Wednesday, January 13, 2021

पसंत आहे मुलगी

 पसंत आहे मुलगी


          मी वयात आलो आणि बाबांनी माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. वयात आलो म्हणजे २५ वर्षांचा होतो. दोन नोकऱ्या सोडून तिसरी धरली होती. नोकरीनंतर छोकरी असं बाबांचं आणि घरच्यांचं साधं सोपं समीकरण बरोबरही असेल. पण छोकरी नोकरीवाली हवी असंही सर्वांच्या मनात होतं. 

          माझ्या मनात अजून छोकरीचा उगमच झाला नव्हता. मला लग्न करण्यासाठी अवकाश हवा होता. तो अवकाश मी घेत होतो. बाबांनी स्थळे बघायला सुरुवात केली होती. रत्नागिरीतील संगमेश्वरपासून देवगडातील शिरगांवपर्यंतची स्थळे बाबा बघूनही आले. मला माहितही नव्हते. बाबांची सूनपरीक्षा सुरु असताना आमच्या दुकानात माझ्या लग्नाविषयीची चर्चा पाटकरगुरुजींनी ऐकली. 

          पाटकरगुरुजी आमचे तीन नंबर शाळेतील वर्गशिक्षक. सातवीत ते आम्हाला गणित विषय अगदी तन्मयतेने शिकवित. त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल होते. ते काॕमन पुलचे शिक्षण विस्तार अधिकारी झाले होते. त्यांना जिल्ह्यात कोणत्याही शाळेत जाण्याची मुभा होती. 

          एकदा ते सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावठण या शाळेत भेटीसाठी गेले होते. तेथील शिक्षक तक्ता त्यांनी बघितला होता. त्यात ' ललिता तुकाराम चव्हाण ' या नाभिक समाजातील शिक्षिका होत्या. पाटकरगुरुजी आमचे कस्टमर. बाबा त्यांचे केस कापत असताना माझ्या लग्नाच्या चर्चेत त्यांनीही भाग घेतला. मग काय ? बाबा त्यांच्या मागेच लागले. त्यांनी त्या मुलीबद्दल माहिती आणून दिली. गाव समजले. 

          आता बाबा माझ्या मागे लागले. मी तयार नव्हतोच. मी एकदा बाबांना रागाने म्हणालो होतो, " बाबा, लग्न मला करायचेय कि तुम्हाला ? मला काही घाई नाही. मला एवढ्यात लग्न करावयाचे नाही. मी एकटा आहे तो बरा आहे. "  पण बाबांची चर्चा सुरु होती ती होतीच. त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती, खंड अजिबात नव्हता. 

          मग एके दिवशी ' फर्नांडिस ' गुरुजी दुकानात आले. ते त्यावेळी शिरवल नं.१ शाळेचे मुख्याध्यापक असावेत. त्यांच्या गजाली ऐकत राहण्यासारख्या असत. विनोदी शैलीतील त्यांचे बोलणे सर्वांनाच आवडे. पण ते परखड आणि खरे होते. त्यांनी मला समजावले. मी लग्नाला तयार होण्यासाठी बाबांना फर्नांडिसगुरुजींची मदत उपयोगी पडली. अखेर मी लग्नाला होकार दिला. 

          आता बाबांना मैदान मोकळे झाले होते. ' माझो झिल लग्नाक तयार झालो ' च्या घोषणा त्यांनी सुरुच केल्या. होळीचे दिवस होते. दोन तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या. बाबांनी मुलीचा पत्ता शोधून काढला होता. मुलीच्या घरी कल्पना न देता आम्ही निघालो. 

          वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गाव कुडाळ पासून फक्त दहा किलोमीटरवर आहे. पोहोचलो एकदाचे. त्यांच्या घरी जाण्यासाठी ' सातेरी मंदिर ' स्टाॕपवर उतरुन चालत निघालो. वाटेत बाबांचे पूर्वीचे मित्र भेटले. ते नाभिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी कुठे जाता असे विचारले. बाबांनी संपूर्ण कथाच सांगितली. ते त्यांना अजूनही चांगलेच जमते. ज्या मुलीला आम्ही बघायला जात होतो ती त्यांची पुतणी होती. त्यांनी मुलीबद्दल प्रश्नच नाही, तुमच्या मुलाला तिने फक्त पसंत करायला हवे. बाकी सर्व माझ्याकडे लागले. 

          बाबा त्यांना भाई म्हणत. आम्ही पुढे त्यांना भाईअण्णा म्हणू लागलो. भाईअण्णा शिस्तप्रिय होते. मुद्देसुद बोलत. ते आम्हाला मुलीच्या घरी घेऊन गेले. ललिता आज घरीच होती. मी साध्या नेहमीच्या वेशात गेलो होतो. तिचे वडील तिठ्यावरील सलूनात काम करीत. साधे सरळ गृहस्थ. त्यांनी आपली मुलगी दाखवायला आढेवेढे घेतले नाहीत. 

          सहसा कोणताही बाप आपल्या मुलीला पहिल्या भेटीत मुलाला दाखवायला तयार होत नाही. पण मी शिक्षक आहे असे समजल्यावर ते खुश झाले. घरातील सर्वजण अतिशय कुतुहलाने बाहेर हळूच येऊन मला बघून जात होते. थोड्यावेळाने बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मी आता घाबरलो होतो. 

