Friday, January 22, 2021

नकय नकय जावया

नकय नकय जावया


          आपण आपल्या इच्छा प्रत्येकवेळी सांगत बसत नाही. मनात ठेवून राहतो. पोटातली इच्छा ओठात येत नाही. तुमच्या ओठातून बाहेर आल्याशिवाय ती दुसऱ्यांना समजणार तरी कशी ? लहानपणापासून असेच होत राहते. इच्छा आकांक्षांची मोठीच्या मोठी लांबलचक यादी आपण आपल्यालाही कळू देत नाही एवढी लपवून ठेवतो. 

          मनात आलेली गोष्ट बोलण्याचा संकोच करत राहतो. यांना काय वाटेल ? त्यांना काय वाटेल ? असे विचार मनातल्या मनात करत राहतो आणि कधीकधी विसरुनही जातो कि आपण कोणत्या इच्छा मनात आणल्या होत्या ते !!!! काहीजण तर आपल्या इच्छा सतत मारण्याचं काम करत असतात. इच्छा असायलाच पाहिजेत. त्या चांगल्या असल्या पाहिजेत. त्या वाईटही असू शकतात. 

          वाईट इच्छा मात्र नक्कीच मारुन टाकाव्यात. त्यांना जवळ फिरकू देऊ नये. पण ज्यांना सोडायचं असतं त्याच आपण होऊन वेगाने मागे लागत असतात. त्यामुळे त्यांना सोडणंही शक्य नसतं. चांगल्या इच्छांचं सतत संवर्धन करत राहायला हवं. त्यांचं प्रबळ महत्त्वाकांक्षेत रुपांतर करायला हवं. त्या पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन तर बघा. त्या लवकरच पूर्ण होऊ लागतील. 

          अर्थात त्यासाठी आपल्याकडे कमालीचा संयम हवाच. ' इच्छा तिथे मार्ग ' असं सुवचनच आहे. इच्छाशक्ती असली तर सगळी योजलेली कार्ये हवी तशी घडू लागतात. सगळीच नाही साध्य होत , पण आपण प्रयत्न करण्यात कमी पडलो असं होऊ नये. आपण त्यांचा आपल्या गतीने पाठलाग करत राहायला हवं. कधीतरी सापडणार नक्की. आपला वेग त्या इच्छेला गाठणारा हवा. 

          नुसती इच्छा बाळगली आणि बसून वाट बघत राहिलो तर काहीच घडणार नाही. ' असेल माझा हरी , तर देईल खाटल्यावरी ' असं म्हणणारे सतत मागे राहीलेले मी पाहिले आहेत. ते सगळ्याला मुहुर्त बघत बसतात. आज शनिवार आहे म्हणून नाही करायचे अशी इच्छा बाळगतात. सगळे शनिवार फुकट घालवतात. ' न कर्त्याचा वार शनिवार ' ही म्हण त्यांना खरी करुन दाखवायची असते जणू. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच अंमलात आणा. 

          वार आणि मुहुर्त बघत बसू नका. तुम्ही जन्माला येताना मुहुर्त बघून जन्माला आलात का ? नाही ना ? मग झालं तर .... तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला सुरुवात कराल तो चांगला मुहुर्त आणि चांगला दिवस. सुरुवात करुन बघा , नको नको म्हणत वेळ दवडू नका. 

          एकदा एक जावई सासरवाडीला आले होते. त्यांच्यासाठी छान बेत केला होता. सासुबाईंनी व्हायनात ( मालवणी शब्द ) तीळ कुटून मस्त तिळकूट बनवलं होतं. जावयांच्या नाकात तो खमंग वास भरला होता. जेवायला वाढण्यात आले. जावई भरपूर जेवले. आग्रह करण्यात आला. संकोचून जावयांनी तिळकुट थोडेच खाल्ले. पण तिळकुटाची चव काही त्यांच्या चवदार जीभेवरुन जाता जाईना. सगळे झोपले. 

          जावई मात्र झोपेत जागे होते. डोळे मिटून सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहत झोपलेले. सगळे गाढ झोपलेले लक्षात येताच जावई मांजराच्या पावलांनी व्हायनसळापर्यंत वास काढत पोहोचले. जाता जाता सासुबाईंना त्यांचा पाय लागला होता. जावयांच्या ते लक्षात आले नाही. ते आपले आपल्याच तंद्रीत. व्हायन सापडले. जावयांनी योगा करायला सुरुवात केली. पोटावर झोपून ते मकरासन करु लागले. 

          सासुने हळूच उठून कानोसा घेतला. बघते तर काय ? जावई अंथरुणात नाहीत. अरे बापरे !!! आमचे जावई अंधारात चालतात कि काय असे तिला वाटले. ती त्यांच्या मागून गेली. अंधुक दिव्याच्या उजेडात स्पष्ट दिसत नव्हते. पण हालचाली जाणवत होत्या. आपले जावई रात्री योगाभ्यास करत असावेत असे तिला वाटले. तीने आणखी पुढे जाऊन बघितले. तिला मांजरासारखा चाटण्याचा आवाज आला. तिने खाली वाकून पाहिले तर तिचे जावई जमिनीला चिकटलेल्या व्हायनातील उरले सुरले तीळ चाटत होते. तिळकुटाचा आस्वाद घेत होते. सासू गालातल्या गालात हसली व परत जाऊन झोपली. 

          सकाळी सगळेजण उठले. जावईसुद्धा उठले. त्यांच्या जीभेवर अजूनही तिळकूटाची चव रेंगाळत असावी. सासूने जावयांना गमतीने म्हटले , " नकय नकय जावया , व्हायन चाटून खावया " हे ऐकताच जावयाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जावयाची पुरती फजिती झाली होती. 

