Monday, May 26, 2025

🔴 मुंबई आणि 'तुंबई' - एक न संपणारा संघर्ष

🔴 मुंबई आणि 'तुंबई' - एक न संपणारा संघर्ष 

          पावसाळा सुरू झाला की, मुंबईकरांच्या मनात धस्स होतं. कारण या दिवसांत मुंबईची 'तुंबई' व्हायला वेळ लागत नाही. गुडघाभर पाण्यातून वाट काढत, रेल्वेच्या रखडलेल्या प्रवासाला सामोरं जात मुंबईकर आपल्या कामावर जातात. या संघर्षाची कल्पना करणंही कठीण आहे. अनेक चाकरमानी आता मुंबईला परतले आहेत, त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे पुन्हा एकदा कर्मभूमीतील आव्हानांना सामोरं जाण्यासारखं आहे.

          मुंबईकरांना खरंच मानायला हवं. रोजच्या जीवघेण्या प्रवासातून ते मार्ग काढतात. नोकरीचा ताण कमी की काय, पण प्रवासाचा त्रास त्याहून अधिक असतो. आम्ही वर्षा-दोन वर्षांनी मुंबईला जातो, तेव्हा तिचा बदललेला चेहरा पाहून थक्क होतो. गगनचुंबी इमारती पाहून भीती वाटते. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहूनही त्रास होतो, मग तिसाव्या मजल्यावर राहणारे मुंबईकर कसे राहत असतील, हे देवच जाणे! 

          सकाळी घर सोडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल की नाही, याची खात्री नसते.

          'आता थांबायचं नाय' या चित्रपटात मुंबईची गटारं साफ करण्याची पद्धत पाहिली आणि सफाई कर्मचाऱ्यांना सलाम करावासा वाटला. हे कर्मचारी आहेत म्हणूनच मुंबई काही अंशी स्वच्छ आहे, यात शंका नाही. तरीही, मुंबई तुंबतेच. गटारांमध्ये काहीही वाहत असताना पाहिलं की, ते कोणताही कचरा टाकणाऱ्या आपल्याच बांधवांची कीव येते.

          मुसळधार पाऊस असला तरी नोकरीसाठी धावपळ करणाऱ्या मुंबईकरांची कमालच आहे. जीव मुठीत घेऊन दररोज कर्तव्य बजावणारे हे चाकरमानी दरवर्षी गावाकडे येऊन आनंदात का राहतात, याचं कोडं मला आज उलगडलं. एकदा गावी आले की, त्यांना मुंबईला जायचं नावही काढवत नाही, कारण 'आमचो गावच लय भारी' हे त्यांना पटलेलं आहे.

          गावी आल्यावर, "साला मुंबयवरना आलो, पन मुलांना खायलाच विसरलो" असं म्हणणारे चाकरमानी भेटले की हसू आवरत नाही. येताना मिठाई आणण्याची त्यांची पद्धत अजूनही गेलेली नाही. मिठाई म्हणजे 'म्हैसूरचे पिवळे चिरेच'. साखरेची कापा, म्हातारीचे केस – हा मुंबईचा सुकामेवा लहानपणी मिळाला की आम्ही त्यावर तुटून पडत असू.

          मुंबईच्या आमच्या मुंबईकर मंडळींना देव सुखी ठेवो. त्यांच्या संघर्षाला कोकणी माणसाचा सलाम!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. 1



Sunday, May 25, 2025

🔴 उकडी पेज: आजीची सय

🔴 उकडी पेज: आजीची सय

         कोकणची भूमी म्हणजे निसर्गाची देणगी, जिथे प्रत्येक गोष्टीला एक वेगळीच गोडी आहे. या गोडीचा अविभाज्य भाग म्हणजे उकडी पेज. आजकालच्या पिढीला चायनीज सूपची चटक लागली असली तरी, कोकणातील अनेक घरांमध्ये, विशेषतः माझ्या किर्लोस आंबवणेवाडीतील घरात, आजही उकडी पेज दररोज बनते. ही केवळ एक डिश नसून, ती आठवणींचा, परंपरेचा आणि निस्सीम प्रेमाचा ठेवा आहे.

          माझ्या आजी-आजोबांच्या काळात, उकडी पेजेची चव खरोखरच लय भारी होती. मातीच्या मडक्यात शिजवलेली उकड्या तांदळाची पेज चवदार असे. मोठ्या मडक्यात सर्वांसाठी बनवलेला भात आणि त्या भातावरची उकडी पेज खूप घट्ट असे. दुधावरच्या सायेसारखी घनदाट असलेली ती पेज, सुरसुरीत पिताना तिची गोडी अजूनच वाढत असे. आज ती चव अनुभवण्यासाठी ती जुनी माणसं नाहीत, पण त्यांची पद्धत आणि त्या चवीची आठवण कायम मनात घर करून आहे.

          माझी आजी केवळ एक गृहिणी नव्हती, तर ती एक धार्मिक आणि दयाळू स्त्री होती. घरासमोरून जाणाऱ्या-येणाऱ्या पांथस्थांना ती मुद्दाम बोलावून पाणी आणि चवदार उकडी पेज देऊन त्यांची तहान भागवीत असे. हा केवळ धर्म नव्हता, तर ते तिच्या मायेचे, तिच्या संस्काराचे प्रतीक होते. आपल्या ९ मुलांना तिने याच उकड्या पेजेवर वाढवले, असे म्हणायला हरकत नाही. उकडी पेज तिच्यासाठी केवळ एक अन्नपदार्थ नव्हता, तर तो तिच्या प्रेमाचा, तिच्या जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग होता. उकडी पेज वाळवताना त्यातून दुधासारखी खाली पडणारी घनदाट पेज पाहिली की ती कधी एकदा पितो असे होऊन जाई. 