          माझी पहिलीच वेळ होती. तिची पहिलीच वेळ नव्हती. तिला यापूर्वी काही स्थळे येऊन गेली होती. पण तिनेच ती नाकारली होती. तिला शिक्षकच हवा होता. मी शिक्षक होतो पण दिसायला काहीच आकर्षक नव्हतो. तिने चहा आणून दिला. मी हळूच मान वर करुन घाबरत घाबरतच तिच्याकडे बघितले. एक साधी सरळ पिवळसर साडी नेसलेली तोंडावर हात घेऊन खुदकन हसणारी मुलगी माझ्यासमोर उभी होती. माझी नजर तिच्या पावलांकडे गेली. ती सावधानस्थितीत उभी होती. तिला नाव विचारले गेले. मीही सांगितले. 

          मी शिक्षक आहे या एकाच गोष्टीवर ती खुश झाली होती. तिला पाहायला आलेला मी पहिला शिक्षक होतो. मी सायन्सचा विद्यार्थी होतो. ती दहावीमध्ये वेतोरे हायस्कूलमध्ये प्रथम आली होती. बारावी सायन्सला ६८ % म्हणजे अतिशय चांगले गुण होते. मी माझा बायोडेटा लिहून दिला. तिनेही सुंदर रेखीव हस्ताक्षरात आपला बायोडेटा मला दिला. मी तिला तिथेच मनापासून पसंत केले होते. मी तिला विचारले , " मी तुम्हाला पसंत आहे का ? " तिने मलाच उलट प्रतिप्रश्न केला , " तुम्हाला मी पसंत आहे का ? " मी तिला विचारले , " माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. " ती म्हणाली, " आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. " 

          मी सरळ सांगून टाकले, " पसंत आहे मुलगी. " ती मला गोड हसत म्हणाली, " मलाही तुम्ही पसंत आहात. " त्यावेळी तिच्या त्या होकारासह एक अनामिक सुगंध मला आला होता. ललिता एक उत्तम शिक्षिका होती. माझ्या डोक्यावर कमी झालेले केस तिला खटकले होते, पण ती आपल्या होकाराशी ठाम होती. घरातील सर्वांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले तरी तिचा निर्धार कायम होता. 

          मे मध्ये आमचे प्रशिक्षण होते. १३ जून २००० रोजी आमचे लग्न झाले. तिच्या आणि माझ्या वयात एक ते दिड वर्षाचे अंतर होते. ती मनाने निर्मळ होती. मितभाषी होती. माझे मानसिक प्रेम सुरु झाले होते. 

          नुकताच ' हम दिल दे चुके सनम ' हा ऐश्वर्याचा सिनेमा मी पाहिला होता. त्यातील " झोका हवा आज भी , जुल्फे उडाता होगा ना, तेरा दुपट्टा आज भी मेरे सर से सरकता होगा ना ! ! ! !  "  या गाण्याची तर मी पारायणे केली. ललितामध्ये मी ऐश्वर्याच बघत होतो. तिचे नाव मी तिला विचारुन ऐश्वर्या ठेवले. तिलाही ते खूप आवडले. मी तिला ऐशू म्हणत असे. चुकून एखाद्या वेळी ऐश्वर्या म्हटले तर ती मला म्हणे, " अहो, रागावलात का माझ्यावर ? मला ऐशूच म्हणा , ऐश्वर्या नको. "  

          ऐशू ही हाक तिला अतिशय आवडे. आता ही हाक माझ्यासाठी दुर्मिळ झाली आहे. तिच्या फोटोसमोर जाऊन मी तिला नमस्कार करताना ' ऐशू ' असे म्हणूनच दिवसाची सुरुवात करतो. प्रेम हे मनावर करावं, शरीरावर नव्हे. आम्ही उभयतांनी एकमेकांच्या मनावर प्रेम केलं. ते अजूनही निरंतर तस्संच राहणार आहे कायमचं.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

मयसा

 मयसा


          आमचे पाक्षिक सुरु होते. डीएड संपत असताना प्रत्यक्ष १५ दिवस पाठ शिक्षकांनी एखाद्या शाळेत सलग शिकवण्याचे काम करायचे असते. आम्हाला पाक्षिकासाठी माझी सातवीपर्यंत शिकत होतो तीच शाळा मिळाली. भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन मध्ये आमचे पाक्षिक सुरु झाले. 

          आम्ही ४० छात्रशिक्षक अगदी मनापासून शिकवत होतो. दरदिवशी मुख्याध्यापक बदलत असत. ते सांगतील त्याप्रमाणे आम्हाला वर्ग मिळे. तासिका घेताना खूप मजा येई. सर्व वर्गांवर जायला मिळे. शाळेतील ऑन ड्युटी काम करणाऱ्या शिक्षकांना त्यानिमित्ताने लेखी काम करायला उसंत मिळे. ते आमच्या सोबत सहकार्याने वागत. 

आम्ही काही छात्रशिक्षक तिथले जुनेच विद्यार्थी होतो. त्यामुळे ती शाळा आम्ही कधीही गेलो तरी आपलीच वाटते. सांस्कृतिक कार्यक्रम शेवटच्या दिवशी करावे लागत. आम्हीही त्याचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच सुरु केले. 