          अशा अनेक घटना आपल्या जवळपास घडत असतीलही. पण इच्छा असताना नको नको म्हणणे बरे नाही. नाहीतर इच्छा उफाळून येते आणि अशी फजितीही होऊ शकते. ही एक गंमतगोष्ट आहे. घडलेली असेल किंवा नसेलही. पण कित्येक माणसं या जावयांप्रमाणे असू शकतात. त्यांनी  " कशाला , कशाला " म्हणत लाजत राहू नये. हवी असलेली वस्तू विनंती करुन थेट मागावी. कधीकधी  जेवणाच्या पंगतीमध्ये असाही आग्रह केला जातो, " लाजू नका, मागू नका , पोटभर जेवा. " आता काय जेवणार कप्पाळ !!!! जेवढ्या इच्छा दाबून ठेवाल , त्या कधीतरी उचंबळून वर येतील. आपण त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Thursday, January 21, 2021

केक आॕफ धीवर

 केक ऑफ धीवर


          वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस मस्त साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असणार. लहान मुलांना तर त्याचं किती अप्रुप !!! त्या दिवसाची तर ती आतुरतेने वाट पाहत असतात. आता तर त्यातून मोठेही सुटलेले नाहीत. अगदी म्हातारे आजोबा देखील या दिवसाची वाट पाहत असावेत. 

          पहिला वाढदिवस साजरा होत असताना मुलांना तितकेसे कळत नाही. खुप कमी जणांना आपला पहिला वाढदिवस आठवत असेल. एक वर्षाच्या वयात काहीच समज नसते. दुसऱ्या वाढदिवसापर्यंत समज आलेली असते. त्यामुळे दुसरा वाढदिवस मुले लक्षात ठेवतात. मग दरवर्षी वाढदिवस साजरा होत असताना होणारे भव्य सेलिब्रेशन त्यांना आनंदाचा उत्सवच वाटत राहतो. 

          मला वाटतं हा वाढदिवस मुलांचं एक वर्ष वाढवित असतो तसा एक वर्ष कमीही करत असतो. आपण म्हणूनच की काय तेवढया पेटत्या मेणबत्त्या विझवत जातो. जणू त्या विझत असलेल्या मेणबत्त्या आपल्याला जाणीव करुन देत असतात आपली तितकी वर्षं आयुष्यातील संपली असल्याबद्दल !!! मग कोणीतरी शक्कल लढवतात. मेणबत्त्या विझवायच्या नाहीत पेटवत जायच्या. मेणबत्या विझवल्या काय किंवा पेटवल्या काय , आयुष्य एका वर्षाने कमी झालेलं असतं. 

          हल्ली असे प्रकट दिन साजरे करण्याचं एक वेडच पसरत चाललं आहे. आमच्या लहानपणी आम्ही आमचा वाढदिवस शाळेत साजरा करत असू. तो कधीकधी वर्गापुरता मर्यादित असे. सगळ्यांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटल्या कि झाला वाढदिवस साजरा. मग सर्व शिक्षकांना पायाला हात लावून नीट वाकून नम्र होऊन नमस्कार केला जात असे. औक्षण वगैरे माहितच नव्हते. शिक्षकांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला कि आपसुक औक्षणच घडे. सर्व मुले पाच मिनिटे गोळ्या आनंदे भरीत होऊन चघळत बसत. 

          वर्गात भरपूर मुले असली तर कधीकधी दोन तीन मुलांचे एकाच दिवशी वाढदिवस असत. मग सकाळ, दुपार , संध्याकाळ तीनवेळ डॉक्टर देतात तशा गोळ्या खायला मिळत. श्रीमंतांची मुले भारिवाली चाॕकलेट्स देत. आम्हांला कधीच न मिळणारी चाॕकलेट्स त्या दिवशी खाण्याचा योग येई. मी शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरे केलेले बघितले आहेत. 

          ४५० पटसंख्या असलेल्या शाळेत असताना एखाद्या दिवशी सात आठ मुलांचे वाढदिवस असत. एक दिवस आड करुन असे वाढदिवस येत राहत. मुलांचे पालक धनवान असल्यामुळे ते मुलांना चांगल्या वस्तू घेऊन देत. रुमाल, पेन, पेन्सिल, वह्या, गोष्टीचे पुस्तक, पट्टी अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाई. माझे टेबल अशा वस्तूंनी आठवडाभरात भरुन जाई. त्यांनी दिलेल्या खाऊने पोटही भरुन जाई. वाढदिवसानिमित्त शाळेलाही ५०१ रुपये देणगी यथाशक्ति प्रत्येकाकडून मिळे. 

          आता तर काही देणगीदार आपल्या किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत स्नेहभोजन देतात. मुलांना एक दिवस गोडधोड जेवणाचा आस्वाद घेता येतो ही एक चांगली गोष्ट त्यानिमित्ताने घडून येते. मांगवली नं.१ शाळेत असताना मनिषा राव यांनी राबवलेला उपक्रम मला भावून गेलेला आहे. स्नेहभोजन , भेटवस्तूंचे वितरण, शाळेला शैक्षणिक भेट आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या पहिल्या तीन नंबरात आलेल्यांना आकर्षक बक्षिसे, रोख स्वरुपातील बक्षिसे असा त्यांचा एक दिवसीय उपक्रम दर एकोणतीस सप्टेंबर रोजी नित्य नियमाने राबवण्यात येतो हे विशेष. 

          अजय रावांचा हा मुलगा विहान ठाण्यातील काँन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतोय. पण त्याचा वाढदिवस गावातील एका शाळेत उत्सवासारखा साजरा केला जातोय हे उल्लेखनीयच आहे. वाढदिवसाला विहान, अजय राव, मनिषा राव नसले तरी विहानच्या आजी आजोबांची उपस्थिती मात्र आवर्जून असतेच असते. विहानला फक्त मुलांनी हाय केलेले व्हिडिओ पाठवले तरी त्यांच्या पालकांना समाधान होत असते. असे सेवाभावी ग्रामस्थ ज्या शाळेला मिळतील तिथल्या मुलांनी त्यांचे सतत आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळे आपल्याला जी शैक्षणिक मदत दरवर्षी मिळते आहे त्याचे मोल पैशात करता येणार नाही असेच आहे. 