          आज शहरातल्या घरात पेज गॅसवर बनते. तिला चुलीवरची ती चव येत नाही, हे खरं आहे. त्यातही प्रेम असतं, पण आजीच्या प्रेमाची सय येते, तेव्हा उकडी पेज प्रथम आठवते. ही केवळ एका खाद्यपदार्थाची आठवण नाही, तर ती एका पिढीची, एका जीवनशैलीची आणि त्यातील मूल्यांची आठवण आहे. उकडी पेज आपल्याला साध्यासुध्या जीवनातील आनंद आणि समाधान शिकवते.

          उकडी पेज हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून, तो कोकणच्या संस्कृतीचा, तिथल्या माणसांच्या साधेपणाचा आणि त्यांच्या अथांग प्रेमाचा एक अविस्मरणीय भाग आहे. आजीच्या हाताची ती चव आणि तिने पेजेतून दिलेले ते प्रेम, आजही अनेकांच्या मनात उकड्या पेजेची सय जागवत राहते.

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. 1

ता. कणकवली



Sunday, May 18, 2025

🔴 या गो दांड्यावरना बोलते

          मे महिना... म्हणजे जणूकाही आनंदाची आणि उत्साहाची बरसात! उष्णतेची लाट असली तरी, याच महिन्यात लग्नाची धामधूम अधिक असते. शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या आणि गावाला आलेले चाकरमानी यामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण पसरलेले असते. एकाच मुहूर्तावर अनेक ठिकाणी लगीनघाई पाहायला मिळते.

          'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील 'या गो दांड्यावरना बोलते, नवरा कुणाचा येतो' हे गाणं ऐकताना आजही मन भूतकाळात रमून जातं. डीजेच्या आधुनिक जमान्यातही या गाण्याची मोहिनी कमी झालेली नाही. आजही अनेक लग्नसमारंभात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासारखा असतो. खरं तर, ही गाणी वाजल्याशिवाय लग्न पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही!

          आमच्या घरात तर या मे महिन्यात दोन-दोन मंगलकार्ये झाली.  दोन बहिणी आणि एका आठवड्याच्या अंतराने ठरलेले विवाहसोहळे ! दोन्ही लग्नं अगदी थाटामाटात आणि आनंदात पार पडली. दोन्ही बहिणींनाही त्यांच्या स्वप्नातले राजकुमार मिळाले. एका बहिणीचं लग्न वराच्या गावी, अगदी घरच्यांसारख्या वातावरणात झालं, तर दुसरीचं एका सुंदर हॉलमध्ये. दोन्ही सोहळ्यांना नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी भरभरून हजेरी लावली. घर बघण्याचा, साखरपुड्याचा, ओटी भरण्याचा, पुण्यवचनाचा, विवाह आणि त्यानंतरच्या पाच परतावणीपर्यंतचे सगळे विधी उत्साहात आणि हास्याच्या कल्लोळात पार पडले.

          गावाकडच्या लग्नातील मंगलाष्टकांचा अनुभव तर काही औरच असतो! एकाच वेळी दोन-तीन गायक वेगवेगळ्या सुरात आणि लयीत मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात, ती एक अद्भुत जुगलबंदी असते. माईक नसतानाही त्यांचा आवाज दूरवर ऐकू जातो. दुसऱ्या लग्नात तर कहरच झाला होता! वधू आणि वर पक्षाकडील गायकांनी अक्षरशः चढाओढ लावली होती. प्रत्येकाला आपली मंगलाष्टकं अधिक सुंदर आणि प्रभावी वाटायला हवी होती. आणि खरं सांगायचं तर, सगळ्यांचीच प्रस्तुती खूप छान झाली.      

          नवरा उंच असल्यामुळे त्याला सगळे स्पष्ट दिसत होते, तर नवरी लाजऱ्या डोळ्यांनी खाली पाहत होती. आणि अशातच कुणीतरी 'आली लग्न घटी समीप नवरा' ही सर्वांना परिचित असलेली मंगलाष्टका सुरू केली. मग काय विचारता! सगळ्यांनी मिळून एका सुरात ती म्हटली आणि तो क्षण अक्षरशः अविस्मरणीय बनला.

          'कुर्यात सदा मंगलम' म्हणत जेव्हा सर्वांनी नववधू आणि नवरदेवाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या, तेव्हा वाजंत्र्यांनी एक वेगळाच जल्लोष निर्माण केला आणि दोन अनोळखी जीवांची रेशीमगाठ बांधली गेली. 

          पूर्वी, जिथे नवरा-नवरी एकमेकांना लग्नानंतरच भेटायचे, ते चित्र आता क्वचितच दिसते. आता तर विवाहपूर्व फोटोशूट आणि वेगवेगळ्या पार्ट्यांची क्रेझ आहे. पण वरातीत डीजे वाजायला लागल्यावर सगळ्यांच्याच पायांना एक वेगळीच ताल मिळतो. लहान-मोठी माणसं, स्त्री-पुरुष सगळेच देहभान विसरून नाचताना दिसतात आणि ज्याला नाचता येत नाही, त्यालाही त्या आनंदात सामील व्हावंसं वाटतं.

