Monday, May 10, 2021

माका खूप होया

 🟤 माका खूप होया

          आपण बोलताना कायम ' मी असं केलं , मी तसं केलं ' असंच बोलत असतो. यात आपण स्वतः प्रक्षेपित होण्याचाच जास्त प्रयत्न करत असतो. आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट , अशी भावना देखील कायम आपल्या मनात येत असणार. ही गोष्ट आपल्या लहानपणापासूनच जन्माला येते. घरातल्या माणसांना बघूनच आपण लहानाचे मोठे होत असतो. आपण लहान असलो तरी आपल्या मोठ्यांची आपण एक छोटी प्रतिकृतीच असतो म्हणा ना !!! 

          मला सर्व गोष्टी अधिक मिळाव्यात ही लालसा प्रत्येकात जन्मताच असते कदाचित. मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या असल्या तर त्या खूप मिळाव्यात , वाईट गोष्टी मात्र खूप नको हं !!!! नाहीतर त्याही जास्त मिळाव्यात असाही नकारात्मक अट्टाहास धरणारे लोकही आजच्या जमान्यात असू शकतात. आजच्या जगात काहीही घडू शकते , तसे काहीही बिघडूही शकते. ते सध्या कोरोनाच्या दररोजच्या बातम्यांनी आपण बघतोच आहे. 

          आपल्याला जीवन हवं असतं , पण मरण नको असतं. आज काहींना मरण हवं असलं तर ते मिळत नाही , ज्यांना ते नको असतं त्यांना मात्र ते अधिक मिळत असतं. का कोण जाणे , हा विरोधाभास काही आपल्या कधीच पचनी पडणारा नाही. असो. आपल्याला देवाने जे मस्त जीवन दिलंय , ते आपल्याला मजेत जगायचं आहे. ते आपण मजेत जगत नसलो तर ..... तर मात्र जरा थांबून विचार करायचा आहे. आणि सध्या आपल्याला थांबून विचार करण्यासाठी या कोरोनाने खूपच वेळ देऊन ठेवला आहे. 

          आपला हव्यास काही कमी होत नाही. मला हे हवे , ते ही हवेच. जे मिळाले नाही त्यासाठी कायमच आपण अतृप्त राहणार. जे मिळाले आहे त्याकडे कधी पाहणारच नाही. आपल्याला हा स्वार्थी भाव सोडून देता यायला हवा. आपला जीव सगळ्यातच गुंतून पडतो आहे. म्हणून देवाने दिलेल्या या देहाकडे लक्ष न देता भौतिक सुख मिळण्यासाठी नुसते धाव धाव धावतो आहोत. अजून थोडं मिळवूया , अजून थोडं ..... हे अजून थोडं कधी संपतच नाही. 

          माझी लहानपणीची गोष्ट सांगतो. मला माझ्या घरात आणल्या जाणाऱ्या सगळ्या खाऊच्या वस्तू अधिक लागत. बाबा बटर घेऊन येत. पूर्वी वर्किचे बटर प्रसिद्द होते. ते स्वस्त आणि मस्त असत. बाबा तेच आणत. आम्हा पाचही भावंडांना ते एका दिवसाला पुरण्याइतके असत. ते चहामध्ये बुडवून खाताना चविष्ट लागत. आणखी दुसऱ्या चांगल्या बटरांची चवच घेतली नव्हती , त्यामुळे जे मिळत ते चांगलेच लागत असे म्हणूया. पण आम्हा पाच भावंडांमध्ये मी ' माका खूप होया ' असे म्हणून अधिक बटरांची मागणी करत असे. त्यामुळे बाबा मला ' खूप बटर ' देत असत. मला ते खूप असलेले बटर खाताना मजा येई. मजा अशासाठी की माझ्या इतर भावंडांना माझ्यापेक्षा कमी बटर मिळाले याचा आनंद मला जास्त होई. 

          बाबांनी मला खुश करण्यासाठी एक योजना आखली होती. मला जास्त बटर वाटावेत , म्हणून ते एका बटराचे तीन ते चार तुकडे करून मला देत. एक पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे मला ते बटर जास्त वाटत असत. मी खुश होऊन न भांडता बटर खात असे. त्यावेळी मला ते समजले नाही. थोडा मोठा झाल्यानंतर लक्षात आले. पण तेव्हा थोडे शहाणपण आले होते. जे मिळे त्याच्यात खुश होत होतो. माणसाच्या शरीरात वयानुसार जसे बदल घडतात , तसेच मनातही बदल घडतात. तसे चांगले बदल माझ्यात घडत गेले. मग मी माझ्याकडील अधिकच्या वस्तू माझ्या भावंडांना आणि मित्रांनाही देत असे. 

