मुलांनो , हे तुमचे नवीन सर आहेत. ते दररोज संध्याकाळी एक तास तुम्हाला शिकवायला येतील. ते स्वतः शिक्षक होण्यासाठी शिकत आहेत हे लक्षात ठेवा. " मुलांनी ते ऐकले व मानेनेच होकार दिला. पण माझ्याकडून शिकण्यासाठी ते आतुर झालेले दिसले. मी कधी एकदा त्यांच्याशी बोलतो असे त्यांना झाले होते. मुलांच्या आईने मला मस्त गरमागरम चहा आणून दिला. ती माऊली माझ्याशी गोड हसली आणि आत गेली. राऊळ सर देखील निघून गेले. माझा तास सुरू झाला. एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला तरी मला आणि मुलांनाही समजले नाही. शेवटी त्या मुलांच्या आईनेच मला " सर , तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल तर गेलात तरी चालेल असे सांगितले. " तेव्हा मी भानावर आलो. मी मुलांचे वाचन घेत होतो. त्यांची तयारी बघत होतो. मुलांशी अभ्यासविषयक गप्पा मारत होतो. त्यांना शाबासकी देत होतो. त्यांना प्रेमळ शब्दांनी अधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत होतो. दोन्ही मुलगे होते. त्यांच्यामध्ये चार वर्षांचा फरक असावा. मी घरी निघण्यासाठी बाहेर पडलो होतो , छोटा शंकू धावतच माझ्या शर्टाला धरायला आला. म्हणाला , " सर , आज खूप मज्जा आली सर .... आम्हाला अभ्यास करतो आहोत असे वाटलेच नाही. उद्यापासून दररोज या सर. आम्हाला तुमच्याकडून शिकताना खूप आनंद झाला सर. " त्या छोट्या मुलाचे बोलणे मला भावले होते. मोठ्या मुलानेही छान स्मितहास्य केले आणि माझ्याबद्दल आदर दर्शविला. तो थोडा मोठा असल्यामुळे त्याने अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नसावी. 

          शिक्षक होण्यासाठीचे शिक्षण घेत असतानाच मला या दोन मुलांना सर्वात आधी शिकवण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हे दोन्ही मुलगे आज अत्युच्च शिक्षण घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. दोघेही सिव्हिल इंजिनियर होऊन एम. बी. ए. झाले आहेत. यातील मोठा मुलगा आज कणकवली नगर पंचायतीचे नगरसेवक आणि मोठे बिल्डर आहेत त्यांचे नाव सुशांत नाईक आणि छोटा मुलगा संकेत नाईक जो आता बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मी त्यांना दोन वर्षेच शिकवले. त्यानंतर नोकरी मिळाल्याने मला त्यांच्याकडे जाणे जमले नाही. त्यांची आता भेट झाली तरी मला त्यांच्यासोबतचा पहिला दिवस आठवतो आणि छोट्या शंकूने म्हटलेलं ते वाक्य आठवते , " खूप मज्जा आली सर " . आज शिकवल्यानंतर " खूप मज्जा आली सर " असे म्हणणारे विद्यार्थी भेटले तर तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



भ्याडसा

           कोडी सोडवणे हा आमचा लहानपणीचा आवडता छंद होता. अर्थात मोठेपणी सुद्धा हा आमचा छंद आहेच. पण तेव्हा सर्व भावंडे मिळून विचार करून कोडी किंवा उखाणी सोडवण्यातली मज्जा काही औरच होती. आम्ही पुढारी किंवा लोकसत्ता पेपर घेत असू. त्यात दरदिवशी कोडी येत असत. आम्हाला शब्दकोडी सोडवण्याचा छंद म्हणण्यापेक्षा नादच लागला म्हणा ना !! शब्दकोडी सोडवून आमच्या शब्दसंपत्तीत भर पडत होती. 

          आमच्या सलूनात येणारे कस्टमर त्यातील शब्दकोडी अर्धवट सोडवून ठेवीत. ती नंतर सोडवून पूर्ण करणे अवघड होत असे. कारण त्यांना न येणारे शब्द शोधून काढावे लागत. माझे बाबा , माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी शब्दकोडी सोडवण्यात पटाईत होती. त्यांच्यामुळेच मलाही ती चांगली सवय लागली. आमच्यात त्यामुळे चढाओढ लागे. ज्यांना लवकरात लवकर शब्द आठवे त्यांना त्याचे श्रेय मिळे. मी ते श्रेय मिळण्यासाठी खूप प्रयत्न करीत असे. संपूर्ण कोडे परिपूर्ण सोडवणे काही सोपे काम नसते. त्यात ते जम्बो कोडे असले तर खूपच वेळ लागे. काही शब्दकोड्यांमध्ये पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द येत त्यामुळेही नवनवीन शब्दांची भर आमच्या ज्ञानात पडत राहिली. दुसऱ्या दिवशी शब्दकोड्याचे उत्तर आले की ते पडताळून पाहण्याचे कामही आनंद देऊन जाई. पूर्ण बरोबर शब्दकोड्यासाठी आपणच आपल्याला पाठीवर शाबासकी देत असू. आपण आपली स्वयंमूल्यमापन चाचणी घेत होतो हे त्यावेळी आम्हाला समजलेही नव्हते. 