         अशा प्रकारे, सगळ्यांच्या साक्षीने झालेल्या या विवाहबंधनानंतर, या जोडप्यांवर आयुष्यभर सुखाने संसार करण्याची एक मोठी जबाबदारी येते आणि म्हणूनच अशा पारंपरिक पद्धतीने झालेली लग्नं अधिक काळ टिकतात, यात काही शंका नाही.

©️ लेखक : प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. 1



Wednesday, May 14, 2025

🔴 दहावीच्या परीक्षेत झळाळते यश! विनोद आणि वेदांत या दोन्ही भावांचे मनःपूर्वक अभिनंदन!

🔴 दहावीच्या परीक्षेत झळाळते यश! विनोद आणि वेदांत या दोन्ही भावांचे मनःपूर्वक अभिनंदन!

         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांनी, विनोद आणि वेदांत यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या दहावीच्या परीक्षेत अत्युच्च यश संपादन करून आपल्या कुटुंबाचा आणि गावकऱ्यांचा नावलौकिक वाढवला आहे. या दोघांच्याही मेहनतीचे आणि जिद्दीचे हे फळ आहे, ज्याने त्यांना उज्ज्वल यश प्राप्त करून दिले आहे.

          विनोदने या परीक्षेत तब्बल $458+05/500 गुण मिळवून 92.60% ची नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मराठी, हिंदी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच सामाजिक शास्त्र यांसारख्या विषयात त्याने विशेष प्रावीण्य दाखवले आहे. त्याची शैक्षणिक तळमळ आणि विषयांवरील पकड या निकालातून स्पष्टपणे दिसून येते.

          त्याचप्रमाणे, वेदांतने देखील उत्तम यश संपादन करत 418/500 गुण मिळवले आहेत, जे 83.60% इतके आहेत. मराठी, हिंदी आणि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात त्याने चांगले गुण प्राप्त केले आहेत. दोघा भावांनीही आपापल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करून हे यश मिळवले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

          आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही भावांनी कठोर परिश्रम घेतले आणि आज त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. एकाच कुटुंबातील दोन मुलांनी एकाच परीक्षेत असे उत्तम यश मिळवणे ही खरंच दुर्मिळ आणि आनंददायी बाब आहे.

          विनोद आणि वेदांत, तुमच्या या शानदार यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 

          तुम्ही याच जिद्दीने आणि मेहनतीने नवनवीन शिखरं गाठत राहा, याबद्दल आम्हाला खात्री आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

©️ तुमचे: कुबलसर



Sunday, May 11, 2025

🔴 निरु आत्ये

 🔴 निरु आत्ये

          बिडवाडीच्या मगरवाडीत माझी आत्ये राहायची. माझ्या वडिलांनी तिला प्रेमाने 'गुलाबायो' म्हणायचे. तिचे पती, म्हणजेच आमचे जीजी, एक प्रसिद्ध वैद्य होते. जीजींना रामचंद्र नावाचे एक भाऊ होते, आणि त्यांच्या पत्नीचे नाव सीताबाई. रामचंद्रकाकांना सगळे 'नाना' म्हणत, तर सीताबाई आमच्यासाठी 'निरु आत्ये' होत्या.

          निरु आत्ये... किती प्रेमळ आणि चांगली आत्ये होती ती! तिने आम्हांला खूप माया लावली. ती बिडवाडीत राहत होती आणि तिचे पती, नाना, मुंबईच्या पोस्ट खात्यात नोकरी करत होते. त्यामुळे त्यांचे निम्मे आयुष्य मुंबईतच गेले. नोकरीमुळे ते क्वचितच, म्हणजे मे महिन्यात किंवा सण-समारंभाला गावी येत. त्यामुळे त्यांची आणि आमची फारशी जवळीक झाली नव्हती, पण आमच्या निरु आत्येने आम्हांवर निस्सीम प्रेम केले.

          आम्ही जेव्हा बिडवाडीला जायचो, तेव्हा आमची गुलाआत्ये आणि निरु आत्ये एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसायच्या आणि आम्ही त्यांच्यात सामील होऊन जायचो. त्यांची मुले – बबन, बायग्या, रमो, राजू, जगी आणि पपी – यांच्यासोबत आम्ही कितीतरी खेळलो होतो. आता ही सर्व मंडळी विवाहित आहेत आणि त्यांना मुलेबाळेही झाली आहेत.

          काळानुसार त्यांचे एकत्र कुटुंब विभक्त झाले असले, तरी त्यांची मने आजही जुळलेली आहेत. प्रत्येक कुटुंबात काही ना काही घडतच असते, पण आमच्या जीजीकाकांनी आणि नानांनी आम्हांला चांगली शिकवण दिली. गुलाआत्येने आणि निरु आत्येने तर आम्हांला आईसारखे प्रेम दिले. जवळ घेऊन मायेची ऊब दिली आणि प्रेमाने नाना प्रकारचे पदार्थ करून खाऊ घातले. गावी गेल्यावर त्यांच्या मिठीत एक वेगळाच आधार मिळायचा. गुलाआत्ये आणि निरु आत्ये या दोघींनीही आम्हांवरच्या प्रेमात कधीच भेदभाव केला नाही. आमचे चुकले तर कान पकडायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.      