          आता मात्र ' माका खूप होया ' हे वाक्य मला परत बालपणाकडे घेऊन जाते. पूर्वीचा मी आणि आताचा मी .... यात बराच फरक पडला आहे. माझे बाबा अजूनही म्हणतात , ' माझो पूर्वीचो झिल गेलो खय ' . आता तो पूर्वीचा मी अजिबात राहिलो नाही हे मात्र त्यांचे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



पिठी , भात आणि बांगडो

 🐟 पिठी , भात आणि बांगडो


          सिंधु उत्सव 1999 मला चांगला आठवतोय. त्या वर्षी अक्षरसिंधु कणकवली यांच्या वतीने एक ध्वनिफीत तयार करण्यात येत होती. त्यात सिंधुदुर्ग विषयक अनेक गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. मी साधारण गात असे. तसा अजूनही गातो. पण त्यावेळेच्या आणि आताच्या आवाजात नक्कीच फरक पडला आहे. आता गाण्यांचा रियाज होणे थांबले आहे. माझे मित्र विजय चव्हाण म्हणजेच आताचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मला सिंधु उत्सव 99 च्या कॅसेट मध्ये एक गाणे गाण्याची संधी दिली. मी त्यावेळी गढिताम्हाणे दादरा या एकशिक्षकी शाळेत कार्यरत होतो. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रेकॉर्डिंग करायचे होते. 

          मला त्यातली सगळीच गाणी म्हणता येत होती. गाण्यांच्या चालीसुद्धा चांगल्या बांधल्या गेल्या होत्या. मला कोणतेही गाणे दिले तरी मी म्हणू शकणार होतो. तेवढा त्यावेळी आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास माझ्यात अक्षरसिंधु आणि कलासानिध्य या दोन्ही सांस्कृतिक संस्थांनी निर्माण केला होता. साहित्याची आवड वाढण्यासाठी मला या दोन्ही संस्थांची अधिकाधिक मदतच झाली आहे. 

          मला जे गाणे म्हणायचे होते , ते गाणे नक्की कोणते ते समजले. माझ्यासोबत पल्लवी पवार ही गायिका गाणार होती. तिचा आवाज अभिनयासाठी चांगला होता. पण ती माझ्यासोबत गाणार असल्याने मला आनंदच होता. यापूर्वी मी स्वाती जाधव म्हणजेच आताच्या स्वराशा कासले यांच्यासोबत काही गाणी म्हटली होती. स्वातीची बहीण भारती हिच्यासोबतही मला गाणी म्हणायला मिळाली होती. मी शास्त्रशुद्ध शिकलो नव्हतो. पण गाण्यातले मला कळत होते. 

          वरवडे शाळेत रेकॉर्डिंग सुरू झाले होते. आम्हाला दोन वर्ग देण्यात आले होते. एक रेकॉर्डिंगसाठी आणि एक सरावासाठी. मी आणि पल्लवी दोघांनीही भरपूर सराव केला होता. तिचा आणि माझा आवाज मॅच व्हायला वेळ लागला. फायनल रेकॉर्डिंग जवळ आले. आमच्या दोघांचे बरेच टेक रिटेक झाले. शेवटी एकदाचे गाणे अंतिम टप्प्यात आले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. एक गाणे गाण्यासाठी आम्हाला सात ते आठ तास लागले होते. रात्री खूप उशिरापर्यंत गाणे पूर्णत्वास पोचले होते. गाण्याचे बोल असे होते. 

कोकणला लाभलाय सागर किनारा    

चल चल पारू जाऊ दर्याला 

नको नको धन्या मी जातंय देवीला 

म्हावऱ्यासाठी गाऱ्हाणं घालीन देवीला 

ए , पारू गो पारू , काय करतस 

बांगडो मी भाजतंय झकास मिठास 

अगो , पिठी , भात बांगडो वाढतस काय 

खाऊन बघशाल तर हाय रे हाय 

अहो , मंडळी चला कोकणाला

पिठी भात बांगडो खायाला


          असे हे गाणे म्हणून झाल्यानंतर मी ज्यावेळी माझा आवाज कॅसेटवर ऐकला तेव्हा मला माझेच कौतुक वाटले होते. साऊंड सिस्टीममुळे गाणे इतके अफलातून वाटत होते की एखाद्या कसलेल्या गायकांनी ते गाणे म्हटले असावे. पल्लवीचा आवाजही छान लागला होता. गाण्याचा परफॉर्मन्स देणे आणि गाणे रेकॉर्डिंग करणे यात असलेला फरक मला समजला. त्यावेळी माझ्या एक लक्षात आले की आज आपण जी सुरेल आवाजातील गाणी ऐकतो त्यामागे त्या गीतकारांचे , संगीतकारांचे आणि गायकांचे किती श्रम असतील ? खरंच या सर्व कलाकारांना माझे विनम्र अभिवादनच असेल. 

          पिठी , भात आणि बांगडो आमच्या कोकणातील प्रसिद्ध मेनू आहे. आम्ही आमच्या आईकडून हा मेनू अनेकदा करून घेतला आहे. गावाकडच्या घरीही तो एक दिवसाआड असायचा. कुळथाची पिठी आणि भाजलेला बांगडा भाताबरोबर खाताना एक घास अधिकचा पोटात जाई. पिठी शिजत असताना त्याचा सुगंध जवळच्या घरापर्यंत जात असे. चुलीवरच्या निखाऱ्यांवर बांगडा भाजताना येणारा दुर्गंध सुगंधच वाटत असे. मस्त उकडा भात , त्यावर गरमागरम कुळथाची पिठी आणि नुकताच चुलीवर भाजलेला बांगडा खातानाचे दिवस आठवले की आताही जिभेला पाणी सुटते. आता बाजारातील बासमती तांदळाचा भात मिळतो. बाजारातली पिठी मिळते. गॅसवर भाजलेला बांगडा मिळतो. पण त्यावेळची ती चव येत नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबल , ( 9881471684 )