          माझ्या मोठ्या मुलीचा अठरावा वाढदिवस अठरा जानेवारीला साजरा करण्यात आला होता. तो आम्ही नेहमीप्रमाणे साजरा केला. तिला खूप आनंद झाल्याचे तिने बोलूनही दाखवले. पण तिचा तिसरा वाढदिवस असतानाची घटना आहे. पहिला वाढदिवस तिच्या लक्षात नसणारच. पण बालपणातील साजरे केलेले वाढदिवस तिला नीटसे आठवत नाहीत असे तिनेच मला सांगितले. 

          मी तिला तिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या गमती सांगायला सुरुवात केली. आम्ही दोन्ही उभयता शिक्षक असल्यामुळे शाळेत गेलो होतो. शाळेचा कामाचा दिवस असल्यामुळे मला शहरात जाऊन केक आणायलाही जमले नव्हते. आम्ही पाटगांवसारख्या खेड्यात राहत होतो.    

          माझे मुख्याध्यापक खटावकरगुरुजी साळिस्त्याला राहात. ते नुकतेच त्यांच्या गावी जत्रेला गेले होते. येताना त्यांनी जत्रेतून आम्हां शिक्षकांसाठी खाऊ आणला होता. खाऊ म्हणजे काहीतरी पिवळ्या रंगाची जाड चकतीसारखी मिठाई होती असे दिसत होते. मी पहिल्यांदा तो पदार्थ पाहात होतो. मी सरांना त्या पदार्थाचे नाव विचारले. त्यांनी त्याचे नांव ' धीवर ' असे सांगितले. 

          मी धीवर पक्ष्याला नदीत सूर मारुन मासा पकडून उडताना पाहिले होते. आज हा नवीनच धीवर बघत होतो. मी तो धीवर पिशवीत जपून ठेवला घरी नेण्यासाठी. संध्याकाळी शाळा सुटली. साडे पाच वाजले होते. मी तळेरे येथे जाऊन केक आणायचा कंटाळा केला होता. 

          घरी पाटगांवला आलो. बायकोने केक आणलात काय विचारले. मी केक आणल्याचे खोटेच सांगितले. हळूच पिशवीतून धीवर काढून बायकोला दाखवत म्हणालो, " अगं, आज आपण या धीवरलाच केक बनवायचा !! " तेवढ्यात मुलगी धावतच मला मिठी मारायला आली होती. तिला तिचा वाढदिवस समजला होता. तिनेही केकबद्दल विचारले. मी तिला नंतर दाखवतो असे सांगून वेळ मारुन नेली. रात्री आठ वाजता आम्ही घरातले सगळे एकत्र जमलो. टीपाॕयवर धीवरला ठेवले. मुलीला तो केकच वाटला. तिला तो आगळा वेगळा केक आवडला होता. तिला तो कापायला सांगितला. तिला कापता येईना. म्हणून मी तिचा चिमुकला हात धरुन तो ताठ असलेला ' केक ऑफ धीवर ' जोर लावून कापला. छोटा तुकडा तोंडात भरवून तिला ' हॕप्पी बर्थ डै टू यु ' म्हटले. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता. 

          त्यानंतर तिचे अनेक वाढदिवस साजरे केले. पण तो छोटेपणातला आनंद आताच्या मोठेपणातील आनंदापेक्षा नक्कीच भाव खाऊन गेल्याचे आजही मला प्रकर्षाने जाणवते. तो क्षण माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आता विरळाच.


©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )

Monday, January 18, 2021

मी दारु पितो

मी दारु पितो


          मी वयाच्या १४ वर्षापासून आमच्या सलूनमध्ये काम करायला लागलो होतो. एकाच दुकानात दोन व्यवसाय सुरु होते. सलून आणि शिवणकाम. बाबा उत्तम टेलरकाम शिकले होते. सलूनकाम नसताना बाबांचे टेलरिंग सुरु असे. सर्व प्रकारचे कपडे स्वतः कापून ते शिवण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केले होते. आई शिवणकाम करायची. खूप काम असताना घरातले काम संपवून ती दुकानात येऊन शिवणकाम करत बसे. मी पोटात असताना सुद्धा तिने बाळंत होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत काम केल्याचे बाबा सांगतात. 

          आता गरोदरपणात सलग नऊ महिने बेडरेस्ट करण्याची प्रथा सुरु झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे सिझर होण्याचे प्रमाण वाढले असावे. पुढे कधीतरी नॉर्मल बाळंतपण हा दुर्मिळ योग समजला जाऊ शकेल. 

          दुकानात गिऱ्हाईक आले कि त्यांच्या दाढीला गरगरीत साबण लावण्याचे काम माझे असे. उंची नाही पुरली तरी शरीराचा पूर्ण झोका देऊन मी साबण लावण्याचे काम उत्साहाने करी. कधीकधी साबण गिऱ्हाईकांच्या तोंडात जाई. पण बिचारी गिऱ्हाईके सहनशील होती. ती म्हणत, " कर काय ते ?  पण शिक. " त्या गिऱ्हाईकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी शिकत गेलो. काही वयस्कर गिऱ्हाईकांचे चेहरे गाल आत गेलेले, हाडे बाहेर आलेले असत. त्यांची दाढी करणे अवघडच काम. 

          लोकांच्या तोंडाला नेहमी हे वाक्य मी ऐकलेले आहे , " काय करत होतास हजामती ? " " हजामत करायची नाहीय. " " हजाम आहेस काय ? " बोलणारे सहज बोलून जातात पण तो धंदा करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींना नक्कीच आश्चर्य वाटते. कारण हजामत करणे एवढी सोपी गोष्ट आहे काय ? मला अवघड वाटलेली गोष्ट लोकांना सोपी कशी वाटते कोण जाणे ? पण कोणालाही जातीवरुन बोलणे बरोबर नाही हे मला लहानापासूनच कळले. आपल्या मनाला लागते तर ते दुसऱ्यांच्या मनालाही लागणारच ना !!! कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचाही विचार करायला हवा. 