          आमच्या आयुष्यातील यशात या बिडवाडीच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे आणि हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही.

          काही दिवसांपूर्वी, आमच्या लाडक्या 'निरु आत्ये'चे देहावसान झाल्याची दुःखद बातमी कानावर आली. एक प्रेमळ आणि चांगली आत्ये आम्हांला कायमची सोडून गेली, याचे खूप वाईट वाटले. चांगली माणसे जेव्हा आपल्यातून जातात, तेव्हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा सल्लागार हरवल्याची भावना मनात घर करून जाते. राजू, जगी आणि पपी यांना होणारे दुःख मी समजू शकतो. आई-वडील कोणालाच शेवटपर्यंत पुरत नाहीत, पण त्यांच्या आठवणींच्या साथीनेच पुढील जीवन जगायचे असते. येत्या १८ मे २०२५ रोजी निरु आत्येचे धार्मिक कार्य आहे. आपल्यावर मोठे संकट आले की आपण आई किंवा बाबांच्या कुशीत जाऊन रडतो, पण आता निरु आत्येची ती प्रेमळ कुशी तिच्या मुलांसाठी कायमची पारखी झाली आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल



Saturday, May 10, 2025

माझ्या प्रिय पपूसाठी... बाळूदादाचा प्रेमळ लेख

माझ्या प्रिय पपूसाठी... बाळूदादांचा प्रेमळ लेख

माझ्या लाडक्या पपूचा आज वाढदिवस! हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण पपू केवळ माझा भाऊ नाही, तर त्याहूनही अधिक आहे. तो माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.

माझे प्रिय भाईमामा, पपूचे वडील... एक प्रेमळ आणि मायाळू व्यक्तिमत्व! त्यांचे पपूवर जीवापाड प्रेम होते आणि पपुनेही आपल्या वडिलांसाठी खूप काही केले. भाईमामांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेक डॉक्टरांना दाखवले, नवनवीन उपचार केले. अपयश आले तरी खचून न जाता, तो त्यांना आशेने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. त्याची ही तळमळ आणि वडिलांवरील निष्सीम प्रेम पाहून मन गहिवरून येते.

खरं तर, भाईमामांचे आयुष्यच अल्प होतं. नियतीला ते लवकर हवे होते. पण मामा गेल्यानंतर पपुने जो धीर दाखवला, तो अविश्वसनीय होता. त्या तरुण वयात त्याने खंबीरपणे आमच्या संपूर्ण कुटुंबाची धुरा सांभाळली. अनेक संकटे आली, पण त्याने आपल्या कणखर स्वभावामुळे त्या सर्वांवर यशस्वीरित्या मात केली. त्याचा हा मोठेपणा आणि जबाबदारीची जाणीव खरंच कौतुकास्पद आहे.

माझं बालपण त्याच्या घरीच गेलं. लहानपणापासून मी त्यांच्या घरी अनेकदा गेलो, राहिलो. त्याची आमच्या आई-वडिलांवर खूप माया आहे. भाईमामांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला होता, आमचा मार्गदर्शक हरपला होता. पण पपुने कधीही आम्हाला त्यांची उणीव जाणवू दिली नाही. त्याने मोठ्या भावाप्रमाणे नेहमी आमची काळजी घेतली, आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन केले.

आम्ही वयाने मोठे असलो तरी, पपु त्याच्या कर्तृत्वाने खूप मोठा आहे. तो स्वतः आणि त्याच्या प्रेमळ पत्नीच्या साथीने कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी उत्तम प्रकारे जोडलेला असतो. आम्हा सगळ्यांनाच पपू आणि त्याचे कुटुंब खूप प्रिय आहे. त्याने इतरांच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या, पण स्वतःच्या अनेक इच्छांना मुरड घातली. त्याची ही selfless वृत्ती त्याला आणखी महान बनवते.

आज त्याच्या वाढदिवशी, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या मनातल्या सर्व अपूर्ण राहिलेल्या इच्छा पुढील वाढदिवसापर्यंत नक्की पूर्ण होवोत. त्याला आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो! त्याचे जीवन आनंद आणि समाधानाने परिपूर्ण असो!

तुझा प्रेमळ,

बाळूदादा


🔴 विहानच्या उज्ज्वल भविष्याची एक झलक

🔴 विहानच्या उज्ज्वल भविष्याची एक झलक

         आज माझ्या मनात आनंदाची एक अनोखी लहर दाटून आली आहे. विहान मनीषा अजय राव याने ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत तब्बल 96% गुण मिळवले हे वाचून मन अभिमानाने भरून आले. हा विहान... तोच ना, ज्याच्या बालपणीच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत!

          2012 साली जेव्हा मी मांगवली नं. 1 शाळेत एक नवखा शिक्षक म्हणून रुजू झालो, तेव्हा माझ्यासमोर राहण्याचा प्रश्न उभा होता. त्यावेळी विहानचे आजोबा, आदरणीय चंद्रकांत राणे यांच्या घरात मला आसरा मिळाला. याचमुळे विहानच्या कुटुंबातील सदस्यांशी माझा स्नेहबंध जुळला. त्यांचे मोठे बंधू, श्रीधर राणे यांनी मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली आणि मांगवली माझं दुसरं 'घर' झालं. 