Saturday, May 8, 2021

आईच सर्वश्रेष्ठ

 🟡 आईच सर्वश्रेष्ठ

          आई म्हणजे आपला आत्मा असतो असे म्हटले तरी बरोबर असेल. आई म्हणजे ईश्वर सुद्धा आहे. आई या शब्दाच्या दोन अक्षरामध्ये अनेक अर्थ लपलेले आहेत. ' आपला ईश्वर ' असेही मोठे रूप आपण बनवू शकतो. आई आपल्यासाठी काय करत नाही  सांगा. ती आपल्या मुलांसाठी सर्वकाही करते. आपण मात्र तिच्यासाठी काय करतो , किंवा तिच्यासाठी काय केले याचा विचार केला तर त्याचे नीट उत्तर आपल्याकडे नसेल. कारण तिने आपल्यासाठी जे केले असेल, त्याच्यापेक्षा नक्कीच आपण तिच्यासाठी कमीच केले असेल. आईने आपल्यासाठी केले म्हणून आपण त्याची परतफेड करावी या अपेक्षेने ती मुळीच करत नसते. ती सतत करत राहते. आपली सर्व मुले त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हावीत हा तिचा मनातील निर्मळ आणि शुद्ध हेतू असतो. आपल्याला मात्र तो दिसत नाही. ती असल्यावर तर अजिबातच दिसत नाही , ती गेली की तिची आठवण राहून राहून येते. 

          तिन्ही जगांचा स्वामी देखील आईविना भिकारी आहे. मग आपण तर एक सर्वसामान्य मानव प्राणी आहोत. आज जगात सगळे दिन साजरे केले जातात. ' माता दिन ' किंवा मदर्स डे साजरा करत असतात , फक्त त्याच दिवशी आईची ममता दाखवायची आणि बाकीच्या दिवशी आईला विसरून जायचे असे होता कामा नये. 

          माझी आई माझ्यासाठी मला आजन्म आठवत राहावी अशीच आहे. ती आमच्यातून जाऊन आता 12 वर्षे होऊन गेली. आमचे सुख हेच तिचे सुख. तिचे सुख हेच आमचे सुख असे कधी घडले नाही. तिने आमच्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. ती दम्याने त्रस्त असे. तिला बाकी कोणतेही आजार नव्हते. ती नेहमी हसतमुख असे. आमच्या एकत्र कुटुंबासाठी तिने केलेला त्याग आज आम्हाला कळतो. तिची सहनशीलता अपार होती. तिने कोणाशीही कधी भांडण केले नाही. ती नाराज असली तरी कोणाला टाकून कधीच बोलली नाही. तिला ते कधीच जमलेही नसते. कारण दुसऱ्याला दुःख देणे तिच्या स्वभावातच नव्हते. तिचे दुःख आम्ही तिच्या डोळ्यात बघितले आहे. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. मोठे झाल्यानंतर शाळा , अभ्यास , करियर , नोकरी , मोठे कुटुंब आणि पत्नी , मुले यांच्यात अडकल्यानंतर तिच्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायचे राहूनच गेले. 

          तिला कणकवलीत स्वतःचे घर हवे होते. भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून ती कंटाळली होती. माझे लग्न झाल्यानंतर लवकरच आम्ही नवीन रुम घेण्याच्या प्रयत्नात होतो. पण लग्न झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी देवगड तालुक्यात नोकरी करत असल्याने सर्वांनाच मी तिकडेच घेऊन गेलो. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांनी माझ्या पत्नीचे बाळंतपणात आकस्मिक निधन झाले. मला बसलेला धक्का मीच सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे आमचे सगळे कुटुंबच कोसळले. आम्ही गावी राहायला गेलो. दुसरे लग्न करावे लागले. 4 वर्षाची मुलगी सांभाळण्याचे काम माझी आई करू लागली. आम्हाला सांभाळले पण आता नातीलाही सांभाळताना तिचे नाकीनऊ आले. आता आई दमली होती. सुनेच्या जाण्याने ती अर्धी संपली होती. फक्त शरीर उरले होते. नाईलाजाने ती घरात वावरत होती. मध्येच कुठेतरी शून्यात हरवताना दिसत होती. तिच्या हट्टासाठी मी दुसरे लग्न केले. त्यानंतर पुन्हा नवीन संघर्ष सुरू झाला. भावाचे लग्न केले. त्याला मुलगी झाली. ती अजूनही सर्वांचे करतच होती. सोबत दोन्ही सुना होत्याच. आई जुन्या पद्धतीची होती. सुना लेकीसारख्याच होत्या. सुना आईने सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोन्ही सुना तिच्या लेकीच झाल्या होत्या. मोठ्या सुनेचे जाणे तिच्या जिव्हारी लागले होते. ती खंगू लागली. तिने जेवणही सोडले. ती जास्त आजारी पडली. आमचे बाबाच तिची सगळी सेवा करत. तिला इतर कोणीही हात लावलेला चालत नसे. आम्ही काही करायला लागलो की ती बाबांना बोलवायला पाठवी. बाबांनी तिचे सर्व केले. आम्हाला तिने काहीही करायला दिले नाही. बाबांशी ती बोलत असे. बाबांजवळ आपले मन मोकळे करत असे. आपली व्यथा तिने आम्हाला कधीही सांगितली नाही. माझी पत्नी गेल्यानंतर फक्त दोन वर्षांच्या फरकाने आई आम्हाला सोडून गेली. 