          एकदा अशीच शब्दकोडी सोडवत बसलो होतो. सुट्टी असल्यामुळे घरात होतो. सगळी भावंडे त्यात आपला सहभाग दर्शवित होती. मी लिहीत होतो. मी लिहीत असलो तरी मोठ्याने वाचून सर्वांना विचारून फक्त लिहिण्याचे काम करत होतो. मी माझ्या मनाने कमीच शब्द लिहिले होते. शब्दसमूह मोठ्याने वाचण्याचे माझे काम सुरू होते. वाचल्यानंतर माझी मोठी ताईच पटकन उत्तर देत होती. माझी आईसुद्धा अधूनमधून त्यात भाग घेण्याचा प्रयत्न करत होती. ती घरात काम करता करता जेवढे ऐकत होती , त्यांची उत्तरे आपल्या परीने मनात ठरवत होती. आम्ही तिला त्यात सहभागी करून घेत होतो याचा तिला आनंदच होता. ती फक्त सातवी शिकलेली होती. आम्ही तिच्यापेक्षा जास्त शिकत होतो , म्हणून आमचा सर्वांचा तिला अभिमानच वाटत होता. ती आम्हाला तिच्यापेक्षा हुशार समजत असे. तिला मोठ्या टाईपच्या अक्षरांची गोष्टीची पुस्तके वाचनाचा छंद होता. पूर्वी कडधान्य कागदात बांधून मिळत असे. किराणा सामान आणल्यानंतर ज्या कागदातून सामान बांधून आणलेले असे , ते सर्व कागद ती वाचून काढीत असे. कधीचे जुने कागद किंवा रद्दी असे ती , पण ती वाचून तिला खूप समाधान मिळे. 

          चार अक्षरी एक शब्द सापडत नव्हता. एका जंगली झुडूप असलेल्या फळाचे नाव होते. ते आठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. आमचा हा शोध आईपर्यंतही पोचला होता. आईने तिथूनच मोठ्याने उत्तर दिले होते. ती म्हणाली , " भ्या-ड-सा " . तिने हे फळ मालवणी बोलीमध्ये सांगितले होते. भेडसा नावाचे एक करवंदासारखे दिसणारे फळ आहे. तिने आम्हाला त्या फळाविषयी अचूक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चार अक्षरी शब्द सापडला होता , " क र वं द " असे त्याचे खरे आणि बरोबर उत्तर होते. पण आईने भ्याडसा हे नवीन फळाचे नाव उच्चारताना एक वेगळ्याच प्रकारचा उच्चार केला होता. त्यानंतर पुन्हा कधीही शब्दकोडी सोडवताना आम्ही तिला ' भ्याडसा ' असे म्हणून आठवण करून देत असू. ती सुद्धा हा शब्द ऐकून जी हसे ते हसणे निखळ होते. अशाच प्रकारच्या अनेक गमतीजमती आम्ही सगळे एकत्र जेवताना होत असत. 

          कोणत्याही शब्दकोड्यात ' भ्याडसा ' हा शब्द कधी आला असेल किंवा येईल याबद्दल मला माहीत नाही , पण आम्हा सर्व भावंडांच्या आयुष्याचे शब्दकोडे या शब्दाने सुरू होते हे तितकेच खरे आहे. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



पाटकरांचा चहा

      कणकवली ढालकाठीच्या शेजारी आमचे दुकान असतानाची गोष्ट. तसे आम्ही त्याच परिसरात विविध ठिकाणी फिरलो. तिथून खूप लांब दुकान घेणे आमच्याही जीवावर आले असते. कारण आमची ओळखीची माणसे या परिसरातच जास्त होती. कणकवली कॉलेज , विद्यामंदिर , तीन नंबर शाळा , बाजारपेठ , भालचंद्र महाराज आश्रम ही महत्त्वाची ठिकाणे आमच्यापासून जवळ असलेली आम्हाला आवडत होती. या सर्वांशीच आमचे जिव्हाळ्याचे नाते जुळले होते. 