          वर्गातील प्रत्येक मुलांच्या क्षमतेनुसार नकला , नृत्ये, नाट्यछटा, विनोदी बातम्या, नाच, रेकॉर्ड डान्स, एकांकिका, नाटुकली इत्यादी विविध प्रकार शिकवणे सुरु झाले. मी नाट्यछटा बसवण्याचे ठरवले. म्हणजे मी एक दोन मुलांना निवडून त्यांना नाट्यछटा देणार होतो. काही मुलांनी स्वतः हात वर केले. सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे म्हणून मी काही सहभागी न होणाऱ्या मुलांकडे लक्ष केंद्रित केले. 

          माझ्या मित्राचा भाऊ सातवीत शिकत होता. त्याचे नाव महेश होते. त्याच्या घरी माझे येणे जाणे असे. त्यामुळे तो मला व्यक्तिगत ओळखत होता. त्याने घरी सांगून टाकले होते. आम्हाला माझ्या दादाचा मित्र शिकवायला आहे. तो मला शाळेत सर आणि शाळेबाहेर कुबलदादा म्हणत असे. त्याला घरी मयसा म्हणत. मीही त्याला प्रेमाने मयश्या किंवा मयसा म्हणू लागलो. त्यालाही ते आवडे. 

          त्याने मला सांगितले , “ दादा, मला नाट्यछटा करायची आहे. ” मी त्याला आश्वासन दिले. त्याला स्क्रिप्ट दिली. वाचण्याचा सराव घेतला. त्याचे वाचन चांगले होते. तो भावनाप्रधान होता. पण त्याचे उच्चार स्पष्ट येत नव्हते. मी त्याला अधिक सराव करायला सांगितले. तरीही उपयोग होत नव्हता. त्याचे पाठांतरही झाले होते. तो रोज घरी सराव करत होता. त्याच्या आईलाही त्यामुळे आनंद वाटला होता. बरेच कार्यक्रम बसवले जात होते. ऐनवेळी त्यात बदलही केले जात होते. निवड करताना बसवलेल्या काही कार्यक्रमांनाही नाकारण्यात आले. मला खूप वाईट वाटले. 

          कारण माझ्या मयश्याचा कार्यक्रम रिजेक्ट केला गेला होता. मी त्याला सांगितले, पण त्याची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. तो रडकुंडीला आला होता. घरी जाऊन त्याने हे आपल्या आईला सांगितले. कार्यक्रम मस्त पार पडले. पाक्षिकही संपले. मी मयश्याचा तो विषय विसरूनही गेलो. 

          पण नंतर एकदा मला त्याची आई भेटली. ती म्हणाली, “ माझ्या मयशाला नाट्यछटा दिलीस तेव्हा मला किती आनंद झाला होता ?  तो रोज मला म्हणून दाखवत होता. पण त्याचे सर्वांसमोर सादरीकरण झाले नाही याबद्दल मला खूप वाईट वाटले. तू त्याला सहभाग दिला नसतास तरी चालले असते , पण त्याचा वाढत असलेला आत्मविश्वास मी कमी होताना पाहिला आहे. खरोखरचा शिक्षक झालास कि असे कधीच करू नकोस. मुले अपेक्षा ठेवून असतात. माझा मयसा असाच अपेक्षा ठेवून होता. त्याचा आणि माझा दोघांचाही तुझ्यामुळे अपेक्षाभंग झाला.” 

          मी त्या माऊलीचे उदगार ऐकून अक्षरशः निःशब्द झालो. माझ्याकडे उत्तर नव्हते. मी पुरता गांगरून गेलो. माझ्या मित्राच्या भावावर मी अन्याय केल्याचे माझ्या आता लक्षात आले होते. हा मयसा नंतर मला ज्या ज्या वेळी भेटे , त्या त्या वेळी मला त्याच्या आईचे ते मौल्यवान शब्द आठवत. त्याने मोठेपणी मोबाईल दुरुस्ती करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. गोव्याला जाऊन जॉब करत होता. लग्न केले. 

          एके दिवशी माझ्या कानावर एक वाईट बातमी धडकली. मयश्याने आत्महत्या केली होती. मला खरेच वाटेना. पण बातमी खरीच होती. मी माझ्या मित्राला जाऊन भेटलो. त्याने सांगितले कि तो हल्ली टेन्शनमध्ये होता. मानसिक तणावात येऊन त्याने गळफास लावून घेतला होता. मला त्याच्या आईला भेटण्याची इच्छा असूनही भेटू शकलो नाही. मित्राच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचे सांत्वन केले. 

          त्याने ‘ बोलावणे आल्याशिवाय नाही ’ ही नाट्यछटा पाठ केल्याचे मला चांगले आठवते. पण बोलावणे आल्याशिवाय त्याने आपल्या मरणाला स्वतः जवळ केले होते. काहीही झाले तरी आपले आयुष्य कधीही महत्त्वाचे असते, ते असे बारीकसारीक गोष्टीसाठी कधीही संपवायचे नसते. 