          त्या दिवशी दाढी करायला म्हाडेश्वर आले होते. त्यांची दाढी वस्तरा पाजळून करावी लागे. वस्तरा पाजळणे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या दगडावर धार काढून मग तो चामड्याच्या पट्ट्यावर ' खणखणे ' पर्यंत घासणे. त्यात पाच मिनिटे जात. मला बाबांनी वस्तरा पाजळायला दिला. मी मस्तपैकी पाजळला. तो लखलखेपर्यंत. दाढीला गरगरीत साबण लावून दाढी करायला सुरवात केली. दाढीचे केस तुटता तुटत नव्हते. मला घाम आला. 

          बाबा मशिनवरुन उठले आणि त्यांनी दाढी पूर्ण केली. नंतर बरेचदा मी त्यांची दाढी घोटूनघोटून केल्याचे मला अजूनही चांगलेच आठवतेय. ते निघून गेले आणि त्यांच्यामागून आलेले गिऱ्हाईक म्हाडेश्वरांबद्दल बोलू लागले. ते म्हणाले , " हे म्हाडेश्वर रोज दारु पितात, मला माहित आहे." बाबांना हे खरे वाटेना. कारण बाबा त्यांना बरीच वर्षे ओळखत होते. त्यांना त्यांच्याबद्दल यत्किंचितही शंका आली नव्हती. 

          याच म्हाडेश्वरांच्या मुलाने काही कारणास्तव राॕकेल अंगावर ओतून पेटवून स्वतः आत्महत्या केली होती. त्यानंतर ते पुरते कोलमडून गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे भारीवाले सगळे कपडे आमच्या बाबांना आणून दिले होते. बाबांनी मग ते काही आपल्या भावांना तर काही गरजू व्यक्तींना वाटलेही होते. एखाद्या मुलाने वडिल असताना आत्महत्या केली असेल तर ते वडिल एवढे हतबल होतात कि ते रोजच मरणाची वाट पाहत मरत असतात. ते मरणच जगत होते. 

          चार पाच दिवसांनंतर पुन्हा ते आले. दाढी करता करता बाबांनीच विषय काढला. बाबा म्हणाले , " अहो म्हाडेश्वर , एका माणसाबद्दल मला एवढा विश्वास आहे कि तो माणूस कधीच दारु पित नाही असे मला वाटते , मला त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याने दारु पितात असे सांगितले तर मी विश्वास कसा ठेवायचा ? मला पडलेले हे कोडे आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा." म्हाडेश्वर खूप हुशार होते. ते काहीही उत्तर न देता निघून गेले होते. दोन तीन दिवसांनंतर दाढी करायला आले. दाढी करुन झाली. त्यांनी आपले तोंड उघडून बाबांच्या नाकाकडे नेले व दीर्घ श्वास सोडून म्हणाले , " मी दारु पितो." बाबांनी दारुचा वास ओळखला आणि त्यांना म्हाडेश्वरांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले होते. 

          असे हे म्हाडेश्वर आता या जगात हयात नसले तरीही म्हाडेश्वरांसारखी अशी कितीतरी माणसे आढळतील, जी आपली दुःखे विसरण्यासाठी असा मार्ग अवलंबतात. त्याने दुःख कमी होते कि नाही समजायला मार्ग नाही. काहीही झाले तरी दारु हा काही दुःख विसरण्याचा सर्वोत्तम मार्ग नाहीच नाही, मग तो इतरांनी तरी का अवलंबायचा ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



नीज माझ्या नंदलाली

नीज माझ्या नंदलाली


          लहान मुलांना झोपवणं हे तसं अवघड काम. पण मनात आणलं आणि आवड असली तर तसं सोपंसुद्धा. प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावर ते अवलंबून असू शकतं. पण लहान मुलंसुद्धा अश्शी असतात अगदी !!! काहीही करा एकदा रडायला सुरुवात केली तर थांबता थांबत नाहीत. त्यांना कितीही आंजारा, कितीही गोंजारा. त्यांच्या मम्मीने घेईपर्यंत तोंड गप्प करणारच नाहीत. 

          माझंही तसंच झालं होतं. छकुलीला मी लहानपणापासून माझीच सवय लावली होती. दुपट्ट्यामध्ये गुंडाळून ठेवण्यापासून तिची शिशू काढण्यापर्यंत मी आनंदाने तिचे सर्वकाही करत होतो. अंगावर पिण्यापुरतीच ती मम्मीकडे जात असे. मला तिच्या सहवासात राहायला आवडे आणि तिला माझ्या. गोरीगोमटी गोंडस छकुली छान हसे. तिचे हास्य मला खुलवी. 

          तिच्या मम्मीच्या दुःखद निधनानंतर तिला सांभाळणे एक दिव्यच होते. शाळेत गेलो कि तिला माझी आई आणि छोटी बहिण छान सांभाळत. पण ती माझीच वाट बघत बसे. पप्पा कधी येणार असे विचारत राही. मी शाळेतून येताना बघितले कि धावत धावत माझ्या अंगावर येई. मी सुद्धा तिला आधी घेऊन तिचे समाधान झाल्यानंतरच हात पाय धुवायला जाई. तिला खाऊची गरज नसे पण माझी गरज असे. मी मग तिच्याशी बोलत राही. माझे बोलणे तिला इतके आवडे कि तीही तिच्या सगळ्या गोष्टी मला सांगत राही. 

          आता ती मोठी म्हणजे अठरा वर्षांची झाली आहे तरीही ती सगळ्या गोष्टी माझ्याकडे शेअर करते. रत्नागिरीला होस्टेलवर असताना मागील दोन वर्षे दरदिवशी रात्री नऊ ते साडेनऊ आमचा बोलण्याचा अर्धा तास असे. आता घरी आहे तर कधीकधी एवढेही बोलता येत नाही , तर ती माझ्यावर नाराजही होते. तिचे बरोबर आहे. आपल्या मुलांसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. अर्थात घरातल्या सगळ्यांसाठी वेळ दिला पाहिजे. घरातले सगळेजण माझ्याबरोबर बोलायला नेहमीच आतुर झालेले असतात. पण मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही माझी चुक आहे. या चुकीचे समर्थन मी सुद्धा करणार नाही. 