         माझ्या आठवणींच्या पानांवर विहानच्या आजोबा-आजींच्या भेटी आजही सोनेरी अक्षरात कोरल्या आहेत. दरवर्षी, ते दोघेही न चुकता विहानच्या वाढदिवसानिमित्त खास ठाण्याहून शाळेत येत. त्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून मन भरून येई. शाळेतील मुले जेव्हा विहानला 'Hi' करत, तेव्हा त्याचे व्हिडिओ आम्ही त्यांना पाठवत असू आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असे.

         विहानचा वाढदिवस म्हणजे शाळेसाठी एक आनंदसोहळाच असे! त्या दिवशी शाळेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या तब्बल 21 विद्यार्थ्यांना सुंदर शैक्षणिक भेटवस्तू मिळत, तर कधी रोख स्वरूपात बक्षीसही असे. इतर मुलांनाही आकर्षक भेटवस्तू मिळत आणि दुपारच्या जेवणात सर्वांसाठी रुचकर, गोड बासुंदीचा बेत असे.

          या सगळ्या गोष्टींपूर्वी मला आठवते, आदरणीय मनीषा राव मॅडम यांचा फोन यायचा. त्या अत्यंत आदरपूर्वक चौकशी करायच्या आणि शाळेतील पटसंख्येनुसार भेटवस्तू पाठवून देत, कधी कधी तर पैसेही पाठवत. त्यांच्या सांगण्यानुसार त्या भेटवस्तू विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी माझी असे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, ज्याबद्दल मी त्यांचा आजही आभारी आहे.

         मांगवली शाळेत मी सात वर्षे सेवा केली आणि या काळात राव कुटुंबीयांशी माझा नियमित संपर्क होता. नवीन शाळेत आल्यावर संपर्क थोडा कमी झाला, तरीही विहानचे आजोबा आजही मला फोन करून आठवण काढतात. एकदा तर ते आणि आजी दोघेही कणकवलीत आमच्या घरी जेवायला आले होते, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.

विहान लहानपणापासूनच एक अत्यंत हुशार मुलगा आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याला उत्तम संस्कार दिले आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्याला सतत प्रेरणा दिली. त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत आहेत.

         आज विहानने दहावीच्या आंतरराष्ट्रीय बोर्डात जे अभूतपूर्व यश मिळवले आहे, ते केवळ त्याचेच नव्हे, तर त्याच्या सुजाण पालकांच्याही परिश्रमाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. हे यश त्यांच्या यशोशिखरावरचा मानाचा तुरा आहे, असे म्हणणे नक्कीच योग्य ठरेल.        

          विहान, तुझ्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! तू निश्चितच उज्ज्वल भविष्य गाठशील यात मला तिळमात्र शंका नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

निपुण भारत: उद्याच्या पिढीसाठी ज्ञानाचा दीपस्तंभ

निपुण भारत: उद्याच्या पिढीसाठी ज्ञानाचा दीपस्तंभ

शिडवणे गावातील शाळेत नुकतीच एक अनोखी गोष्ट मुलांच्या मनात रुजली. मुख्याध्यापक प्रवीण सरांनी 'निपुण भारत' या महत्त्वाकांक्षी योजनेची कथा अगदी सोप्या शब्दांत मुलांना सांगितली. ही केवळ एक योजना नाही, तर आपल्या देशाच्या भविष्याची आधारशिला आहे, ज्ञानाचा एक तेजस्वी दीपस्तंभ आहे, जो प्रत्येक मुलाला सक्षम आणि सुजाण बनवण्याचे स्वप्न पाहतो.

'निपुण' या शब्दाचा अर्थच आहे 'हुशार'. या कार्यक्रमाचा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे - 'निपुण सदा बोलावे, अभ्यासावे जनांसी सांगावे'. याचा अर्थ असा की प्रत्येक मुलाने चांगले आणि ज्ञानवर्धक बोलायला शिकले पाहिजे, आपले लक्ष अभ्यासात केंद्रित केले पाहिजे आणि जे काही ज्ञान अर्जित केले आहे, ते इतरांनाही आनंदाने वाटले पाहिजे. कारण ज्ञान वाटल्याने वाढते, आणि याच विचारातून एका सुजाण समाजाची निर्मिती होते.

आपल्या देशाने एक महत्त्वाचे ध्येय निश्चित केले आहे - 2026-27 पर्यंत प्रत्येक मुलाला साक्षर करायचे आहे. केवळ अक्षरांची ओळख पुरेशी नाही, तर 'संख्यात्मक ज्ञान ते द्यावे' म्हणजे मुलांना आकडेमोड आणि गणिताचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.

या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पाया मजबूत करणे गरजेचे आहे. 'पायाभूत लेखन, वाचन, विकसित ते करावे' यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. लहान वयातच मुलांची लिहायची आणि वाचायची क्षमता चांगली विकसित झाली, तर पुढील शिक्षणाचा मार्ग सोपा होतो. त्याचबरोबर 'गणितीय कौशल्य बाणवावे' म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची आणि गणितातील संकल्पना समजून घेण्याची क्षमता मुलांमध्ये रुजवली जाईल.