          मयश्यासारखी अनेक तणावग्रस्त मुले या जगात असतील त्यांनी आपल्या जीवनाकडे सकारात्मक रितीने बघितले पाहिजे. आत्महत्या हा नकारात्मक दृष्टीकोन मनातून कायमचा हद्दपार करायलाच हवा. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Tuesday, January 12, 2021

किलवर तिरी

 किलवर तिरी


          कित्येकांच्या घराचा पत्ता नसतो पण त्यांच्या घरी पत्त्यांचा पत्ता असतो. पत्ते म्हणजे खेळातले पत्ते. टेबलाचे एखादे ड्रॉवर उघडावे तर पत्ते सापडतील ते पत्ते. या पत्त्यांना आता प्लेईंग कार्डस म्हणतात. हे नाव बाकी लगेच समजते. पूर्वी या पत्त्यांना कॅट म्हटले जाई. 

          कॅट म्हणजे मांजर. मांजर जसे प्रत्येक घरी पाळले जाई तसेच हे कॅट सुद्धा पाळले जाई म्हणून की काय त्यालाही कॅट म्हणत असावेत कदाचित. मांजराची जशी म्याँव चालते तशीच या कॅटची पिशी चाले. या पिशीने माणसे वेडीपिशी होताना मी बघितली आहेत. 

          आम्ही तेव्हा सावंतांच्या चाळीत भाड्याने राहायचो. मालक आणि सगळे शेजारी गुण्यागोविंदाने राहात. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत. एका घरात कायम पत्त्यांचा खेळ चाले. मोठी माणसे केवळ एक टाईमपास म्हणून पत्ते खेळत. टेपरेकॉर्डर चालू असे. त्यावर जुने ' आवारा हू ' हे गाणे लावलेले असे. कधीकधी ' सावज माझं गवसलं ' असे मराठी गाणे वाजत असे. गाणी थांबली कि आम्ही समजू कि पत्त्यांचा डाव संपलेला आहे. असे एकावेळी दोन मनोरंजनाचे खेळ सुरु असत. 

          आम्ही लहान होतो. आम्हाला पत्तेही कळत नसत आणि गाण्यांचा अर्थही. हळूच त्यांच्या घरी जाऊन एक फेरी मारुन येत असू. त्यांचे पत्ते पिसण्याचे कौशल्य बघत असू. पिसतानाचा टाळीसारखा येणारा आवाज आम्हाला आवडे. नवनवीन पत्ते आणि त्यावरील नवनवीन चित्रे बघताना मजा येई. निम्मे निम्मे पत्ते दोन हातात घेऊन फर्र असा आवाज करत पिसण्याची पद्धत आम्हाला तिथेच शिकायला मिळाली. 

          गाढवपिशी, पाच तीन दोन , मेंडीकोट आणि पत्त्यांच्या विविध गमतीदार जादू बघत बघत शिकत गेलो. समोरच्याला कोट देता देता किती कोट सेकंद वाया घालवले असतील नकळे. पण त्यातही मौज येत होती. जादू दाखवून समोरच्याला उल्लू बनवून निघून जाताना मोठेच ज्ञान घेतल्यासारखे वाटे. बघता बघता जसे पत्ते बदलत गेले, गाणीही बदलत गेली. ' सून सायबा सून , प्यार की धून , हो sss मैंने तुझे चुन लिया ' असे तोंडाने म्हणत पत्त्यांची पानेही चुन चुन चुनली जात होती. 

          बाबा घरी आले कि आमचे हे खेळ आपोआप थंड होत. एकदा तर बाबांनी आमचं पत्त्यांचं हे वाढतं वेड पाहून पत्त्यांना पेटत्या चुलीत घालून आम्हाला थंड करुन टाकलं होतं. परीक्षा जवळ आल्या कि आम्हाला अभ्यासाशिवाय काहीच करण्यास मज्जाव असे. गाणी ऐकू येत तेव्हा अभ्यास करताना समोर पत्ते नाचू लागत. आईने आमच्या घराचा दरवाजा बंद केलेला असे. मोठ्या ताईचाही डोळ्यांचा धाक असे. पण सुट्टीत पुन्हा पत्तेबाजार भरे. 

          शेजारचे राणेकाका एस.टीत कंडक्टर होते. ते ड्युटीवरुन आले कि पत्त्यांच्या पिसण्याचा आवाज येई. ते मेंडीकोट खेळण्यात पटाईत होते. समोरच्याला कोट घालून आपण उघडेबंब खेळत राहात. कोट घालून म्हणजे खेळात ते दुसऱ्यांना कोट चढवत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. खेळ एकदा रंगात आला कि ते आपल्या वयाचेही भान विसरुन जात. काकीने जेवायला बोलावले तरी त्यांना जेवायला जायला वेळच होई. अर्ध्या पाऊण तासांनंतर गेले तर गेले. नाहीतर स्वतः काकीच त्यांना हाताला धरुन घेऊन जाई. तरीही ते सुरु असलेला डाव संपवूनच उठत. 

          एकदा त्यांचा पत्त्यांचा खेळ रंगात आला होता. त्यांच्याकडे असलेले पत्ते तितकेसे स्ट्रॉन्ग नसावेत बहुदा. ते मोठ्याने ओरडत खेळत होते. त्यांनी ' किलवर तिरी ' हातात घेतली होती. ते टाकणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले कि आपल्यावर कोट बसणार. ते सावध झाले. त्यांनी आपल्या पायाखाली दडवलेला तुरुपाचा पत्ता बाहेर काढला आणि ते कोटापासून वाचले. 