          आमच्या दुकानशेजारी एक चहाचे दुकान होते. हॉटेल असले तरी तिथे चहा सतत मिळे. भजी क्वचितच मिळे. हे चहाचे दुकान पाटकरांचे होते. सुरेश पाटकर नावाचे हे गृहस्थ आमच्या दुकानात सतत बसलेले असत. पेपर वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. ते संपूर्ण पेपर वाचून काढत. अग्रलेख वाचून त्यावर चर्चा देखील करत. त्यांचे सामान्यज्ञान वर्तमानपत्रातील दैनंदिन लेख वाचून वाढलेले होते. पेपर वाचता वाचता ' पाटकर , दोन चहा पाठवा. ' असा आवाजही ते ऐकत आणि लगेच चहा गरम करून त्यांना चहा नेऊन देत. पुन्हा आमच्या दुकानात येऊन उर्वरित पेपर वाचून पूर्ण करत. असे त्यांचे रोज चाले. आमच्या दुकानात जास्त गिऱ्हाईके असली तर ते स्वतःच्या हॉटेलमध्ये जाऊन पेपर वाचत. पेपर वाचून संपला की आमचा पेपर आणून देत. पेपरात एखादी बातमी त्यांनी वाचायची राहिली असे होणे शक्यच नसे. कारण आमच्या बाबांनी एखादी बातमी पाटकरांना विचारली तर ते पान नंबरासह बातमी सविस्तर सांगत असत. 

          त्यांचा पोशाख अगदी साधा असे. पांढरा लेंगा आणि पांढरी सँडो बनियन. सँडो म्हणजे बिनबाह्यांची. सतत तोच वेष असल्याने ते दररोज तसेच दिसत जसे काल दिसले होते. दाढी वाढली तर ते स्वतः करत. केस मात्र आमच्या दुकानात कापत. पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा घातलेले पाटकरकाका सुंदर दिसत. पण असा वेष घातलेले पाटकरकाका दुर्मिळ होते. 

          त्यांच्या चहाची चव लाजबाब होती. आमच्या घरचा चहा आणि त्यांचा चहा यात खूपच फरक जाणवे. त्यांचा चहा आमच्यासाठी कायमच अमृततुल्य असाच होता. आज जर त्यांचे हॉटेल असते, तर आम्ही तो अमृततुल्य चहा त्यांच्याकडेच जाऊन घेतला असता. ते कोरा चहा करून ठेवत. चहाच्या किटलीत तो भरून ठेवत. मोठ्या पातेल्यात गरम पाणी करून ठेऊन त्यावर ही चहाची किटली ठेऊन देत. कधीही चहा द्यायचा असला की दोन चमचे दूध घालून तो कोरा चहा अमृततुल्य बनवत. चहाच्या ग्लासमध्ये ओतताना ते बरोबर मापात ओतत. आम्ही त्यांच्याकडून तीन ते चार वेळा तरी चहा घेत असू. त्यावेळी 50 पैशांचा चहा मिळे. कधी कधी आमची काही गिऱ्हाईके आम्हाला त्यांच्याकडचा चहा देत. आम्ही बाकी कसले नसलो तरी चहाचे शौकीन जास्त होतो. आणि पाटकरांच्या हातचा चहा मिळणार तर मग सोडतच नसू. आई दुकानात चपाती आणि उसळ पाठवून देत असे. आम्ही कधीतरी चहातून चपाती खात असू. एकच चहा मागवला असला तर तो तिघांमध्येही वाटला जाई. बाबांनी प्यायलेल्या चहाच्या ग्लासमधून आम्ही भावंडे दोन दोन झुरके घेऊ. 

          आज पाटकरकाका नाहीत , त्यांचे हॉटेल नाही , त्यांचा अमृततुल्य चहा नाही. पण त्यांच्यासोबत घालवलेल्या चहाच्या आठवणी नुकत्याच आले घालून उकळलेल्या गरमागरम चहासारख्या अजूनही तशाच आहेत. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




इतकी कल्पना नव्हती

           इतकी कल्पना नव्हती

        काही व्यक्तींमध्ये अचानक बदल घडतात. काही बदल वयानुसार घडतात. प्रसंग आल्यानंतर जाणीवपूर्वक बदल घडवावे लागतात. या सर्व गोष्टींची कल्पना यायला वेळ लागतो. काही काळ थांबून , वाट बघून घडलेले बदल स्वीकारावे लागतात. कामातील बदल म्हणजे आपण विश्रांती म्हणतो. हे बदल व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. आमूलाग्र बदल घडण्यासाठी तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. परिश्रम कमी असताना मोठ्या बदलाची अपेक्षा करणे चुकीचे असते. पण बदल हा जीवन जगण्यासाठी एक आवश्यक गोष्ट असे म्हणायला हरकत नाही. 