          आपण जे करतो ते आपल्या मुलांसाठीच ना ? आपल्या कुटुंबासाठीच ना ? मग त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवायला नको का ? त्यांना काहीही नको असते, फक्त आपला अमूल्य वेळच हवा असतो आणि तो आपल्याकडे नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळ आपण मुलांसाठी, पत्नीसाठी, पतीसाठी, आईबाबांसाठी देऊ शकतो. फक्त ते मनात हवे. कधीकधी खुप काम असते. बोलायला , जेवायलाही वेळ नसतो. पण घरातले सर्व आपल्याला समजून घेतात ही माझ्यासाठी घेण्यासारखी गोष्ट असते. आपण आपले आपल्याच विश्वात दंग असतो. त्या विश्वाच्या कोशातून बाहेर यायला शिकायला हवे. 

          मी रोज रात्री माझ्या छकुलीला मांडीवर घेऊन बालगीते म्हणायचो. मला येणारी सगळी बालगीते संपली तरी ती कधीकधी झोपत नसे. आता दुसरं म्हणा , असं म्हणून मला गायला लावी. मग मी शक्कल लढवली. माझ्याकडे टेपरेकॉर्डर होता. त्यात बालगीतांची कॅसेट लावून ठेवू लागलो. अचानक लाईट गेली तर पुन्हा मलाच म्हणावी लागत. मांडीवर झोके देत , थापटवत असताना मग मलाही आणि तिलाही झोप येई. हे आता रोज रात्रीचे चालले होते.   

          तिच्या सगळी गाणी पाठांतर झाली होती. नंतर तर तीच मला म्हणून दाखवी. माझ्या कुशीत घट्ट मिठी मारुन झोपताना माझी बोटे ती आपल्या चिमुकल्या बोटांनी तितकीच घट्ट पकडून ठेवी. मध्यरात्री उठलो तरी तिची घट्ट इवली मुठ सोडताना तिला जाग कशी येई देव जाणे ? 

          आता माझ्या तिन्ही मुली मला माझ्या मुलाप्रमाणेच आहेत. दुसरी मुलगी गुड्डी आणि तिसरी उर्मी या दोन्ही मुली अगदी छकुलीच्या बालरुपातीलच आहेत. तिन्हींचे मेतकूट इतके छान जमते कि त्यांना एकत्र हसता,भांडताना , खेळताना बघून मी जगातील एक सुखी बाबा असल्याचा अनुभव घेत राहतो. कोणीही आपल्या मुलींना कधीच कमी मानू नका. रचनाकारांनी गाणीसुद्धा मुलांचीच बनवलेली आहेत. आपण ती बदलून मुलींची करुन म्हणावीत. जसे मी म्हणतो , " नीज माझ्या नंदलाली, नंदलाली गं ! ! ! !  "


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 16, 2021

असा तरी कित्या

 असा तरी कित्या


          त्यावेळी शालेय पोषण आहाराचे वाटप वस्तुरुपात करण्यात येई. फक्त तांदळाचे वाटप होई. दर महिन्याला एका मुलाला तीन किलो तांदुळ मिळत. पहिली ते चौथी पर्यंत शाळा असल्याने प्रत्येक मुलाला दर दिवसाला शंभर ग्रॕमप्रमाणे पोषण आहार म्हणजेसुद्धा सरकारने तळागाळातील गरीब मुलांसाठी केलेली दैनंदिन मदतच होती. 

          आमच्या लहानपणी असे काही मिळत नसे, शिक्षण मात्र रोजच्या रोज पोट भरुन मिळे. त्या शिक्षणावरच आमचे बालपण संस्कारीत होत गेले. नंतर सुगंधी दुध मिळू लागले. ते ही मुले आवडीने पित असत. त्याची चव वेगळीच असे. मग कधी कधी सुकडी मिळे. तिचे लाडू करुनही दिले जात. आता सगळ्या मुलांची मज्जा आहे. दुपारी माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गरमागरम तयार भोजन दिले जाते. शाळेत डबा नेण्याचीही गरज नाही. 

          सध्या शाळा सुरु नाही म्हणून सर्व मुलांना पालकांमार्फत तांदुळ, तुरडाळ, मटकी, मुग, चवळी दरमहा दिली जाते हेही शासनाचे उपकारच आहेत. मोफत पुस्तके दरवर्षी मिळतात. तयार गणवेश मिळतात. पूर्वी एवढं काही मिळत नसे. उलट त्यावेळी आम्हाला त्याची खरी गरज होती. आता सर्व काही मोफत मिळते म्हणून त्या गोष्टींची किंमत कमी झाली आहे असे वाटत राहते. 

          पूर्वी आम्ही एक पुस्तक संच मोठ्या भावंडांपासून छोट्या भावंडांपर्यंत वापरत असू. आता सहा महिन्यातच नवीन पुस्तकसंच फाटलेला दिसून येतो. फुकट मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते हेच खरं !! माझी शाळा एकशिक्षकी होती. शिपायापासून सर्व कामे मलाच करावी लागत. 

          सर्व मराठी शाळेतील आजचे शिक्षक हे काम करत आहेत. मुलांचे हित लक्षात घेऊन सगळी कामे करत आहेत. ही कामे करता करता त्यातून वेळ मिळाला तर शिकवण्याचेही काम करत आहेत. रात्र थोडी नि सोंगे फार ,  अशी गत झाली तरी बिचारा शिक्षक प्रामाणिकपणे शिक्षणाची गाडी जोमाने हाकताना दिसत आहे. नवनवीन तंत्रज्ञान , ऑनलाईन कामे करुन अध्यापनाची विविध तंत्रे शिकत सतत अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करत आहे. यातील प्रत्येकाचा वेग कमी जास्त असू शकतो. पण प्रत्येकाला मर्यादा असतात, तशाच त्या शिक्षकालाही आहेत. सर्वजण सेम टू सेम काम करुन दाखवू शकत नाहीत. पण सर्वजण आपली पूर्ण कार्यक्षमता आपापल्या परीने वापरत आहेत हे नक्की. 