          दुसऱ्यांना कोट लावणारे स्वतः कोट लावून कसे घेणार ? अक्कलहुशारीने आणि शिताफीने त्यांनी स्वतःला मोठ्या संकटातून वाचल्याचा उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. त्यावेळी ते म्हणालेही होते , " किलवर तिरी टाकली असती तर काय झाले असते ? " मोठे संकट आले असते अशा आविर्भावात ते बोलताना पाहून मी ही ' फार मोठ्या संकटातून काका वाचले ' असा अभिनय करुन त्यावेळीही खळखळून हसलो होतो. घरी गेल्यावर आईबाबांना आणि भावंडांना सांगितल्यानंतर तर आम्ही सगळे इतके हसलो होतो कि राणेकाकी आम्हाला विचारायला आली होती. तिला सांगितले तर तिही मनसोक्त हसली. 

          जीवनात अशी ' किलवर तिरी ' सारखी नको असलेली माणसे येतात तसे हवे हवेसे वाटणारे तुरूपही येतात. असे तुरुप आले कि मनाला हुरुप येतो. माणसांचा हा तुरुप सतत रुपे बदलत राहतो. जीवनरुपी पत्त्यांचा खेळ हा असाच सुरु राहणार त्याला कधीच अंत नाही. आता ते राणेकाकाही नाहीत , पण त्यांची ही आठवण तुरुपासारखी काढून मी माझ्या जीवनाला नवीन रुप देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, January 11, 2021

सागरा, प्राण तळमळला

सागरा प्राण तळमळला


          आमच्या घरातील सर्वांनाच भजनाची खूपच आवड आहे. माझ्या लहानपणी तर आमच्या  भजनात माझे एक चुलत काका पट्टीचे बुवा असल्यामुळे मला भजनाची गोडी निर्माण झाली. भजनासाठी आम्ही तहानभूक विसरुन भजन असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करु. 

          माझे बाबा, चार काका, मी, माझा भाऊ आणि बुवाकाकांचे दोन मुलगे असे नऊजण उत्तम भजन करत असू. बुवाकाका पेटी छान वाजवत. माझे भाईकाका मृदुंग वाजवत. बालाकाका झांज वाजवत. आणि आम्ही उरलेले सहाजण उत्तम कोरस होतो. सुर, लय आणि ताल यांची चांगली जाण असलेले आम्ही बुवाकाका जे म्हणत ते लगेचच उचलून धरत असू.    

          बुवाकाकांचे दोन्ही मुलगे संगीतप्रेमी होते. वडिलांचे सर्व गुण त्यांच्यात भिनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. बुवाकाका सर्वगुणसंपन्न. ते मृदुंगही छान वाजवत. भाईकाकांच्या मृदुंगाचा ठेका चुकला तर ते पेटीच्या दोन कडांवर हाताने वाजवून ठेका समजावून सांगताना मी कित्येकदा बघितले होते. 

          बुवाकाकांचा मोठा मुलगा सागर. तो अभ्यासातही हुशार होता. आमच्याबद्दल बुवाकाकांना अतिशय आदर होता आणि आम्हालाही त्यांच्याबद्दल अजूनही आदर आहे. जवळपासच्या पंचक्रोशीत तर बुवाकाका प्रसिध्दच. त्यांच्या भजनासाठी लोक झोपलेले उठून येत असत. आम्ही गणपतीच्या अकरा दिवसात दररोज सरासरी पाच भजने करत असू. एका रात्रीत तर आम्ही सलग १० - ११ भजने करेपर्यंत पहाट झाली होती. 

          आम्ही चौघे लहान असलो तरी आमची भजनाची आवड आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. माझा भाऊ न्हानू दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीची भजने म्हणून घर दणाणून सोडायचा. सोबतीला आम्ही असायचोच. बुवाकाकांच्या मोठ्या मुलाला सागरला आम्ही राजू किंवा ' राजग्या ' म्हणायचो. राजू खरंच सगळ्यांच्या मनांवर राज्य करणारा असाच. त्याला आमच्याकडे यायला खूप आवडायचे. आमच्याबरोबर खेळता खेळता तो मोठा कधी झाला ते समजलेच नाही. तो मोठा झाला आणि आमचे बुवाकाकांबरोबरचे संबंध बिघडले होते. तरीही तो आमच्याकडे येत असे. पण हळूहळू त्याचे आमच्याकडे येणे बंद झाले. त्याचा स्वभाव बदलला नसला तरी त्याच्या सवयी बदलल्या होत्या. त्याने दारु प्यायला सुरुवात केली होती. त्याचे दररोज दारु पिऊन घरी येणे आम्हाला खटकत होते. पण आम्ही काहीही करु शकत नव्हतो. तो आता खूपच प्यायला लागला होता. 

          छोटा असतानाचा राजू आणि आताचा पस्तिशीतला राजू पूर्णपणे बदलून गेला होता. आम्ही वर्षातून दोन तीन वेळा जायचो तेव्हा तेव्हा राजग्याचं हे दारुमय जीवन बघून पायाखालची जमीन सरकायची. सहज तोंडातून उद्गार यायचे , " कोण होतास तू , काय झालास तू ?  " आम्ही रागाने त्याच्याशी बोलणे टाळू लागलो. तो बोलण्याचा प्रयत्न करीत असे, पण मी जाणूनबुजून त्याच्याशी बोलत नसे. माझा भाऊ त्याला जाताना येताना गाडीवर घेत असे. दया येई म्हणून प्रसंगानुसार पैसेही देत असे. 