          आमच्या डीएडच्या वर्गात एकूण तीन कल्पना असतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती. समजले तेव्हा कल्पना आली. या तीन कल्पना म्हणजे कल्पना मलये, कल्पना धुत्रे आणि कल्पना मुसळे. तिन्ही कल्पनांचे स्वभाव आगळे आणि वेगळेच होते. एक कल्पना थोडी भित्री होती. दोन कल्पना धीट होत्या. तिन्ही एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. एकाच माध्यमिक शाळेत एकत्र शिकलेल्या आणि हुशार होत्या. पुन्हा एकदा दोन वर्षासाठी एकत्र आल्यानंतर त्या तिघींनाही जो आनंद झाला असेल त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तिन्ही तुफान बोलक्या. एकीचे बोलणं पूर्ण व्हायच्या आत दुसरी बोलत असे , तिसरी दोघांचेही बोलणं खोडून काढण्यात पटाईत. दोन वर्षे एकत्र शिकताना त्यांच्याकडूनही आम्हाला बरेच शिकता आले. तिन्ही कल्पना आज उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका आहेत. 

          अध्यापक महाविद्यालयातील ती दोन वर्षे या तिन्ही कल्पनांनी चांगल्या प्रकारे गाजवली. कार्यानुभव , संगीत , नृत्य , शिवणकाम हे त्यांचे आवडते विषय. आम्हाला कोणतीही मदत लागली तर या त्रयींची मदत मिळणार हे नक्की ठरलेलं असे. भरतकाम , विणकाम यांनीच आम्हाला शिकवले. कधी कधी तयार करूनच दिले. पाठाच्या सादरीकरणात शैक्षणिक साहित्य देण्यात त्यांनी कधीही नकार दिला नाही. अगदी बहिणींप्रमाणे साथ दिली. या कल्पनांनी जशी साथ दिली तशी इतर मैत्रिणींनीही दिली. 

          आज कल्पना मलये एक उत्तम साहित्यिक झाली आहे. ती एक लेखिका आणि कवयित्रीही आहे. तिच्यातले हे गुण आम्ही बघितले नव्हते. ती एक उत्तम वक्ता सुद्धा आहे. या साहित्यिक कल्पनेची आम्हाला कल्पना नव्हती. ती आज आपले मत परखडपणे मांडताना दिसते. पूर्वी पाठ घेताना ती घाबरताना आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. आज तिच्या बोलण्याने समोरचाच घाबरून जाऊ शकतो इतका आत्मविश्वास तिच्यात आला आहे हे विशेष सांगावेसे वाटते. तिला दिलेल्या कोणत्याही विषयावर ती मुद्देसूद लिहू शकते. तिच्या जीवनात आलेल्या संकटांशी तिने हसत हसत सामना केला आहे. 

          दुसरी कल्पना म्हणजे कल्पना धुत्रे. हिचा स्वभाव पहिल्यापासूनच प्रेमळ. ती आता आमच्या किर्लोस आंबवणे शाळेत शिक्षिका आहे. पालकांना आपलेसे करण्याची तिची भाषाशैली घेण्यासारखी आहे. पूर्वी ती एवढी मनुष्यवेल्हाळ नव्हती. वाटेने जाता जाता शेतकरी ग्रामस्थांबरोबर संवाद करत जाणारी वेगळी कल्पना आम्ही पूर्वी पाहिली नव्हती. 

          तिसरी कल्पना म्हणजे कल्पना मुसळे. 1 ली ते 7 वी पर्यंत माझ्याच वर्गात असलेली कल्पना , शिक्षिका होईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. एकदम साधी, सरळ, नाकासमोर चालणारी मुलगी. आमच्या दुकानापासून तिचे घर अगदीच जवळ. तिचे बाबा , आई , भाऊ यांच्यासोबत आमचे संबंध चांगले होते. आज ही कल्पना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना जी तल्लीन होऊन शिकवते , ती घाबरट कल्पना आज धीट झालेली आम्हाला पहावयास मिळते आहे. 

          अशा या तिन्ही कल्पना इतक्या प्रभावी होतील अशी कल्पना त्या तिन्ही कल्पनांनीही केली नसेल कदाचित. पण आज तिन्ही कल्पना शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावून आहेत , आपल्या परीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडवित आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याला सर्वांचेच सलाम असायला हवेत. ' दिव्यत्वाची जेथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती '. 

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...