'निपुण भारत' हा केवळ एक स्थानिक किंवा राज्याचा कार्यक्रम नाही, तर 'एन म्हणजे नॅशनल, राष्ट्रीय कार्यक्रम आहे'. ही एक देशव्यापी मोहीम आहे, 'आय म्हणजे इनिशिएटिव्ह आहे', एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे, जी आपल्या भावी पिढीला सक्षम बनवण्यासाठी उचललेले एक ठोस पाऊल आहे. 'पी फॉर प्रोफिसीयंसी, यू फॉर अंडरस्टँडिंग आहे' म्हणजे प्रत्येक मुलाने केवळ ज्ञान मिळवू नये, तर ते ज्ञान त्याला व्यवस्थित समजले पाहिजे. आणि 'एन फॉर न्यूमरसी आहे', आकडे आणि संख्यांचे महत्त्व अनमोल आहे.

या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात जुलै 2021 मध्ये झाली आणि 2027 पर्यंत या ध्येयाला मूर्त स्वरूप देण्याचा संकल्प आहे. शिक्षण केवळ पुस्तकी नसावे, म्हणूनच 'खेळ, कथा आणि ताल, स्थानिक कला, हस्तकला' यांचा समावेश करण्यात आला आहे. मुलांना खेळातून शिकायला मिळेल, कथांमधून कल्पनाविश्वाची सफर करता येईल, आणि आपल्या स्थानिक कला व हस्तकलांची ओळख होईल. 'संगीतालाही महत्त्व द्यावे', कारण संगीत हे केवळ मनोरंजन नाही, तर ते एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढवते.

शिकण्याच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि मुलांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी 'नाही कशात अडखळणे, आणि नाही उगीच भटकणे' हा महत्त्वाचा नियम आहे. प्रत्येक मुलाने 'वाचन-लेखनात प्रवीण होणे' म्हणजेच वाचण्यात आणि लिहिण्यात निष्णात असणे आवश्यक आहे.

शिकलेले ज्ञान केवळ पुस्तकात राहू नये, ते व्यवहारात उपयोगात यावे यासाठी 'प्रश्नांची उत्तरे देणे, नित्य अभ्यासे प्रकटावे' महत्त्वाचे आहे. मुलांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देता आली पाहिजेत आणि यासाठी नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे. यामुळे 'मार्ग आमुचे सुलभ वाटावे', म्हणजे शिक्षणाचा मार्ग अधिक सोपा आणि आनंददायी होईल.

अक्षरांची ओळख ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. म्हणूनच 'क, ख, ग, घ, ङ, आणि ए, बी, सी, डी' यांसारख्या अक्षरांचे ज्ञान मुलांना व्यवस्थितपणे दिले जाईल, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणाची मजबूत नींव मिळेल.

या सगळ्या प्रयत्नांचा उद्देश एकच आहे - 'अपुल्या भारत देशा, निपुण करत राहावे'. आपल्या देशाला ज्ञानी आणि सक्षम बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे आहे. 'ध्येयासाठी सदैव झुंजावे', या उदात्त ध्येयासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायचे आहेत.

जेव्हा आपला 'भारत निपुण होई, परिपूर्ण भारत होई', तेव्हा हे केवळ एक स्वप्न राहणार नाही, तर ती एक ऐतिहासिक सत्यता असेल. 'हाचि सुबोध अमुचा, इतिहासे करुन दाखवावे', हाच आपला निर्धार आहे आणि याच निर्धारातून एका नवीन, सशक्त आणि ज्ञानी भारताची निर्मिती होईल. प्रवीण सरांनी सांगितलेली ही गोष्ट केवळ एक प्रेरणा नाही, तर एक कृती कार्यक्रम आहे, ज्यामध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग महत्त्वाचा आहे. चला तर मग, या ज्ञानयज्ञामध्ये आपणही आपली समिधा अर्पण करूया!


🔴 आई : देवाजीची माया

🔴 आई : देवाजीची माया

          माझी आई... खरंच खूप ग्रेट होती ती! अतिशय संवेदनशील आणि मितभाषी. तिच्या डोळ्यांत आम्हाला आमचं संपूर्ण जग दिसत असे. ती जास्त बोलली नसली, तरी तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक भावावरून आम्ही तिच्या मनातलं अचूक ओळखायचो. आपल्या कुटुंबाने नेहमी आनंदात आणि सुख-समाधानात राहावं, हेच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. त्यासाठी ती स्वतःच्या जीवाचंही रान करायला तयार असायची. तिला स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे, हे तिने कधीच स्वतःहून सांगितलं नाही.

          तिने नेहमी आपल्या पतीदेवांच्या म्हणजेच बाबांच्या मताचा आदर केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कदाचित आम्ही कधी तिचा विचार केला नसेल, पण तिने मात्र आमच्या भल्याचाच नेहमी विचार केला. तिच्यामुळेच आज आम्ही चांगले घडलो आहोत. बाबांनी आम्हाला जगायची दिशा दाखवली, तर आईने आम्हाला खऱ्या अर्थाने जगवलं. 