          मला तो ' दादा ' म्हणे. आता त्याने आपली हेअरस्टाईल बदलली होती. लांबलचक दाट केस आणि दाढीसुद्धा हातभर वाढलेली. डोळे सतत लालभडक तांबारलेले. त्याच्याकडे बघून त्याचा रागही येई आणि दयासुद्धा. आमच्याकडचे त्यांचे येणे जाणे बंद असले तरी आमच्या घरात कुणाचेही मयत झाले तरी बुवाकाकांनी आणि राजूने स्मशानात सर्वांच्या आधी हजेरी लावलेली मी बघितलेली आहे. 

          नुकतेच माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते. आम्ही लग्नाला गेलो होतो. लग्न झाले. सर्वांची जेवणे झाली.स्वागत समारंभ पार पडला. अचानक माझा फोन वाजला. गर्दीच्या आवाजात मला तो समजला नाही. सहज बाहेर आलो. फोन हातात घेतला. तीन मिस कॉल होते. एका नातेवाईकांचा फोन आला होता. मी त्यांना उलट फोन केला. 

          त्यांनी मला सांगितले , " सर, एक वाईट घटना घडली आहे. तुमच्या बुवाकाकांचा मोठा मुलगा ऑफ झाला. " मी त्यांना पुन्हा विचारले तरीही त्यांनी तेच उत्तर दिले. त्यावेळी मला अगदी लहानपणीचा तो ' राजू ' आठवला. तो निरागस , गोंडस राजू. 

          आधी राजू दारु पिऊ लागला होता आणि नंतर दारुच त्याला दररोज पित होती. दारु पिण्यासाठी त्याची पावले दिवसातून एकदातरी अड्ड्याकडे वळत होती. शेवटी दारुनेच त्याचा घात केला. त्याने दारुत स्वतःला बुडवून घेतले. आता दारुनेच त्याला कायमचे बुडवले होते. त्याचा दारुण मृत्यू झाला आणि त्या सागराचा प्राण कायमचा तळमळला. एक चांगला सागरच सागरात बुडाला. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 2, 2021

हर्ष दाती

 हर्ष दाती


          लग्न झालं की काही दिवसांत घरातल्यांचा एकच घोषा सुरु होतो. आता लवकरात लवकर घरात पाळणा हलला पाहिजे. त्यांचं सुद्धा बरोबर असतं म्हणा. 

          लवकर मूल झालं तर ते लवकर मोठं होतं. आपण नोकरीला असलो तर रिटायर्ड होईपर्यंत आपलं मूल आपल्या पायावर उभं राहिलेलं असतं. पण हे त्यावेळी आपल्याला समजत नाही. समजतं तेव्हा खूप वेळ झालेला असतो. 

          आमचं लग्न होऊन अडीच वर्षांनंतर मला मुलगी झाली. तोपर्यंत अनेकविध प्रसंग आमच्या आयुष्यात येऊन गेले. असे प्रसंग तर सर्वांच्याच आयुष्यात येतच असतात. असे प्रसंग येतात आणि आपल्याला अधिक कणखर बनवून जातात. 

          सर्वांची सत्वपरीक्षा होते. कोणीही त्यातून सुटत नाही. त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. काही त्याचा निकराने सामना करतात तर काही ढेपाळतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारसरणी व संस्कारांवर ते अवलंबून असते. 

          १८ जानेवारी २००३ हा आमच्या आयुष्यातील अतिशय प्रतिक्षेचा दिवस उजाडला होता. नऊ महिने पोटात बागडणाऱ्या जीवाला बाहेरचं जग पहायचं होतं. दोन जीव वेगळे होणार होते. माझी पत्नी आई होणार होती. 

डॉक्टरांनी सिझर करावं लागणार हे आधीच सांगून टाकलं होतं. शेवटी सिझर झालं. डॉक्टर हसत बाहेर आले होते. त्यांनी मला आत बोलावलं. मी घाबरतच आत गेलो. पांढऱ्या पसरट भांड्यात ठेवलेल्या बाळाला बघून मला जो  आनंद झाला तो आभाळापेक्षा मोठा होता. 

          डॉक्टरांनी मला बाळाच्या गळ्यात अडकलेली नाळ दाखवली. म्हणाले, " जरा उशीर झाला असता तर, बाळ घुसमटले असते. आता ते ठिक आहे. तुमची पत्नी थोड्या वेळाने शुद्धीवर येईल मग तुम्ही तिला भेटू शकता. "  मी निर्धास्त झालो.पण पत्नीला भेटून तिचे अभिनंदन करायला मी उतावीळ झालो होतो.

          आम्हाला एक गोड मुलगी झाली आहे हे मला तिला सर्वांच्या आधी सांगायचे होते. मला पहिली मुलगीच हवी होती. पण पत्नीला मुलगा हवा होता. मुलगी झाली म्हणून मी अत्यंत खुशीत सर्वांना सांगत सुटलो होतो. 

          पत्नी शुद्धीवर आली. तिला माझ्या अगोदरच समजले होते. पण ती मला म्हणाली, " तुमचंच खरं झालं, तुम्हाला हवी तशी मुलगी देवाने दिली आहे. तुमचा विजय झाला, अभिनंदन तुमचं! " मी तिचं अभिनंदन करायला जात होतो तर ती माझंच अभिनंदन करत होती. ती  माझं अभिनंदन करत असली तरी ती विजयी झाली नाही हे तिचा चेहरा मला सांगत होता. 