          माझ्या शाळेत त्यावेळी चार वर्गात एकूण सतरा विद्यार्थी होते. मी एकटाच सर्व वर्ग शिकवत होतो. संध्याकाळपर्यंत शिकवून संपत नव्हते. दररोज १४ ते १५ विषय हाताळण्याची कधी कधी कसरत करावी लागत होती. एकशिक्षकी शाळेत शिकवणारे सर्वच शिक्षक असं करत असताना मी बघितले आहे. सातवीपर्यंत दोन शिक्षकी असणाऱ्या शाळांमध्ये सेम कसरत करावी लागते. कामगिरी शिक्षक आलेच तर त्यांना दोन्ही ठिकाणची जबाबदारी पार पाडतानाही पाहिले आहे. 

          एकूण काय तर  मुले कमी असली तरी कसरती तितक्याच. लोकांना मात्र पगाराचे आकडे दिसतात. त्यांना कामाचे स्वरुप दिसत नाही. बोलण्यासाठी मुद्दे भरपूर सापडतात. असो. काहीही झाले तरी हा संघर्ष सुरुच राहणार असे दिसते आहे. 

          तांदळाच्या पिशव्या नुकत्याच प्राप्त झाल्या होत्या. मी मुलांच्या हजेरीनुसार मागणी केली होती. त्यातील दोन मुले दोन महिने मुंबईला गेली होती. त्यांची रितसर गैरहजेरी लावली होती. दिपक आणि संदीप या दोन मुलांना तांदळाच्या पिशव्या दिल्या गेल्या नाहीत. ती मुले माझ्याकडे तांदुळ मागू लागली. मी त्यांना त्यांच्या गैरहजेरीचे कारण सांगितले. त्यांना ते समजले. पण सर्व मुलांना तांदळाच्या पिशव्या मिळाल्या , आम्हाला आमच्या गैरहजेरीमुळे मिळाल्या नाहीत याचे त्यांना वाईट वाटलेले दिसत होते. 

          सर्व मुलांनी तांदळाच्या पिशव्या दप्तरात भरल्या होत्या. काहींनी दप्तराजवळ ठेवल्या होत्या. या दोघांची नजर फिरुन फिरुन त्या तांदळांवरुन जाताना दिसत होती. शाळा सुटली.मुले घरी गेली.शेजारच्या मुलांनी आपले दप्तर भरभरुन आणल्याचे त्या दोन मुलांच्या माऊलीने पाहिले. सगळ्यांना तांदुळ मिळाले आणि माझ्या मुलांना अजिबात नाही म्हणून तिला मुलांचा राग आला. तिने मुलांना मार मार मारले. 

          दुसऱ्या दिवशी तिने त्या मुलांमार्फत मला चिठ्ठी पाठवून दिली. मी चकितच झालो. चिठ्ठी उघडून वाचू लागलो. चिठ्ठीत मालवणी भाषेत लिहिले होते , " सगल्या पोरांना तांदूल घावले , माज्या लेकांका नाय घावले , असा तरी कित्या ??? " मला चिठ्ठी वाचून खूप हसायला आले. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगितले तेव्हा तिला पटले. ती म्हणाली, " गुर्जी, सांगलास ता बरा झाला, आता मी माज्या दोनक लेकांका घराकडे ठेवचंय नाय , रोज शालेत पाठवतलंय , बघतंय मी तुमी तांदूल कसे देयत नाय ते "  

          मी घरी आलो आणि ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर तेही मला खोखो हसत म्हणायला लागले , " असा तरी कित्या ? "


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Friday, January 15, 2021

मी अजून जिवंत आहे

 मी अजून जिवंत आहे


        वडीलधारी माणसे आपल्यापेक्षा अधिक पावसाळे बघितलेली असतात. त्यांना सर्व काही समजत असते. त्यांनी अनुभव घेत असताना त्यांना अनेकदा ठेच लागलेली असते. पुढच्यांना ठेच लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे मोठी माणसे सतत लहानांना सल्ला द्यायची एकही संधी सोडत नाहीत. 

          ह्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा कनिष्ठांवर विश्वास कमीत कमी दिसून येतो. कनिष्ठ कायमच कनिष्ठच राहतात. किंवा त्यांच्यावर कुणीही श्रेष्ठ नसले तर तेही श्रेष्ठ होऊन जातात. आपल्यापेक्षा लहानांना सगळ्या गोष्टींबद्दल बारीकसारीक सांगत राहून नकोसे करुन सोडतात. 

          मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही कि सगळ्याच गोष्टी मोठ्यांना विचारुनच कराव्यात. आपण आपल्या मनाने कधी घेणार निर्णय ?  मोठे म्हणतात , "  हे करु नको, ते करु नको." न विचारता केले तर म्हणतील, " आमचं ऐकत नाही ना ?  म्हणून असं होतं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. "  

          चुकल्यानंतर कधीच समजून घेणार नाहीत. आपले निर्णय कसे बरोबर असतात तेच सतत सिद्ध करत बसतील. एखादी गोष्ट त्यांना न सांगता केली आणि आपल्याला यश मिळालेच तर त्याचे श्रेय आपणच घेतील. ठिक आहे, घेऊ देत श्रेय. पण यश मिळाल्यानंतरही त्यात इतकेही यश मिळाले नाही असेही सांगतील. पुन्हा हे ही सांगतील कि आम्ही शुन्यातून पृथ्वी निर्माण केली. असू दे. आपलेच आहेत, ऐकून घ्यायलाच पाहिजे. 