          स्वतः उपाशी राहून तिने आमची पोटं भरली. तिच्या स्वयंपाकघरात कधीही कशाचीही कमतरता नसायची. तिने केलेली उसळ तर इतकी चविष्ट असायची की विचारू नका! तिच्या प्रत्येक जेवणात प्रेम ओतप्रोत भरलेलं असे. त्यामुळे तिच्या साध्या जेवणालाही एक वेगळीच गोडी यायची, जी फक्त तिलाच ठाऊक होती. 

          आम्ही सर्व भावंडं तिची लाडकी होतो.पण माझ्या छोट्या भावावर तिचं जरा जास्तच प्रेम होतं. तो तिच्याशिवाय क्षणभरही राहायचा नाही. त्याला चहात चपाती बुडवून भरवतानाची आईची प्रेमळ मूर्ती माझ्या डोळ्यासमोर अजूनही जशीच्या तशी उभी आहे. 

          माझा भाऊ बाबांना थोडा घाबरायचा, पण आई त्याची खास दोस्त होती. आई आता जिथे कुठे असेल, तिथून ती आम्हा सर्व भावंडांकडे नक्कीच लक्ष ठेवून असेल. 

          आज मातृदिन आहे म्हणून नाही, तर ती कायमच आमच्यासोबत असायला हवी होती, इतकं तिचं आमच्यावर निस्सीम प्रेम होतं. ती आमची लाडकी आई होती आणि म्हणतात ना, लाडक्या माणसांना देव लवकर घेऊन जातो... तसंच काहीसं झालं. 

          आमची आई आम्हाला कायमचं सोडून गेली. तिने कधी आमच्यावर राग काढला नाही, कधी रुसून बसली नाही. तिला आमच्याकडून काहीच नको होतं, फक्त आणि फक्त प्रेम!!!

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 सुट्ट्यांतील पत्त्यांचे रंग

🔴 सुट्ट्यांतील पत्त्यांचे रंग

          सुट्टी म्हटलं की विविध बैठ्या खेळांची आठवण येते. आमच्याकडे बालपणी सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ आणि पत्ते असे खेळ असत. आजही हे खेळ प्रत्येक घरात असणार आणि त्यात पत्त्यांचा खेळ तर विशेष लोकप्रिय असेल. काही घरात तर रात्र रात्र जागून पत्त्यांचे डाव रंगतात.

          मे महिन्यात मुंबईचे 'चाकरमानी' गावी परतताना सोबत पत्ते घेऊन येतात आणि मग संध्याकाळ झाली की रात्री जेवण होईपर्यंत 'पत्त्यांचा खेळ' रंगात येतो. आम्हांला पत्ते खेळायला शिकायला मिळालं ते श्रीधर सावंतांच्या घरी.     

          गांगोवाडीत आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो, त्या घरातील सर्वजण 'पत्तेप्रेमी' होते. त्यामुळे नकळतच आमचंही पत्त्यांवर प्रेम जडलं. पत्ते खेळतांना त्यांनी आम्हांला काही 'जादू'च्या ट्रिक्ससुद्धा शिकविल्या, ज्या आजही लक्षात आहेत. ती जादू शिकवणारी माणसं तर मनात कायम घर करून राहिली आहेत.

          पत्त्यांमधील खेळांचा राजा म्हणजे 'मेंडी कोट'! गंमत म्हणजे मी त्याला पूर्वी 'मेंढी कोट' म्हणायचो. पत्त्यांमध्ये एकही मेंढी किंवा बकरी नसताना त्याला मेंडी कोट का म्हणतात, हे मला अजूनही कोडं आहे. आणि त्यात प्रत्यक्ष कोट नसतानाही आपल्याला 'कोट' लागतो! दहाला 'मेंडी' म्हणतात आणि अशा चार मेंड्या मिळाल्यावर प्रतिस्पर्ध्याला 'मेंडी कोट' बसतो. 

          आम्ही अनेकदा असे कोट मोठ्या खुशीने स्वीकारले आहेत, पण दुसऱ्यांना कोट चढवण्याइतका शहाणपणा अजूनही आमच्यात आलेला दिसत नाही! त्यावेळी राजा, राणी आणि गुलाम यांचे चित्र असलेले पत्ते डोळ्यासमोर नाचत असतात.

आमचे बाबा शिस्तीच्या बाबतीत खूप कठोर होते. त्यांना स्वतःला पत्त्यांचा खेळ आवडत असला तरी, आम्ही पत्ते खेळून बिघडून जाऊ नये म्हणून ते आम्हांला खेळू देत नसत. पण सुट्ट्या आल्या की त्यांचा नाइलाज होई आणि ते काही काळासाठी त्यांची शिस्त थोडी शिथिल करत. 

          आम्ही त्यांना पत्त्यांच्या जादू दाखवू लागलो की त्यांनाही त्यात गंमत वाटे. पण ही गंमत फार काळ टिकायची नाही. आम्ही दिवसभर पत्तेच खेळतोय हे कळल्यावर, कधीतरी तेच पत्ते चुलीत जळताना दिसत!

          आज आमच्या घरात मी एका बाजूला साऊथ इंडियन चित्रपट बघतोय आणि दुसऱ्या बाजूला मेंडीकोटचा खेळ रंगात आला आहे. मोठ्या मोठ्याने हास्याचे आवाज येत आहेत आणि एकमेकांना कोट चढवण्याची स्पर्धा सुरू आहे. तुमच्याही घरात सध्या असे 'कोट' सुरू आहेत का?