          आमच्या गावच्या घरी आईचे निधन झाले. मला त्यावेळी न्यूमोनिया झाला होता. मी कणकवलीत उपचार घेत होतो. तसाच मी घरी गेलो. आईचा निच्छेष्ठ देह पाहून मोठ्याने रडू लागलो. मी आईविना भिकारी झालो होतो. ज्या आईने आम्हाला अंगाखांद्यावर खेळवले होते , ती गेली हे खरेच वाटत नव्हते. ती गेली आणि माझ्या शरीरातील वीजच निघून गेली होती. तिच्या कुटुंबासाठी ती झिजली होती. तिला स्वतःला काहीही मिळाले नव्हते. तिच्यासाठी मी कणकवलीत एक स्वतःचा रुम घेतला. त्यातही ती काही महिनेच राहिली. गेल्यावर्षी आम्ही गावाकडे नवीन घर बांधले. त्या घराला आम्ही ' आईचं स्वप्न ' असं नाव देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकलेलो नाही. तिने आमच्यासाठी घेतलेले कष्ट आम्ही पाचही भावंडे कधीही विसरू शकणार नाही. खरंच आपली आई नाही तर आपण भिकारीच नाही का ? 

          तुमच्याकडे सगळं असलं आणि त्यात फक्त तुमची आई नसली तर ते सगळं निरर्थकच आहे. ' प्रेमाचा पान्हा ' मुखी पाजून जाणारी आमची आई आमच्या सर्वांसाठी कायमच सर्वश्रेष्ठ असणार आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, May 5, 2021

टेस्ट ऑफ कोविड

 🟡 टेस्ट ऑफ कोविड

          शाळा सुरू होणार होत्या. त्यामुळे आम्हां सर्व शिक्षकांच्या कोविड टेस्ट होणार होत्या. सर्वांची आर. टी. पी. सी. आर. करणे शासनाने बंधनकारक केले होते. तशा ऑर्डर्स आल्या. माझा दिवस जवळ आला होता. आणि तो दिवस उजाडला. मी मनातून घाबरून गेलो होतो. मला वाटतं माझ्यासारखे सगळेजण घाबरले असतील बहुतेक. पण सगळ्यांनी मला घाबरायला होतं , म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी अशासाठी घाबरत होतो , की जर मी पॉझिटिव्ह आलो तर ? या तरचा मी जरा जास्तच विचार करत होतो. पण मनाचे बळ वाढवले आणि तपासणीसाठी ' कणकवली शासकीय विश्रामगृहात ' वेळेपेक्षा थोडा उशिराच हजर झालो. माझ्याआधी 35 शिक्षक हजर झाले होते. एवढे सगळे शिक्षक बघितल्यानंतर मी थोडा सावरलो. ज्यांचे नंबर जवळ येत होते , त्यांची तपासणी मी अधिक निरीक्षणपूर्वक बघू लागलो. हेतू हा , की बघू ते कशी प्रतिक्रिया देतात ते !!! 

          नंबर आला की प्रत्येक शिक्षक बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसत असत. बसलेल्या शिक्षकाच्या नाकात एक लांबलचक बारीक टोकदार हिरासारखी काडी घालत असत. मला नाकात जरा धूळ गेली तरी शिंक यायची सवय. आता कसे होणार ? माझा नंबर येईपर्यंत प्रत्येकजण आपली मान त्रासदायक हलवताना दिसत होता. दुखत असले तरी दुखत नाही म्हणून सांगत होता. 

          शेवटी एकदाचा माझा नंबर आला. मी खुर्चीवर बसलो. माझे नाक त्यांच्या ताब्यात दिले. कोविड टेस्ट काडीने माझ्या नाकात प्रवेश केला. काडी जरा वेळ आतल्या आत वळवळली. पुन्हा बाहेर आली. तोपर्यंत मी श्वास रोखून होतो. टेस्ट काडी नाकाच्या खूप आत गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून येणारे पाणी मी रोखू शकलो नाही. चला ... काडी बाहेर आल्यानंतर ' सुटलो एकदाचे ' असे म्हणत बाहेर पडलो आणि गाडीवर बसेपर्यंत पुन्हा एक शंका भेडसावत राहिली होती. माझा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला तर ? .... दोन ते तीन दिवस घरच्या घरी विलगिकरण करून राहिलो. रिपोर्ट दोन दिवसांनी समजला आणि जीव भांड्यात पडला. रिपोर्ट निगेटिव्ह होता ना !! आपल्या जीवनात बाकी सगळं पॉझिटिव्ह व्हायला लागतं ...... फक्त कोविड रिपोर्ट तेवढा निगेटिव्ह आला म्हणजे झाले. घरातली मंडळी खुश झालीच , पण त्याहीपेक्षा जास्त खुश शाळेकडची मंडळी झाली. असो. 

          त्यानंतर शाळा सुरू झाली. खूप चांगले दिवस पुन्हा सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करता येऊ लागले होते. विद्यार्थी तर कमालीचे खुश झाले होते. शाळेची वेळ तीन तासांची असल्यामुळे तर त्यांना लवकर शाळा सुटण्याचा आनंद घेता येत होता. आणि लवकरच दुसरी कोविड लाट येते आहे असे कळले. पुन्हा लॉकडाऊनची घंटा मोठ्याने वाजली. आता ठरवले कोविडची लस घ्यायची. 

          नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ' कोविड लस ' घेण्यासाठी दाखल झालो. लहानपणी इंजेक्शन घेणे माझ्या जीवावर येई. पण आता स्वतःहून इंजेक्शन घेण्यासाठी आलो होतो. इथेही नंबर सिस्टीम होतीच. पण सुदैवाने लवकर नंबर लागला. मी आणि माझे मुख्याध्यापक दोघेही एकाच दिवशी लस घ्यायला गेलो होतो. डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य होते. जयंती साजरी करून येताना इंजेक्शन घ्यायचे महत्त्वाचे कार्य करायचे होते. 

          इंजेक्शनची नोंदणी झाली. परिचारिका मॅडमनी इंजेक्शन हळुवार टोचले होते. त्यानंतर अर्धा तास विश्रांती घेऊन घरी गेलो. कोणताही त्रास होत नव्हता ही चांगली गोष्ट होती. दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर ' पॅरिसिटीमॉल ' गोळी घेतली होती. रात्री मस्त झोपलो. मध्यरात्री अचानक तापाने फणफणायला झालं. रात्री 1 वाजल्यापासून झोपच गेली. सगळं अंग मोडून आलं होतं. पूर्वी माझी आई अंग दुखत असलं की म्हणायची , " माझं अंग पुवासारखं   दुखतंय ". मला त्यावेळी हसू यायचं. आज माझी तीच अवस्था झाली होती. म्हणतात ना ... जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. 

          सकाळी अंथरुणातून उठलो. हात पाय धुवून घेतले. डोकं जड झालं होतं. ताप होताच. बाहेर ढगाळ वातावरण असल्यामुळे मला सगळीकडे निळं निळं दिसू लागलं. मी खूपच बेजार झालो. इंजेक्शन घेतल्यानंतर हा त्रास होणार असे मला सांगण्यात आले होतेच. पुन्हा गोळी घेतली तसे साधारण बरे वाटू लागले. पण उत्साही अजिबात वाटत नव्हते. रोज मोबाईल , लॅपटॉप किंवा पुस्तक समोर घेऊन बसणारा मी ..... बाबांना माझे यातले काहीच बघायला मिळत नव्हते म्हणून ते विशेष घाबरले होते. तिसऱ्या दिवशी मात्र मी पूर्वस्थितीत आलो. तरीही डोकं जड होतच. म्हणून माझ्या मेहुण्याच्या साखरपुड्यालाही जाऊ शकलो नव्हतो.

          आता चेकपोस्ट ऑर्डर आल्यामुळे दोन दिवस चेकपोस्टवर काम करत असताना तिथला एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. पुन्हा माझी पाचावर धारण बसली. आपण त्यांच्या संपर्कात तर आलो नाही ना ? शंका आली म्हणून त्याच दिवशी रॅपिड टेस्ट करून घेतली. तीही निगेटिव्ह आली. सुखावलो. पुनश्च ड्युटी जॉईन केली. आता ड्युटी करत असताना कुठेही स्पर्श झाला तरी सॅनिटायझर लावण्याचे काम करतोय. भीती कायमच पाठीमागून येत असलेली. पण काहीही झाले तरी आपण आपली काळजी घेण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. कोविडसह जगायला शिकायला हवं. कारण हा राक्षस कधी जाईल हे आज या वक्ताला तरी सांगता येणं शक्य नाही. लस घेतली तरी काळजी घ्यायलाच हवी. आणि हे ही खरेच की ' काळ ' जी काळजी घेतो ती खरी काळजी !! नाही का ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



सहांचा सहवास

 🟢 सहांचा सहवास

          आज चेकपोस्ट ड्युटीवरचा आमच्या पथकाचा शेवटचा दिवस ( पुढची ऑर्डर येईपर्यंत तरी ). गेले 12 दिवस ड्युटी करत असताना आमच्या पथकातील आम्ही सहा जण. मला दोन दिवसांनंतर पथक प्रमुख करण्यात आलं. माझ्यासोबत काम करणारे इतर पाचजण. माझे मित्र प्रशांत कुडतरकर , मंगेश खांबाळकर , अनिल खोत , सुनिल खांडेकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टर अतिग्रे मॅडम या सर्वांनी केलेलं टीमवर्क महत्त्वाचे आहे. आम्ही शिक्षक वर्ग एकाच केंद्रातील असल्यामुळे आधीपासूनच ओळख होती. पण डॉ. अतिग्रे यांची नव्याने ओळख झालेली. शिक्षणक्षेत्रात काम करत असताना आम्ही शिक्षक बऱ्याचदा एकत्र येतो. पण आरोग्य कर्मचारी, डॉक्टर , पोलीस यांचा सहवास खूप कमी प्रमाणात लाभतो. 

          गेल्यावर्षी महिनाभर कोरोना योद्धा म्हणून काम केलेले होतं. तो ही अनुभव गाठीशी होताच. पण प्रत्येकवेळी टीम बदलते. अर्थात कामाची पद्धतही टीमनुसार कमी जास्त प्रमाणात बदलतेच. वरून ऑर्डर येतात त्याचीच अंमलबजावणी करायची असते. तरीही दिलेली ऑर्डर फॉलो करत कर्तव्यभावनेने काम करणारी माणसं भेटली की काम करायलासुद्धा जोश येतो. 