          गोरी गोमटी माझी मुलगी माझे प्राणच. हॉस्पिटलमध्ये असल्यापासून मी तिचा ताबा घेतला. तिच्याशी मी इतका बोलत राही की माझे बोलणे तिला नक्की कळत असावे असे मला नेहमीच वाटत राही. तेव्हाच तिचे नाव मी छकुली ठेवले. सगळे तिला छकुलीच म्हणू लागले. 

          तिचे नाव तिच्या काकांनी ठेवले. हर्षदा. खरंच मला नेहमीच हर्ष देणारी म्हणून मला तिचा जास्त अभिमान वाटतो. सर्वांनी मला सांगितले की पहिली बेटी धनाची पेटी असते. 

          धनासाठी मी कधीच आटापिटा केला नाही. पण तिच्या रूपाने एक न मोजता येणारं धन माझ्या पदरात पडलं म्हणून मी परमेश्वराचे त्याचवेळी साष्टांग नमस्कार घालून आभार मानले होते.


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

आजोबांचा अडकित्ता

 आजोबांचा अडकित्ता 

   

मी तेव्हा खूप लहान होतो. मला आजोबा धूसरसे आजही आठवतात. पण त्यांच्या आठवणी मला सांगताना बाबांनी सांगितलेल्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही भावंडांनी घरातल्या अंथरुणांबरोबर खेळायला सुरुवात केली होती. एक एक गुंडाळलेले अंथरून काढून ते लादीवरून गाडीसारखे ढकलत ढकलत पुढे सरकवत होतो. 

तेवढ्यात आजोबा तेथे आले होते आणि आम्हाला रागावले होते. त्यानंतर आम्ही तसला खेळ पुन्हा कधीच खेळलो नसू. मी अगदीच लहान. गोंडस बाळ. आजोबांचा लाडका. घरी असताना मला खेळवायला त्यांना खूप आवडे. आजोबा दिसायला हिरो होते हिरो. ते सगळ्या गोष्टी करण्यात पटाईत होते. त्यांचा आवाज सुरेल होता. ते तमाशात लावण्या नाचत. भजनात बुवागिरी करत. 

त्यांच्याकडे नेहमी पानाची चंची असे. चंची म्हणजे पान, सुपारी , तंबाखु , अडकित्ता आणि कात ठेवण्याची छोटी पिशवीच. त्यात तीन चार कप्पे असत. ती गुंडाळून ठेवता येत असे. त्यात आजोबा आपल्या गोळ्या , सुटे पैसे ठेवत असत. मी दोन वर्षाचा असतानाची गोष्ट असेल कदाचित. मी आजोबांच्या चंचीलाच हात घातला. त्यातली एक एक वस्तू मी काढू लागलो. आजोबा माझ्याकडे कौतुकाने बघत होते. 

मला काय खेळायचेच होते. माझा खेळ होत होता. ते सुद्धा त्यात लहान होऊन सहभागी झाले होते. बोबड्या बोलामध्ये माझ्याशी बोलत होते. ते नेहमी पंचा किंवा धोतर नेसत. आतासारख्या चड्ड्या घालणं त्यांना मान्य नव्हतं. त्यावर खिसा असलेली मांजरपाटाची बाबांनी शिवलेली बनियन असे. मांजरपाट म्हणजे साधे खळीचे कापड. पण या पेहरावात आमचे आजोबा नटासारखेच भासत. ते स्वतः गाणी रचत. कित्येक गाणी , अभंग, जेवणावळीचे श्लोक त्यांना पाठ होते. 

मी आता माझा मोर्चा अडकित्त्याकडे वळवला. मला ते यंत्र खेळणंच वाटलं. मी तो फेकत होतो. दुडूदुडू जाऊन परत आणत होतो. असं माझं खेळणं सुरुच होतं कि अचानक आजोबांनी माझ्याकडे अडकित्ता मागितला. मी माझ्या खेळात रंगून गेलो होतो. मी अडकित्ता द्यायला तयार नव्हतो. त्यांनी माझ्याकडून अडकित्ता काढून घेण्याचा प्रयत्न केला. 

मी चिमुकल्या मुठीत घट्ट पकडून धरलेला अडकित्ता सोडतच नव्हतो. ओढून घेण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला त्याची धार लागेल म्हणून ते काळजी घेत होते. माझी पकड आणखी घट्ट होत गेलेली. शेवटी आजोबांनी " नातवा , माका दी आडकती , दी बाबू " अशी विनवणी सुरु केली. मी अडकित्ता त्यांच्या दिशेने फेकला. अडकित्ता माझ्या हातातून सुटला होता. तो परत मागे येणार नव्हता. 

तो थेट आजोबांच्या कपाळावरच बसला. नशीब डोळ्यावर बसला नाही. कपाळाला नुसता बसला नाही तर त्याची धार लागून आजोबांच्या कपाळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आजोबांनी कपाळ दाबून धरले. तेवढ्यात तिथे बाबा आले आणि माझा पराक्रम बघितला. 