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

          सत्य घटनेवर आधारित 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट केवळ बघण्यापुरता नाही, तर तो प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करण्यासारखा आणि शिकलेल्या-न शिकलेल्या प्रत्येकाने पुन्हा पुन्हा अनुभवावा असा आहे. यात दाखवलेला शिक्षक म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेची खरी गरज आहे. 

          विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची केवळ आवड नव्हे, तर एक धगधगता 'वणवा' पेटवण्याची क्षमता शिक्षकामध्ये हवी, हे हा चित्रपट प्रभावीपणे दाखवतो.

         या चित्रपटातील शिक्षकाने परिस्थितीपुढे हार मानलेली नाही. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून कसा सकारात्मक बदल घडवता येतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. 

          एका ध्येयवेड्या शिक्षकाची तळमळ आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारा खोलवर परिणाम चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णपणे समजणार नाही. याची कथा सांगून त्यातील उत्कंठा कमी करण्यात अर्थ नाही. क्लायमॅक्स तर चित्रपटगृहात डोळे पुसताना अनुभवायचा विषय आहे.

         खरं शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं, हे तेव्हा कळतं जेव्हा शिक्षणामुळे समाजात आदर मिळतो, जगण्याची दिशा सापडते. अनेकजण मोठे होत असताना घरच्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून दूर राहतात. मनात असूनही शिक्षण घेता येत नाही आणि मग 'सातवी नापास' किंवा 'आठवी नापास' असं सांगतानाही संकोच वाटतो. 

          स्वतःला शिक्षण घेता आलं नसलं तरी, आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकावं, चांगलं भविष्य घड़वावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी होणाऱ्यांच्या व्यथा या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. हा चित्रपट केवळ विद्यार्थ्यांबद्दल नाही, तर समाजात कचरा गोळा करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवनावरही मार्मिक भाष्य करतो.

          आज 'नवसाक्षरता अभियान' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आपले अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. साक्षर झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवण्यासारखा आहे. 

          एक शिक्षक म्हणून मला याचा आनंद आहेच, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर तर माझी छाती अभिमानाने आणखी फुलून आली आहे. शिक्षकाने जर मनात आणलं, तर तो आपल्या विद्यार्थ्यांना असं घडवू शकतो की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलते. हे आयुष्य बदलण्याचं व्रत प्रत्येक शिक्षकाने जपायला हवं.        

          कारण शिक्षक हा केवळ एक पेशा नाही, तो एक आदर्श आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 आप्पासाहेब पटवर्धन: कोकणचे गांधी - गोपुरीतील एका क्षणाची भेट

 🔴 आप्पासाहेब पटवर्धन: कोकणचे गांधी - गोपुरीतील एका क्षणाची भेट

          कणकवलीतील 'गोपुरी आश्रम' ही केवळ एक जागा नाही, तर परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या त्याग आणि कार्याची साक्षीदार आहे. त्यांना 'कोकणचे गांधी' म्हणून ओळखले जाते आणि ते अगदी सार्थ आहे. त्यांच्या या आश्रमात अनेकदा जाण्याचा योग मला लाभला आहे. पूर्वी येथे गाई-गुरे आनंदाने चरत असत आणि म्हणूनच या पवित्र भूमीला 'गोपुरी' हे नाव पडले असावे, असे मला वाटते. आप्पासाहेबांनी सुरू केलेले अनेक लोककल्याणकारी उपक्रम आजही गोपुरीमध्ये पाहायला मिळतात.

          आज मी याच गोपुरीमध्ये एका शांत आणि शीतल अशा चिकूच्या झाडाखाली बसून हा लेख लिहित आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेली ही गोपुरी नगरी अनेकांनी केवळ पुस्तकांमध्ये वाचली असेल. पण ज्या भूमीत प्रत्यक्ष 'आप्पा' राहिले, त्या पवित्र स्थळी काही क्षण घालवल्यास आणि त्यांच्या निष्पाप प्रतिमेकडे टक लावून पाहिल्यास, 'कोकणचे गांधी' आप्पासाहेब तुमच्याशी नक्कीच संवाद साधतील, असा अनुभव येतो. निसर्गाची ओढ असणारा प्रत्येक संवेदनशील माणूस या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

          आप्पासाहेबांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला आणि त्यांचे देहावसान १० मार्च १९७१ रोजी झाले. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ २२ मार्च १९७१ रोजी त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानिमित्त उभारलेल्या स्मृतिफलकावर एक मार्मिक संदेश कोरलेला आहे: 'परि अवशेष तनुचे सारे, गाडावे तरुतळी, एकची इच्छा नच फेकावे पवित्र गंगाजळी'. त्यावेळी दिलेला हा उदात्त विचार आजही अनेकांना पूर्णपणे समजलेला दिसत नाही, याची खंत वाटते.

          आज योगायोगाने, मी माझ्या दुचाकीच्या दुरुस्तीसाठी जवळच्या शोरूममध्ये आलो होतो. ती दुरुस्त व्हायला बराच वेळ लागणार होता. वेळेचा सदुपयोग व्हावा आणि आप्पांच्या पवित्र भूमीत थोडा विसावा मिळावा म्हणून मी इथे आलो आणि या विचारांची लेखणीतून निर्मिती झाली.

लेखन: प्रवीण अशितोष कुबल



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...