          शिक्षकांना अशा कामांची शासनाने सवयच लावलेली आहे. जे काम इतर कर्मचारी करू शकणार नाहीत , ते काम शिक्षक नक्कीच इमाने इतबारे पूर्ण करताना मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. घरात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतानाही ' ड्युटी फर्स्ट ' म्हणत कामावर हसतमुखाने हजर होणारी माणसे पाहिली की त्यांना सॅल्युट करावेसे वाटते. 

          माझ्या पथकात काम करणारे आम्ही सहाही जण 12 दिवसांसाठी एकूण 96 तासांसाठी एकत्र आलो. सर्वजण नियमांचे काळजीपूर्वक पालन करत आहेत. तशा तिन्ही टीमच्या ड्युट्या त्रासदायकच आहेत. प्रत्येकाला येताना किंवा जाताना काळोख मिळतो. सलग आठ तासांची ड्युटी असल्याने चहा, नाश्ता किंवा जेवण यांची गरज भासते. त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि शासनाने ती ऐकली. आम्हाला गरमागरम चहा आणि नाश्ता मिळू लागला. कधी कधी आमच्या पथकातील सदस्य सर्वांसाठी आईस्क्रीम , कलिंगड , खरबूज आणि बिस्किटे आणत असत. दानशूर व्यक्तींनी आम्हाला रात्रीचे जेवणही देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवली शाळेच्या मुख्याध्यापिका अकिवाटे मॅडम यांनी आम्हाला एकदा थंडगार मठ्ठाही आणून दिला. जनता ढाबा यांच्याकडून दररोज संध्याकाळी चहा , नाश्ता मिळू लागला. 

          खारेपाटण हा मुख्य चेकपोस्ट असल्यामुळे येथे खूपच अलर्ट राहावे लागते. पोलीस आपली कामे निरंतर करताना दिसतात. पोलीस येथे पोलीस कमी आणि पोलिसातील माणूस म्हणून जास्त वागताना दिसतात. शेवटी पोलीस हा एक माणूसच आहे. त्यालाही भावना असतात. त्यांना दिलेले काम ते करत असतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काही खूप कडक वाटतात , पण त्यांच्या सहवासात गेल्यानंतर ते किती प्रेमळ आहेत याची प्रचिती मला प्रत्यक्ष आली आहे. बारा बारा तास ड्युटी करूनही ते आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य स्वस्थ ठेवत आहेत हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना कडक शिस्तीतच राहावे लागते , त्याला ते तरी बिचारे काय करणार !!!

          येणारे लोक विविध परिसरातून आलेले असतात. त्यांची भाषाही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधावा लागतो. आमचे सर्व सदस्य त्यांच्याशी अदबीने बोलताना दिसत होते. प्रवाश्यांच्या भावना दुखवू नका , असे आमच्या आदेशातच नमूद केलेले असले तरी आमचे सदस्य त्यांच्याशी असे बोलत की जाताना त्यांनी आम्हाला थॅंक्यु म्हणावे. 

          काल एक कर्करोगाने पीडित पेशंट डेरवणपर्यंत गेला. त्यांच्या कुटुंबाने मोठी रिस्क घेऊन त्यांना डेरवणपर्यंत घेऊन गेले. पण त्या रुग्णाचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने उपचार न घेताच परत यावे लागले. कोणाचे नातेवाईक मृत्यू पावत आहेत , त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडबडीने त्यांना जावे लागत आहे. जात असताना आमचा तपासणीचा ससेमिरा त्यांच्याही मागे आहेच. पण ही माणसे काही आमची शत्रू नाहीत , की आले की आम्ही त्यांच्यावर गृह विलगिकरणाचा शिक्का मारतोय. आम्हाला जे काम दिलेले आहे ते करणे आम्हाला भाग आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांच्या जर भावना दुखावल्या जात असतील तर आमचाही नाईलाज आहे. 

          काही माणसे उगीचच फिरत असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठीही अशी शिस्त गरजेची आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे त्याला प्रतिबंध बसावा हाच हेतू शासनाचा आहे , पण लोकांना त्याचे गांभीर्य नसले तर असेच घडणार ना ? 

          चेकपोस्टवर दररोज सॅनिटायझेशन, मास्क , सफाई आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची विचारपूस करण्यात येत होती. पण काहीही झाले तरी येणाऱ्या माणसांपासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांची माहिती घेणे तसे रिस्कीच काम आहे. जे काम करतात त्यांना काम करण्याचा अनुभव असतो. म्हणून ते कायमच सजगपणे पुढील ऑर्डर आली तरीही कामावर हजर होत राहतात. सर्वांना समान संधी मिळाली तर चांगलेच झाले असते. पण ज्यांना धोका पोहोचू शकतो , त्यांना अशा प्रकारे डेंजर झोन मध्ये काम करताना त्रास झाला तर ? हाही विचार करावा लागतो. आरोग्य खात्यातील महिला कर्मचारी ज्यावेळी रात्री उशिरापर्यंत ड्युटी करताना पाहून त्यांनाही सलाम करावासा वाटतो. 