          काहीही करायचे असेल तर यांची परवानगी घ्यायला लागते. नाहीतर म्हणतील , " मी अजून जिवंत आहे ना ? अजून मेलेला नाही. " असेही म्हणतील , " माझे म्हणणे पूर्वी सर्वजण ऐकत असत , म्हणून सगळे कसे व्यवस्थित चालले होते. आता तुमच्या राज्यात कोण कोणाला विचारत नाही. म्हणतात ना .... वाघ पडला झाळी आणि वानर दाखवतो नाळी ....तशी तुमची खबर आहे."  ही वाक्ये मोठ्यांची ठरलेली वाक्ये आहेत. ते आपल्या काळजीपोटी हे सर्व करत असतात हे बरोबर आहे. पण पुढे जाणाऱ्याला मागे ओढणे म्हणजे अतिकाळजी झाली. 

          मग आम्ही छोटे पुढे कसे जाणार ? लहान मुलाला जोपर्यंत स्वतः कंदिलाला हात लावल्याशिवाय काच गरम असल्याचा चटका बसत नाही तोपर्यंत तो हात लावतच राहणार. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव एकदा तरी घ्यायला द्यावा. अर्थात इथे चांगल्या गोष्टींचा अनुभव असा अर्थ अभिप्रेत आहे. नाहीतर ही मोठी माणसे त्यातही कूस काढतील. 

          दाखवताना ते प्रथम दोषच दाखवतात, चांगल्या बाबी बघण्याचे विसरुनच जातात. मग जनरेशन गॕपची ओरड मारतात. आमच्यावेळी असे नव्हते बाबा ! !  तुमच्या काळातील ही पिढी पुढे काय दिवे लावणार तो परमेश्वरच जाणे ?  

          त्यांनासुद्धा आपल्या आजी आजोबांनी अगदी असेच म्हटलेले असणार. पुढे आपण मात्र पुढच्या पिढीला असे म्हणू नका म्हणजे मिळवली. चुका सर्वांकडूनच होतात, चुकत चुकत शिकणं खरंच चांगलं असतं. पण सतत सल्ले देऊन आपल्याच माणसांना परावलंबी बनवणं कितपत योग्य आहे ? 

          लहानांना स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी बिनधास्त करायला दिल्या पाहिजेत. पहिल्यांदा चुकतीलही. पण हळूहळू चुकांचे प्रमाण कमी होत जाऊन कौशल्य प्राप्त होईल. केलेली चूक पुन्हा होणार नाही. 

          आईबाबा मुलांना सांगतात , "तुला हे जमणार नाही, ते जमणार नाही." स्वतः अपयशी ठरलेले पालक मुलांनाही अपयशीच होण्याचा मार्ग दाखवत राहात असतात हे त्यांना सांगणार कोण ? मोठ्ठे असतात ना ते ? त्यांचे कसे चुकेल , चुकले तर ते आमचेच. आमच्याच कपाळावर कायम चुकण्याचा शिक्का. 

          कित्येक हुशार आईवडिलांची मुले या अतिसल्ल्यांमुळे परावलंबी जीवन जगताना मी स्वतः पाहिली. अतिशिस्तीमुळे बिघडली गेलेली मुले आता अक्षरशः पालकांनाच नको झाल्याचीही उदाहरणे आहेत. व्यसनी झाली आहेत. पालकांशी शत्रुप्रमाणे वागत आहेत. 

          आपल्या पाल्यांशी पालकांनी मित्रत्वाचे नाते जोडायला हवे. आपलं मूल काय करतंय याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण उलट तपासणी नको. मधल्या पिढीतल्या मध्यम मोठ्यांची मोठीच अडचण होऊन बसते. केस पिकले, वय झालं, टक्कल पडलं तरी त्यांच्या वरच्या मोठ्यांचं त्यांना ऐकून निर्णय घेण्याची कसरत करावी लागते. लहानांनी संयम ठेवला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच मोठी माणसे बाळगत असतात, तसाच संयम बोलताना जर मोठ्यांनी ठेवला तर छोटे मोठे वादविवाद होणारही नाहीत. आता हे वाचल्यानंतरही हे चुकीचे कसे आहे यावरही ते नक्की वाद घालतील यातही मला अजिबात शंका वाटत नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Thursday, January 14, 2021

कळीचे निर्माल्य

 कळीचे निर्माल्य


          पूर्वी आई होण्याची चाहुल लागली कि प्रत्येक पहिलटकरीन खुश होत असे. आता तसे घडतेच असे नाही. माझ्या पत्नीला दिवस गेल्याचे समजले आणि ती इतकी खुश झाली कि तिला स्वर्ग दोन बोटे उरला. मला आणि घरातल्यांना तेच हवे होते जे घडत होते. सर्वांनी तिची काळजी घ्यायला सुरूवात केली होती. तिला विविध सल्ले मिळू लागले. हे खाऊ नको, ते खाऊ नको अशांची सरबत्तीच झाली. तिला खावेसे वाटत असताना प्रतिबंध केला जात होता. खाल्लेले टिकत नव्हते. पण ते बाहेर पडल्यानंतर तिला बरे वाटत होते. 

          मी आमच्या झोपण्याच्या खोलीत छोट्या बाळांची चित्रे लावली. तिची काळजी घेऊ लागलो. तिला हा अनुभव मस्त वाटत होता. एक गोंडस बाळ जन्माला येणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी चालली होती. नवीन पाहुणा येणार म्हणून सगळेच खुश. हळूहळू पोट दिसू लागले. आता तीन महिने उलटून गेले होते. ती शाळेत जात होतीच. मी कणकवलीत आणि ती दाणोलीत. प्रवासाचा त्रास होऊ लागल्याचे दिसत होते. पण घरी राहून ती शाळेची काळजी करत बसे. तिच्याकडे वरचे वर्ग होते. 

          आपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले तिला कधीच आवडले नव्हते. ती तशीच प्रवास करुन शाळेत जात होती. कणकवली ते दाणोली दोन गाड्या बदलून जाणे त्रासाचेच होते. प्रवास ६० किलोमीटरपेक्षा जास्त होता. ती सोमवारी गेली कि शनिवारी यायची. ५ वा महिना सुरू झाला. डॉक्टर मॅडमांनी तिला अधिक काळजी घ्यायला सांगितलं होतं. पोटातल्या हालचाली अलगद जाणवू लागल्या होत्या. 