बाबा मला मोठ्या आवाजात ओरडले. मी बाबांच्या आवाजाने घाबरुन रडू लागलो. घरातले सगळे काय झाले म्हणून बघायला आले. आजोबांवर अडकित्ता मारला म्हणून मला कोणीही जवळ घेईनात. मी आणखीनच भोकाड पसरले. माझे प्रेमळ आजोबा मला काहीही बोलले नाहीत कि रागावलेही नाहीत. 

उलट त्यांनी मला हलकेच उचलून माझे पटापट पापा घेतले. आता मला माझे आजोबाही नाहीत आणि ते गोड गोड पापा सुद्धा. आता असे निरलस प्रेम मिळणे केवळ दुरापास्त झाले आहे.



©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



मी रंगवतोय

 मी रंगवतोय 

   

माझ्या भावाचा कलाशिक्षकाचा कोर्स नुकताच पूर्ण झाला होता. त्याने ए. टी. डी. केल्यानंतर पुढे जी. डी. आर्ट करण्याचे मनोमन ठरवले होते. मग काय ? त्याने ठरवले आणि आम्हीही त्याला परवानगी दिली. खर्चाची आम्हाला कल्पना नव्हती. पण त्याला कधी कधी आठवड्यालाच  २ - ३ हजाराचे रंग, ब्रश, कॅनव्हास अशा महागड्या वस्तू लागत. तो लगेचच मागत नसे. कारण त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. आपले अगदीच अडते आहे असे वाटले तरच तो मागणी करी. त्याने मागणी केल्यानंतर त्याला आठवड्याने वस्तू मिळत. 

गरिबांनी महागडे शिक्षण घेणे, ते व्यवस्थित पूर्ण करण्याला चिकाटी लागते. माझ्या भावाकडे चिकाटी होती. परिश्रम करण्याची क्षमता होती. पण तो बाबांना घाबरत असे. लहानपणी अनेक उचापती केल्यामुळे त्याला खोडकर म्हटले जाई. तो आईला सांगी. आईकडून बाबांकडे ते रात्री पोहोचे. मग बाबा म्हणत , “ उद्या बघू.” त्यांनी कधी नाही म्हटले नाही. ते तरी लवकर कसे देऊ शकणार होते ? आम्हाला त्यांचा संघर्ष दिसत होता. 

मग माझ्या भावानेच ठरवले. आपण काहीतरी काम करून पैसे मिळवायचे. एवढी डिग्री मिळवायची आहे तर रात्रंदिवस काम करून पैसे मिळवीन असे त्याने ठरवूनच टाकले. प्रत्येकवेळी बाबांकडे पैसे मागणेही त्याला अजिबात आवडत नव्हते. 

घरांना रंग काढून देणारे अनेकजण आमच्या दुकानात दाढी, केस करायला येत असत. त्यांच्यापैकी दोघांनी त्याला कामावर यायला सांगितले. घरांना रंग द्यायचे काम होते. काम असेल तसा हा जात असे. चार चार दिवस बाहेर राहून त्यांच्यासोबत भिंतींना रंग काढण्याचे काम करून येतील ते पैसे बाबांकडे आणून देण्याचे त्याने आता सुरु केले होते. बाबांनाही बरे वाटले. पण मला आवडले नव्हते. 

माझा कलाकार भाऊ भिंती रंगवतोय हे मला बघवत नव्हते. भिंतींवर जशीच्या तशी चित्रे काढणारा तो रंगाऱ्यांबरोबर भिंती रंगवून दिवसाची मजुरी आणून देत होता. त्याला आनंद वाटत असल्यामुळे मीही काही बोललो नाही. पण त्याला उन्हातान्हात कामे करताना भरपूर त्रास होत होता. त्याला होत असलेला त्रास मला जाणवे. 

त्यादिवशी तो असाच चार पाच दिवसानंतर कामावरून आला होता. मस्त हसत होता. कामाचे आलेले पैसे बाबांच्या हातात देऊन मनसोक्त जेवला. तो आज खूप दमलेला दिसला. त्याने लगेच अंथरून घातले आणि झोपी गेला.

रात्री चार वाजता मला जाग आली. कसला तरी आवाज आला होता. बघतो तर काय ? भाऊ उठला होता. मला वाटले पाणी प्यायला उठला असेल. तो भिंतीवर उजव्या हाताने काहीतरी वरखाली करत होता. त्याचे डोळे बंद होते. म्हणजे तो झोपेत होता. मी त्याला सहजच विचारले , “ काय रे न्हानू, काय करतोयस ? ” त्यावेळी तो डोळे बंद असतानाच म्हणाला होता , “ मी रंगवतोय.” मला हसू आले आणि वाईटही वाटले. मी त्याला हलकेच चिमटा काढून झोपेतून जागे केले. तेव्हा त्याचे लाल झालेले डोळे चोळत तो जागा झाला. त्याला आपण झोपेत असताना ब्रश घेऊन रंगवतोय हे लक्षात आले असावे. तोही गालातल्या गालात हसला आणि पुन्हा गाढ झोपी गेला. 

त्याला लहान असताना झोपेत चालण्याची सवय होती. पण मोठा झाल्यानंतरही तो त्याचं जागेपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेतील स्वप्नातही आपल्या भविष्यातील आयुष्याला रंग देत होता असे मला वाटत होते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असला तरी तो याबाबतीत माझ्यापेक्षाही नेहमीच मोठा असणार आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...