          गेले 12 दिवस लाभलेला सहा जणांचा सहवास म्हणूनच अविस्मरणीय असाच आहे. कोणतेही शासकीय काम करत असताना अशी जागृत टीम मिळणं , त्यांची निवड होणं ही त्यांच्या पुढील अधिक चांगल्या कार्यासाठी असलेला आरंभच असतो. माझ्या पथकातील माझ्या सर्व सहा सदस्यांचे विशेष आभार. आमच्या सर्व पोलीस कर्मचारी , अधिकारी , आरोग्य कर्मचारी आणि प्रसंगानुसार मिळालेल्या सर्व ज्ञात अज्ञातांचे आभार. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , ( 9881471684 )



🟢 प्रदिप मांजरेकरसर : एक शैक्षणिक दीपस्तंभ

 🟢 प्रदिप मांजरेकरसर : एक शैक्षणिक दीपस्तंभ

          बारावी झाल्यानंतर काय करावे हा आमच्यासमोर प्रश्न होता. बऱ्याच विचारमंथनानंतर डीएड करण्याविषयी ठरले. त्याचवर्षी बारावीनंतर डीएड सुरू झाले होते. आमचे मार्क्स बऱ्यापैकी असल्यामुळे आम्हाला डीएडला प्रवेश मिळाला. 40 जागांमध्ये आमचे सिलेक्शन झाले. 

          40 पैकी 40 विद्यार्थी अत्युच्च गुण असलेले होते. त्यातील काही ग्रॅज्युएट झालेले होते. ते सर्व आमचे दादा आणि ताई होते. पण 40 पैकी 40 क्लासमेट्स असल्यामुळे आम्ही एकमेकांना नावानेच हाक मारत असू. 

          सहदेव पालकर, स्मिता निमणकर , योगिता उपरकर , प्रदीप मांजरेकर , संतोष लाड , अरुणा माळवदे , रविंद्र कुडतरकर , दशरथ सावंत असे अतिशय हुशार पदवीधर आम्हाला क्लासमेट म्हणून लाभले. अजूनही होते , पण आता जेवढे आठवले तेवढे सांगितले. सर्वजण त्यांच्या शाखेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले होते. या सर्वांनी महाविद्यालयीन जीवन अनुभवलेले होते. त्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेतानाचे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. आम्ही मात्र नुकतेच ज्युनिअर कॉलेजमधून महाविद्यालयात पदार्पण केले होते. 

          आम्हाला या मोठ्या अनुभवी मित्र मैत्रिणींचा आधार होता. पहिले एक दोन महिने आम्ही गप्पच होतो. पण हळूहळू आमचे महाविद्यालयीन जीवन खऱ्या अर्थाने सुरू झाले होते. 

          आमच्या वर्गातील मांजरेकरांचा ' प्रदीप ' आमचा नेता होता. तो दररोज काहीतरी नवीन संकल्पना सांगत असे. डीएड प्रशासनास विरोध करण्याची क्षमता त्याच्या शब्दात होती. अन्याय कधीही सहन करायचा नाही असे त्याचे कायमच म्हणणे असते. त्याच्याकडून आम्ही बरेच काही शिकलो. अर्थात सगळ्यांकडूनच आम्हाला शिकता आले , पण त्याच्याकडून जरा जास्तच शिकलो. 

          आत्मविश्वासाने लढा देण्याचे सामर्थ्य त्यानेच आमच्यात आणले. त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली आणि आम्ही ती नाही केली असे कधी झाले नाही. त्याला आम्ही कधीही विरोध केला नाही. त्याचा विरोध बरोबर होता हे आम्हाला समजत होते , कळत होते , पण वळत नव्हते. कारण आम्ही घाबरट होतो. आमचा हा भित्रेपणा त्याने लवकरच घालवला. त्याच्या शब्दांनी आमच्यात वीरश्री संचारत असे. तो आमच्यासाठी कायमच आदर्श असणार आहे. आता त्याला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 

          त्याचे विचार परखड असतात. त्याने आम्हा सगळ्यांच्यात आपले विचार पेरले होते. दोन वर्षातील डीएड कालावधीत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन केले आणि प्रदीपने आम्हाला अनुभवांचे शिक्षण दिले. तो आमच्यापेक्षा वयाने आणि ज्ञानानेही कायमच मोठा होता आणि असणार आहे. 

          आपल्या जिल्हयातील आणि परजिल्ह्यातील असे आम्ही 40 मित्र मैत्रिणी विचारांनी एकत्र बांधले गेलो होतो. आज हे सगळे मित्र आणि मैत्रिणी विविध जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून आपले कर्तव्य प्रभावीपणे बजावताना दिसत आहेत. 

          ' कॉमन ऑफ ' हा आमच्या वर्गाचा एक ट्रेंड बनला होता. त्यामुळे तर आमचा प्रदीप संपूर्ण कणकवलीत प्रसिद्द झाला होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे , या एका वाक्यावर आमच्या क्लासमेट्सनी 5 ते 6 तरी कॉमन ऑफ घेतले असतील. प्रशासन एखादा त्रासदायक नियम आमच्यावर लादत आहे असे समजले की दुसऱ्या दिवशी त्यांना कल्पना देऊन ' कॉमन ऑफ ' होत असे. कॉमन ऑफ म्हणजे आम्ही घेतलेली सामुहिक सुट्टी असे. या सामूहिक सुट्टीची संकल्पना आम्हाला नवीनच होती. 