          आतलं बाळ तिच्याशी संवाद साधू लागलं होतं. ती आपल्याच तंद्रीत. वाचनात कमालीची दंग होऊन जायची. जाड जाड पुस्तके एक दोन दिवसांत वाचून संपवायची. बाळांचं पोटातील गोल गोल फिरणं तिला गुदगुल्या करी. मग हळूच माझा हात ती आपल्या पोटावरुन फिरवून मलाही बाळाच्या ढुशा समजत. मलाही आनंदाच्या उकळ्या फुटत. मी तिच्याशी तासंनतास बोलत राही. ती आनंदी राहण्यासाठी जेवढे उपाय करु शकत होतो तेवढे करत होतो. पण काही बाबतीत ती रडून मोकळी होई. 

          आता तिला सहा महिन्यांची रजा घेण्याची गरज होती. पण मे महिना जवळ येत होता. सुट्टी पडणारच होती. मग रजा फुकट जाईल म्हणून तिनेच नकार दिला. मार्च ते एप्रिल हा दोन महिन्यांचा काळ तिच्यासाठी खूप कठीण काळ गेला होता. हाफ डे शाळा होती. कधी कधी मीच रजा घेऊन तिला भेटायला दाणोली मुक्कामी जात असे. 

          मे उजाडला. हायसे वाटले. आता आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली होती. पण मला सुट्टी असली तरी मी दुकानात म्हणजेच सलूनात काम करत असे. पण मी तिला सतत तिच्यासोबत हवा होतो. रात्री ती माझी आतुरतेने वाट बघत बसे. दरवाजाशी उभी राहून त्या अवस्थेतही वाट पाहताना ती अजूनही मला दिसते आहे. माझी चाहुल लागली कि मस्त गालात हसे. कधीकधी उशीर झाला म्हणून लटक्या रागाने बोलतही नसे. तिची ती नेहमीची सवय माझ्या अंगवळणी पडली होती. तिच्यासोबत असताना ती स्वतःलाही हरवून जाई. माझ्याशी गप्पा मारत बसे. मीही तिच्या बोलण्याने दिवसभराचा थकलेला शीण विसरुन जाई. असे मे महिनाभर दररोज चालले होते. 

          आभाळात काळे ढग जमू लागले तशी ती अधिकच आनंदाने बोलू लागे. पाऊस पडायला लागल्यावर तिला भारीच वाटे. पोटातील बाळाच्या हालचाली आता वाढल्या होत्या. आमचा आनंदही वाढत चालला होता. जून कधी उजाडला समजलेदेखील नाही. नवीन शैक्षणिक वर्षाची चाहुल लागली होती. दोन तिन दिवसांनंतर शाळा सुरु होणार होती. ती शाळेत हजर होणार होती. शाळेत हजर झाल्यानंतर आठवडाभरात रजा घेऊन घरी येणार होती असे आमचे ठरत होते. 

          शाळेत जाण्यापूर्वी डॉक्टर मॅडमना दाखवून यावे म्हणून सोनोग्राफी करण्यासाठी मी तिला दवाखान्यात नेले होते. तिला बाळाची हालचाल मंदावलेली असल्याचे जाणवत होते. ती घाबरली होती. तिला तिचं बाळ ढुश्या मारणारंच हवं होतं. डॉक्टर मॅडमनी सोनोग्राफी केली होती. पाच दहा मिनिटे त्या सोनोग्राफीच करत होत्या. त्यांनाही घाम आलेला दिसला. त्यांनी मला बोलावून घेतले. मला समजावून सांगितले. 

          बाळाची हालचाल थांबून दोन दिवस झाले होते. त्यांनी बाळाची हालचाल अजिबातच होत नसल्याचे सांगितले होते. मी अक्षरशः त्या क्षणाला फक्त चक्कर येऊन पडायचाच शिल्लक राहिलो होतो. पण मी धीर सोडून चालणार नव्हते. मला तिला धीर द्यायचा होता. ती माझीच वाट बघत होती. मी तिला ठिक आहे असे म्हणालो होतो. औषधे आणतो असे सांगून पुन्हा डॉक्टर मॅडमांकडे गेलो होतो. त्यांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. 

          दुसऱ्या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायला सांगितले होते. मी तिला घेऊन घरी आलो. घरी येईपर्यंत तिने मला विविध प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. पण मी ही गोष्ट तिला वाटेत सांगणार नव्हतो. रात्री झोपताना सांगणार होतो. रात्री झोपताना तिने माझा हात नेहमीप्रमाणे पोटावर ठेवला होता. हालचाल कधीच थंड झाली होती. पण मी तिला दिलासा देत होतो. बोलता बोलता दोघांनाही झोप कधी लागली समजलेच नव्हते. 

          मध्यरात्री अचानक जाग आली. ती उठून बसली होती. आता मला तिला सांगायचे होते. पहाटे चार वाजता मी तिला विश्वासात घेऊन सांगून टाकले. तिचे बाळाचे स्वप्न धुळीला मिळाले होते. ती सकाळपर्यंत रडतच राहिली आणि रडण्याशिवाय पर्यायच नव्हता. नाहीतर ती वेडी झाली असती. सकाळी लवकरच तयारी करुन आम्ही दवाखान्यात गेलो. 

          नॉर्मल साठी प्रयत्न करता करता रात्रीचे ३ वाजले. माझा डोळा लागला होता. अचानक मला माझ्या काकांनी हलवले. सून मोकळी झाली म्हणून सांगितले गेले. मला बरे वाटले. बाळाला बघावेसे वाटले होते. त्यांनी बाळाला पाण्यात तरंगत ठेवले होते. बिचारं बाळ जन्माला येण्यापूर्वीच देवाघरी गेले होते. एका कळीचे फुलण्याआधीच निर्माल्य झाले होते.


©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...