          आज आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ नसलो तरी आठवणींच्या रूपाने नेहमीच जवळ आहोत. प्रदीपला सगळे ' पदो ' किंवा ' पदया ' म्हणतात. डीएड कॉलेजची आठवण आली की आम्हाला आमचा कॉमन ऑफ आठवतो. आणि कॉमन ऑफ आठवला की पदोपदी आमचा प्रदीप मांजरेकर आठवतो. कित्येक वर्षानंतर Whats App आले आणि आमचा व्हाट्स अँप ग्रुप स्थापन झाला. आमच्या ग्रुपचे नावसुद्धा " कॉमन ऑफ ' ग्रुप असेच आहे , आता बोला ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , ( 9881471684 )



Tuesday, May 4, 2021

सो गया है रस्ता

 🟢 सो गया है रस्ता


          गेले दहा बारा दिवस कणकवली ते खारेपाटण प्रवास सुरू आहे. चेकपोस्ट ड्युटीच्या निमित्ताने खारेपाटण चेकपोस्टवर रुजू झाल्यापासून दुपारी साडे बारा वाजता निघतो. दोन वाजण्याच्या अगोदर चेकपोस्टवर पोचायचे असते ना !! जाताना रस्ते मोकळेच असतात. मोकळे म्हणजे उघडे. आता उघडे म्हणजे काय ? तर रस्त्यावर गाड्या तरी असायला पाहिजेत ना ? बिचारे ते या मे महिन्याच्या कडक उन्हात ताप ताप तापताहेत ..... मस्त काळे कुळकुळीत रस्ते. आता दोन बाजूंनी प्रवास सुरू झाला आहे. गाडी चालवायला आणि लवकर अपेक्षित ठिकाणी पोहोचणं सोपं झालंय अगदी. 

          गाडीचा वेग वाढवणं आपल्याच हातात असतं. तरीही वेग वाढता वाढत नाही. हेच जर शाळेत जायचं असतं तर वेग नक्कीच वाढला असता. तरीही जाताजाता शाळेकडे जाणारा रस्ता वाटेत मिळतोच. गाडी आपसूकच शाळेच्या रस्त्याला वळते. मी आपला नेहमीप्रमाणे गाडी पुढे नेत राहतो. शाळेचा आतला रस्ता सुनसान आणि चिडीचूप. फक्त मैदानातील वृक्ष रुक्षपणे उभे असलेले. खोखोचं मैदानही मुलांशिवाय खायला येत होतं. शाळेचे व्हरांडेही मुलांची वाट बघत असल्यासारखे. शाळेचे दरवाजे मला आपल्याला उघडण्यास सांगताहेत. फक्त कार्यालय उघडून मी कसातरी आत शिरतो आणि जरा वेळच बसल्यासारखे करत पुन्हा दरवाजा बंद करून टाकतो. सगळी शाळाच मला खायला येते आहे असे वाटून मी शाळेतून तसाच निघतो. गाडीचा वेग वाढलेला असतो. मी चेकपोस्ट गाठतो. 

          कोविड प्रादुर्भावामुळे घाबरून किंवा कंटाळून लोकं पुन्हा एकदा गावाकडे येत असलेली बघून रस्ता सुखावतो. आमचे चेकपोस्टवरचे कर्मचारी येणाऱ्यांची नीट नोंदणी करून घेतात. पोलीस बिचारे येणाऱ्या सर्व गाड्यांना थांबवत आहेत. बारा बारा तासांची ड्युटी करत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक वर्ग चेकपोस्टवर जीवावर उदार होऊन नोंदणीचे उत्तम प्रकारे काम करताहेत. 

          अधिकारी आणि पदाधिकारी सुद्धा काम सुरळीतपणे सुरू आहे का खात्री करत आहेत. येणारी माणसं घाबरत घाबरत प्रवास करून येत आहेत. आल्यानंतर आदरपूर्वक आपली माहिती देत आहेत. सर्व तपासणी करूनही शिक्के मारून घेऊनसुद्धा ' धन्यवाद ' असे म्हणत निघून जात आहेत. लहान मुले सुद्धा जाताना बाय बाय करत आहेत. या येणाऱ्या माणसांना बघून रस्ता खुश होत चाललाय बहुतेक. 

          दुपारी माणसं कमी असताना तो तापतोय, रात्री मात्र माणसांची संख्या वाढत चालली की तो थंडगार पडतोय. असे करता करता रात्रीचे दहा कधी वाजतात मला समजतसुद्धा नाही. मी आपली ड्युटी संपवून रात्री निघतो तेव्हा पुन्हा एकदा शांत संयत रस्त्याशी माझी गाठ पडते. नेहमी वर्दळीचा असणारा रस्ता गाड्यांची आपणहून वाट पाहताना दिसू लागतो. जाताना संचारबंदी कडक दिसून येते. वाऱ्याच्या झुळकीसह एक गाणं हळुवार कानात गुंजन करू लागतं. ' सो गया ये जहाँ ... सो गया आसमा..... सो गयी है सारी मंजिले .... सो गया है रस्ता ..... मी आपला त्या गाण्यांच्या ओळी गुणगुणत पुढे निघतो. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...